कोकणातील काही प्रसिद्ध गणपती

Author: Share:

निसर्गाची मुक्त उधळण झालेल्या कोकणात मंदिराची सुद्धा रेलचेल आहे. हिरवळीप्रमाणे भक्तीभावही कोकणात चराचर भरून राहिला आहे. महाराष्ट्राचे लाडके दैवत असलेल्या गणरायावर कोकणचे म्होप प्रेम..त्यामुळेच नाना रूपाच्या मोहक मूर्ती या मंदिरंच्या गाभाऱ्यात अवघ्या  कोकणवर आशीर्वादाची छत्रछाया धरत स्थाई आहेत.

कोकणात माझ्या निसर्गाची भरती

तशीच बढती मंदिरांची

गणेशोत्सवाच्या मुहूर्तावर आम्ही घेऊन आलो आहोत कोकणच्या विविध स्थळी विराजमान गणेशाच्या मंदिरांची माहिती..वाचा आणि नक्की भेट द्या!

कोकणातील काही प्रसिद्ध गणपती

गणपतीपुळे

गणपतीपुळे हे रत्नागिरी जिल्ह्यातील लोकप्रिय पर्यटनस्थळ आहे.

४०० पूर्वींचे महत्वाचे तीर्थक्षेत्र म्हणुन गणपतीपुळे ओळखले जाते. गणेशाचे हे थोरात स्थान अतिशय नयनरम्य व मनाला शांतता देणारे आहे. ह्या मंदिराचे वैशिष्ट्य असे की हे मंदिर समुद्रकिनारी आहे. किनारा आणि मंदिर यातील अंतर फार तर फार पाच मिनिटे असेल. मंदिरातून बाहेर पडल्यावर लगेच आपण किना-यावरच उतरतो. एका बाजूला समुद्र म्हणजे वाळू तर दुस-या बाजूला खडकाळ प्रदेश असे हे अनोखे संयोग आहे, अशा प्रतिकूल परिस्थितीत देखील बाप्पाला आवडणा-या दुर्वा मात्र तिथे विपुल प्रमाणात उपलब्ध आहेत.

निवास स्थान : एम . टी . डी . सी गणपतीपुळे २३५२४८

गुळ्याचा गणपती

गुळ्याचा गणपती पुळ्याला गेला असं कोकणात का म्हणतात ते नक्की ठाऊक नाही पण कथा अशी सांगतात कि  रामचंद्र चिपळूणकर या गृहस्थाला  गणपतीने दृष्टांत देऊन मी गणेशगुळे येथे टेकडीला वास्तवाला आहे असं सांगितल. सातारच्या शाहू महाराजच्या मदत घेऊन त्यांनी हे मंदिर बांधलं सुरवातीच्या काळात गणपतीच्या पोटातून पाणी वाहायचं ते वाहायचं बंद  झालं गणपतीच्या पुळ्याला स्थलातंर केलं असं सांगतात

निवास व्यवस्था : पावस अथवा रत्नागिरी येथे रात्नागीपासून २२ किमी अंतरावर पुढे समुद्रकिनाऱ्यावर जात येत.

लाल गणपती 

सुमारे ५०० वर्षांपासून या गणपतीची इतिहास सांगणार लाल गणपतीचं स्थान हेही वैशिष्ट्य पूर्ण आहे. रत्नागिरीतील तेलीआळी येथील श्री.शेट्ये कुटुंबियांच्या घरी या लालगणपतीची स्थापना केली जाते.  नागपंचमीच्या दिवशी रामआळीतील श्री दत्तात्रय पाटणकर यांच्याकडे गणपतीचा पाट घेऊन जातात. त्याच दिवशी म्हणजे नागपंचमीच्या दिवशी एका दिवसात लाल गणपती ची मूर्ती तयार केली जाते.ह्या गणपतीला बैठक हा प्रकार नसतो.त्यानंतर हरतालिकेच्या एक दिवस अगोदर या गणरायाला रंगविण्यात येते. लाल गणपतीची मूर्ती रामआळीतील पाटणकर कुटुंबीय पिढ्यानपिढ्या साकारत आहेत. या मूर्तीचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे या ह्या गणपतीच्या उंची वा आकारात कोणताही बदल होत नाही.

भाद्रपद विनायकीच्या दिवशी गणरायाचे आगमन मिरवणुकीने होते. गणरायाला खास असा लाकडी रथ तयार करण्यात आलेला आहे. गणेशोत्सवाच्या दिवसांमध्ये लाल गणपतीचे दर्शन घेण्यासाठी भक्तांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या पाहावयास मिळतात.गौरी पूजनही मोठ्या थाटात उत्साहात,पारंपरिक पद्धतीने केले जाते.यावेळी शेट्ये कुटुंबियातील माहेरवाशिणी हजर असतात.

गौरी विसर्जनाच्या दिवशी सजविलेल्या रथातून पारंपरिक पद्धतीने मांडावी समुद्र किनारी विसर्जन केले ज़ाते.

जय गणेश

या मंदिराची स्थापना कालनिर्णयकार ज्योतिर्भास्कर जयंतराव साळगावकर यांनी केली आहे. श्रीगणेशभक्तांना त्यांच्या व्यवसायात निरंतर जय मिळवून द्यावा, जागतिक व्यापार-उद्योगापासुन ते खेळापर्यंत सर्वच आघाड्यावर भारतीयांना जय मिळावा, या संकल्पनेतूनच या मंदिराचे नाव “जय गणेश” असे ठेवण्यात आले आहे. सुवर्णगणेशाचे हे मंदिर म्हणजे मालवण शहरातील प्रमुख मंदिर आहे.

मालवण शहरात सहज चालत जातो येण्याजोगं ठिकाण बाजारपेठेपासून हाकेच्या अंतरावर बी. नारळाच्या बागेतील मंदिराचं बाह्यस्वरूप खूप छान आहे.

रेडीचा गणेश

रेडी गणेश खनिजाच्या खाणीच्या परिसरात सापडला .  या ठिकाणी श्रीगणेशाचे सुंदर मंदिर बांधण्यात आले आहे. दर संकष्ठीला येथे भाविकांची प्रचंड गर्दी जमते.

रेडी येथील नागोळा वाडीतील एक तरुण सदानंद नागेश कांबळी हा ट्रक ड्रायव्हर म्हणून एक लोहखनिजाच्या कंपनीत नोकरीला होता. रेडीतील मायनिंगच्या खाणीवरुन बंदराकडे व बंदराकडून खाणीकडे त्याच्या लोहखनिज भरलेल्या ट्रकची सतत ये-जा होत असे दि. १८ एप्रिल १९७६ रोजी एका विशिष्ट ठिकाणी त्याने आपला ट्रक उभा केला व तो तेथेच झोपला. पहाटेच्या सुमारास त्याला स्वप्न पडले व स्वप्नामध्ये श्रीगणपतीने येऊन त्याच ठिकाणी खोदा आपले या ठिकाणी वास्तव्य आहे असा दृष्टांत दिला. त्यानुसार श्री.कांबळी व श्री.वासुदेव जुवेलकर यांनी मायनिंग कंपनीतील काही मजुरांच्या मदतीने खोदकामास सुरुवात केली. काही भागाचे खोदकाम करताच त्यांना आश्चर्याचा धक्काच बसला. त्यांना गणपतीच्या मूर्तीच्या तोंडाचा व कानाचा भाग स्पष्ट दिसू लागला. लगेच ग्रामदेवता श्री माऊली देवीच्या मंदिरात ही सर्व मंडळी गेली व त्यांनी देवीचा कौल घेतला. श्रीदेवी माऊलीने श्रीगणपतीच्या मूर्तीची त्याच ठिकाणी स्थापन करण्याचा कौल दिला. खोदकाम करता करता दि. १ मे १९७६ रोजी गणपतीची पूर्ण मूर्ती दिसली. ही मूर्ती जांभ्या दगडाच्या गुंफेमध्ये कोरलेली होती व मूर्ती जांभ्या दगडाचीच होती. सुमारे सव्वा महिन्यांनी बंदराजवळ गणपतीचे वाहन असलेला दगडात कोरलेला मोठा उंदीर सापडला. श्रीगणपतीच्या त्या मुर्तीला प्लास्टरिंग व रंगरंगोटी करुन सजविण्यात आले. श्रीगणेशाची ती द्विभुजा भव्य मूर्ती अतिशय देखणी व सुबक दिसते. नवसाला पावणारा हा रेडीचा श्रीगणेश भाविकांचे श्रध्दास्थान आहे. या ठिकाणी गणेशाचे सुबक मंदिर बांधण्यात आले. प्रत्येक संकष्टीस व श्रीगणेशाच्या प्रगटदिनी अनेक भाविक येथे दर्शनासाठी येत असल्याने या परिसरास जत्रेचेच स्वरुप असते.

वेंगुर्ल्यापासून अंतर : वेंगुर्ल्यापासून ३० कि मी बस – खासगी वाहने आहेत.

उफराटा गणेश

सुमारे ३०० वर्षांपूर्वी गुहागरच्या समुद्रात सापडलेली संगमवराची सुंदर पांढरी मूर्ती किनाऱ्यालगत रस्त्याच्या कडेला पूर्वेकडे तोंड करून स्थापन केली  खवळलेल्या समुद्राच्या प्रकोपापासून गुहागरला वाचवण्यासाठी, एका नि: सीम भक्ताच्या हाकेला श्री गणपती धावून आला . पूर्वाभिमुख असलेल्या गजाननाने आपले मुख वळवून पश्चिमाभिमुख म्हणजेच सागराकडे केले आणि समुद्र शांत झाला . त्या भयानक संकटापासून गुहागरचे संरक्षण झाले . दिशा संपूर्ण बदलली (उफराटी) म्हणून “उफराटा गणपती”. अशी कथा आहे .

पांढऱ्या शुभ्र मूर्तीच्या हातात परशु व त्रिशूळ आहे . डाव्या सोडेंचा गणपती असून या मूर्तीभोवती नागन वेंटिले घातलं आहे

गुहागर गावात बस स्टॅंडपासून चालत १० मिनिटांच्या अंतरावर देवपाटात हे गणेश मंदिर आहे.

बळेश्वर

केळशीत उटंबर शंकराचे एक पवित्र स्थान आहे असून बळेश्वर या नावाने ते प्रसिद्ध आहे तर केळशीत परांजपे आळीत गणेशाची छोटीसी देखणं मंदिर आहे गणेशाची संगमवारी मूर्ती मनमोहक आहे.

हेदवी दशभुजा गणेश

हेदवीच्या दशभुजागणपतीचं देऊळ अतिशय प्रसिद्ध आहे. हे पेशवेकालीन मंदिर गुहागर शहरापासून साधारण वीस किलोमीटर अंतरावर आहे. डोंगराच्या पायथ्याशी, एका बाजूला अगदी शांत परिसरात असलेलं हे मंदिर नुसतं पाहूनही मन प्रसन्न होतं. मंदिर परिसरात सुंदर उद्यान निर्माण करण्यात आल्यानं हा परिसर आणखी सुंदर झाला आहे. मंदिरातील मूर्ती ‘श्री दशभुजा लक्ष्मीगणेश’या नावानं ओळखली जाते.

हेदवीच्या गणपती मंदिराच्या अलीकडे बामणघळ हा निसर्गाचा अनोखा चमत्कार आहे. हेदवीपासून तीन किलोमीटर अंतरावर उजव्या बाजूस जाणारा उतार लागतो. या रस्त्याने गेल्यास समुद्रकिनारा लागतो. किनाऱ्यावरच थोड्या अंतरावर उमा-महेशाचं एक सुंदर मंदिर आहे. मंदिरापासून थोडं आणखी पुढे डोंगराच्या दिशेने गेल्यावर कातळामध्ये समुद्रापर्यंत पडलेली एक उभी मोठी चीर दिसते. हीच ती प्रसिद्ध बामणघळ. किनाऱ्यावरून सुरू होणाऱ्या कातळापासून काही फूट आतपर्यंत सुमारे दहा ते पंधरा फूट एवढी तिची उंची ही घळ पडलेली आहे. समुद्राच्या लाटांचं वेगानं येणारं पाणी या ठिकाणी वर्षानुवर्षं घुसून ही घळ तयार झाली आहे. लाटांचं पाणी वेगाने आत घुसतं,  वेगवेगळे आकार पार करत ते घळीच्या अगदी वरच्या टोकापर्यंत शिरतं आणि तिथून वेगानं वर उसळतं. भरतीची वेळ असेल आणि लाटांचा जोर जास्त असेल, तर एवढ्या खोल असलेल्या घळीतूनही हे पाणी वेगानं वर आकाशाच्या दिशेने फेकलं जातं आणि कातळाच्या पृष्ठभागापासून काही फूट वर उडतं. घळीच्या अगदी वरच्या टोकापर्यंत किंवा बाजूलाही आपल्याला उभं राहता येत असल्यामुळे, कधीकधी आपल्यालाही या तुषारसिंचनाचा आनंद घेता येतो; मात्र ही घळ जेवढी सुंदर, तेवढीच धोकादायक आहे. अतिउत्साह दाखवणाऱ्या पर्यटकांचा जीव धोक्यात आल्याच्या घटनाही इथे घडल्या आहेत.

आंजर्ल्याचा कड्यावरचा गणपती

दापोली पासून अर्ध्या तासाच्या अंतरावर असणारे आंजर्ले  गाव . उजवीकडे उंच डोंगरावर मंदिराचा कळस  खुणावतो . पूर्वी मंदिरात जाण्याकरता होडीतून जावे लागे. परन्तु आता ५-६ वर्षांपूर्वी नवीन रस्ता (पूल ) झाला , जो थेट मंदिराच्या पायथ्यापर्यंत घेऊन जातो.

मंदिर परिसरात ६०० वर्षांपूर्वीचा बकुळ वृक्ष आहे.  मंदिराच्या शेजारी शंकराचे मंदिर आहे. गणेश मूर्ती ४ फूट असून बाजूला रिद्धी सिद्धी च्या प्रतिमा कोरलेल्या आहेत , पोटाभोवती नाग असून हातात परशु आणि अंकुश अशी शस्त्रे आहेत . मुख्य म्हणजे मूर्ती उजव्या सोंडेची आहे.

दापोलीपासून अंतर : १८ किमी रस्ता अरुंद आहे, रेल्वेस्थानक : खेड, बससेवा : दापोली बसस्थानकांपासून पहाटे ५ वाजल्यापासून रात्रौ ८ पर्यंत बस सेवा उपलब्ध आहेत.

१२ पिढय़ांपर्यंत या देवस्थानचे व्यवस्थापन नित्सुरे घराण्याकडे नांदले. आज या मंदिरात सर्व गणेशभक्तांना स्वहस्ते श्रीपूजा करण्याचा अधिकार आहे. त्यासाठी नित्सुरे विश्वस्तांनी पुढाकार घेऊन आवश्यक ती घटनादुरुस्ती केली आहे. मंदिराचे दरवाजे सर्व धर्मीयांसाठी खुले केले आहेत.

निवास स्थानक : दापोली , मुरुड , हर्णे अथवा आंजर्ले गाव येथे भक्तनिवास आहेत.  फो न. २३४३००

अठरा हातांचा श्रीवीरविघ्नेश

रत्नागिरी शहरातील वरच्या आळीत असलेल्या अठरा हातांच्या गणपतीचे मंदिर भाविकांचे श्रद्धास्थान आहे. अष्टदशभुज गणपती किंवा वीरविघ्नेश्वर या नावाने हे स्थान ओळखले जाते. श्रीवीरविघ्नेश गणपतीची स्थापना १७६७ मध्ये झाली. या मूर्तीची स्थापना विनायक जोशी यांनी केली. मूर्ती खास जयपूरहून घडवून आणलेली आहे. मूर्तीला अठरा हात असून हे हात महालक्ष्मीचे आणि स्वरूप महागणपतीचे आहे.

मंदिर खासगी मालकीचे असून, कोणत्याही प्रकारची चीजवस्तू देणगी स्वरूपात स्वीकारली जात नाही. मंदिराचा वार्षिकोत्सव मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदा ते पंचमीपर्यंत साजरा होतो.

खेडचा श्रीसिद्धिविनायक

रत्नागिरी जिल्ह्यातील खेड येथील श्रीसिद्धिविनायकाची स्थापना सुमारे ११० वर्षांपूर्वी हरी रंगनाथ कार्ले-इनामदार यांनी केली असे सांगण्यात येते. त्यामुळे या मंदिराचा मालकीहक्क व पूजेची जबाबदारी कार्ले घराण्याकडेच आहे. त्यासंदर्भात एक दंतकथा सांगितली जाते. सुमारे ११० वर्षांपूर्वी हरी रंगनाथ कार्ले-इनामदार यांच्या स्वप्नात येऊन श्रीसिद्धिविनायकांनी दृष्टांत दिला की, येथून जवळच असलेल्या सुसेरी नदीमध्ये माझी मूर्ती आहे ती काढून आण. दुसऱ्या दिवशी सकाळी उठून सुसेरी नदीत जाऊन पाण्याच्या डोहात शोध घेतला असता उजव्या सोंडेच्या श्रीसिद्धिविनायकाची मूर्ती सापडली. कार्ले-इनामदार कुटुंबीयांनी तिची स्थापना आपल्या वाडय़ाच्या समोरील मोकळ्या जागेत केली. त्या वेळेस कुटुंबीयांनी तेथे छोटेखानी मंदिर उभारले. उजव्या सोंडेच्या श्रीसिद्धिविनायकाची सुबक आणि सुंदर मूर्ती आजही तिथेच आहे. देवस्थानची जबाबदारी स्थापनेपासूनच कार्ले यांच्याकडे होती. त्यांच्याकडे गावची इनामदारी होती. या मंदिरात माघी गणेशोत्सव फार मोठय़ा प्रमाणात केला जातो. भक्तांच्या हाकेला धावणारा श्रीसिद्धिविनायक अशी येथील भाविकांची श्रद्धा आहे.

किल्ले मंडणगडावरील श्रीगणेश

छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात विविध गडांवर गणपतींची स्थापना करण्यात आली, त्यापैकी किल्ले मंडणगडावरील श्रीगणेश हा एक मानला जातो. मंडणगड किल्ल्याची उभारणी इ.स. १२ व्या शतकात पन्हाळ्याचा राजा भोज याच्या कारकीर्दीत झाली. त्यानंतर सोळाव्या शतकात किल्ल्याची डागडुजी करण्यात आली. इ.स. १८१८ मध्ये या किल्ल्याचा ताबा ब्रिटिशांकडे गेला. ऐतिहासिक संदर्भ ग्रंथामध्ये या किल्ल्याचे नाव महाराजांच्या काळात हिम्मतगड असे होते. तर काही ठिकाणी किल्ल्याचा उल्लेख मदनगड असा असून कालांतराने मंडणगड असे नाव पडले. या किल्ल्यावरील  श्रीगणेशाच्या मंदिराची स्थापना महाराजांच्या काळात करण्यात आली असे आढळून येते.

मंदिराचा जीर्णोद्धार १९८४ मध्ये करण्यात आला. श्रीची भग्नमूर्ती बदलून त्या जागी नवीन मूर्ती बसवण्यात आली. माघ महिन्याच्या गणेशचतुर्थीला गडावर उत्सव साजरा केला जातो. उत्सवादिवशी गडावर महाप्रसादाचे आयोजनही करण्यात येते.

_______________________________________________________________________

संदर्भ:
१. कोकणातील देवालये, प्रा. सुहास बारटक्के, परचुरे प्रकाशन
२. “किती किती रूपे तुझी..”- लोकप्रभा, २१ सप्टेंबर २०१२
३. निसर्गाचा चमत्कार बामणगळ : अभिजित पेंढारकर
४. *ओवी: प्रज्ञा माने
Previous Article

गणेश मंत्र आणि मंत्राचे महत्व भाग १

Next Article

स्मार्ट महाराष्ट्रच्या सर्व वाचकांना श्रीगणेशचतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!

You may also like