Smart Maharashtra

दिसामाजी काही उत्तम वाचावे…

dummy_728

श्रीशालिवाहन शके १९४१, शिवराज्याभिषेक शके ३४५, विकारीनाम संवत्सर

क्रांतिसिंह नाना पाटील

Author: Share:

जन्म: ३ ऑगस्ट १९००

स्मृतिदिन: ६ डिसेंबर १९७६

स्वातंत्र्यसंग्रामातील धगधगती मशाल आणि स्वातंत्र्यसंगर क्रांतिसिंघ नाना पाटील हे भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील एक धगधगते लोकरीप्रिय मराठी नाव. स्वातंत्र्यानंतर त्यांनी राजकारणात प्रवेश केला. शेतकऱ्यांच्या-कामगारांच्या उन्नतीचे स्वप्न पाहणारा हा नेता होता. महात्मा फुलेंच्या सत्यशोधक समाजातून ते गांधीवादाकडे खेचले गेले आणि आदर्श ग्रामराज्यातून  ग्रामीण जनतेची प्रगतीचा ध्यास त्यांनी घेतला.  प्रतिसरकार हा समांतर शासनाचा एकमेवाद्वितीय प्रयोग त्यांनी राबवला.  स्वातंत्र्यसंग्राम, स्वातंत्र्योत्तर राजकारण आणि ग्रामोन्नतीचा वसा अशा क्षेत्रातून नाना पाटील हे नाव महाराष्ट्रासाठी ललामभूत ठरले आहे.

सांगली जिल्ह्यातील येङमच्छिंद्र हे त्यांचे मूळ गाव. लहानपणापासूनच नानांना दणकट शरीराचे वरदान लाभले होते.पुढील काळातही त्यांच्या भारदस्त व्यक्तिमत्वामुळे लोक त्यांच्याकडे आकर्षित होत गेले. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर नानांनी काही काळ तलाठी म्हणून नोकरी केली. पण समाजकारण व राजकारणाची ओढ असलेले नाना लवकरच नोकरीतून बाहेर पडले.

१९३०च्या सविनय कायदेभंग चळवळीपासूनच त्यांचा स्वातंत्र्य लढ्यात सहभाग झाला. नानांवर वारकरी संप्रदायाचा प्रभाव होता. वक्तृत्वाची देणगी होती. सामान्यांचं भाषेत भाषणे करून प्रेरणा उत्पन्न करण्याची हातोटी नानांकडे होती. ग्रामीण भागातील, बहुजन समाजातील लोकांचा स्वाभिमान जागृत करून त्यांना स्वातंत्र्य चळवळीत सहभागी करून घेण्यात क्रांतिसिंहांचे महत्वाचे योगदान आहे

ब्रिटिश शासनाला समांतर अशी शासन यंत्रणा उभी करण्याचा सृजनशील विचार त्यांनी केला. टिळकांनी सांगितलेल्या होमरुल म्हणजे ‘आपुला आपण करू कारभार’ ह्या सूत्राची हि पुढची पायरी होतील. १९४२च्या चले जाव चळवळीतत्यांनी हा विचार प्रत्यक्ष अंमलात आणला. ही संकल्पना प्रतिसरकार म्हणून ओळखली जाते. प्रतिसरकारच्या माध्यमातून लोकन्यायालये, अन्नधान्य पुरवठा, बाजार व्यवस्था यासारखी लोकोपयोगी कामे केली जात. या प्रतिसरकारच्या माध्यमातून बाजारव्यवस्था, अन्नधान्य पुरवठा, भांडणतंटे सोडवण्यासाठी लोकन्यायालयांची स्थापना, दरोडेखोरांना-पिळवणूक करणार्‍या सावकारांना -पाटलांना कडक शिक्षा – अशी अनेक समाजोपयोगी कामे करण्यात येत होती. प्रतिसरकारचा प्रचार ज्येष्ठ कवी ग. दि. माडगुळकर लिखित पोवाड्यांच्या माध्यमातून आणि शाहीर निकम यांच्या खड्या आवाजाद्वारे केला जात होता.

नाना पाटील यांच्या नेतृत्वाखाली प्रतिसरकारमध्ये विविध दलांची स्थापना झाली. त्यातल्या एका दलाचे-तुफान दलाचे- फील्ड मार्शल जी.डी. लाड होते. ह्या दलाची कुंडल येथे युद्धशाळा होती. या युद्धशाळेतून प्रशिक्षित अशा पाच हजारांवर जवानांच्या दोनशे शाखा स्वातंत्र्यपूर्व काळात गावोगाव काम करीत. तलवारी, जांबिया या परंपरांगत हत्याराबरोबरच पिस्तूल बाँबगोळे फेकण्याचे प्रशिक्षण या जवानांना होते. प्रतिसरकारने गावटग्यांवर बसवलेल्या दहशतीमुळे या सरकारची पत्री सरकार अशी ओळख तयार झाली.

नाना पाटील यांनी ‘तुफान सेना’ या नावाने सैन्य दलाची स्थापना केली होती. ब्रिटिशांच्या रेल्वे, पोस्ट आदी सेवांवर हल्ला करून त्यांना नामोहरम करण्याचे तंत्रही त्यांनी राबवले. १९४३ ते १९४६ या काळात सातारा व सांगली जिल्ह्यातील सुमारे १५०० गावांत प्रतिसरकार कार्यरत होते. या संकल्पनेचा प्रयोग पुढे देशातही अनेक ठिकाणी करण्यात आला. नाना पाटलांच्या ’प्रति सरकार’ला लोक ’पत्रीसरकार’ म्हणत.

१९२० ते १९४२ या काळात नाना ८-१० वेळा तुरुंगात गेले. १९४२ ते ४६ या काळात ते भूमिगतच होते. ब्रिटिशांनी त्यांना पकडण्यासाठी बक्षीस लावले, जंगजंग पछाडले पण क्रांतिसिंह ब्रिटिशांना सापडले नाहीत. भारताला स्वातंत्र्य मिळणार हे नक्की झाल्यावरच (१९४६) क्रांतिसिंह कर्‍हाड तालुक्यात प्रकट झाले.

‘गांधी -विवाह’ ही अतिशय कमी खर्चात विवाह करण्याची पद्धत रुजवण्याचा प्रयत्न केला, तसेच शिक्षण प्रसार, ग्रंथालयांची स्थापना, अंधश्रद्धा निर्मूलन, ग्रामीण जनतेची व्यसनमुक्ती या माध्यमातून समाजसुधारणेचे कार्य केले.

क्रांतिसिंहांचे ६ डिसेंबर इ.स. १९७६ वाळवा मध्ये निधन झाले.

संदर्भ: मराठी विकिपीडिया

Previous Article

भारतातील जाती: डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी वाचलेल्या निबंधाचे विश्लेषण

Next Article

चवदार तळ्याचा महाड सत्याग्रह

You may also like