Smart Maharashtra

दिसामाजी काही उत्तम वाचावे…

dummy_728

श्रीशालिवाहन शके १९४१, शिवराज्याभिषेक शके ३४५, विकारीनाम संवत्सर

स्वातंत्र्यदिन म्हणजे काय?

Author: Share:

राज्यशास्त्राच्या अभ्यासात अनेक संज्ञाचे अर्थ स्पष्ट करून सांगितले जातात. प्रत्येक शब्दाला एक विशिष्ट अर्थ अभिप्रेत असतो. जसे ‘राज्य’ किंवा ‘स्टेट’, ‘लोकशाही’. जेंव्हा या शब्दांचा वापर राज्यशास्त्रात केला जातो, तेंव्हा त्याच्या पाठीमागे एक विशिष्ट अर्थ अभिप्रेत असतो. याच धर्तीवर आज “स्वातंत्र्य” शब्दाचा आणि “स्वातंत्र्यदिन” या शब्दाचा एक अर्थ स्पष्ट करण्याची गरज निर्माण झाली आहे. या देशाच्या राज्यकारणात या संज्ञेचा अर्थ स्पष्ट करावा. जेणे पुन्हा हा शब्द वापरला जाईल तेंव्हा त्याच्या मागील विचार आणि त्याची खोली, गाभा याबद्दल कोणीही संभ्रमित नसेल.

सद्यस्थितीत आम्हाला या दोन्ही शब्दांबद्दल  गैरसमज आहेत.

 अधिकारातून येणारी कर्तव्ये 

स्वातंत्र्य हा अधिकार नव्हे हे कर्तव्य आहे. मुलगा लग्न करून मुलगी घरी आणतो, तो मुलीवर अधिकार गाजवीत नाही. दुसर्याची मुलगी आपल्यावर विसंबून आपल्या घरी येते, त्या विश्वासाला जागणे हे नवर्याचे कर्तव्य आहे. तद्वत, जेंव्हा परकीय जोखडातून आपण आपल्या लोकांना मुक्त करतो तेंव्हा त्यांची जबाबदारी आपल्या खांद्यावर आपण घेतो. कारण, आपण लोकांना पारतंत्र्यातून ह्या साठी मुक्त करतो कारण त्यांची जबाबदारी घेण्यास परकीय शक्ती नकार देते. या बाबतीत महाराजांचे एक पत्र फार सयुक्तिक आहे. आपल्या सैन्याला पाठवलेल्या पत्रात ते सांगतात, लोकांच्या पदरी पडलेल्या भाजीच्या देठासही धक्का लावू नका… अन्यथा लोकास वाटेल यापेक्षा मोगल बरे…”

भारतीय राज्यशास्त्रात राजा हा लोकांचा विश्वस्त आहे. लोकांनी आपला प्रतिनिधी म्हणून त्याची नियुक्ती केली आहे.  आर्य चाणक्य म्हणतात, प्रजानां सुखे राज्ञ: प्रजानां च हिते हितं. हाच विचार राष्ट्राचे कर्तव्य खांद्यावर घेणार्या तरुणांनी केला पाहिजे.

स्वातंत्र्यदिन

यथैव प्रत्येक स्वातंत्र्य दिनाला आपल्या मनात दोन विचार आले पाहिजेत. मागील वर्षभरात या देशाच्या विकासासाठी, जनतेच्या भल्यासाठी काय केले. स्वातंत्र्याच्या, या भूमीच्या मूल्यांच्या जपणुकीत आपण किती यशस्वी झालो, आणि आपल्या देशाची जी मुलभूत तत्वे आहेत त्यांची जोपासना करण्यात आणि त्यांचा सुगंध जगभरात पसरवण्यात माही किती यशस्वी झालो हा पहिला विचार. दुसरा विचार हा कि  येणाऱ्या वर्षात आपली काय उद्दिष्ट्ये आहेत आणि ती पूर्ण करण्यासाठी आपण काय करणार आहोत?

थोडक्यात आपल्या कर्तव्यांचा लेखाजोखा आपण या दिवशी मांडतो.

  पिढीचा फरक

 सध्याची  स्वातंत्र्यानंतरची दुसरी पिढी. आपल्या आधीच्या पिढीने  स्वातं त्र्यलढ्यात भाग घेतला असेल- नसेल ,त्याच्या आधीच्या पिढीने नक्कीच पारतंत्र्य अनुभलेय. या तुलनेत आम्ही फार सुदैवी आहोत.

आम्ही मुळात जन्माला आलोच ते ‘शेल्टर जगात’ म्हणजे ‘संरक्षित कवचाखाली’. आज संवेदनशील तरुणांनी कितीही ते दिवस, स्वातंत्र्यसैनिकांचे वेड, त्यांचा जुनून आणि भारतभूमीची अगतिकता ‘फील’ करण्याचा प्रयत्न केला तरीही आम्ही पूर्ण पणे ते समजू शकत नाही. त्यामुळे स्वातंत्र्य शब्दाचा अर्थ आम्हाला किती समजतोय हे स्पष्ट होते. दु:खात होरपळलेल्या माणसाला सुखाची खरी गोडी समजेल, भुकेल्या माणसाला एखा घासाची  गोडी समजेल, पोट भरलेल्या माणसाने गरीबाच्या भाकरीचा कितीही आस्वाद घेण्याचा प्रयत्न केला तरी त्याला ती गोडी नसेल, जी शेतात राबलेल्या दमलेल्या पोटाला जाणवेल.

कितीही मन लाऊन वाचले तरी जन्मठेप मधील सावरकरांनी  वर्णिलेले नरक दिवस  आम्ही नाही अनुभवू शकत. तत्सम,” अनादी मी अनंत मी” या शब्दांचा अर्थ आम्ही कितीही समजण्याचा प्रयत्न केला तरी त्यातील तलवार  किंवा “ख़ुशी के दौर” मधील दुर्दम्य आशावाद आम्हाला कशी समजणार?

यावरून एक विचार करा , कि आमच्या पुढच्या पिढ्यांचा या काळाशी दुरावा अधिक वाढणार! मग आमच्याही पेक्षा त्यांना पारतंत्र्याचा आघात काय होता हे समजणे अधिक अस्पष्ट  होईल .

आज महाराजांच्या कार्याची  माहिती पुस्तकातून आम्हाला समजू शकते, बाजीप्रभूंनी अवघ्या ३०० बांदलासवे छातीवर झेललेला ३००० गनीम आम्हाला स्तंभित करेल, पण जोपर्यंत आम्हाला यवनांचे अनुभव समजत नाहीत तोपर्यंत महाराजांच्या, मावळ्यांच्या कार्याची व्याप्ती आमच्या बालबुद्धीच्या परेच असेल.

आमच्या पिढीचे कर्तव्य

मग आपल्या पिढीचे हे कर्तव्य आहे कि स्वातंत्र्याच्या मंतरलेल्या जगाचा आणि येणाऱ्या भविष्याचा सेतू आम्ही सांधावा. गेल्या काळाच्या स्मृती आत्यंतिक आदराने आणि प्रचंड पराकाष्ठेने जतन करून ठेवाव्यात आणि निष्ठेने पुढील पिढीच्या स्वाधीन कराव्यात.

मात्र या स्मृती म्हणजे केवळ आठवणी नाहीत. स्वातंत्र्य ज्या कारणासाठी लढले गेले ते केवळ परकीय जोखडातून आपली मुक्तता  होण्यासाठी नव्हे.

या भूमीला एक फार प्राचीन आणि श्रीमंत  इतिहास आहे. जगाला सद्भाव आणि प्रेम शिकवणाऱ्या, जीवनाची गूढ तत्वे उलगडणाऱ्या तीन महानतम धर्मांचा उगम येथे झाला आहे, तत्वज्ञाना पासून ते कल्याणकरी राज्याशास्त्रापर्यंत अनेक विचार, प्रवाह आणि गुण या मातीत जन्मले, अभ्यासले गेले, सांगितले गेले आणि जतन केले गेले. हे विचार हि मुल्ये आणि तत्वे पारतंत्र्यात पायदळी तुडवली गेली. त्यांची पुन्हा रुजवक आणि जपणूक या मातीत व्हावी यासाठी स्वातंत्र्य मिळवले गेले. आज त्या मूल्यांचे तत्वांचे विचारांचे जतन आम्ही केले नाही, पूर्वाश्रमी भारत खंड भरभराटीस पावला तो केवळ या संपन्न विचारांमुळेच. जर तेच विचार आम्ही पुन्हा समाजात आणले नाहीत तर स्वातंत्र्याचा अर्थ शुन्य राहतो. कारण केवळ आपला राजा म्हणजे स्वराज्य नव्हे. आमच्या मातीशी नल जोडून राहणारा राजा त्याचे स्वराज्य. शिवाजी महाराजांनी राज्याभिषेकाच्या वेळेस छत्रपती पदवी का धारण केली, नाणी का पाडली? केवळ मिरवण्यासाठी नव्हे. मुसलमान राजवट येण्यापूर्वी जे आमचे पराक्रमी आणि विवेकी राजे होऊन गेले त्यांच्या सार्वभौमत्वाची ती सगळी प्रतीके पुन्हा मातीत रुजावीत हा महाराजांचा प्रयत्न होता. केवळ तेच आपल्याला पुन्हा करायचे आहे.

सकारात्मक विचार

मानस शास्त्रात सकारात्मक दृष्टीकोन या शब्दाला खूप महत्व आहे. एखाद्या गोष्टीकडे आपण कुठल्या दृष्टीने पाहतो यावर त्या गोष्टीचा आपल्यावर होणारा परिणाम अवलंबून असतो. मला अंधाराची वाटते असे म्हटले कि मी अक्खी रात्र तळमळत घालवेन. मात्र मी दिवसभर मेहनत करत असेन तर हाच अंधार मला सुखावह झोपेची अनुभूती देईल.

स्वातंत्र्य या शब्दाकडे आपण सकारात्मक व नकारात्मक दृष्टीने पाहू शकतो. जर या शब्दातून आपल्याला केवळ घडलेली घटना एवढेच अभिप्रेत असेल तर आपण भविष्याकडेही नकारात्मक नजरेनेच पाहू. या पेक्षा  जर स्वातंत्र्याची घटना आपण प्रेरणा म्हणून पहिली, तर प्रत्येक क्षण या घटनेतून आपण काही नवीन निर्माण करण्याची ओढ मिळवू.

स्वातंत्र्य हा शब्दाचा अर्थ आपल्या राष्ट्राच्या मुलभूत तत्वांची जपणूक करण्यासाठी आणि त्यांचा विकास करण्यासाठी आपल्या राष्ट्राचा आपल्या खांद्यावर घेतलेले कर्तव्य. स्वातंत्र्य दिन म्हणजे या कर्तव्याची आपल्याशी केलेली उजळणी.

आपल्या कर्तव्यज्ञान दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

Previous Article

मविप्र महाविद्यालयात स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहाने साजरा

Next Article

१५ ऑगस्ट

You may also like