१६ डिसेंबर १९७१ : कथा भारत पाक युद्धाची: पाकिस्तानच्या सपशेल शरणागतीची

Author: Share:

भारताच्या मनावर आणि शरीरावर असंख्य जखमा करून विभक्त झाल्यानंतरही, पाकिस्तानची भारताबद्दलची शत्रुत्वाची भावना कमी झाली नाही. पाकिस्तानने सरळ सरळ भारतावर चार युद्धे लादली आहेत. सीमेवरील चकमकी आणि आतंकवादी घुसवण्याचे भ्याड प्रयत्न याला गणतीच नाही. आज १६ डिसेंबर म्हणजे पाकिस्तानविरुद्धच्या १९७१ च्या युद्धाची भारताच्या विजयाने झालेली अखेर, पाकिस्तानला स्वीकारावी लागलेली लाजिरवाणी शरणागती, जगासमोर क्रूर पाकिस्तानचे उघडे पडलेले रूप आणि बांगलादेशचा उदय…

१९७० च्या पाकिस्तानमधील सार्वत्रिक निवडणुकीत पूर्व पाकिस्तानातील अवामी लीग ने १६७ जागा जिंकून बहुमत सिद्ध केले आणि आवामी लीगचे नेते शेख मुजिबूर रहमान यांनी राष्ट्राध्यक्षांपुढे सरकार स्थापनेचा दावा सादर केला. पाकिस्तानच्या स्थापनेपासून राजकारणात वर्चस्व ठेवणार्‍या पश्चिम पाकिस्तानातील खास करून पंजाबी व पठाणी राजकारण्यांना बंगाली वर्चस्व होणे मान्यच नव्हते. झुल्फिकार अली भुट्टो यांनी मुजिबूर यांना पंतप्रधानपद देण्यास विरोध केला.

राष्ट्राध्यक्ष याह्याखान यांनी पूर्व पाकिस्तानात सेनेला तैनात केले. अटकसत्र व दडपशाही सुरू झाली. पूर्व पाकिस्तानी सैनिक व पोलिसांना निःशस्त्र करण्यात आले, ज्याचा परिणाम म्हणून बंद, हरताळ, मोर्चे सुरु झाले. पाकिस्तानी सैन्याला कारणच हवे होते. सेनेने २५ मार्च १९७१ रोजी ढाक्याचा ताबा मिळवला व अवामी लीगवर बंदी घालण्यात आली. मुजिबूर रहमान यांना अटक करून पश्चिम पाकिस्तान त्यांची रवानगी झाली.

पूर्व पाकिस्तानातील हिंदूचे मोठ्या प्रमाणात शिरकाण सुरू झाले. तब्बल ३० लक्ष बंगाली लोकांचे खून झाले, साधारण दोन लक्ष महिलांवर बलात्कार झाले.

२७ मार्च १९७१ रोजी झिया उर-रहमान यांनी मुजिबूर रहमान यांच्या वतीने बांगला देशच्या स्वातंत्र्याची घोषणा केली व एप्रिलमध्ये छुप्या सरकारची स्थापना केली. यामुळे पूर्व पाकिस्तानात स्वातंत्र्याची ओढ लागलेले हजारो लोग मुक्तिवाहिनीमध्ये सामिल झाले.

भारताच्या तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यानी बांग्लादेशच्या स्वातंत्र्य लढ्याला पूर्ण पाठिंबा जाहीर केला व पूर्व पाकिस्तानी जनतेला जी मदत लागेल ती पुरवण्याचे आश्वासन दिले. या घटनेचे भारतावर थेट परिणाम झालाच, कारण आश्रय घेण्यासाठी पूर्व पाकिस्तानातुन मोठ्या संख्येने लोक भारतात आश्रयास आले. त्यांची संख्या साधारण कोटी पोहोचली. भारताच्या अर्थव्यवस्थेवर याचा ताण पडला.

दुसरीकडे पाकिस्तानने अमेरिकडून युद्धकालात मदत मिळवण्याचे आश्वासन मिळवले होते. एप्रिल १९७१ मध्ये इंदिरा गांधींनी युरोपचा झंजावाती दौरा केला आणि ९ ऑगस्ट १९७१ रोजी रशियाशी २० वर्षाचा मैत्रीचा करार करून अमेरिकेला परस्पर काटशह दिला. यामुळे अजून एक परिणाम साधला गेला. चीन हा पाकिस्तानचा मित्रदेश असला तरी त्याने युद्धकाळात तटस्थ राहणे पसंत केले.

दरम्यानच्या काळात मुक्तिवाहिनी पूर्व पाकिस्तानात सक्रिय झाली व तिने गनिमी काव्याने पाकिस्तानी लष्कराविरुद्ध उठाव केला. भारताने देखील मुक्तिबाहिनीला पूर्ण पाठिंबा देत लष्करी साहित्याची मदत केली.

नोव्हेंबर युद्ध अटळ झाले, आणि आक्रमक इंदिरा गांधींनी पूर्ण तयारीनिशी आपल्या सैन्याला युद्धासाठी सज्ज राहायला सांगितले. तेंव्हा भारताचे लष्करप्रमुख होते जनरल माणेकशॉ. त्यांनी इंदिरा गांधींकडे युद्धासाठी सैन्य सज्ज करायला सहा महिन्याचा वेळ मागितला होता, यावरून युद्धाचे विचार वरच्या पातळीवर जून पासून सुरु झाले असावेत असे समजते. भारताने पश्चिम पाकिस्तानच्या सीमेवर राखून पूर्व पाकिस्तानात घुसण्याचा प्लॅन बनवला.

२३ नोव्हेंबर १९७१ रोजी पाकिस्तानी राष्ट्राध्यक्ष याह्याखान यांनी पाकिस्तानमध्ये आणीबाणी लागू केली व युद्धास तयार रहाण्याचे देशवासीयांना आवाहन केले. रविवार ३ डिसेंबर ला युद्धाची पहिली ठिणगी पेटली. पाकिस्तानी हवाई-दलाने भारतीय सीमा ओलांडून उत्तर भारतातील अनेक हवाईतळांवर हल्ले चढवले, आणि भारताने युद्धाचे बिगुल वाजवले. इंदिरा गांधींनी भारतीय सेनेला ढाकाच्या दिशेने आक्रमण करायचे आदेश दिले.

पाकिस्तानने पहिले आक्रमण करून युद्धाची सुरुवात केली खरी परंतु त्यांना वेग कायम राखता आला नाही. पाकिस्तानी लष्कराचे भारतीय सेनेपुढे काही एक चालत नव्हते.

लोंगेवालाच्या लढाईचा विशेष उल्लेख करावाच लागेल. राजस्थान मध्ये जैसलमेर जिल्ह्यातील लोंगेवाला येथे केवळ १२० शूर भारतीय सैनिकांनी २,००० पेक्षाही अधिक सैन्य असलेल्या पाकिस्तानच्या चिलखती ब्रिगेडचा पहाटेपर्यंत निकराने सामना केला होता, आणि सकाळी भारतीय हवाई दलाने पाकिस्तानच्या तोफखान्याच्या ठिकर्या उडवल्या आणि हा हल्ला उडवून लावला. स्टोरी पहिल्यासारखी वाटतेय? बरोबर! या घटनेवरच ‘बॉर्डर’ चित्रपट बनला आहे. पाकिस्तानी सेनेला पश्चिम सीमेकडे भारतीय मोर्चे विस्कळीत करण्यात अपयश येत होते तर भारतीय सेनेने आक्रमक भूमिका घेऊन पाकिस्तानच्या सीमेलगतचा एकूण १४,००० चौ.किमी इतका मोठा भूभाग काबीज केला. हा सर्व भाग नंतर सिमला कराराअंतर्गत पाकिस्तानला परत करण्यात आला.

भारतीय वायुसेनेने या युद्धात जबरदस्त कामगिरी नोंदवली. ऑपरेशन पायथॉन या नावाखाली भारतीय नौदल व हवाईदलाने अमेरिकन पद्धतीप्रमाणे विमानवाहक युद्धनौकांचा वापर करून पूर्व पाकिस्तानात चितगावयेथील पाकिस्तानी विमानतळ उद्ध्वस्त केला.. या युद्धात भारताने हवाई दलाच्या विमानांची एकूण ४,००० उड्डाणे केली. त्यांना पाकिस्तानी हवाईदलाकडून फारसा प्रतिकार झाला नाही.

पश्चिमेकडे भारतीय नौदलाने कराची बंदराची कोंडी केली व त्याबरोबरच दोन पाकिस्तानी विनाशिका बुडवल्या. यामध्ये एक महत्वाची घटना म्हणजे कराचीहून निघालेल्या पाकिस्तानी पाणबुडी “आयएनएस गाझी” ला भारतीय पाणबुडी “आयएनएस राजपूत” ने विशाखापट्टणम जवळ अचूक टिपले. यासाठी भारतीय इंटेलजन्स संस्था रॉ ने महत्वाची भूमिका बजावली होती. ह्या घटनेवर नुकताच आलिया भटने रॉ गुप्तहेर रेहमत खानची भूमिका केलेला ‘राजी’ हा सिनेमा येऊन गेला.

भारतीय पायदळानेही पूर्व पाकिस्तानमध्ये मुसंडी मारली. एकूणच सर्वच आघाड्यांवर सुरुवातीपासून पाकिस्तानला खूप मोठे नुकसान सहन करावे लागले. पंधरवड्याच्या आतच भारतीय सेनेने ढाका शहर काबीज केले. पाकिस्तानी सैन्यासमोर काही दुसरा उपायच उरला नाही आणि अखेर पोकळ गर्जना करणारे आणि निष्पाप बंगाली लोकांवर अत्याचार करणारे क्रूर पाकिस्तानी सैन्य १६ डिसेंबर रोजी पांढरे निशाण दाखवत शरण आले. ९३,००० पाकिस्तानी सैनिक युद्धबंदी झाले ज्यांना भारताने सोडून दिले. पाकिस्तानचे लेफ्टनंट जनरल ए.के. नियाझी यांनी भारताचे लेफ्टनंट जनरल जगजीत सिंग अरोरा यांच्यापुढे ह्या बिनशर्त शरणागतीच्या कागदावर सह्या केल्या आहेत. नियाझींनी शरणागतीचे प्रतिक म्हणुन त्यांच्याकडील रिव्हाल्वर जनरल जगजीतसिंग अरोरा यांच्याकडे सुपूर्द केले.

भारताने लगेचच बांगलादेशच्या स्वातंत्र्याची घोषणा केली व जगाच्या नकाशावर बांगलादेश हा नवीन देश उदयास आला. याह्याखान यांनी राष्ट्राध्यक्षपदाचा राजीनामा दिला. मुजिबूर रहमान यांची मुक्तता करण्यात आली. १० जानेवारी १९७२ रोजी मुजिबूर रहमान परत बांगलादेशात आले.

भारताचे जवळपास ४ हजार सैनिक या युद्धात वीरगतीस प्राप्त झाले आले आणि नऊ हजारांपर्यंत जखमी झाले. इंदिरा गांधी यांची प्रतिमा ह्या युद्धाने अधिक उजळलीच, आंतरराष्ट्रीय स्तरावर सुद्धा युद्धाचे मोठे परिणाम झाले.

भारतीय सैन्य, नौदल आणि हवाईदल यांचे सामर्थ्य पुन्हा एकदा सिद्ध झाले. दिसलेले खंबीर भारतीय राजकीय नेतृत्व आणि संपूर्ण संसदेची मिळालेली साथ यामुळे भारतीय लोकशाही बळकट झाली. अमेरिका आणि रशिया यामध्ये तेंव्हा विस्तव जात नव्हता. रशियाची भारताला मदत असल्याने भारत जिंकल्यास रशियाचे पारडे शीतयुद्धात जड होईल या भीतीने पाकिस्तानला मदत केली. मात्र, तिने बंगालच्या उपसागरात तैनात केलेल्या नौकेचा वापर केला नाही. भारतालाही पश्चिम पाकिस्तान जिंकण्यात स्वारस्य नव्हते. रशियाची मदत मिळाल्याने, अमेरिकेवर वचक बसला आणि साम्यवादी चीनही गप्प राहिला हे वर सांगितलेच.

एकंदरीत, भारतीय सैन्याचे शौर्य, सैन्य-नौदल-वायुदल असा तिन्ही दलांचे सामूहिक प्रयत्न, उजळून दिसलेले खंदे राजकीय नेतृत्व आणि आंतरराष्ट्रीय डिप्लोमसी आणि पाकिस्तानची सपशेल शरणागती अशा सर्व आघाड्यांवर भारतासाठी हे युद्ध संस्मरणीय ठरले.

अशी ही १९७१च्या भारत पाकिस्तानमधील युध्दस्य कथा रम्या!

देशासाठी सर्वोच्च बलिदान दिलेल्या शूर भारतीय सैनिकांचे पुण्यस्मरण!

Previous Article

१९ डिसेंबर

Next Article

१६ डिसेंबर

You may also like