मागे वळून पाहताना… भाग १

Author: Share:

१९८२ सालापासून मी कुटुंब समुपदेशनाच्या क्षेत्रात आहे. या प्रवासात काही सज्जनांशी छान संबंध जुळले तर काही जुलमी लोकांशी झुंजताना मनाची सालटी निघाली. दोन्ही प्रकारात एक साम्य! काहीतरी केल्याचे (काहीतरीच नव्हे) लाभलेले समाधान! त्या स्मरणयात्रेची ही चुणूक!

पहिल्या दशकात बहुतेक शोषित त्रस्त स्त्रियांच संपर्कात येणे घडले.  सासू, नणंद इत्यादी खलनायिकांच्या दुष्ट छळास स्त्रिया बळी पडत होत्या. एकत्र कुटुंबव्यवस्था या दुर्दशेस कारण आहे, असे त्यांना वाटे. विभक्त कुटुंब लाभल्यास समस्या संपतील असेही! काळाच्या रेट्यात बहुतेक ठिकाणी एकत्र कुटुंबपद्धत भूतकाळात गडप झाली. सासरचा छळ इतिहासजमा होऊ लागला. पण समस्यांचे रुप बदलले तरी समस्या संपल्या नाहीत. समस्याविहिन समाज हे स्वप्नील मिथक असावे.

सासर या भयप्रद बाबीचे जावनात स्थान उरले नसूनही दांपत्यजीवन व्यामिश्र बनले. प्रापंचिक वादळे चहाच्या पेल्यातील वादळांसारखी उरली नाहीत. काळ कूसपालट करत असताना स्त्रीच्या अर्थार्जनाची गरज निर्माण झाली. पण समाजाने मानसिकता बदलणे योग्य ठरवले नाही. स्त्रीस वेळेची नि शक्तीची चणचण भासू लागली. संयुक्त कुटुंबात वडील माणसांच्या उपस्थितीचा मुलाहिजा पाळून राग गिळून दहा अंक मोजणे घडे. एकांत मिळेतो राग बराच शमलेला असे. ते विभक्त कुटुंबात झाले नाही. राग येताच पतीपत्नीत चकमक झडे. मोठे कुणी नाही, हे कळणाऱ्या बहुतेक दांपत्यांना लहान मुलांच्या उपस्थितीची जाणीव ठेवण्याचे महत्त्व कळले नाही. त्यामुळे बालक-पालक समस्या वाढल्या. संबंधात येणाऱ्या या दुराव्यास तिसरे कुणी नव्हे तर पती-पत्नीच जबाबदार असत. दीर्घकाळांपासून स्थापित झालेले पूर्वग्रह नि गृहितके (प्रिझम्शन्स  अँड प्रेज्युडिस) नवे बेबनाव लटके ठरवत.

डॉक्टर्स म्हणजे क्रिम ऑफ द सोसायटी, हे एक स्थापित गृहितक! बारावीच्या परीक्षेत चांगले गुण मिळवणारे मेडिकलला वा इंजिनिअरींगला जातात म्हणून असेल! पण माझ्याकडे आलेल्या त्रस्त मंडळीत डॉक्टर्सची संख्या सर्वाधिक असल्याचे मला नवल वाटे. लगेच पूर्वी वडीलांनी खूपदा ऐकवलेले नि त्या वयात न कळलेले मत आठवे – ‘सुशिक्षित शब्दातील सु खोटा बडेजाव मिरवतो. शिक्षण घेणारा शिक्षित! शिक्षणात अभ्यासक्रम महत्वाचा! अभ्यासक्रमात सुसंस्कृतता नि समंजसपणाचा समावेश नसतो.’ डॉक्टर दांपत्याच्या संदर्भात समुपदेशन क्षेत्रात आलेले अनुभव हे अधोरेखित करत! डॉक्टर्स ज्ञानी असल्याने त्यांना सुसंकृत समजणे, माझा भाबडेपणा! माझ्या सर्व डॉक्टर क्लायंट्सचे प्रेमविवाह! त्यांच्या समस्या सोडवताना त्यांना सुशिक्षित म्हणणाऱ्या गृहितकाच्या चिरफळ्या उडाल्या. प्रत्येक वेळी मला वडील आठवले. कधी वाटले, तल्लख मस्तकात छळण्याचे क्रूर छुपे मार्गही सामान्य लोकांहून अधिक निर्माण होत असावेत. अकल्पनीय मार्गानी ते थंडपणे क्रूर मानसिक छळ करू शकतात. ‘क्रौर्यापुढती त्यांच्या गगन ठेंगणे’ म्हणावेसे वाटेल, असा!

समुपदेशनाच्या पहिल्या दशकात शोषित स्त्रिया आणि शोषक नवरा वा सासरचे असा प्रकार होता. समंजस लोकांना ते योग्य नसल्याचे जाणवत होते. मोजक्या घरात हितावह बदल घडत होता. तरी तशा घरांची संख्या बोटावर मोजण्या इतकी! सुजाण नागरिक नि समुपदेशक शोषणचक्र फिरू नये ते थांबावे यासाठी प्रयत्नशील होते. हितावह दिशेस होणारा बदल क्षुल्लक नि अयोग्य दिशेस भेलकांडणे अधिक, असा प्रकार चालू होता. स्त्री शिक्षणाच्या प्रक्रियेने वेग घेतला होता. महागाई वाढत होती. जीवनमान उंचावत होते. दोघांची नोकरी गरज बनून जीवन अफाट वेग धारण करत होते. तो वेगही प्रश्न निर्माण करणारा! जीवनात प्रश्न नसणे अशक्यट! पण काही प्रश्न समस्यांचे रूप धारण करतात. या समस्या जटिल बनून गुदमर निर्माण करतात. पुढच्या दशकात हा गुदमर प्रकर्षाने दिसला. त्याचे व्यामिश्र परिणाम तिसऱ्या आणि नुकत्या सुरू झालेल्या चौथ्या दशकात तीव्र बनले.

हल्ली मुली आग्रही झाल्या आहेत, अशी तक्रार दिसते. पूर्वी ‘गरीब चालेल, पण मुलगा सुसंस्कृत असावा,’ असे मुली म्हणत. आता ‘मुलावर जबाबदारी नको, त्याची आर्थिक स्थिती उत्तम असावी’ असा त्यांचा आग्रह असतो. वास्तविक हल्ली कुणाला भावंडे नसतात. असल्यास फार तर एक बहिण वा भाऊ! जन्मदाते आर्थिकदृष्ट्या मुलावर अवलंबून नसतात. तरी! ते चूक की बरोबर या शब्दात सांगता येणारे गणित नाही. निराकरण हवे असल्यास परिस्थितीच्या मुळास भिडावे लागते. कारण कोणतीही परिस्थिती अचानक कोसळत नाही. काही वर्षातील अयोग्य घटनांचा तो एकत्रित दुष्परिणाम असतो. आज यक्षप्रश्न बनलेले प्रश्न, विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात निष्ठूरपणे डावललेल्या प्रश्नांचा ज्वलंत परिणाम आहे.

मी कुटुंब समुपदेशन करू लागले, तेव्हा समाजात कजाग स्त्रिया होत्या. त्या नवऱ्याच्या डोक्यावर मिरे वाटत. पण त्यांची संख्या मोजकी! बहुतेक स्त्रिया अर्थार्जन करत असूनही सासरी नवरा आणि त्याच्या माणसांच्या आज्ञेत असत. घरातील मंडळींनी नि समाजाने प्रत्येकाच्या दिवसास चोवीसच तास असतात, याची जाणीव ठेवली नाही. स्त्री अर्थार्जन करत असली तरी तिने गृहकृत्य दक्ष असलेच पाहिजे, असा आग्रह! अर्थार्जन पुरुषाचे क्षेत्र असून ती हातभार लावते, याची जाणीव नाही. अर्थार्जन दोघांनी करायचे तर घरातील कामेही दोघांनी करावी, हा समंजस विचार डावलून एकत्र कुटुंबात कामाचा रगाडा तिच्यावर! ती एकटी सारे निपटू शकणार नाही, या वास्तवाकडे काना डोळा! तेव्हा अर्थार्जन करणाऱ्या बहुतेक स्त्रियांना घरकामात सूट मिळाली नाही. उलट नोकरी करणाऱ्या स्त्रीच्या कामावर साऱ्यांची बोचरी नजर! घरी-दारी तिला साहेब! ती कामात कमी पडताच तुटून पडणारे! या स्त्रिया अपार शारीरिक व मानसिक तणावाचा सामना करत होत्या. ही पासिंग फेज समंजसपणे पार व्हावी, यासाठी मोजक्या सुजाणांनी केलेले प्रयत्न गरजेच्या तुलनेत अपुरे ठरले. नोकरी आणि घर या दोन्ही आघाड्या सांभाळताना होणारी दमछाक वा थकव्याचा सहानुभूतीने विचार न करता समाजाने टर उडवण्याचा आनंद लुटला. दाहक विनोदांनी त्यांना भाजून काढले. ‘स्त्रियांना विनोदबुद्धी नसते,’ या गृहितकाच्या वेदनाही कमी नव्हत्या. सर्वांनी त्यांच्या श्रमाकडे डोळेझाक केली तरी समज नि मुग्धता या सीमेवर अडखळणाऱ्या घरातील मुलींचे डोळे उघडे होते. अगतिक आईची मुस्कटदाबी त्या बघत होत्या. त्यांच्या मनात बंडखोर विचारांचे बीज पडत होते. मोजके समंजस लोक व कुटुंब समुपदेशक प्रयत्नशील असल्याने काही घरात पोक्त विचार रूजला, पण बहुसंख्य घरात हिटलर वृत्तीचा नवरा नि त्यास चाव्या मारणारे त्याचे नातेवाईक होते. समाजाचा कल, अगतिक स्त्रियांची व्यथा नाकारण्याचा! परिणामी होरपळत समंजसपणाची किंमत चुकवणाऱ्या सुना नि बंडखोर सुना अशा मिश्र समाजाची निर्मिती सुरू झाली. वयात येणाऱ्या मुली हेही बघत होत्या. आता याचा एकत्रित परिणाम दिसतो आहे.

अशी परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता सतर्क लोकांना जाणवली होती!.मी समंजस घरात वाढले. एकदा आईने मित्रवर्तुळात केलेले छोटे भाषण हल्ली मला वारंवार आठवते. “स्त्रीचे पुरुषावरील अवलंबन दूर करण्यास स्त्री शिक्षणाची भलावण करणारे पुरुष स्त्रियांचे हितचिंतकच! त्यांनी निर्माण केलेली शिक्षणप्रणाली, पुरुषी असमे स्वाभाविक! अण्णासाहेब कर्वे यांनी स्त्रियांसाठी कॉलेज निर्माण करून त्यात गृहिता गमा (जी.ए) ही पदवी देणारे शिक्षण सुरू केले. पण स्त्री-पुरुषात समानतेचा बुर्झवा आग्रह धरणारा तो पुरोगामी, अशी विपरीत व्याख्या प्रचलित झाली. आण्णासाहेबांच्या हयातीत त्यांच्या योग्य विचारास विरोध होऊन जी.ए. पदवी बी.ए. बनली. स्त्री समजस वातावरणात वाढली नसेल तर ती पुरुषी होण्याची शक्यता निर्माण झाली! परिणामी स्त्रीदाक्षिण्य संपले  नि समानता चार पावले दूर राहिली. बहुसंख्य पुरुषांना बाहेर हंसा वाडकर (तेव्हाचीलोकप्रिय अभिनेत्री) नि घरात सीता हवीशी झाली. हे खुळचट स्वप्नरंजन पुढे स्त्रीस त्रासदायक ठरेल. पुरुषी शिक्षणप्रणाली स्त्रीचा समंजसपणा संपुष्टात आणील. ती आक्रमक बनेल. समाजास ते पचणार नाही. अर्थार्जन एकट्या पुरुषाच्या अखत्यारीत उरणार नाही. पुरुषास मिंधेपण भयभीत करेल. तरी ते कबूल करणे त्यास रुचणार नाही. तो अधिक उर्मट बनेल. मिंधा उर्मट पुरुष नि आक्रमक स्त्री  असा विपरीत समाज निर्माण होईल. .ढाई अक्षरं प्रेमाची नि लग्नाचीही! प्रेम होतं नि लग्न करतात. होणारी घटना आपसूक होते नि केलेली घटना हेतुपुरस्सर! प्रेम सुंदर असूनही खूप ठिकाणी लग्न भयानक का ठरते याचा समाजाने विचार करायला हवा.“

मी तेव्हा १२-१४ वर्षांची! मला भाषणे रटाळ वाटत. तिचे अनुमान वर्तमान बनले तेव्हा माझ्या वयात नि अनुभवात वाढ झाली होती. हल्ली सर्वत्र अर्थार्जन करणाऱ्या स्त्रिया दिसतात. पण बहुतांश घरात निर्णयाचा अधिकार वा आर्थिक स्वातंत्र्य न लाभलेल्या असंतुष्ट स्त्रिया मूकपणे धुमसताना दिसतात. म्हणून सुप्त मनात बंदी झालेल्या अशा चर्चांच्या स्मृती हल्ली वारंवार डोके वर काढतात. ‘मुलाची आर्थिक स्थिती उत्तम हवी’ म्हणणाऱ्या खूप मुली भेटल्या. त्या बहुतांशी वर वर्णन केलेल्या मुशीत (घरात) घडल्या (वा बिघडल्या) होत्या. त्यांनी घरात राबणारी, नोकरीत टोमणे खाणारी, साऱ्यांचे भक्ष्य बनलेली, आर्थिक अधिकार नसलेली कमावती आई नि अधिकार मिरवणारे वडील पाहीले. त्यांच्या मनात नवरा नामक बॉसबद्दल आकस निर्माण होणे सावाभाविकच!

हे याच कारणाने घडलेअसे नाही. विश्लेषण क्लिष्ट असते. तरी निराकरण शोधणारा ते टाळू शकत नाही. मागच्या पिढीत सुशिक्षित गृहिणींनी अर्थार्जन केले वा केले नाही. नोकरी करणाऱ्या बहुतेकींना कुचंबणा सोसावी लागली. नोकरी न करणाऱ्या स्त्रिया न्यूनगंड झाकायला नोकरी करणाऱ्या स्त्रिया कशा सुगृहिणी नाहीत याचा पुरावा सादर करण्याची धडपड करत. फार क्वचित अर्थार्जन करणारीस समंजस वातावरण लाभले. तसे झाले तिथल्या स्त्रियांच्या यशाचा आलेख उंचावला. आता अपार महागाई नि भ्रष्टाचाराने, दोघांच्या अर्थार्जनास पर्याय ठेवलेला नाही. पुरुषाच्या मनात मिंधेपण घर करून! समाजाच्या मर्दपणाच्या बुर्झवा कल्पना! अपक्व पुरुषांना अधिक उर्मट करणाऱ्या! परिणामी विरोध करू न शकलेल्या अगतिक स्त्रिया, मुलींच्या काळजीनेत्रस्त झाल्या. गंभीरपणे विचार करायला नव्हता त्यांच्यापाशी वेळ की  शक्ती! मनात मुलींची आपल्यासारखी गत होऊ नये ही मातृसुलभ इच्छा! त्यांनी नकळत मुलीच्या मनात उत्तम आर्थिक स्थितीतला नि जबाबदारी नसलेल्या मुलाचा आग्रह निर्माण केला. आईचे हाल पाहीले असलेल्या नि स्वतःच्या पायावर उभ्या असलेल्या मुली, मनाजोगा नवरा न मिळाला तर एकटे राहण्यास तयार झाल्या. याचा पुरावा देऊ शकेल असा एका माय-लेकींचा हा प्रातिनिधीक किस्सा…

‘मी मुलीला सांगीतलं…’ आई आक्रंदत होती, ‘माझ्या अनुभवावरून शहाणी हो! पुढच्याची ठेच पाहून मागचा शहाणा झाला, तर ठेच खाणाऱ्याची वेदना हळवी होते. नोकरीस जाण्यापूर्वी स्वयंपाक! थकून घरी यावं तर पोळ्यांचा राडा प्रतीक्षेत! कंबरेचा टाका ढिला करणारा! माझ्या कष्टाच्या कमाईवर ‘त्याच्या’ माणसांच्या हौशी भागत. तरी ‘तो  सगळ्यांचं करतो,’ हे कौतुक नवरा मिरवणार! इतरांनी वा स्वतः मला मदत करावी, असं त्यास वाटणार नाही. स्वतःचं तारुण्य खर्ची पडल्याची जाणीव नसलेल्यास तरुण  पत्नीस हौस असते, हे कसं कळणार? हौस करायला स्वकमाई वापरण्याचा हक्क दूर, पोळ्यास बाई लावण्याची गरज कधी भागली नाही. कुणी थकवा समजून घेत नसे. स्वतःसाठी पोळ्या न करणं, हीच कामात घट! माझीच उपासमार करणारी! इतरांचा भाताचं शीत न खाता, पोळ्यांवर ताव! ज्याच्या आर्थिक जबाबदाऱ्या पेलण्यास मी राबते, त्याला माझी उपासमार दिसली नाही कधी तर इतरांकडून कशी अपेक्षा ठेवणार? लग्नाआधी जगले तेच. मग नुसतं जिणं रेटलं, बस्स! म्हणून घरात कुणी नसलेला जावई हवा मला! लेकीचा  पगार बळकावून तिला राबवणारा नको.”

अशा आईच्या मुलींना अर्थार्जन करायचे आहे, ते कुटुंब वा स्वतःच्या उत्कर्षासाठी नव्हे. प्रसंगी घरावर लाथ मारता यावी, यासाठी! पूर्वी स्त्रीच्या मानेवर ‘घरात राह्यचं असेलतर…’ही तलवार लटकत होती.  आता ‘ही घरावर लाथ मारून निघून जाईल,’ही तलवार पुरुषाच्या डोक्यावर आहे. पण जी तलवार स्त्रीस भयप्रद दमन सोसणे भाग पाडत असे; ती पुरुषास भयभीत करणे दूर, उलट काही पुरुषांना अधिक उर्मट करत आहे. सतत लाथ उगारलेली असणारे घर डळमळणारच!

आधीच्या पिढीत साऱ्या स्त्रिया त्रस्त वा भयभीत होत्या, असे नाही. काहींनी कौशल्याने मुलांचे कल्याण केले. नवरा  ‘नजर’ प्राप्त करील, या आशेवर त्यांनी घरी-दारी काबाडकष्ट केले. पण पन्नाशी गाठली तरी नवऱ्यास नजर प्राप्त झाला नाही. स्त्रियांच्या जीवनात ऋतुनिवृत्तीच्या समस्यांची भर पडली. त्या सैरभैर झाल्या.‘आपण पालथ्याघड्यावर पाणी ओतले,’ ही जाणीव होऊन त्या निराश झाल्या वा पेटूनउठल्या. ऋतुनिवृत्तीच्या समस्येचा वैज्ञानिक दृष्टिकोनातून विचार करून उतारा शोधण्याचे रास्त काम टाळणे घडले. उलट दाहक  विनोद जन्माला घालून समाजाने अशा स्त्रियांना अधिक घायाळ केले. ‘आधी चंद्रमुखी मग सूर्यमुखी आणि आता ज्वालामुखी!’ हाती आलेल्या चंद्रमुखीचे, ज्वालामुखीत रूपांतर आपण नि आपल्या स्वजनांनी केले, याची पुरुषास जाणीव नव्हती. गृहिणी विना घरास घरपण नसले तरी घर ‘त्याचे’! घराच्या हप्त्यात तिच्या कमाईचा सिंहाचा वाटा असून! हे गैर आहे, हे कळणे दूर, पुरुषाने ‘आधी तिने  सौंदर्याचातोरा मिरवला, मग मुलांना प्राधान्य दिले. आता माझ्यावर डाफरते. मला पत्नीसुख नाहीच’ असा गळा काढला. पुरुषप्रधान संस्कृतीत, पुरुष चुकत नसतो नि चूक कबूल करतो  तो मर्द नसतो, लग्न पुरुषाच्या सुखासाठी असते या विकृत गृहितकांचा जबरदस्त पगडा!

क्रमशः

लेखिका: स्मीता भागवत

असे लेख/बातम्या व इतर साहित्य नियमितपणे वाचण्यासाठी आमच्या Facebook Page ला Like आणि Follow करा: https://www.facebook.com/SmartMaharashtraOnline/

Previous Article

नांदगाव -भालूर येथे स्वच्छ भारत अभियान अंतर्गत जनजागृती रँली

Next Article

साधो ऐसा ही गुरू भावे

You may also like