Smart Maharashtra

दिसामाजी काही उत्तम वाचावे…

dummy_728

श्रीशालिवाहन शके १९४१, शिवराज्याभिषेक शके ३४५, विकारीनाम संवत्सर

लोकमान्य टिळकांचे राजकीय विचार 

Author: Share:
“ज्या लोकसमुदायात एक प्रकारचा सामाजिक, धार्मिक आणि राजकीय आपलेपणा भरलेला नाही, ज्यांचे घटक सामान्य भावनेने एकत्र बांधलेले नाहीत आणि, ज्यांच्या अंगात इतर समुदायाहून भिन्न प्रकारचे वैशिष्ट्य वास करीत नाही, ते लोक किंवा त्याचा समुदाय कधीही राष्ट्र या संज्ञेस प्राप्त होत नाही. तसेच ज्या समाजात हि वैशिष्टये जागृत ठेवणारे नेते नाहीत, तो समाज कधी ना कधी नष्ट झाल्याशिवाय राहणार नाही..” 
– लोकमान्य टिळक
भारतातील कुठच्याही पत्रकाराला ललाळभूत असणाऱ्या, भारतीय मनाला राष्ट्रधर्माची आणि एकसंधतेची शिकवण देणाऱ्या, आणि प्रखर राष्ट्रधर्माद्वारे, स्वातंत्र्याचे स्फुल्लिंग चेतवणाऱ्या एका महान नेत्याची आज पुण्यतिथी! लोकमान्य बाळ गंगाधर टिळक!भारतीय असंतोषाचे जनक म्हणून परिचित असण्यासाठी, काय केले असेल लोकमान्यांनी? हि असंतोषाची ठिणगी कशी पेटवली असेल? लेखणीचा शस्त्र म्हणून वापर केला जातो असे आपण नेहमी ऐकतो, टिळकांच्या हातातील शस्त्र एकीकडे इंग्रजांच्या अस्तित्वावर वार करीत असताना, आपल्या मनातील ठिणगी भारतीयांच्या हृदयात ओतण्याचे कार्य केले त्यांच्या राष्ट्रवादी विचारांनी आणि कृतींनी!  म्हणूनच असंतोषाचे जनक या उपाधीचा उगम त्यांचं राजकीय विचारांमध्ये आढळतो!
स्वराज्य आधी की सुधारणा?
टिळकांच्या राजकीय विचारांमध्ये सर्वाधिक चर्चिला गेलेला मुद्दा म्हणजे त्यांचे मित्र आगरकरांशी त्यांची विचारभिन्नता! सामाजिक सुधारणांचा वसा घेऊन, समाजाचे प्रबोधन हे स्वातंत्र्याच्या आधी करणे आवश्यक आहे, असे आगरकरांचे म्हणणे होते. जेणेकरून, जेंव्हा,देश स्वतंत्र होईल तेंव्हा, आपसूक सुरुवातीपासून उत्तम विचार आणि आचार असलेला समाज त्या देशाचा नागरिक असेल हि त्यामागील भावना होती. लोकमान्यांचे या बाबतीमध्ये वेगळे मत होते. ते म्हणायचे, एकदा स्वातंत्र्य आल्यानंतर, समाजसुधारणा करणे अधिक सुलभ होईल. सुरुवातीला पारतंत्र्याचे जोखड भारतीयांच्या मानेवरून आधी दूर केले पाहिजे. स्वातंत्र्य नसेल, तर सामाजिक सुधारणा परकीयांच्या हातातील मोहताज होतात.
म्हणूनच, इंग्रजांनी कायदे करून भारतामध्ये सुधारणा करणे त्यांना रुचले नाही. कारण इंग्रजांनी कायदे करून थोपवलेल्या सुधारणा, भारतीय आपल्या संस्कृतीवरील आघात मानतील असे त्यांचे म्हणणे होते, जे खरे ठरलेही! त्यांचा सुधारणेला विरोध नव्हता. फक्त या सुधारणा भारतीयांनी स्वतःहून कराव्यात असे त्यांचे म्हणणे होते, कारण त्यात भारतीयांच्या विचारामध्ये आमूलाग्र बदल होऊन ते सुधारणा स्वीकारतील. यासाठीच आधी स्वराज्य हि त्यांची बैठक होती.
याचे एक उत्तम उदाहरण म्हणजे, समाजसुधारकांनी १८९० मध्ये समाजसुधारणेचा प्रस्ताव मांडला ज्यात लग्नासाठी किमान वय मुलांचे २१ आणि मुलीचे १६ असावे, द्विभार्या पद्धत बंद करावी, हुंडा पद्धत बंद करावी, वयाच्या चाळीस वर्षानंतर, विधवा विवाहाखेरीज विवाह करू नये या, सुधारणांना टिळकांनी पाठिंबा दिलेला आढळतो आणि त्यावर त्यांची स्वाक्षरी आहे. मात्र, १८९१ मध्ये Age of Consent Bill मांडण्यात आले, ज्यात बारा वर्षाखालील पत्नीबरोबर संभोग करण्यास कायद्याने बंदी आणि मुलगी वयात आल्यावर तिची इच्छा असल्यास पतीचा त्याग करू शकेल अशी मुभा ह्या दोन सुधारणा होत्या. टिळकांनी ह्या बिलला विरोध केला. त्यांचा  सुधारणांना  विरोध नव्हता, फक्त त्या सुधारणा राजकीय स्वातंत्र्य मिळाल्यानंतर, भारतीयांनी स्वतः केल्या पाहिजेत, परकीयांनी कायदे करून नव्हे! पुढे झालेही तेच. आजच्या इंडियन पिनल कोड मध्ये या दोन्ही सुधारणा आहेत, आणि त्या आपण स्वखुशीने मान्य केलेल्या आहेत.
पाश्चात्यांचे अंधानुकरण म्हणजे सुधारणा नव्हे. भारतीय संस्कृतीचा विचार करून सुधारणा केली पाहिजे असे त्यांचे मत होते. भारताला स्वतःची अस्मिता आहे, हे लक्षात घेणे आवश्यक होते.
 
टिळक आणि राष्ट्रीयत्व
टिळक हे राष्ट्रीयत्व विचारसरणीचे अग्रणी पुरस्कर्ते होते. त्यांच्या असंतोषाच्या विचारसरणीत ह्या राष्ट्रीयत्वाचा फार मोठा वाटा आहे.
राष्ट्रीयत्व हा दृश्य पदार्थ नाही. राष्ट्र हि मानसिक कल्पना आहे. एकतेची हि भावना अनेक घटकातून प्रतीत होते, वांशिक एकता, धार्मिक एकता, समान राजकीय आकांक्षा यातून राष्ट्रीयत्व वाढीस लागते. टिळकांचे राष्ट्रीयत्व सुद्धा अनेकांगी होते. भारतीय प्राचीन संस्कृती आणि इतिहासाविषयी त्यांचे विचार राष्ट्रीयत्वाचे होते. गीतारहस्य वाचताना भारतीय संस्कृतीचा त्यांचा गाढा अभ्यास, चिंतन आणि अभिमान पदोपदी जाणवतो. तरुण सावरकरांमध्येही त्यांनी ह्या राष्ट्रीयत्वाचे स्फुल्लिंग चेतवले असेल निश्चित! सावरकरांच्या सहा सोनेरी पाने पुस्तकामध्येसुद्धा याच राष्ट्रीयत्वाचे अंश सापडतात.
राष्ट्रीयत्व आणि एकता जागृत ठेवण्यासाठी टिळकांनी लेखणीसोबत वापरलेले अजून एक महत्वाचे साधन म्हणजे सार्वजनिक उत्सव. सार्वजनिक गणेशोत्सव आणि छत्रपती शिवाजी महाराज जयंती आणि राज्याभिषेक उत्सव यातून राष्ट्रीयत्व जागृत ठेवण्याचे महत्वाचे कार्य त्यांनी केले. गणेशोत्सवासारख्या धार्मिक उत्सवांमध्ये धर्मसंगोपन, संस्कृतीजतन या धार्मिक उद्दिष्टांसोबत, लोकांना एकत्र करून राष्ट्रीय विचारांचे आदान-प्रदान करण्याचे व्यासपीठ म्हणून त्यांनी सार्वजनिक गणेशोत्सव उत्सवाचा सुंदर उपयोग केला. आजही जेंव्हा या उत्सवात विकृती शिरलेल्या दिसतात तेंव्हा आपल्याला टिळकांच्या या उत्सवामागील भावनेची प्रकर्षाने आठवण होते, हेच टिळकांचे फार मोठे यश मानावे लागेल.
शिवजयंती आणि शिवराज्याभिषेक आज महाराष्ट्रातील तरुण उत्साहात साजरे करतात. जेंव्हा मराठ्यांच्या अभिमानाचे हे तीर्थक्षेत्र दुरावस्थेत होते, तेंव्हा टिळकांनी लोकांच्या मनातील शिवप्रेम आणि अभिमान जागृत करून त्यांना या क्षेत्री खेचून आणले. स्वराज्याचे शिवबा आणि आऊसाहेबांचे स्वप्न ज्या क्षेत्री सत्यात उतरले, महाराष्ट्राच्या स्वतःच्या राजाचा राज्याभिषेक ज्या क्षेत्री झाला, त्याहून पवित्र क्षेत्र दुसरे नसेल, आणि पारतंत्र्याच्या अंधकारातून मानसिक दृष्ट्या बाहेर काढण्यासाठी आणि त्यांच्यात स्वातंत्र्याची मनीषा बाधावण्यासाठी त्याहून निराळा महापुरुष दुसरा असणार नाही याची जाणीव टिळकांना होती.
किंबहुना, आजही जेंव्हा महाराष्ट्रातील माणूस शिवजयंतीला आणि गणेशोत्सवाला एकत्र येतो, तेंव्हा, एकत्र राहण्याची आणि आपल्या महापुरुषांचा, आपल्या इतिहासाचा आणि आपल्या संस्कृतीचा सन्मान कायम ठेवण्याची प्रतिज्ञा मनोमन घेतली जाते.
लोकमान्यांनी उद्गारले हे वाक्य, आपल्या देशातील प्रत्येक नागरिकाने नागरिक आणि मतदार म्हणून आणि प्रत्येक राजकीय नेत्याने समजून  विचार करून आचरणात आणण्याची आवश्यकता आहे…
 

टिळक म्हणतात, ” ज्या लोकसमुदायात एक प्रकारचा सामाजिक, धार्मिक आणि राजकीय आपलेपणा भरलेला नाही, ज्यांचे घटक सामान्य भावनेने एकत्र बांधलेले नाहीत आणि, ज्यांच्या अंगात इतर समुदायाहून भिन्न प्रकारचे वैशिष्ट्य वास करीत नाही, ते लोक किंवा त्याचा समुदाय कधीही राष्ट्र या संज्ञेस प्राप्त होत नाही. तसेच ज्या समाजात हि वैशिष्टये जागृत ठेवणारे नेते नाहीत, तो समाज कधी ना कधी नष्ट झाल्याशिवाय राहणार नाही..” 

टिळकांच्या राजकारणाची चतुःसुत्री
१९०६ साली काँग्रेस मध्ये जहाल आणि मवाळ अशी फूट पडली. याला कारणीभूत होती १९०५ ची बंगालची फाळणी. बंगालचे कर्झनने दोन भाग केल्यावर जी अभूतपूर्व संतापाची लाट बंगालमध्ये उसळली आणि सामान्य माणसापासून रवींद्रनाथ टागोरांसारख्या अलौकिक साहित्यिकांपर्यंत सर्वांनी वंदे मातरम आणि आमार शोनार बांगला च्या जयघोषाखाली बंगाल एकत्र केला, ही भावना, हि एकता राष्ट्रीय स्तरावर घेऊन जावी अशी लोकमान्य टिळकांची इच्छा होती, ज्याला मवाळांचा विरोध होता. इंग्रज न्यायाभिमुख राज्यकर्ते असून त्यांच्याकडे घटनात्मक मार्गाने अर्जविनवण्या करूनच ते आपल्याला स्वराज्य देतील अशी मवाळांची प्रामाणिक धारणा होती. टिळक मात्र, भारताला कुठली घटना नसल्याने घटनात्मक मागण्या वगैरे विधानांना अर्थ नसल्याचे सांगत होते. याच वेळेस त्यांनी स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे, हि सिंहागर्जना केली.
टिळकांच्या विचारातील राष्ट्रीयत्व राजकीय कृतीतून बाहेर आलॆ आणि भारतीय जनतेने त्याला अभूतपूर्व प्रतिसाद दिला. यालाच आपण चतुःसुत्री म्हणून ओळखतो.
स्वराज्य
आपले राज्य, म्हणजे स्वराज्य हि त्याची सरळ सोप्पी व्याख्या होती. केवळ, प्रशासनात भारतीयांना जागा द्या या मवाळ्यांच्या मागणीत त्यांचे मन भरत नव्हते. हा देश माझा आहे, यावर संपूर्णतः भारतीयांचेच राज्य हवे, परकीयांकडे प्रशासनातील वाट्याची भिक्षा कशाला मागायची? हा त्यांचा सरळ सवाल होता.  मात्र टिळकांचे स्वराज्य केवळ इथेच थांबत नाही. वर उल्लेखलेल्याप्रमाणे प्राचीन भारतीय राष्ट्रीयत्व त्यांचं विचारसरणीचा गाभा होते. टिळकांच्या स्वराज्याची संकल्पनाही वेदात सांगितल्याप्रमाणे धर्माशी संबंधित आहे. धर्म म्हणजे एक जीवनप्रणाली आहे, आणि स्वराज्याशिवाय धर्माचे पालन केले जाऊ शकत नाही. यासाठी, स्वराज्य स्वधर्मपालनाचे ध्येय आणि उद्दिष्ट्य मानले गेले. टिळकांच्या शब्दात, ” our life and dharma are in vain in the absence of swarajya..”
स्वराज्याचा अर्थ सांगताना, लोकमान्य म्हणायचे, “इंग्रजांना इंग्लंड मध्ये जे स्थान आहे, ते भारतीयांना भारतात मिळायला हवे..” स्वतःचे भवितव्य आम्ही ठरवू, आमचे भवितव्य परकीयांच्या हाती देऊन आमची प्रगती होणार नाही.
केवळ धार्मिक नव्हे सर्व भौतिक, अध्यात्मिक, अधिभौतिक आणि वैयक्तिक स्वातंत्र्य आणि प्रगती, स्वराज्यावरच अवलंबून असते.
टिळक म्हणतात, 
“If we do not get swarajya, there will be no industrial progress, … not any possibility of having any education useful to the nation, either primary or higher…”
राष्ट्रीय शिक्षण
राष्ट्रीय शिक्षण म्हणजे ज्यामुळे विद्यार्थ्याला राष्ट्राची माहिती मिळते ते शिक्षण! ब्रिटिशांच्या शाळा आणि कॉलेजेस म्हणजे, कारकून तयार करण्याचे कारखाने होते. भारतीय संस्कृती आणि विचारांशी सुसंगत शिक्षण देण्याऱ्या आणि राष्ट्रीय मनोवृत्तीची जोपासना करणाऱ्या राष्ट्रीय शिक्षण संस्था काढण्याची त्यांनी योजना मांडली. शिक्षण मातृभाषेतूनच दिले जावे असे टिळकांनी वाटे, अर्थात परकीय भाषेला त्यांचा विरोध नव्हता. 
 
बहिष्कार
ब्रिटिशांची गाडी भारतात बहरण्याचे मूळ कारण आर्थिक सुबत्तेत होते, आणि हि आर्थिक सुबत्ता त्यांना मिळाली होती, त्यांच्या व्यापारातून. भारत हि फार मोठी बाजारपेठ होती, आणि त्यामुळे या बाजारपेठेने त्यांचं व्यापाऱ्यांना नाकारले तर इंग्रजांना राजकीय अस्तित्व टिकवणेही कठीण होईल हा सिद्धांत टिळकांनी मांडला. यासाठी परदेशी वस्तू विशेषतः कापडाची होळी करण्याचा मंत्र त्यांनी दिला. सावरकरांनी केलेली परदेशी कापडाची होळी, ज्याची धग ब्रिटिश संसदेला बसल्यावाचून राहणार नाही असे टिळक म्हणाले होते, त्यांचीच संकल्पना होती.
बहिष्कार हे प्रभावी राजकीय अस्त्र होते. परदेशात जाणारा पैसा थांबवणे आणि पर्यायी भारतीय वस्तूंचे उत्पादन वाढवणे हि दोन्ही कार्ये यातून शक्य होतात. टिळक म्हणाले कि जर तुमच्यात सशस्त्र क्रान्तीची शक्ती नसेल तरीही चालेल, पण जर तुमच्यात आत्मसंयम आणि नकार देण्याची शक्ती असेल तरीही, ब्रिटिश शासन तुमच्यावर राज्य करू शकणार नाही!
असहकाराच्या चळवळ जी गांधीजींनी नंतर सुरु केली , तिची बीजे टिळकांनी अशी पेरून ठेवली होती .
स्वदेशी
स्वदेशीचा पुरस्कार हा टिळकांच्या राष्ट्रीयत्वाचा फार महत्वाचा घटक आहे. परदेशी मालावर बहिष्कार आणि स्वदेशी वस्तूंचा वापर या दोन्ही समांतर जाणाऱ्या प्रक्रिया आहेत. यातून केवळ भारतीय उद्योगांना प्रोत्साहनच नाही मिळाले तर, राष्ट्रीयत्वाची आणि स्वदेशप्रेमाची भावनाही वाढीस लागली. थोडक्यात स्वदेशी हि केवळ बाह्य चळवळ नव्हती, तर मनातूनही स्वदेशी असले पाहिजे हा मंत्र या चळवळीने दिला.  स्वदेशी आणि बहिष्कार या दोन सूत्रांचा गांधीजींच्या राजकारणात महत्वाचा अंतर्भाग झालेला दिसतो.
लोकमान्य हे क्रांतीचा धगधगता अविष्कार होते. अर्थात, त्या आक्रमकतेला विचारांची ठोस बैठक होती आणि अभ्यासाची जोड होती. म्हणूनच कालातीत विचार आणि कृती ते देऊ शकले, ज्याचा पुढच्या स्वातंत्र्यचळवळीवरच नाही तर स्वातंत्र्योत्तर भारतातही परिणाम झालेला दिसतो.
टिळकांचे स्वातंत्र्यलढ्यातील कार्य अपरिमित आहे. या कार्याला त्यांच्या सिद्धहस्त लेखणीची जोड मिळाल्याने ते अधिकच तेजपुंज झाले आहे.

टिळकांच्या पवित्र स्मृतीला विनम्र अभिवादन!

Previous Article

संविधान आणि मुलभूत हक्क

Next Article

महाराष्ट्रदर्शन

You may also like