मागे वळून पाहताना… भाग २

Author: Share:

वानगीदाखलअशा घरातील सैरभैर स्त्रीचेएकप्रातिनिधिक मुक्तक सूचक वाटते.

वस्त्र सतीचे!   

सासरच्या संबंधाचं पोत अति हीन निघालं सख्यांनो अति हीन निघालं

विणायला घेतला होता मी झब्बा, पण हाती माझ्या झबलंआलं.

तारुण्याच्या उत्साहात नववधूनं संबंधांचं नीटस वस्त्र विणायला घेतलं,

सख्यानो मी खरंच नीटस वस्त्र; विणायला घेतलं होतं;

‘ते’ उसवत असल्याचं दिसत असून, विणकामाचं आव्हान मी पेललं होतं.

आशावादाच्या स्वप्नात रंगलेली मी एकतर्फी वस्त्र विणत राह्यले,

सख्यांनो मी एकटीच विणकाम करत राह्यले,

कधीतरी दुसऱ्या बाजूत सदिच्छा मिसळेल, या आशेत मूर्खासारखी रमत राहिले.

जीवनाचे महावस्त्र विणून, झब्बा शिवल्यावर जाणवले मला की 

दुसरी बाजू विणली न गेल्याने, वीण विसविशीत झाली आहे, तरी सख्यांनो,

आशावादी मनात, अंतिम आशा तरारली, पाण्यात बुडवले की वस्त्र घट्ट होते,

सख्यांनो,दुर्दम्यआशा तग धरलेल्या मनातील आशा मेली नव्हती, पण…

एकतर्फी वीण कालप्रवाहात इतकी आटली की

विणायचा होता झब्बा, पण हाती माझ्या झबलं आलं.

झबलं पाहून जाणवलं, सख्यांनो मला प्रकर्षानं जाणवलं,

नवरा आणि सासररुपी रणात सदिच्छेचे बी पेरणे हा आशावाद नसून मूर्खपणा होता, 

सख्यांनो मृगजळाने तहानभागेल, असे समजण्याचा माझा तो भाबडेपणा होता, 

तो संपवून उरलं-सुरलं जीवन तरीजगण्याचा आदेश मला मिळाला आहे!

सख्यांनो एका मूर्ख स्त्रिला पन्नाशीत अक्कलदाढ आली आहे!

सख्यानो मला आता अक्कलदाढ आली आहे!

बहुतेक पुरुषांना आपल्यामुळे, तिला फक्त कर्तव्य करावी लागली, हे उशीरा तरी कळले आहे. पण ते कबूल करण्याची क्षमता सर्व पुरुषात नसते, जे इगोवर मात करू शकले, त्यांच्या मनात सहानुभूती दाटली. ऋतुनिवृत्तीचा काळ पासिंग फेज समजून त्यांनी तो ओलांडण्यास पत्नीस मदत केली. तिने मदत नाकारली वा मागच्या गैर वर्तनाचा संदर्भ देऊन टोमणे मारले तरी ते अपमान समजले नाहीत. तो वैफल्याचा चीत्कार आहे, हे त्यांनी समजून घेतले. टोमणे पचवण्यास अपराधाचे परिमार्जन ठरवून त्यांनी पत्नीस तोल सावरण्यास अवधी दिला. पश्चात्ताप नि अश्रू कितीही खरे असले तरी गेलेला काळ परत आणण्यास ते समर्थ नसतात, हे समंजस पत्नीनेही समजून घेतले. अशा दांपत्याचा भूतकाळ बिघडला तरी वर्तमान नि भविष्यकाळ निवांत झाला.

पण वर्षानुवर्षे जुलूम सोसून ज्वालामुखी झालेली पत्नी एकदा सॉरी म्हणताच चंद्रमुखी होईल, अशी अपेक्षा बाळगणाऱ्या पुरुषांचे चूक कबूल करणे वरपांगी ठरले. पश्चात्ताप खरा असेल तर क्षमा मिळेतो धीराने घेण्याचा समंजसपणा आपसूक निर्माण होतो.  वरपांगी पश्चात्ताप ‘चूक कबूल केली तरी…’ असा गळा काढण्यास प्रेरित करतो. अनेक वर्षे उपचाराविना ठसठसलेली जखम, एकदा सॉरी म्हणताच भरावी, हा आग्रह वा अपेक्षा गैर असल्याचे कळले नाही, त्यांचा अतीत नासला होताच, पण ते वर्तमान नि भविष्यही निवांत करू शकले नाहीत.

परिस्थितीची कारणे तपासायची मार्ग  शोधण्यासाठी! पुढे यापेक्षा अधिक भयानक परिस्थिती निर्माण होईल, असे म्हणून मोकळे होण्यासाठी नव्हे! आता प्रश्न पूर्वीइतके सीमित राहिलेले नाहीत. काळाचा रेटा देशात माजलेल्या प्रचंड भ्रष्टाचाराचे प्रश्न निर्माण करत आहे. लग्नाची व्याख्या बदलते आहे. बदलांचा स्वीकारून त्यास हितप्रद वळण कसे देता येईल, यासाठी वैचारिक चर्चा व्हाव्यात नि योग्य योजनांची आखणीही! कालची पिढी प्रतिगामी होती आणि तरुण उथळ आहेत, हा विचार नवा नाही. विविध कारणे दाखवून हाच विचार जनरेशन गॅपच्या संदर्भात प्रत्येक पिढीने व्यक्त केला आहे. काळाची कूसपालट होत असताना, याचा गंभीर विचार व्हावा. आपल्या पिढीने संक्रमणास तोंड दिले. म्हणून हे आपणच केले पाहिजे! तरुण पिढीत नैसर्गिक स्त्रीत्व आणि पौरुषत्वाचा विचार रुजवणे, स्त्रीत्व जागे करत समान अधिकार प्राप्त करण्याची गरज कौशल्याने बिंबवणे, ही कठीण आव्हाने आहेत. स्त्रीत्व वा पौरुष इंग्रजी माध्यमात शिकलेल्या मुलांना कळत सले तरी त्यांना ‘Men from Mars & women from Venus’ हे कळते.

या संदर्भात एक आख्यायिका आठवते. भूतलावरील अनाचार नि विकृतीचे थैमान माजलेले पाहून विश्वकर्मा वैतागला. नैराश्याच्या भरात त्याने पृथ्वी बेचिराख केली. नैराश्याचा भर ओसरल्यावर त्याची नजर अनायासे वसुंधरेकडे वळली. हिरवीकंच अवनी नि निरागस मानव पाहून त्याने डोळे विस्फारले. तो नकळत उद्गारला, “मी सारे बेचिराख केल्यावर हे कुणी केले?”

“मी!” नम्र स्वरात पण ठाम उत्तर मिळाले.

 “प्रलयकारी विनाशानंतर निर्मिती करण्याची क्षमता असलेला हा ‘मी’ कोण?” विश्वकर्म्याच्या स्वरात टोकाचे आश्चर्य!

“मी ‘हा’ नसून ‘ही’ आहे! मी जननी! माता! तुम्ही मला विश्वासानं सृजनक्षमता दिली. ती मी जिवाच्या करारानं जपली. जीवनाचं बीज, मी उद्ध्वस्त होऊ दिलं नाही!”

विश्वकर्मा नतमस्तक झाला. संहारकर्त्याचा प्रलयाग्नी मातेच्या चरणी शांत होतो. गर्भधारण करते ती मादी! मातृत्व मनाने नि मानाने धारण करते ती माता! हल्ली सारे संबंध शारीर कक्षेस सीमित होत आहेत, म्हणून परिस्थिती विपरीत बनली आहे.

आख्यायिका खरी नसते. पण ती पूर्णपणे कपोलकल्पितही नसते! त्यात सूचक अर्थ दडलेला असतो. हा आशय समजून घेऊ. विधायक मार्गाने जाऊ. नैराश्य दूर सारून केल्याने होत आहे रे…, म्हणत आधी केले पाहिजे, हा विचार आत्मसात करू. ‘निश्चयाचे ऐसे बळ तुका म्हणे तेचि फळ’ म्हणत तुकोबांचे स्मरण करू. अशक्यप्राय प्रसंगी मला नेहमी एक शेर आठवतो. जो मी वारंवार ऐकवतेही! ‘कौन कहता है आकाशमें सुराख नही होता, तबियतसे एक पत्थर तो उछालो यारो.’ खरोखर विचारपूर्वक उपायांचे फत्तर उडवले तर समस्यांचे आभाळ छिन्नभिन्न होईल.

विवाह मोडकळीस आले असले तरी ते मोडीत निघालेले नाहीत. स्वैराचारासाठी बदनाम असलेल्या पश्चिमेतही नाही. हे भावुक लेखिकेचे स्वप्नरंजन नसून देशविदेशात कुटुंब समुपदेशनात सहभाग असलेल्या अनुभवी व्यक्तिचे मत आहे. अनुभवाच्या बळावर मी ‘जे न देखे रवी ते देखे कवी,’ या म्हणीस ‘जे न देखे कवी ते देखे अनुभवी,’ हे शेपूट जोडते. जोवर मनास मनाची ओढ आहे, तोवर कुटुंबसंस्थेस पर्यायाने लग्नास मरण नाही. म्हणून पश्चिमेतही कुटुंब टिकवण्याचे प्रयत्न होतात. त्यात माझा खारीचा वाटा असतो. आता जागतिक खेड्यात – ग्लोबल व्हिलेज मध्ये जागतिक विवाह होतात. काळे, गोरे एशियन, युरोपियन सहचर पूर्वग्रह टाळून एकमेकांच्या चांगल्या बाजू स्वीकारून जीवन जगत आहेत. म्हणून हल्ली मला जगास जागतिक खेडे म्हणणे सयुक्तिक वाटते. आपल्या दृष्ट्‍या संतांनी अनेक शतकांपूर्वी मांडलेला ‘वसुधैव कुटुंबकम्’ हा विचार आता वर्तमान बनला आहे. एकमेकांच्या संस्कृतीचा आदर करत त्यातील चांगले स्वीकारण्याची वृत्ती वाढते आहे, हे पाहण्याचा आनंद आगळाच!

पश्चिमेत इंटर नॅशनल जोड्या चर्च विवाहाबरोबर समंत्रक विवाहही करतात. वधू-वर मंत्रांच्या अर्थाकडे दुर्लक्ष करत नाहीत. लग्नात ऋतुभ्यः षट्पदी भव। सा या अनव्रता भव । सखा सप्तपदी भव। हे मंत्र भराभर बोलून संपवण्याचा ढोंगीपणा नसतो. लग्न लावणारे परवानाधारक पुरोहित (हिंदू लायसस्न्ड प्रिस्ट) ज्ञानी असतात. त्याचे इंग्रजी नि संस्कृत भाषेवर प्रभुत्व असते. ते संस्कृत मंत्रांचा इंग्रजी अनुवाद वधू-वरास सांगतात. आपल्या लग्नात इच्छा असून मंत्राचा अर्थ न कळलेले लोकही आवर्जूनते ऐकतात. दोन अपूर्ण व्यक्तिमत्व पूर्णत्व प्राप्त करण्यासाठी सहप्रवासाचा प्रारंभ करतात, ते लग्न! या भावनेचा आता इथे आदराने स्वीकार होत आहे. म्हणून ‘जेलसी दाय नेम इज वुमन’ हा विचार खोडून ‘अडजेस्टमेंट दाय नेम इज वुमन’ हा विचार प्रस्थापित करण्यात येत आहे. ‘लव्ह इज द प्रोसेस इन विच टू हार्टस् सिंग वन साँग इन सेम ट्यून’ किंवा ‘इन हॅपी मॅरेज वाईफ प्रोव्हाइड्स द क्लायमेट अँड द हसबंड लँडस्केप’ असे म्हटले जाऊ लागले आहे. तत्त्वचिंतक डॉ. विली ग्रॅहॅम म्हणतात, “द हाय्येस्ट इन गॉड इज द डिपेस्ट इन अस द अर्ज टू लव्ह अँड टू बी लव्ह्ड!”

ग्लोबल व्हिलेजमध्ये पूर्वेची संस्कृती पश्चिमेत स्थापित होण्याचा संकेत मिळतो आहे तसा पश्चिमेच्या समस्या पूर्वेस पोहोचण्याचाही! म्हणून आपल्याकडे लग्नातील अर्थ हरवला आहे. महागड्या वस्त्राभूषणांचे प्रदर्शन, मेजवानी, मेंदी, संगीत नि व्हिडिओ फिल्मचे नि ब्युटी पार्लरचे वाढणारे महत्त्व म्हणजे लग्न असे विपरीत समीकरण तयार झाले आहे. लग्नमंत्र ज्या भाषेत आहेत ती संस्कृत भाषा कधीच मृतभाषा ठरवण्यात आली आहे. वास्तवात पूर्वेची सांस्कृतिक सुबत्ता आणि पश्चिमेची आर्थिक सुबत्ता यांचा ग्लोबल व्हिलेज हा मिलाफ व्हावा. आपण पश्चिमेची सुबत्ता बरीच आत्मसात केली आहे. पण सांस्कृतिक सुबत्ता गमावून श्रीमंत होणे योग्य नाही. आपल्या पूर्वसुरींनी केवळ इंद्रिय शमनासाठी लग्न निर्माण केलेले नाही. मने जोडणाऱ्या सेतुस प्राधान्य देऊन त्यांनी आदर्श कुटुंब संस्थेचा विचार मांडला. कुटुंब म्हणजे जनकाचे साम्राज्य, जननीचे विश्व आणि अपत्यांचा स्वर्ग हा तो विचार!पौर्वात्य देशात आर्थिक समृद्धीची सुनामी आली आहे, त्यात हल्ली सद्विचार वाहून जात आहे. त्यास पुन्हा स्थापित करण्याचा प्रमाणिक प्रयत्न झाला तरच वातावरण बदलेल. स्त्री-पुरुष आकर्षण सहजप्रवृत्ती (natural instinct) असली तरी लग्न समाजाने समाजहितार्थ निर्माण केले आहे. म्हणून ते टिकवण्याची जबाबदारी समाजाची!

समाज म्हणजे तुम्ही, मी – आपण! पुरुषप्रधान संस्कृती म्हणजे शोषणास हिरवा कंदिल, असा विपर्यास करणे चूकच! प्रत्येक संस्थेच्या नीटस कारभारासाठी शासक असावाच लागतो. त्यास कुटुंबसंस्था अपवाद नाही. समंजस वाहनचालक (शासकपक्ष) आणि नियंत्रक – ब्रेक (विरोधपक्ष) असलेला रथ नीट चालतो.  शासक आणि विरोधपक्षाचा विचार करताना मला नेहमी पंजा (काँग्रेसचे चिन्ह नव्हे) आठवतो. एका बाजूस बहुसंख्य बोटे! दुसरीकडे एकच पण दणकट अंगठा! बहुसंख्य बोटांवर नियंत्रण ठेवणारा! त्याच्या सहकाराविना बोटांचे कार्य होणे अशक्य! पुरुषप्रधान संस्कृतीवर टाकास्त्र परजण्यापेक्षा शिक्षित स्त्रीने अंगठ्यासारखा दणकट विरोधपक्ष बनण्याचा निश्चय केला पाहिजे. तसे झाल्यास – नव्हे केले तरच सारे साजरे होईल. बिघडलेल्या दुधाचा कलाकंद करू जाणणाऱ्या अन्नपूर्णेस विरसल्या कुटुंबसंस्थेस देखणा आकार देणे का जमणार नाही?

लग्नात शोषण असते, म्हणून लग्न नाकारणे हा पलायनवाद! काल पुरुषांनी स्त्रियांना जगणे नको केले आता स्त्रिया पुरुषांचे जिणे हराम करतील, हा सूडाचा विचार! शोषणचक्र फिरवणे नव्हेतर थांबवणे योग्य आहे, हे तरुण पिढीस कौशल्याने पटवणे, आपल्या पिढीच्या वाट्यास आलेले विहितकर्म! तंबोऱ्याच्या तारा स्वतःस योग्य बंधनात जखडतात तेव्हा सूर झंकारतो. अतिताण तार तोडतो नि सैल तार सूर हरवतो! चंद्र-सूर्य कक्षेची चाकोरी स्वीकारतात म्हणून रात्री विसावा नि दिवसा शक्तीसंचार प्राप्त होतो. ऋतू कालमर्यादेचा आदर करतात म्हणून ऋतूवैविध्य अनुभवता येते. बंधने नेहमी क्लेशकारक असतात, असे नाही, हे पुढच्या पिढीस पटवण्याचे कौशल्य प्राप्त केले तरच आपली पिढी शहाणी ठरेल. नाहीतर सूडाच्या विचारास वेग देणारी दिडशहाणी! तुम्हाला पटते ना हे?

शुभं भवतु.

समाप्त

लेखिका: स्मीता भागवत

 

असे लेख/बातम्या व इतर साहित्य नियमितपणे वाचण्यासाठी आमच्या Facebook Page ला Like आणि Follow करा: https://www.facebook.com/SmartMaharashtraOnline/

 

Previous Article

भालुर येथे गांधी जयंती साजरी

Next Article

ढेकु येथे श्री संत सेवालाल संस्थेद्वारे गुणवंतांचा सत्कार

You may also like