Smart Maharashtra

दिसामाजी काही उत्तम वाचावे…

dummy_728

श्रीशालिवाहन शके १९४१, शिवराज्याभिषेक शके ३४५, विकारीनाम संवत्सर

कुठून निघालो, कुठे पोहोचलो?

Author: Share:

मातृप्रधान संस्कृती’ असं बिरूद मिरवणा-या भारतीय संस्कृतीत ईश्वराच्या बरोबरीने स्त्रीचे महात्म्य वर्णिले आहे. ” न मातु: परदैवतम | “असे आईचे अर्थात स्त्रीचे वर्णन करून भारतीय संस्कृतीने प्रत्येक युगात स्त्रीला महत्वाचे स्थान दिलेले आढळून येते. पूर्वीपासून आतापर्यंत स्त्रीचे महत्व व स्थान लक्षात घेऊनच तिला वंदन करण्याची आपली परंपरा आणि संस्कृती आहे. स्त्रीचे स्थान उच्च आहे, म्हणूनच आपल्या संस्कृतीमध्ये ‘मातृदेवो भव’ असे म्हटले जाते. गायीला गोमाता, जमिनीला भूमाता, नदीला लोकमाता, देशाला भारतमाता, इतकंच काय तर अगदी ईश्वरालाही ‘विठाई माऊली’ संबोधण्याची आपली परंपरा. मात्र नारीशक्ती उपासनेची संस्कृती जोपासणारा हाच भारत आज महिलांसाठी जगातील सर्वात धोकादायक देश बनला आहे. ब्रिटन मधील थॉमसन रॉयटर फौंडेशन या संस्थेने केलेल्या सर्वेक्षणानुसार भारत हा बलात्कार, महिलांवर अत्याचार, महिलांचे शोषण यामध्ये अग्रस्थानी आहे.असे साहित्य वाचत राहण्यासाठी लाईक करा आमचे फेस बुक पेज 

www.facebook.com/SmartMaharashtraOnlineयुद्धग्रस्त सीरीया आणि अफगानिस्तानपेक्षाही भारतातील महिलांची स्थती दयनीय असून अफगाणिस्तान, येमेन, सीरिया, सोमालिया, सौदी अरेबिया आणि पाकिस्तान अशा देशांमध्ये इस्लामिक नियमांच्या जाचामुळे महिलांची स्थिती बिकट असल्याचे आपण आजवर मानत होतो, पण त्या देशांतील महिलांपेक्षा अधिक हालअपेष्टा भारतातील महिला सोसत असल्याचे या अहवालाने समोर आणले आहे. स्त्रीशक्तीचा जागर करणाऱ्या भारतासाठी ही बाब जितकी दुर्दैवी तितकीच चिंताजनक म्हणावी लागेल. 2011 मध्ये झालेल्या सर्वेक्षणानुसार अफगानिस्तान, कॉन्गो, पाकिस्तान, भारत आणि सोमालिया हे देश सर्वांत असुरक्षित मानले गेले होते. परंतु, यावर्षी भारतातील महिलांचे वाढलेले प्रश्न पाहून यावेळी भारताला सर्वांत असुरक्षित देश असल्याचे या संस्थेच्या अहवालात म्हटले आहे. ज्या देशाच्या पुरातन संस्कृतीचे गोडवे अवघे जग गाते, आज त्याच देशाला महिलांसाठी असुरक्षित देश म्हटल्या जात असेल तर, आपण कुठून निघालो, आणि कुठे पोहोचलो? याचं आत्मचिंतन आपल्याला करावं लागणार आहे.

जगभरातील नामांकित स्वयंसेवी संस्था, सामाजिक कार्यकर्ते, समाजविज्ञान शाखांचे ज्येष्ठ अभ्यासक इत्यादींकडून विविध निकषांद्वारे ब्रिटन मधील थॉमसन रॉयटर फौंडेशन या संस्थच्या वतीने जगभरातील महिलांच्या स्थितीविषयी सर्वेक्षण केल्या जाते. २०११ च्या सर्वेक्षणात महिलांच्या धोकादायक स्थितीबाबत भारत जगात चौथ्या नंबरवर होता. पण आता 2018 च्या पहाणीत भारताचा नंबर सगळ्यात वरचा लागला आहे. त्यामुळे आधुनिक काळात स्त्री सक्षमीकरणासाच्या गप्पा मारत असताना स्त्रीचं समाजातील खरं स्थान आपल्याला शोधावं लागणार आहे. कोणत्याही प्रवासात मागे वळून पाहणे, हा अनिवार्य भाग. क्षणिक थांबून, पार केलेल्या वळणाकडे ओझरता दृष्टिक्षेप टाकून पुढे चालणे ही प्रवासरीत. या पार्श्वभूमीवर स्त्री जीवनाचा प्रवासही एका ओझरत्या आढाव्याने बघायला हवा.

भारतीय संस्कृतीचा विचार करता इतर कोणत्याही संस्कृतीपेक्षा भारतीय संस्कृतीने प्रत्येक युगात स्त्रीला महत्वाचे स्थान दिलेले आढळून येईल. पुरातन काळात अनेक रणरागिणींनी आपल्या पराक्रमानी इतिहासाची पाने रंगवली दिसून येतात. आजची स्त्रीही पुरुषांच्या तुलनेत कोठेही मागे नाही. प्रचंड आत्मविश्र्वास, चिकाटी, जिद्द आणि बुद्धिमत्तेच्या जीवावर स्त्रीने विविध क्षेत्रांमध्ये आपलं कर्तृत्व सिद्ध केलं आहे. भारतात सुधारणावादी विचारसरणींनी बाळसं धरल्यानंतर ‘चूल आणि मूल’ इतपतच मर्यदित असलेल्या कार्यक्षेत्रातुन स्त्री बाहेर पडली. तिच्या जीवनाला अनेक पैलू लाभले. आणि त्यांना अधिक चमक तिने आपल्या कर्तृत्वाने दिली आहे.

आपल्या बुद्धीला, आत्मसन्मानाला तिने नवीन दिशा दिली आहे. आजच्या जगात असे कोणतेही क्षेत्र नाही जिथे स्त्री नाही. प्रत्येक क्षेत्रात ती पुरुषांच्या पुढे आहे. एव्हडेच नाही तर धर्माच्या आणि परंपरेच्या बंधनातूनही स्त्री मुक्त होऊ लागली आहे. धर्माच्या नावावर मिळणाऱ्या धमक्या ती नुसती पचवू लागली नाही तर परंपरेची पुनर्माडणी करायलाही ती आता शिकली आहे. असं सगळं काही असताना समाजात स्त्रीकडे पाहण्याचा अनेकांचा दृष्टीकोन आजही निकोप नाही. भोवताली घडणाऱ्या घटनां बघितल्या तर स्त्रीसामर्थ्याचा हा गोडवा म्हणजे नाण्याची एक बाजू तर नाही ना? असा प्रश्न पडतो. कारण, आजच्या प्रगत महिलांच्या जीवनातली ‘महिला’ म्हणून होत असणारी घुसमट वाढताना दिसत आहे. आजही घराघरात स्त्री चा छळ केला जातो. हुंड्यासाठी तिला जाळून मारले जाते. महिला मुली रस्त्यावर सुरक्षित फिरू शकत नाही. स्त्रीला केवळ उपभोगाची वस्तू समजणारे महाभागही आपल्या समाजात वावरत आहेत. घरात, कामाच्या ठिकाणी महिलांना अनेक अत्याचारांना तोंड द्यावे लागते. बलात्कार, भ्रूणहत्याच्या घटना आणि अन्याय, अत्याचाराला बळी पडणाऱ्या महिलांची संख्या बघितली तर स्त्री-मुक्ती आणि सक्षमीकरन हे शब्द केवळ बोलण्यासाठीकच तर नाही ना, अशी शंका आल्यावाचून राहत नाही.

प्रत्येक समाजातील महिलेचा दर्जा हा त्या समाजाच्या प्रगतीचा टप्पा दर्शवितो. श्रुष्टीची निर्मिती, पुरातन काळातील कर्तबगार स्त्री, ते चूल आणि मूल, या संकल्पनपुरती बंदिस्त असलेल्या स्त्रीचा प्रवास आज एकविसाव्या प्रगत शतकापर्यंत येऊन पोहोचला आहे. या वळणावर स्त्रीचे नेमके स्थान काय आहे, हे बघायला हवं. आज प्रत्येक क्षेत्रात स्त्रियांनी बाजी मारली आहे. कोणत्याही परीक्षेचा निकाल तपासून पहा त्यात मुलींचा वरचस्मा ठळकपणे अधोरेखित होतो. नुकत्याच झालेल्या राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक परीक्षातच नाही तर यूपीएससी एमपीएससी सारख्या स्पर्धा परीक्षामधूनही मुलींनी आपले यश अधोरेखित केले आहे.

मुलींमध्ये प्रचंड प्रतिभा आणि कार्यशक्ती असल्याचे वारंवार समोर येत असताना समाजाचा मुलींकडे पाहण्याचा दृष्टिकोन अजूनही बदलला नसल्याचे दुर्दैवाने अनेक घटनांमधून सातत्याने समोर येत राहते. तिला केवळ उपभोगाची वस्तू समजणारी विकृत मानसिकता आजही समाजात अस्तित्वात आहे. दिल्लीत निर्भया प्रकरण घडल्यानंतर लोकांना जरब बसणारे कायदे केले गेले असले तरी परिस्थिती सुधारली नाही. निर्भया प्रकरणानंतरच्या कोपार्डी, कठुवा, उन्नाव अशा कितीतरी नृसुंश घटना भारतात सातत्याने घडत आहेत. राष्ट्रीय गुन्हे अहवालानुसार दिवसाला पाच ते सात महिलांवर देशात बलात्कार होतात. हे सदृढ समाजाचे लक्षण कसे मानावे? एकतर्फी प्रेमातून आलेल्या नैराश्येतून अनेक तरुण मुलींवर हल्ले होतात, त्यांचा चेहरा विद्रुप केला जातो.

आजकाल बलात्कारांच्या घटनात नृशंसतेचा कडेलोट केला जातोय, हे रानटीपणाचे लक्षण नव्हे का? त्यामुळे प्रगतीच्या आणि आधुनिकतेच्या गप्पा मारत असताना आपण नेमके कुठे चाललो आहोत याचा विचार प्रत्येकाने करण्याची गरज आहे. माणसाचा स्वार्थ आज माणुसकी धर्मापेक्षा वरचढ ठरू लागला असून त्याला आता कायद्याचाही धाक उरला नसल्याचं वास्तव समोर येऊ लागलं आहे. स्त्री अत्याचारांचा हा कुरूप आलेख नुसता देशाचं सामाजिक स्वस्थ बिघडविणारा आणि जगात शरमेने देशाची मान खाली घालायला लावणाराच नाही तर माणसाच्या माणूसपणावर प्रश्नचिन्ह निर्माण करणारा आहे. त्यामुळे याला कुठेतरी आवर घातला गेला पाहिजे. नुसतं स्त्री सक्षमीकरणाच्या गप्पा मारून समाजातील स्त्रीची अवस्था सुधारणार नाही तर तिच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन समाजाला बदलावा लागेल. थॉमसन रॉयटर फौंडेशन या संस्थेने भारतातील महिलांच्या स्थितीचे वर्णन केलेच आहे.

अर्थात काही विचारवंत आणि तज्ज्ञांच्या मतांच्या आधारे बनविला गेलेला हा अहवाल किती संयुक्तिक, असाही प्रश्न काहीजण उपस्थित करू शकतात. मात्र अहवाल संयुक्तिक असो कि नसो भारतात स्त्रियांना आजही दुय्यम दर्जा दिला जातो, त्यांना केवळ उपभोगाची वस्तू म्हणून बघितले जाते, हे सत्य नाकारता येणार नाही. भारतातील आजच्या अवस्थेला केवळ सरकार कायदा किंव्हा व्यवस्था जबाबदार नाही, तर समाजही त्याला तितकाच कारणीभूत आहे. त्यामुळे आपली संस्कृती काय आणि आपण करतोय का? याचं आत्मचिंतन करण्याची वेळ आज आली आहे.

@ऍड. हरिदास उंबरकर
बुलडाणा
9763469184असे साहित्य वाचत राहण्यासाठी लाईक करा आमचे फेस बुक पेज 

www.facebook.com/SmartMaharashtraOnlinePrevious Article

विक्रम जगताप यांची राष्ट्रवादी युवक काँग्रेस नाशिक जिल्हा उपाध्यक्ष पदी निवड.

Next Article

रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी आयोजित युवकांसाठी आर्य चाणक्य – निबंध स्पर्धा

You may also like