Smart Maharashtra

दिसामाजी काही उत्तम वाचावे…

dummy_728

श्रीशालिवाहन शके १९४१, शिवराज्याभिषेक शके ३४५, विकारीनाम संवत्सर

लातूर तालुक्यातील गोंदेगाव येथे होत असलेल्या अंधश्रद्धेच्या कुप्रथेविरुद्ध कारवाई होत नाही, पोलीस ढिम्म

Author: Share:

बाबा राम रहीमच्या अंधश्रद्धेला बळी पडलेल्या लोकांच्या न्यायासाठी उभारलेल्या लढ्याला न्याय मिळायला तब्बल १५ वर्षे लागलीत.

असे भोंदू बाबा, समाजातील लोकांच्या श्रद्धेचा, अज्ञानाचा वापर करून त्यांचे आर्थिक, शारीरिक, मानसिक अशा प्रकारे शोषण करत राहतात. समाज या प्रकारांना श्रद्धा, भावना, धर्म यांचा आधार देत योग्यच ठरवतात. बाबांचा विरोध करणे म्हणजे स्वतःचा जीव धोक्यात घालणे हे स्पष्टपणे दिसते. हरियाणातील धाडसी पत्रकार रामचंद्र छत्रपती यांनी डेराच्या विरोधात भूमिका घेतली म्हणून त्याचा खून केला.

महाराष्ट्रातील लातूर तालुक्यातील गोंदेगाव या गावात राजरोसपणे घडणाऱ्या अंधश्रद्धेच्या विरोधात, भारतीय वायुसेनेचे जयंत धाबेकर, रा. दुधगांव उस्मानाबाद यांनीही अशीच हिंमत दाखवत अंधश्रद्धा करणाऱ्यांच्या विरोधात पुरावे गोळा केले. अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य प्रधान सचिव श्री. माधव बावगे यांच्या मदतीने पोलीस अधिक्षक डॉ. शिवाजी राठोड यांची भेट घेऊन तक्रार व पुरावे सुपूर्द केले.

दि. ०७ जून २०१७ रोजी पोलीस स्टेशन गातेगाव येथील सह पोलीस निरीक्षक चव्हाण यांची भेट घेऊन तक्रार व पुरावे दिले. संबंधित अधिकाऱ्यांनी गुन्ह्याची नोंद केली नाही, उलटपक्षी “आम्हीच प्रत्येक अमावस्या दिवशी पोलीस स्टेशनच्या दरवाज्याला लिम्बु-मिरची बांधतो” असे सांगून तक्रारीची गंभीर दखल घ्यायची सोडून क्रूर चेष्टाच केली.

पोलीस अधिकारीच अंधश्रद्धा मानतात आणि ते या तक्रारीवर निष्पक्ष तपास करणार नाहीत हे स्पष्ट होते. दि. १९ जून २०१७ रोजी विविध उच्च अधिकारी यांना ई मेल पाठवून निष्क्रिय पोलीस अधिकाऱ्याची माहिती दिली.

“आपले सरकार” या संकेत स्थळावर तक्रार नोंदवली (DIST/PLLT/2017/97 ) परंतु त्यावर अजूनसुद्धा काहीही उत्तर मिळाले नाही. प्रशासनाचा ढिम्मपणा पाहून जयंत धाबेकर यांनी वायुसेनेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून मदत मागितली. त्यांनी सदर तक्रारीसंदर्भात गुन्ह्याची नोंद व्हावी या आशयाचे पत्र जिल्हाधिकारी, पोलीस अधिक्षक, जिल्हा सैनिक कल्याण केंद्र, लातूर यांना पत्र लिहिले.

२९ जून २०१७ रोजी, लातूरचे उप-जिल्हाधिकारी डॉ. अनंत गव्हाणे, पोलीस अधिक्षक डॉ. शिवाजी राठोड व उप-विभागीय पोलीस अधिकारी किंद्रे यांची भेट घेऊन वायुसेनेचे पत्र दिले आणि गुन्हा नोंद करावा अशी विनंती केली. गुन्ह्याची नोंद झाली नाही.

२४ जुलै २०१७ रोजी विविध उच्च अधिकारी यांना ई मेल पाठवून मदत मागितली. त्यावर, सहाय्यक आयुक्त समाज कल्याण लातूर यांनी पोलीस ठाणे गातेगावला एक पत्र पाठविले. त्यासंदर्भात पोलिसांकडून काहीही कारवाई झाली नाही.

सर्व प्रकारे प्रयत्न करूनही पोलीस यंत्रणा गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ करत आहे म्हणून ३१ जुलै २०१७ रोजी जयंत धाबेकर यांनी पंतप्रधान कार्यालयाच्या संकेत स्थळावर तक्रार नोंदवली PMOPG/E/2017/0411150.

०१ ऑगस्ट २०१७ रोजी पोलीस अधीक्षक , लातूर यांची भेट घेऊन अंधश्रद्धा विरोधात दाखल केलेल्या तक्रारीवर गुन्हा नोंद व्हावा याविषयीचे निवेदन दिले. जयंत धाबेकर यांनी आता जिल्हा न्यायालयाचे दार ठोठावले आहे.

तरीही, धाबेकर यांचा लढा थांबलेला नाही. पोलीस यंत्रणाच अशा बाबांना पाठीशी घालते. त्यांच्याविरोधात कायदेशीर कारवाई करायची तसदी घेत नाही. समाजातील अश्या अनेक छोट्या मोठ्या बाबा, देवी यांनी कित्येक लोकांचा जीव घेतला, कित्येक लोकांचे आयुष्य उद्ध्वस्त केले पण समाजानेही त्यांचा कधी विरोध केला नाही. ज्यांनी विरोध केला त्यांचा खून या समाजानेच केला.

लेखक: जयंत धाबेकर

Previous Article

आजचा पाऊस आणि पहिले पाढे पंचावन्न

Next Article

नांदगाव येथील काही व्यापार्‍याकडून शेतकरी बांधवांची दिशाभुल

You may also like