जन्म:२९ एप्रिल १८६७
स्मृतिदिन: ७ एप्रिल १९३५
भारताचे एडिसन म्हणून ओळखले जाणारे मराठी वैज्ञानिक आणि संशोधक शंकर आबाजी भिसे. भौतिक, रसायन आणि औषधशास्त्रात त्यांनी लावलेले शोध आणि काळापुढे विचार करण्याची त्यांची खासियत पहिली की भारताचा एडिसन म्हणून गौरवलेला हा शास्त्रज्ञ मराठी होता हे पाहून आपली छाती अभिमानाने भरून येते.
शंकररावांचे वडील धुळ्याला मॅजिस्ट्रेट होते. तिथल्या शाळेत शंकररावांचे प्राथमिक शिक्षण झाले. मुलाची यंत्राची आवड पाहून वडिलांना फार आनंद होत असे. त्यामुळे उत्तेजनार्थ त्यांनी शंकररावांना महिना ३० रुपये पगारावर अकाउन्टन्ट जनरलच्या ऑफिसमध्ये कारकून म्हणून चिकटवले.
१८९७मध्ये ‘ इन्व्हेन्टर रिव्ह्यू ॲन्ड सायंटिफिक रेकॉर्ड’ नामक मासिकाने ‘स्वयंमापन यंत्र’ करण्याची एक स्पर्धा जाहीर केली होती. शंकररावांनी अशा यंत्राचा आराखडा करून मासिकाकडे पाठवला. त्यावेळी शंकररावांच्या त्या यंत्राला प्रथम क्रमांक मिळाला. शंकर आबाजी भिसे यांच्या संशोधक कारकिर्दीची सुरुवात झाली.
शंकर आबाजी भिसे यांनी दोनशेच्यावर निरनिराळे शोध लावले आहेत आणि ४० हून अधिक पेटंट त्यांच्याकडे आहेत.
१९०० साली मद्रास येथे भरलेल्या ‘इंडियन इंडस्ट्रियल काँग्रेस’चे ते अध्यक्ष होते. त्या काली प्रचलित असलेल्या लायनो, मोनो, स्ट्रिंजरटाइप, विक्स आणि त्या काळच्या इतर मुद्रण यंत्रांच्या रचना आणि त्यांच्या वापराच्या कमाल कार्यमर्यादा यांचा अभ्यास करून शंकरराव भिसे यांनी ’भिसेटाइप’ हे छापण्यासाठीचे खिळे पाडण्यासाठी आणि जुळवण्यासाठीचे यंत्र शोधले. त्याचे पहिले पेटंट इंग्लंडमध्ये त्यांना मिळाले. नंतर त्यांनी अमेरिका, जर्मनी, फ्रान्स आदी देशांतही ’भिसोटाइप’ची पेटंट घेतली. या यंत्राच्या उत्पादनासाठी आणि एकूण भारताच्या वैज्ञानिक प्रगतीसठी त्यांनी रतन टाटा यांच्या भागीदारीत ’टाटा-भिसे इन्व्हेन्शन सिंडिकेट’ या कंपनीची लंडन येथे स्थापना केली . या यंत्राचे पहिले ’गुणित मातृका’ नावाचे मॉडेल मिनिटाला १२०० अक्षरे छापी.
१९१६साली भिसे अमेरिकेला गेले. तिथे युनिव्हर्सल टाइप मशीन कंपनीच्या विनंतीनुसार ’आयडियल टाइप कास्टरया यंत्राचा आविष्कार केला, व अमेरिकेत त्याचे पेटंट घेतले. १९२० साली त्यांनी ‘अमेरिकन भिसे आयडियल टाइप कास्टर कॉर्पोरेशन’ची स्थापना करून १९२१साली पहिले यंत्र विक्रीस आणले. अशा अनेक मुद्रण यंत्रांचे आराखडे डॉ. भिसे यांनी बनविले. त्यांच्या टाइप कास्टिंगच्या शोधाचा अमेरिकेच्या तत्कालीन पाठ्यपुस्तकातही समावेश करण्यात आला होता ही आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. १९२७ मध्ये न्यूयॉर्क विद्यापीठाने डॉक्टर भिसे यांना डी.एस्सी. ही पदवी दिली.
वैज्ञानिक विचारांचा त्यांनी उद्योगातही वापर केला. त्यांनी काचेचा कारखाना आणि १८९० मध्ये आग्रा लेदर फॅक्टरी काढली होती. सौरऊर्जेवर चालणाऱ्या मोटारी तयार करण्याची मूळ कल्पना डॉ. डॉक्टर भिसे यांची होती.
भिसे यांनी सामाजिक कार्य देखील केले. धी सायंटिफिक क्लबची स्थापना केली. दादाभाई नौरोजींच्या सहाय्याने भिसे यांनी १९०१ साली ‘पेटंट सिंडिकेट’ नावाची कंपनी काढली.
अगदी आजारी असतानाही त्यांच्यातील वैज्ञानिक शास्त्रज्ञ शांत नव्हता. १९१०मध्ये ते आजारी पडले. त्यावेळी त्यांना देण्यात आलेले एक भारतीय औषध त्यांना फार गुणकारी वाटले. त्या औषधाचे त्यांनी रासायनिक पृथक्करण केल्यावर त्यात आयोडीन असल्याचे त्यांना कळले. १९१४ मध्ये त्यांनी एक नवीन औषध तयार करून त्याला ’बेसलीन’ हे नाव दिले. हे औषध उपयुक्त वाटल्याने अमेरिकेच्या लष्कराने या औषधाचा पहिल्या महायुद्धात पुरेपूर उपयोग केला. याच औषधावर संशोधन करून आयोडीन हा घटक असलेले पण पोटात घेता येण्यासारखे एक औषध त्यांनी बनवले. या औषधाला त्यांनी’ॲटोमिडीन’ (ॲटॉमिक आयोडीन) हे नाव दिले होते. १९२७मध्ये या औषधाच्या उत्पादनाचे आणि वितरणाचे हक्क भिसे यांनी शेफलीन या कंपनीला विकले. हे औषध बऱ्याच रोगांवर गुणकारी आहे.
आगगाडीच्या स्वयंचलित दरवाजाचा शोध डॉ. भिसे यांनी १८९८ मध्ये लावला होता. त्याचे झाले असे, पुण्याहून मुंबईस येत असताना कल्याण स्टेशनवर उतरताना एका प्रवाशाची बोटे दरवाजात चिरडली. त्यामुळे रेल्वेवर टीका झाली. अशा प्रकारचा अपघात टळावा म्हणून डॉ. भिसे यांनी असा शोध लावला की, प्रवाशाने गाडीच्या दरवाजात मुद्दाम बोट घातले वा कोणी निष्काळजीपणे दरवाजा लावला तरीही प्रवाशास इजा होणार नाही. या शोधाचे पेटंट भिसे यांनी घेतले नाही. मुंबईतील प्रदर्शनात त्यांनी या स्वयंचलित दरवाजाचे नमुने ठेवले व त्यास बक्षीस मिळाले.
स्वयंचलित आगामी स्थानदर्शक यंत्र – त्यांच्या या यंत्रामुळे रेल्वे प्रवाशांना पुढच्या स्टेशनचे नाव आधीच कळणार होते. पण एका भारतीयाने शोध लावल्याने ब्रिटिश रेल्वे कंपनीने हे यंत्र वापरण्यास नकार दिला. आज आपण प्रत्येक रेल्वे प्लॅटफॉर्मवर ‘इंडिकेटर’ बोर्ड पाहतो. त्या इंडिकेटर बोर्डाचे निर्माते डॉ. भिसे आहेत.
समुद्राच्या तळाशी भरपूर प्रकाश देणारा दिवा, वातावरणातील विविध वायू वेगळे करणारे यंत्र, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी विजेच्या साहाय्याने छायाचित्रे पाठविणारे यंत्र, धुण्यासाठी ‘ रोला ‘ नावाचा रासायनिक पदार्थ, जखमांवर लावण्यासाठी ’बेसलीन’ आणि पाण्यात विरघळणारे पोटात घेण्यासाठी ’ॲटोमिडीन’ (आण्विक आयोडीन) जे आपण वर पहिले आहे, बॉडी मसाजर (डोके दुखू लागल्यास शिरा चेपणारे यंत्र, ‘चटण्या’ वगैरे वाटणारे ‘मिक्सर’, थोडक्यात फिजिक्स, आणि केमिस्ट्रीच्या सर्व प्रांतात मुक्त संचार करणारा हा शास्त्रज्ञ होता.
जागतिक दर्जाच्या ‘हूज हू’ या संदर्भग्रंथात ‘भारताचे एडिसन’ असे म्हणून शंकर आबाजी भिसे यांना गौरवण्यात आले आहे. डॉ. भिसे खर्या अर्थाने आपले ‘एडिसन’ होते, पण स्वातंत्र्यानंतर हा एडिसन उपेक्षित राहिला. थॉमस अल्व्हा एडिसननेही डॉ भिसे २३ डिसेंबर १९३० रोजी न्यू जर्सी येथे भेट घेतली होती. २९ एप्रिल१९२७ रोजी, म्हणजे भिसे यांच्या साठाव्या वाढदिवसाच्या दिवशी अमेरिकन वैज्ञानिकांच्या उपस्थितीत ’अमेरिकेतील भारताचे पहिले शास्त्रज्ञ’ म्हणून त्यांचा गौरव करण्यात आला.
या मराठी शास्त्रज्ञाचे ७ एप्रिल १९३५ रोजी हृदयक्रिया बंद पडल्याने निधन झाले.
या थोर मराठी शास्त्रज्ञास स्मार्ट महाराष्ट्राचा मानाचा मुजरा!
संदर्भ: मराठी विकिपीडिया