कर्नाटकात भाजप विजयी आहे !

Author: Share:

कर्नाटकाच्या नाटकात भाजपाला खलनायक ठरविण्यात येत आहे हे फार मोठे कारस्थान आहे ० इस्लाम आणि ख्रिस्ती हितसंबंधांचे उघड आणि छुपे प्रतिनिधित्व करणारे ह्या देशातले काही प्रभावशाली गट आणि राष्ट्रव्यवहारातल्या विभिन्न क्षेत्रातल्या फाजील महत्वाकांक्षी आणि विधिनिषेधशून्य भ्रष्टाचारी प्रवृत्ती ह्यांचे हे कारस्थान आहे ० प्रसारमाध्यमे त्यात सामील झाली आहेत ही शोकांतिका आहे ० ही शोकांतिका हे आव्हान समजून आपण कंबर कसली पाहिजे असे हिंदुत्वनिष्ठ माध्यमांना वाटत नाही ही आणखी एक पण गंभीर शोकांतिका आहे ० भाजपाला कर्नाटकात सरकार स्थापिता आले नाही ही वस्तुस्थिती आहे ० परंतु त्याचा चुकीचा अर्थ लावून ती खोटेपणाने सांगितली जात आहे ० अनैतिक मार्गांनी आणखी एक राज्य गिळंकृत करण्याचा मोदी आणि शहा ह्यांचा नीच प्रयत्न संजीवनीच्या शोधात आलेल्या काँग्रेस पक्षाने हणून पडला आणि ह्या लोकशाही रक्षणाच्या कामात एक प्रादेशिक पक्षाने आणि सर्वोच्च न्यायालयानेही काँग्रेसची पाठराखण केली असे दाखविण्यात येत आहे ० कर्नाटकाने भविष्याचे सूचन केले आहे असा आशादायक आणि विश्वासदर्शक भास उभा करण्यात येत आहे ०

सबका साथ सबका विकास असा शंखध्वनी करून प्रगतीचे टप्पे मागे टाकीत भारताचा लोकरथ वेगाने घोडदौड करीत असल्याचा हुंकार मोदी आणि शहा करीत असले तरी प्रत्यक्षात मुसलमान,महिला आणि मागासवर्गीय ह्यांना पायदळी तुडविण्याचे अभियान भाजपने चालविले आहे अशी हाकाटी कर्नाटक नाट्यानंतर सुरु झाली असून भाजपने सत्तास्थानी असण्याचे अरिष्ट दूर करण्यासाठी आगामी २०१९ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी सर्व प्रादेशिक पक्ष अधिक काँग्रेस असे महागठबंधन होईल अशी ग्वाही देण्यात येत आहे ० अंत्योदय उद्दिष्ट समोर ठेवून गेली चार वर्षे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लोकाभिमुख शासनाचा जो सुखद अनुभव दिला नि त्यामुळे जे नवे समर्थक भाजपाला मिळाले त्यांचा बुद्धिभ्रम करण्याचा मोठा संघटित प्रयत्न सुरु झाला असून त्यात प्रसारमाध्यमे महत्वाची भूमिका बजावत आहेत हे लक्षात घेतले पाहिजे ० त्यादृष्टीने पुढील तीन मुद्द्यांचा विचार ह्या लेखात मी करणार आहे ०

कर्नाटकात नेमके काय घडले ? काँग्रेसला भाजपवर टीका करण्याचा किती हक्क आहे ? सत्ता स्थापन करता आली नाही हे सध्या जरी अपयश वाटत असले तरी त्याचा लाभ लोकसभा निवडणुकीत भाजपाला होऊ शकतो ० हे ते तीन मुद्दे ० कर्नाटकातील स्पर्धा केवळ भाजपविरुद्ध इतर सगळे अशी होती की राष्ट्रहितैषी विचारवंतांनाही त्यात काही महत्वाची भूमिका बजावता आली असती का असा चौथा मुद्दाही विचारात घेतला जाणार आहे ०

कर्नाटकात भाजप सर्वाधिक जागा मिळवलेला पक्ष म्हणून पुढे आला आहे ० काँग्रेस आणि जनता दल सेक्युलर हे पक्ष भाजपच्या पुष्कळ मागे आहेत ० जनतादलाच्या ऐंशी प्रतिशत इच्छुकांनी अनामत रकमा गमावल्या आहेत ० पाच वर्षांपूर्वी झालेल्या निवडणुकीत भाजपाला चाळीस जागा मिळाल्या होत्या त्या ह्या वेळी १०४ झाल्या ० म्हणजे अडीच पट वाढल्या ० ह्याला लोकांचा कल भाजपच्या विरुद्ध लागला म्हणायचा की बाजूने लागला म्हणायचा ? काँग्रेसच्या पन्नासहून अधिक जागा कमी झाल्या आहेत ० म्हणजे निर्विवादपणे लोकांचा सत्तास्थापनेचा कौल भाजपाला मिळाला आहे ० विधानसभेत बहुमत सिद्ध करण्यासाठी भाजपाला आठ जागा कमी पडल्या ० पण हे कमी पडणे ह्यात लोकांचा दोष नाही ० भाजपच्या स्थानिक कार्यकर्त्यांचे प्रयत्न कमी पडले ० त्यांनी लावला त्यापेक्षा अधिक जोर लावला असता तर त्याला लोकांनी चांगला प्रतिसाद दिला असता ०


असे साहित्य वाचत राहण्यासाठी लाईक करा आमचे फेस बुक पेज 

www.facebook.com/SmartMaharashtraOnline


लोक भाजपाला हवी तेव्हढी मते देण्यास उत्सुक होते ० म्हणून तर गेल्या निवडणुकीपेक्षा ६४ जागा लोकांनी वाढवून दिल्या ० जे काँग्रेसचे सरकार कर्नाटकात राज्य करीत होते त्यातील निम्म्याहून अधिक मंत्र्यांना लोकांनी घरी बसविले ० म्हणजे लोकांना काँग्रेस पुन्हा सत्तेवर यायला नको आहे ० असे असूनही काँग्रेस पुन्हा सरकार बनवीत आहे आणि तो लोकशाहीचा विजय आहे असे प्रसारमाध्यमे लोकांना सांगत आहेत ० काँग्रेस आणि जनता दल ह्यांच्या युतीचे सरकार कर्नाटकावर राज्य करणार आहे ० त्यांचे विळ्याभोपळ्याइतके सख्य आहे ० तरी त्यांनी भाजपचा हक्क नाकारून सत्ता मिळविली हा लोकशाहीचा विजय आहे असे जे सांगितले जात आहे ० ते वस्तुस्थिती निदर्शक नाही ० कारण सामान्य माणसाच्या समस्या आणि सुख , श्रेयस आणि प्रेयस ह्या दोन्ही निकषांवर कसे साधता येईल ह्याचा अहर्निश विचार करून जो सरकारी चक्रे हलवितो त्या मोदींच्या पाईकांच्या हाती सत्ता सुपूर्द करण्याची जनतेची इच्छा होती ० हजारो हातांनी ते भाजपला हवे ते द्यायला सिद्ध होते पण स्थानिक भाजप कार्यकर्त्यांची झोळी दुबळी पडली ०

सर्वाधिक जागा मिळविलेला पक्ष म्हणून भाजपाला सत्ता स्थापनेची पहिली संधी दिली ह्या कारणासाठी राज्यपाल वजुभाई वाला ह्यांच्यावर अश्लाघ्य भाषेत टीका करण्यात आली ० ठरावीक मुदतीत विधानसभेत बहुमत सिद्ध करण्याचे बंधन राज्यपालांनी भाजपवर घातले होते ० मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीत त्यांनी पाच वर्षासाठी भाजपच्या नेत्याची प्राणप्रतिष्ठा केली नव्हती ० राज्यपाल वजुभाई वाला हे संघाचे स्वयंसेवक आहेत हा त्यांचा सगळ्यात मोठा अवगुण आहे आणि पक्षपाती वृत्तीने ते काँग्रेस-जनता दल युतीचा हक्क डावलून भाजपचे घोडे पुढे दामटतील अशी भीती काही वृत्तवाहिन्यांवरून व्यक्त झाली ० ते पंतप्रधानांच्या विश्वासातले आहेत हा त्यांचा दोष दाखविण्यात आला ० ह्या काँग्रेसच्या विषाक्त आणि असहिष्णू वातावरणाने भारताचे गेल्या सत्तर वर्षाचे राजकारण प्रदूषित झाले आहे ०

आपण स्वतंत्र होताच नेहरूंनी भारतात काम करीत असलेली मुस्लिम लीग फाळणीला उत्तरदायी आहे असे समजू नका तर ती देशभक्तांची संघटना आहे असे माना असा फतवा काढला होता ० तीच काँग्रेस संघाला देशभक्तांची संघटना मानायला सिद्ध नाही ० कॉग्रेसला संघ अस्पृश्य आहे ० काँग्रेसला संघ नष्ट व्हायला हवा आहे ० राज्यपाल वजुभाई वाला हे स्वयंसेवक आहेत हा त्यांचा अपराध आहे का आणि असला तर तो किती मोठा आहे ? सुशीलकुमार शिंदे म्हणाले की काँग्रेस आणि जनता दलाचा हक्क डावलून त्यांनी भाजपाला संधी दिली ह्या त्यांच्या पक्षपातीपणाची आयोग नेमून चौकशी झाली पाहिजे ० हे शिंदे केंद्रात गृहमंत्री असतांना त्यांनी हिंदू आतन्कवाद हा शब्द प्रचलित करण्याचा उद्योग केला होता ० त्यामुळे त्यांनी गृहमंत्रिपद किती निष्पक्षपातीपणे सांभाळले असेल ह्याविषयी चिंता व्यक्त करणारे विचार देशभक्त नागरिकांच्या मनात आलेच असणार ० तेव्हा सोक्षमोक्ष लावण्यासाठी शिंदे ह्यांच्या गृहमंत्री असतानाच्या कालखंडाची आयोग नेमून चौकशी झाली पाहिजे अशी मागणी करणे अयोग्य ठरणार नाही ०

मालेगावचा बॉम्बस्फोट हिंदूंनी केला असे खोटे चित्र उभे करण्यासाठी काँग्रेसच्या राजवटीत कर्नल पुरोहितांसारख्या कर्तृत्ववान, दक्ष आणि देशासाठी केव्हढाही पराक्रम आणि केव्हढाही त्याग करण्यास सिद्ध असलेल्या सेनाधिकाऱ्याला प्रचंड मानसिक आणि शारीरिक छळ करून आठ वर्षे कारागृहात डांबण्यात आले ० शेवटी ते निर्दोष सुटले ० अजमल कसाबसारख्या पाकिस्तानी आतन्कवाद्यांनी २००८ मध्ये मुंबईवर हल्ला केला त्यात ज्या स्थानिक रहिवाश्यांनी त्यांना सहकार्य केले त्यांच्या देशद्रोहीपणाचे जे पुरावे उपलब्ध होते ते काँग्रेस सरकारच्या गृहमंत्र्यांनी नष्ट केले आणि त्यांना जीवदान दिले ० ह्या दोन घटनांविषयी सुशीलकुमार ह्यांना काय म्हणायचे आहे ते चौकशी आयोगासमोर उघड होईल ० काँग्रेसच्या सत्तरवर्षाच्या कारभाराला मुसलमानांचा अनुनय आणि त्यांना हवा असेल तेव्हढा हिंदुद्वेष अशी पार्श्वभूमी आहे ० प्रसारमाध्यमे सत्य सांगायला पुढे येत नाहीत हे दुर्दैव आहे ०

कर्नाटकात भाजपाला सत्ता मिळविण्याची घाई झाली होती म्हणू त्यांनी राज्यपालांची अनुमती मिळविण्याचे दुस्साहस केले असा एक आरोप केला जातो ० ह्या संदर्भात काँग्रेसची पार्श्वभूमी तपासू ० सत्ता मिळविण्याची नेहरूंना अतिशय घाई झाली होती म्हणून फाळणी टाळण्यासाठी प्रयत्न न करता त्यांनी ती स्वीकारली असा आरोप केला जातो ० हा आरोप मान्यवरांनी केला आहे आणि त्याचे उत्तर मिळाले तर आजही हवे आहे ० दुसऱ्यांचे न्याय हक्क डावलून ते बळकावणे आणि सत्ता मिळविणे ह्याविषयी काँग्रेसला बोलण्याचा काही नैतिक अधिकार आहे काय ? स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान सरदार वल्लभभाई पटेल ह्यांनी व्हावे असा कौल जवळजवळ सर्व प्रदेश काँग्रेस संघटनांनी दिला होता ० त्याला झिडकारून मोहनदास गांधींनी नेहरूंना पंतप्रधान केले ० मुसलमान आणि अन्य अल्पसंख्यांक ह्यांच्याशी कसे वागायचे हे पटेलांपेक्षा नेहरूंना अधिक चांगले माहीत आहे आणि त्यांना पाश्चात्य रीतिरिवाजही चांगले अवगत आहेत अशी कारणे गांधींनी आपल्या निवडीच्या समर्थनार्थ दिली होती ० म्हणजे हिंदूंचा कौल डावलून मुसलमान आणि ख्रिस्ती ह्यांच्या पसंतीला अग्रक्रम देण्याची परंपरा पहिल्या दिवसापासून सुरु झाली आणि ती गांधींनी सुरु केली ० त्याचा लाभ नेहरूंनी घेतला ० आता तो लाभ राहुल गांधींना हवा आहे ०

जे झालें ते चांगले झाले ० नरेंद्र मोदींचे केंद्रातील काम करणारे सरकार , भाजपाची अनेक राज्यातील काम कारणारी सरकारे आणि कर्नाटकातील राहुल गांधींचे सरकार ह्यांची तुलना करण्याची संधी जनतेला मिळाली आहे ० लोकसभा निवडणुकीत मतदान करण्याच्या वेळी चांगल्यावाईटाची निवड करतांना ह्या अभ्यासाचा उपयोग होईल ० कर्नाटकातील जनतेने भाजपला कौल दिला आहे ० तो ऐतिहासिक आहे आणि नव्या युगाची सुरवात करणारा आहे ० मोगलांनी हिंदूंना जेव्हढे अपमानित केले नसेल तेव्हढे काँग्रेसने केले आहे ० मोगल परके होते ० काँग्रेस स्वदेशी होती ० काँग्रेसची स्थापना इंग्रजांनी केली ० पहिल्याच अधिवेशनात हिंदुराष्ट्राची शतकानुशतके प्रचलित असलेली संकल्पना मोडीत काढून हिंदी राष्ट्राची संकल्पना स्वीकारण्यात आली ० ह्या संकल्पनेने हिंदूंना करकचून बांधण्यात आले आणि ती नाकारण्याचे स्वातंत्र्य मुसलमानांना देण्यात आले ० त्याप्रमाणे ती नाकारून पाकिस्तान निर्माण करण्यात आले ०

उरलेल्या भारताचा पहिला पंतप्रधान नेमताना तो हिंदुहितापेक्षा मुसलमानांच्या आशाआकांक्षांशी समरस होईल ही काळजी घेण्यात आली ० म्हणून भारतीय सैन्याला काश्मीर संपूर्ण मुक्त करू देण्यात आला नाही ० आज भारतातील ख्रिश्चन संस्था उघड्पणे मोदींना विरोध करून राहुल गांधींच्या पाठीशी उभ्या राहिल्या आहेत ० कश्मीरमध्ये नेहरूंनी आणि काँग्रेसने लाडावलेले लोक भारतीय सैन्यावर दगडफेक करीत आहेत ० पारतंत्र्याच्या दिशेने चाललेला हा प्रवास रोखला जाईल अशी शुभचिन्हे कर्नाटकातील भाजपच्या विजयाने दिसू लागली आहेत ० काँग्रेसमुक्त भारताच्या मोदींच्या घोषणेचा अर्थ आहे की ह्या पुढे हिंदुहित डावलून देशाचा कारभार हाकला जाणार नाही ० हिंदुहितात अल्पसंख्यांकांचे हित कसे सुरक्षित आणि वर्धिष्णू असते ह्याची प्रत्यक्ष प्रमाण साक्ष द्यायला हजारो यहुदी म्हणजे ज्यू आणि पारशी पुढे येतील ० मात्र त्यांना मोदींच्या राज्यात पाकिस्तान निर्माण करता येणार नाही आणि ईशान्य भारत तोडून भारतापासून अलग करता येणार नाही ० कर्नाटकाच्या जनतेने काँग्रेसमुक्त भारताची कल्पना स्वीकारली आहे ० त्यामुळे आत्मविश्वास दुणावून भाजपच्या कार्यकर्त्यांनी आणि समर्थकांनी लोकसभा निवडणुकीच्या सिद्धतेला लागायला हवे ०

कर्नाटकातील संघर्षाला भाजप विरुद्ध इतर पक्ष असे मर्यादित राजकीय स्वरूप यायला नको होते ० त्याला सर्वंकषतेचे परिमाण असायला हवे ० म्हणजे इतर समाज घटकांनी ह्या युद्धात उतरायला हवे ० इस्लाम आणि ख्रिस्ती संघटनांनी त्यादृष्टीने मोर्चेबांधणीस सुरवात केलीच आहे ० विचारवंतांकडून एक विधायक प्रस्ताव पुढे यायला हवा होता ० जनतादलास आवाहन करायला हवे होते ० ह्या दोन पक्षांनी युती करून सरकार बनविण्याचे आवाहन विचारवंत,साहित्यिक ,कलावंत आणि उद्योगपती ह्यांनी करायला हवे होते ० जनता दलाने बाहेरून पाठिंबा दिला असता ० भाजप आणि जनता दल ह्यांनी विकासविषयक समान आर्थिक कार्यक्रम ठरवायला पाहिजे होता ० जर कार्यक्रम कार्यवाहीत आणण्यास भाजप अपयशी ठरला तर त्याने एक वर्षानंतर आपणहून सत्तात्याग करावा असे बंधन घालता आले असते ० जे काँग्रेसचे नाहीत पण भाजपच्या विरोधात आहेत अशा घटकांना काँग्रेसमुक्तीचा अर्थ समजावून सांगण्यात भाजपचे कार्यकर्ते ह्यांचे कौशल्य ह्यापुढे पणाला लागणार आहे ० ह्या कामी वैचारिक खाद्य पुरविण्याचे काम भाजप नव्हे तर भारतनिष्ठ विचारवंतांनी सर्व शक्तीनिशी करायला हवे ०

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी ह्यांनी कर्नाटक नाट्यात त्यांची भूमिका वठवितांना मोदींमुळे भारताचा पाकिस्तान होतो आहे अशी खंत व्यक्त केली ० त्यांनी निराश होण्याचे कारण नाही ० भारताचा , जोपर्यंत ह्या देशात हिंदूंची बहुसंख्य आहे तोपर्यंत , पाकिस्तान कधीही होणार नाही ० कारण लोकशाही आणि धर्मनिरपेक्षता हिंदूंच्या रक्तात मुरली आहे आणि त्याला शेकडो वर्षांची परंपरा आहे ० पण हिंदूंच्या ह्या गुणवैशिठ्याची काँग्रेस कधीही वाखाणणी करीत नाही ० मुसलमान हिंदी राष्ट्र का स्वीकारत नाहीत ह्याचा काँग्रेसने कधी गंभीरपणे विचार केला नाही ० त्यांना मुसलमानपण किंचितही सोडायचे नसून अखंड भारताचे अखंड पाकिस्तान करायचे आहे ० मुसलमानांचा हा फुटीरतावाद नष्ट करण्यासाठी ते मूळचे हिंदू आहेत ह्याची त्यांना जाणीव करून द्यावी लागेल ० ते काँग्रेसला जमणार नाही ० सबका साथ सबका विकास ह्या घोषणेनुसार मुसलमानांना बरोबर घेऊनच हिंदू पुढे जाणार आहेत ० मात्र त्यांना पाकिस्तान निर्माण करण्याची महत्वाकांक्षा धरता येणार नाही ० त्यात हिंदूंचे काही चुकले आहे असे काँग्रेस सोडून कोणी म्हणणारे नाही ० म्हणून काँग्रेसमुक्त भारत हवा आहे ० ते तस्से होईल ह्याची ग्वाही कर्नाटकात मोदी आणि शहा ह्यांच्या नेतृत्वाने दिली आहे ० सूज्ञांस अधिक काय सांगावे ?

लेखक: अरविंद विठ्ठल कुळकर्णी
संपर्क: ०९६१९४३६२४४


असे साहित्य वाचत राहण्यासाठी लाईक करा आमचे फेस बुक पेज 

www.facebook.com/SmartMaharashtraOnline


Previous Article

‘चला, वाचू या’ २९ व्या पुष्पामध्ये ‘ऍनेस्थेशिआ’ आणि ‘सृजनरंग’

Next Article

२६ आणि २७ मे रोजी ‘मसाप’ चा ११२ वा वर्धापनदिन

You may also like