Smart Maharashtra

दिसामाजी काही उत्तम वाचावे…

dummy_728

श्रीशालिवाहन शके १९४१, शिवराज्याभिषेक शके ३४५, विकारीनाम संवत्सर

एका फर्जंद मावळ्याच शिवाजी राजांस पत्र

Author: Share:

( सदर पत्र हे फक्त लिखाणाचा भाग असून यामागे प्रत्यक्षअप्रत्यक्षपणे कुणाच्याही भावना दुखावण्याचा कोणताही हेतू नाही, याची नोंद घ्यावी.)असे साहित्य वाचत राहण्यासाठी लाईक करा आमचे फेस बुक पेज 

www.facebook.com/SmartMaharashtraOnline 

माननीय, आदरणीय.

स्वराज्याचे संस्थापक

छत्रपती शिवाजी राजे भोसले

राज, सगळ्यात आधी तुम्हासनी माझा मानाचा मुजरा. राज आधी तुमची माफी मागतो बर का, कारणं हे पत्र लिव्हायला तसा उशीरच झालायं अस वाटतंय. खर तर आधीच लिव्हायला पायजे व्हत. आताच्या जमान्यात व्हात्सअप्पा का काय ते त्याच्यामुळ पत्र नाय लिव्हत कुणी. बरंच लई सांगायचंय राज तुम्हासनी, म्हनुणसी हे पत्र लिव्हण्याचा अट्टाहास.

राज, नुकताच एक पिच्चर बघितला आमी. पांडबासोबत गेलतो नगराला, तेव म्हणला फर्जंद पिच्चर आलाय, लई भारीये तेव. माह्या दोस्त लई कट्टर शिवभक्त हाय बरका. तुमच्यावर लई श्रद्धा हाय त्याची. तुमी देवच हायता बघा आमचं.

राज, त्या पिच्चरमधी शिंवगडावरली लढाई बघितली. तुमच्याव जीव ववाळून टाकणारी मानस लढतानी सवराज्यासाठी जीव सोडत व्हती ते बघुनसी लई वाईट वाटलं बघा. वाईट यच्यासाठी कि माणस मरत व्हती. पण ती जीवाची पर्वा न करता आपल्या धन्यासाठी लढत व्हती हे बघुनसी आमची छाती अभिमानानी भरून आली. राज, काहींचा जीवं गेला पण शिंवगड सवराज्यात आला, हे काय कमी व्हता का तानाजी सारख्या मावळ्याला.

व्हय राज, यक सांगा ना, अत्याचार कसं सहन करत असतील व्ह तवाची माणस? दिवसाढवळ्या बायकांना, पोरींना ते मुघल घेऊन जायचे राव. रडायलाच आलं ते सगळ बघुनसी. पण राज, तुमी सवराज्य उभं केलंसनी, तवा थोडे फार झाले असतील अत्याचार बंद. पण त्याआधी व्हती ना अगदी तशीच कंडीशन आत्ता बी हाये. वयात आलेल्या पोरी, बायका दिवसाढवळ्या गायब व्हत्यात आन आमासनी माहित व्हवून भी आमी कायीच करू शकत नायी. कुणाकड इचारायला जावं त रकुणी आईकून घेत नाय. उलट आमचीच आय-बईन काढायला कमी करत नाय. चुकलंच राव राज तुमचं, जर हे तसचं पयल्यासारख व्हणार व्हत तर मग कायला करायचा सवराज्य स्थापन करायचा परयत्न. पण तुमासनी तरी काय मायित हे आस व्हईन ते. इनाकरण आमचे मावळे गेले ना लढता–लढता. काय किंमत रायली त्यांच्या मरण्याला-सारी सारी, बलिदानाला.

तुमी गिरेट व्हता राज. रयतेच हाल व्हत असतानी राज्याभिषेक कसा करायचा ? असा तुमचा ईचार. तुमी केला हो रयतेचा ईचार. पण आताचे जे राज्यकर्ते हायती ते नाय ना राव करीत आमचा ईचार. इलेक्शन आलं कि आमी त्यांचे मायबाप व्हतो, ती अगदी पाया पडत्यात आमच्या. पण यकदा का इलेक्शन झालं कि आमासनी पायपुसणी करून टाकीत्यात. रयतेवर कधी कोनचा कर लाऊन तुमी सवराज्याची उभारणी नाय केली, पण आता जियसटी आन महागाई नावाच्या भुतांनी जीव नकोसा करून सोडलाय आमचा. पलीकडल्या आळीतला धोंडीबा सांगत व्हता, “आता हाटेलात थोडं जरी खाल्ल तरी इतकं बिल व्हतय कि असं वाटत कि बिल गेट्स आमच्या शेजारी खायाला बसले व्हते.”

पिच्चरमधी काय तब्बेत व्हती त्या फर्जंदाची. ते घडाभर दुध पिण, कमालच कि ! पण आता तेव्हडा घडा उचलायचा म्हंजी नाकी नऊ येत्यात तरुण पोरांच्या, तेव्हड दुध पिण म्हंजी लांबची गोष्ट. हा पण त्यासनी दारू प्यायला लावा, काही पठ्ठे आसले हायती, नाय दोन-दोन घडे पेले तर तिथून पुढ ! ताज दुध तर कुठ मिळतच नाय आजकाल, नुसती पावडर ! जीव घेतला लहान-लहान पोरांचा त्या पावडरीच्या दुधानी. नुसत्या हाडाच्या काड्या करून टाकल्या बघा. तुमचं मावळ यखादा किल्ला सहज चढून जायचे बघा नुसत पळत-पळत. पण आत्ताचे मावळे बघा कि, दोन मजले चढले तरी धापा टाकीतेत. लिफ्ट का काय असतं न शहरात तेच पायीजे त्यासनी. हे कव्हा चढायचेत किल्ला. त्याला फर्जंदासारखे मावळेचं पायजेत. आमचे मावळे हायत, कुणी धाब्यावर , कुणी कट्ट्यावर, कुणी फ्लेक्स वर तर कुणी बार वर. जीव तुटतो हो, ती पिढी बरबाद होतानाची बघताना.

तेव फर्जंद म्हणे फकस्त ६० मावळे घेऊन लढायला तयार झालता. पिच्चर बघितल्यावरच कळल बघा ते. इतिहास वाचाया आन तेव समजून घ्याया यळचं कुनाकडये ? राज, तुमच्या एका शब्दाखातीर मावळे जीव द्यायला तयार झाले हो. फर्जंद तर म्हणे , हा जीव माझा कुठंय, तुमचाच तर हाये. तुमी दिलेलं कड हातात घालताना काय आनंद झालता व्ह त्याला ! आताचे मावळे पण लगीच व्हतेत तयार, पण कयाला, सवाराज्यासाठी लढाया नाय तर दंगली कराया, दगड फेकाया. तुम्ही कड दिलंत लढायासाठी, पण आताचे काही राज्यकर्ते देत्यात बंदुका अन तलवारी मावळ्यांच्या हातात. ते पण आपल्याच माणसांची डोकी फोडाया. काय वाट लाऊनसी ठेवलीये बघा ना. जाऊद्या, नाही बोलत आता त्याचव कायी, नायतर सांच्याला माह्याच घरावर पडायची दगड.

तेव फर्जंद म्हणला , आपली माणस हि खेकड्यागत हायती. तेव अस कमून म्हणला काय कळल नाय तवा. पण येक आलं बघा धेनात. ते दोघ-तीघ मावळे आपापल्यातच लढत होते. कोणाच हातीयार किती मोठ हाय हे दाखवीत व्हते. तवा फर्जंद म्हणला,“तुमी आपल्या-आपल्यातच लढाया लागले तर कसं व्हणार ? कसं आपण किल्ला सर करणार ?” तुमच्या जमान्यातल्या लोकासनी कळल ते, कि आपापल्यातच नसत लढायचं. पण आमी शिकून सुदिक अडाणीच रायलो. आमी आमच्यातच भांण खेळाया लागलो. माणूस हा यकच धरम हाय आन माणुसकी हि यकच जात हाय, हे अमासनी अजून बी नाय कळल. काय मायित कवा कळण ?

राज , अजून लई लिव्हायचं हाय बर का , लई बोलायचय तुमाच्यासनी. पण कामाव जायची येळ झाली, मनुन थांबतो आता इथंच. इतका आटापीटा केला तुमच्या मावळ्यांनी आन त्या राज्याची आमी सगळ्यांनी काय दुरादशा करून ठेवलीये बघा ना ! या सगळ्यासनी आमी सगळेच जबाबदार हायेत बघा. तुमी समद्यानी रक्ताचं पाणी करून हे सवराज्य मिळवलं, पण अमासनी त्याची किंमत नाय रायली. माफ करा राज, लई चुकलो बघा आमी.

– तुमचाच एक फर्जंदा सारखा मावळा

 

@प्रा. विशाल पोपट पवार
रुईछत्तिशी, ता. नगर. जि.अ.नगर
vishalpawar153@gmail.com

( लेखक ATSS महाविद्यालय , चिंचवड, पुणे येथे प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत )असे साहित्य वाचत राहण्यासाठी लाईक करा आमचे फेस बुक पेज 

www.facebook.com/SmartMaharashtraOnline 

Previous Article

वेद अपौरुषेय, ईश्वरनिर्मित आहेत का? भाग ५

Next Article

दिडोंरी तालुक्यात पश्चिम आदिवाशी भागातील उमराळे बु परिसरात पाच ते सहा दिवसांपासून रिपरिप पाऊस पडत असल्याने शेती कामांना वेग

You may also like