लिंगायतांनो ,तुम्ही दूर जात आहात का ? : अरविंद विठ्ठल कुळकर्णी

Author: Share:

 लिंगायत धर्म हा हिंदुधर्माचा भाग नसून तो स्वतंत्र धर्म आहे अशा आशयाचे विधान कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या ह्यांनी काही दिवसापूर्वी केले असून त्यामुळे काँग्रेस पक्षाच्या वर्तुळात आनंदाचे वातावरण निर्माण झालेले दिसत आहे ० काही लोक काहीतरी जडीबुटी उपयोगात आणून  गेलेली मर्दानगी पुन्हा प्राप्त करून घेण्याच्या खटपटीत असतात ० तशा अवस्थेत काँग्रेसला बघावे लागण्याची पाळी लोकांवर आली आहे आणि हे सध्याच्या काँग्रेस नेतृत्वाला शोभादायक निश्चितच नाही ० भारताचे गेल्या शंभर वर्षाचे राजकारण सावरकर विचार संकुल आणि गांधी विचार संकुल ह्याच  दोन गटात स्पष्टपणे विभागले गेले आहे आणि काही हिंदुत्ववादी संघटनांच्या काही दखलपात्र गटांवर गांधीवादाचा प्रभाव काम करीत असल्याचे दिसत असल्याने लिगायत समाजाच्या ह्या वादाकडे राष्ट्रहिताच्या म्हणजेच हिंदुहिताच्या दृष्टिकोनातून कसे बघता येईल हे तपासले पाहिजे  ०

                     आसिंधुसिंधुपर्यंता यस्य भारतभूमिका ! पितृभू: पुण्यभूश्चैव स वै हिंदुरितिस्मृत:

अशी स्वातंत्र्यवीर वि दा सावरकरांनी हिंदूंची  व्याख्या केली आहे ० सिंधू नदीपासून समुद्रापर्यंत पसरलेली ही भारतभूमी ज्याची पितृभूमी आणि पुण्यभूमी आहे तो हिंदू अशी ही व्याख्या आहे ० ती हिंदुधर्माची व्याख्या नाही ० लिंगायत लोकांनी आपला लिंगायत धर्म स्वतंत्र  धर्म आहे असे म्हटल्याने हिंदुत्वाची ,हिंदू समाजाची आणि हिंदू संस्कृतीची आपल्याला प्रथमदर्शनी वाटते तेव्हढी हानी होत नाही ० येथे धर्म ह्याचा अर्थ उपासना पद्धती ,पारलौकिकाविषयीचे चिंतन आणि त्यादृष्टीने पाळावयाचे आचारविचार असा घेतला आहे ० हिंदू धर्म म्हणून जो म्हटला जातो त्यात असे उपासना स्वातंत्र्य सर्वांना मुक्तपणे दिलेले आहे ० हिंदू आध्यात्मिक प्राणी आहे आणि त्यासाठी त्याला असे स्वातंत्र्य हवे असते ० तो सत्याचा शोध घेत असतो ० हा शोध संपलेला नाही आणि संपेल असे वाटत नाही ० म्हणून कोणतेही एक धर्ममत अंतिम सत्य म्हणून तो बंधनकारक मानत नाही ० त्याच्या दृष्टीने सर्व सापेक्ष आहे आणि प्रत्येकाला आपले मत मांडण्याचा समान अधिकार आहे ० वैज्ञानिक कसोट्या लावून खंडनमंडन पद्धतीने अंतिम सत्याच्या शोधार्थ मार्गक्रमणा करावयाची हा हिंदूंचा विचार हजारो वर्षाच्या अभ्यासातून प्रगल्भ आणि परिपक्व झाला आहे ० भारत ज्यांची पुण्यभूमी आहे अशा हिंदुंमध्ये माझाच ईश्वर, माझाच प्रेषित आणि माझाच धर्मग्रंथ खरा बाकीच्यांचा पाखंडी म्हणून नष्ट  झाला पाहिजे असे प्रतिपादणारा कोणी सुदैवाने जन्माला आला नाही ० तेव्हा लिंगायत हा स्वतंत्र धर्म आहे असे म्हटल्याने बिघडत नाही ० तथापि कर्नाटकाच्या मुख्यमंत्र्यांच्या विधानाला राजकीय पैलूही आहेत ० त्या संदर्भात त्यांचे विधान आणि काँग्रेसच्या वर्तुळात उठलेल्या प्रतिक्रिया अभ्यासल्या की काँग्रेस आणि हिंदुत्वनिष्ठ संघटना ह्यांच्यातील अंतर आणि वेगळेपण प्रकर्षाने लक्षात येते ० लिंगायत लोक त्याचा विचार करणार आहेत की  नाही तसेच आपण त्यांना तो विचार करायला लावणार आहोत की नाही हा कळीचा मुद्दा आहे ०

                      सावरकरांनी स्वतंत्रता देवीच्या स्तोत्रामध्ये , ” जे जे उत्तम,उदात्त ,उन्नत ,महन्मधुर ते ते ! स्वतंत्रते भगवती सर्व तव सहचारी होते ” असे म्हटले आहे ० पाकिस्तानच्या हिताच्या दृष्टीने फाळणी करून स्वतंत्र झाल्यावर भारताची पुढची वाटचाल उदात्त आणि उन्नत  म्हणून उत्तम अशी झाली नाही ० तुम्ही जेव्हढे लहान व्हाल तेव्हढे राजकीय लाभ अधिक अशी विविध समाजघटकांना लालूच दाखविणारे राज्यकर्ते काँग्रेसच्या रूपाने सत्तेवर ठाण मांडून बसले ० म्हणून विविध समाजघटकांमध्ये आपल्याला अल्पसंख्यांक म्हणून सरकारने मानावे अशी इच्छा प्रादुर्भूत झाली ० त्यामुळे किती अधोगती झाली ते पाहिले पाहिजे ० हिंदू धर्म हा पर्यावरणवादी, वैज्ञानिक जीवनशैलीशी सुसंगत वागणारा .प्रत्येकात ईश्वर वास करतो आहे  समजून त्याचा आदर करणारा , पूर्णपणे मानवतावादी, राक्षसी राजकीय महत्वाकांक्षा नसलेला ,सहिष्णू ,परमताच्या स्वातंत्र्याचा आग्रही ,शांततावादी , पूर्वपक्ष आणि उत्तरपेक्ष ह्या तंत्राने वाद करणारा आणि सहजीवनासाठी दुसऱ्यांना हवाहवासा वाटणारा असा सर्वोत्तम धर्म असल्याचे स्वामी विवेकानंद ह्यांनी उच्चरवाने शिकागोच्या सर्वधर्मपरिषदेत  घोषित केले ० भारत इंग्रजांच्या केवळ राजकीयच नव्हे तर सर्व बाजूंनी पारतंत्र्यात असतांना आणि इंग्रजांचे साम्राज्य सर्व पृथ्वीवर पसरलेले असतांना एका  संन्याशाने हिंदू जीवनशैलीचे माहात्म्य सर्वदूर परिणामित केले ०अत्यंत सुसंस्कृतपणे त्यांनी इंग्रजांवर मात करून दाखविली ०  विवेकानंद हे आत्मविलोपी विरक्त होते ० भारतभूमीपेक्षा आपण मोठे आहोत हा भ्रम त्यांच्यात नव्हता ० दुर्दैवाने भारताच्या स्वातंत्र्य चळवळीचे नेते आणि स्वतंत्र भारताचे राज्यकर्ते आत्मकेंद्रित आणि इतिहासाचा अभ्यास नसलेले निघाले ० त्यांना आपले माहात्म्य देशापेक्षा मोठे वाटत होते ० जगाने आपल्याला प्रेषित मानावे म्हणून भारताची स्वातंत्र्य चळवळ बाजूला सारून त्यांनी हिंदू-मुस्लिम ऐक्याचा प्रयोग श्रद्धाविषय म्हणून भोळ्या हिंदूंच्या माथी मारला ० तो फसला तरी स्वतंत्र भारतातही त्यांनी तो प्रयोग अट्टाहासाने पुढे चालू ठेवला ० जगभरात फसलेल्या हिंदू-मुस्लिम ऐक्याची सिद्धी भारतात आम्ही यशस्वीपणे करून दाखविली असा डंका त्यांना वाजवायचा होता ० वास्तविक दोन मने फाटल्याने देश विभाजन झाले होते ० स्वतंत्र भारतात दोनच नव्हे तर अनेकानेक मने घट्ट जोडली जाण्याची सुरवात व्हायला हवी होती ० प्रत्यक्षात उलटे झाले ० स्वतःला काही ना काही कारणाने वेगळे समजणाऱ्या लहान गटांनी मुख्य प्रवाहात सामील व्हावे असे आवाहन केले जाण्याऐवजी मुख्य प्रवाहाशी फटकून वागून जो स्वतःला अल्पसंख्यांक म्हणवून घेईल त्याच्यावर सुखसोयींचा वर्षाव होईल असे  क्रयविक्रीचे वातावरण निर्माण करण्यात आले ० परिणामी विवेकानंदानी स्थापन केलेल्या आणि रक्ताचे पाणी करून वाढविलेल्या रामकृष्ण मिशनला आपण हिंदू नसून आपला स्वतंत्र धर्म आहे आणि आपण अल्पसंख्यांक आहोत असे घोषित करण्याचा आणि त्याला न्यायालयात जाऊन अधिमान्यता मिळविण्याचा मोह झाला ० ज्या विवेकानंदांनी धार्मिक आणि बौद्धिक पातळीवर इंग्रजांचा पराभव केला त्या विवेकानंदांचा एकात्मतेच्या पातळीवर पराभव करण्यात काँग्रेसजनांनी आनंद मानला ० लिंगायत लोकांनी हे विसरू नये ० काँग्रेस हिंदुहिताविषयी नेहमी उदासीन राहिली त्याचे किती घातक परिणाम झाले हेही लिंगायत लोकांनी आपल्या स्मरणातून जाऊ देऊ नये ०

                     पाकिस्तानात १९५१ मध्ये हिंदूंचे लोकसंख्येतील प्रमाण २१ प्रतिशत होते आज ते एक प्रतिशतही नाही ० काश्मीर खोऱ्यातून चार लाख पंडितांना सहकुटुंब नेसत्या वस्त्रानिशी हाकलवून देण्यात आले ० काँग्रेसने निषेधाचा शब्दही उच्चारला नाही ० काँग्रेस शासनाच्या सक्रिय आशीर्वादाने ईशान्य भारतातील अनेक राज्ये आज पूर्णपणे ख्रिस्ती झाली आहेत आणि ती तेथील हिंदूंशी सामंजस्याचे सहजीवन जगायला उत्सुक दिसत नाहीत  ० हिंदू धर्म तुम्हाला स्वतंत्र विचार करण्याचे स्वातंत्र्य देतो ० पण इस्लाम आणि ख्रिस्ती धर्म तुम्हाला ते स्वातंत्र्य देत नाहीत  ० तुम्ही लहान दिसलात की तुम्हाला ते धर्म गिळून  टाकतात ० अशी विषमता भारतात अस्तित्वात आहे ० हिंदुधर्म बाटवाबाटवी करीत नाही ० म्हणून राज्यकर्त्यांनी वंचित हिंदू समाज घटक आक्रमक आणि सर्वभक्षक धर्मांकडून फसविले जाणार नाहीत ह्याची व्यवस्था करायला हवी होती ० ते न्यायाला धरून झाले असते ० लिंगायतांना धर्माचे स्वातंत्र्य हवे आहे ० ते त्यांना हिंदू परंपरेने  केव्हाच दिले आहे ० तथापि स्वातंत्र्यही संघटन पाठीशी असेल तर जिवंत राहते ० लिंगायत धर्म जिवंत राहण्यासाठी लिंगायत लोक लिंगायत म्हणून जिवंत राहायला हवेत० ते हिंदुत्वाच्या कक्षेत परिभ्रमण करीत राहतील तोपर्यंत त्यांना कोणी धक्का लावू शकणार नाही०

                     जसा इस्लाम आणि ख्रिस्ती धर्म इतरांपासून वेगळा अशा स्वरूपात स्पष्टपणे दाखविता येतो तसा हिंदुधर्म दाखविता येत नाही ० हिंदूंच्या चिंतनाच्या पद्धतीत प्रत्येकाला स्वातंत्र्य आहे ० त्यामुळे अनेक उपासना पद्धती येथे जन्माला आल्या आणि शतकानुशतके गुण्यागोविंदाने सहजीवन जगल्या ० ह्या सगळ्या उपासना पद्धतीचे जे सार ते म्हणजे हिंदुधर्म असे साधारणपणे मानण्याची रीत आहे ० अमुक एक हिंदुधर्म पाळतो तो हिंदू असे नसून हिंदू पाळतात तो हिंदुधर्म असे आहे ० तरीसुद्धा असा हिंदुधर्म जिवंत आहे ० इस्लाम आणि ख्रिस्ती धर्माच्या आक्रमणापुढे भले भले टिकले नाहीत  ० नामशेष झाले ० टिकला केवळ हिंदुधर्म कारण त्याला हिंदुत्वाचे संरक्षक कवच होते ० धर्मस्वातंत्र्य  देणाऱ्या  हिंदुत्व विचाराशी कृतज्ञपणे सर्व घटक जोडलेले राहिले ० हिंदुत्व म्हणजे राष्ट्रीयत्व.० राष्ट्रीयत्व म्हणजे एकत्वाची जाणीव ० आपण हिंदू आहोत आणि सगळे एक आहोत कारण हजारो वर्षांपासून ह्या देशातील ऋषीमुनींनी ,राज्यकर्त्यांनी ,योद्ध्यांनी आणि हुतात्म्यांनी , कलाकारांनी ,शेतकऱ्यांनी आणि कामगारांनी ,महिलांनी आणि लहान मुलांनी आणि विशेष म्हणजे साहित्यिकांनी ज्या उदात्ततेच्या ,वीरश्रीच्या ,चारित्र्याच्या ,वत्सलतेच्या आणि कठोरतेच्या परंपरा घालून दिल्या त्या स्न्हेबंधनांनी आपले रम्य भावविश्व गुंफले गेले आहे ० ही भूमी आपली पितृभूमी आणि पुण्यभूमी आहे ० आपल्याला काही प्रेरणा घेऊन जगण्यासाठी रोमकडे किंवा मक्केकडे बघावे लागत नाही ० काशीस जावे नित्य वदावे हा मंत्र आपल्याला पुरतो ० मग आपण वैदिक असो की लिंगायत असो ० आमचा धर्म स्वतंत्र आहे असे म्हणतांना आम्ही हिंदुत्वाच्याही कक्षेत येत नाही असे लिंगायतांना सांगायचे असेल तर इस्लाम आणि ख्रिस्ती धर्मापुढे लाचार होणारी काँग्रेस संस्कृती त्यांना फार काळ संरक्षण देऊ शकणार नाही ० निवडणुकीच्या काळात होणारे लाभ हे प्रेयस असतात ० धर्म श्रेयस काय ते सांगतो ० सावरकरांचे ‘ हिंदुत्व ‘ वाचले की श्रेयस काय आणि प्रेयस काय ह्यावर छान प्रकाश पडतो आणि दृष्टी स्वच्छ होते ० ईश्वर लिंगायतांना सद्बुद्धी देओ आणि देईल असा विश्वास आहे ० इत्यलम ०

Previous Article

आमची चूक झाली, फेसबुकचा सर्वेसर्वा झुकरबर्गचा माफीनामा

Next Article

भारतीय सौर कालगणना 

You may also like