तुमची माहिती जपून ठेवा: सोशल मीडियावर काय काळजी घ्यावी?

Author: Share:

मार्क झुकेनबर्गने दिलेल्या माफीनाम्यानंतर तुमचं सोशल मीडियावरील माहितीचा कसा गैरवापर केला जाऊ शकतो हे तुमच्या समोर याची देही याची डोळा आलेले आहे. झुकेनबर्गने माफी मागितली म्हणजे फक्त फेसबुकच दोषी आहे असे नव्हे. तुम्ही या ना त्या मार्गाने कारणाने देत असलेला डेटा कुठे कसा विकला जातो आणि कसा वापरला जातो हे आपण सांगू शकत नाही. सध्याचे युग माहितीच्या विस्फोटाचे आहे. माहिती हीच ह्या काळाची सर्वात मौल्यवान वस्तू आहे. तिच्यासाठी लोक पैसे मोजायला तयार आहेत. थोडक्यात तुमची माहिती कुणीही पैसे देऊन खरेदी करू शकते. तुमचे सोशल मीडियावरील अकाऊंट कदाचित दुसऱ्याला तुमच्या आयुष्यत डोकावायला मदत करत असेल.

 तुम्ही सोशल मीडिया वापरणे बंद करणार नाही, करण्याची आवश्यकता सुद्धा नाही, तुमची माहिती कुणी कशी वापरावी हे तुमच्या हातात नाही. पण तुमची कोणती माहिती बाहेर पडते आहे हे मात्र तुमच्या हातात आहे ना!! भावनेच्या आहारी वाहवत जाऊन तुम्ही सगळंच शेअर करून बसलात तर गोंधळ होऊ शकतो. म्हणूनच सोशल मीडियावर प्रचंड काळजी घेणे आवश्यक आहे. आजपासून दहा वर्षांपूर्वी ह्या धोक्याबद्दल कुणी विचारही केला नसेल. पण आज सुज्ञपणे विचार करण्याची आवश्यकता आहे.

 सोशल मीडिया मध्ये काय समाविष्ट आहे? 

 फेसबुक, ट्विटर, ऑर्कुट, लिंकडीन, व्हॉट्सएप, इंस्टाग्राम हे मुख्य सोर्सेस आहेत, ज्यातून तुम्ही माहिती ह्या माहितीच्या महाजाळात फेकत असता. ठराविक माणसे युट्युब सुद्धा वापरत असतील. यु ट्यूब हे सध्या वापरात असलेले आणि पहिले जाणारे सर्वात लोकप्रिय माध्यम आहे. आपल्या लेखापुरता आपण ह्या माध्यमांचा विचार करणार आहोत जे सर्वसाधारणपणे वापरले जातात.

 फेसबुक

 सर्वसामान्यपणे फेसबुक आणि व्हॉट्सएप हे सर्वाधिक वापरली जाणारी माध्यमे आहेत. ह्यावर खूप जास्त डेटा तयार होत असतो.

 फेसबुकवरील तुमचे प्रोफाइल हे सर्वाधिक महत्वाचे साधन आहे तुम्हाला जाणून घेण्यासाठी. तुमचा डिजिटल आरसाच म्हणा! सध्या अनेक एम्प्लॉयर आपल्या भावी एम्प्लॉयी संबंधी माहिती घेण्यासाठी, किंवा भावी स्थळाची माहिती घेण्यासाठी ह्या प्रोफाइल चा सर्वाधिक वापर करीत असतात. फेसबुक जी माहिती तुम्हाला अकाउंट ओपन करताना विचारते, ती तुम्हाला देणे क्रमप्राप्त आहे. (तीसुद्धा कमी केली जाईल असे झुकेनबर्गने सांगितले आहे.) मात्र तुमच्याबद्दल लिहिताना तुम्ही भारंभार माहिती देण्याची आवश्यकता नाही. म्हणजे माझे विचार काय आहेत, माझे व्यक्तिमत्व काय आहे, ह्यातील जी माहिती तुम्हाला लोकांना कळावी असे वाटते तेवढीच द्या. अधिक माहिती दिल्यास तुमच्याविषयी लपवण्यासारखे तुमच्याकडे राहत नाही. सायकॉलॉजीच्या जोहरी विंडो थेअरीप्रमाणे प्रत्येक माणसाकडे असे काही गुण किंवा दुर्गुण किंवा एखादी माहिती असते जी दुसऱ्याला कळू नये असे त्याला वाटते (हिडन एरिया) आणि तो ती जाणीवपूर्वक लपवून ठेवतो. दुर्दैवाने, फेसबुक ह्याला अपवाद असावे. कारण इथे माणूस स्वतःला अधिकाधिक एक्स्पोज करण्यासाठी उतावीळ असतो. हा उतावळेपणाच नडतो. फेसबुकवर तुमचे खोटे किंवा कृत्रिम चित्र तयार करा असे मी सांगत नाही. पण चित्र तयार करताना ते ओव्हरपेंटेड करू नका.

 फेसबुकरील दुसरा एक धोका म्हणजे पोस्ट करणायचा. काही जणांना उठता बसता पोस्ट करण्याची सवय असते. मी हे केले, मी ते केले, मला असे वाटले..ह्यामध्ये कदाचित आपल्याला लाईक्स मिळतील, कमेंट मिळतील थोडक्यात वाहवा मिळेल अशी माणूससुलभ भावना असते. मात्र हे करताना, तुम्ही तुमची दिनचर्यातर लोकांसमोर उघडी करीत नाही आहेत ना, तुमचे वैगुण्य लोकांसमोर उघडे करीत नाही ना किंवा आपला पैसा, एखादी संवेदनशील माहिती, नातेवाईक आप्तेष्ट यांच्याबद्दल आपल्या भावना ज्या चार भिंतींबाहेर जाणे अयोग्य आहे, त्या तर आपण लोकांना उघडत नाही आहोंत ना हे पाहणे गरजेचे आहे, जोहार विंडो थेअरीच्या भाषेत, आपण आपला हिडन एरिया ओपन तर करीत नाही आहोत ना, कारण तसे करणे सर्वथैव चुकीचे आहे. हा तुमचा संवेदनशील भाग असतो ज्याचा गैरवापर घेतला जाऊ शकतो. विशेषतः मुलींनी याची काळजी घेणे अधिक आवश्यक आहे. बऱ्याचदा फेसबुकवरून दुर्दैवी जाळ्यात फसल्याच्या ज्या घटना समोर येतात, त्याआधी त्या व्हिक्टीम ने आपली हिडन विंडो ओपन केली असण्याची अधिक शक्यता आहे.

 इथे अजून एक मोठा धोका असतो तो शेअरचा. तुमची माहिती तुम्ही एकदा सोशल मीडियावर टाकलीत की ती तुमची राहतच नाही ना तिला फक्त तुमच्या विंडोची लिमिट राहते. ती शेअर करून कुठच्याकुठे पोहोचू शकते. त्यामुळे आपल्या पोस्टवर माहिती लिहिताना, आपले फोटो अपलोड करताना विशेष विशेष (हा शब्द चुकून दोनदा आलेला नाही) काळजी घेणे आवश्यक आहे.

 व्हॉट्स एप वरही हीच काळजी घेणे आवश्यक आहे.इथे प्रसाराचा वेग कदाचित अधिक असावा. त्यामुळे तुम्ही एखादी टाकलेली पोस्ट नको त्या व्यक्तीच्या हाती लागणे अशक्य नाही. तुम्ही लिहिताना ह्याची काळजी घेणे आवश्यक आहे. तुम्ही सार्वजनिक पोस्ट टाकत असलात तर विशेषतः तुम्हाला काळजी घेणे आवश्यक आहे, करणं आपल्या भावना अधिक जास्त ज्वलनशील झाल्या आहेत. त्या पटकन भडकतात. त्यामुळे तुमच्या पोस्टमधील वाक्यरचना, शब्दांची निवड अधिक समर्पक असणे काटेकोरपणे पाळले पाहिजे.

 बऱ्याचदा खूप चुकीची माहिती व्हॉट्स एप वर फिरत असते. विशेषतः काही ठराविक गैर उद्देश्याने कार्यरत गट, पक्ष हे काम करीत असतात. आपल्याकडे आलेली एखादी माहिती, जी तुम्हाला किंचितशी सुद्धा संशयास्पद वाटते, ती पुढे न सरकावणे योग्य आहे. एखादी माहिती पुढे सरकावणे आवश्यक वाटल्यास, त्याची शहानिशा करणे आवश्यक आहे. बऱ्याचदा एखाद्या गोष्टीसाठी इथे फोन करावा अशा पोस्ट असतात. तुम्ही तिथे फोन केल्यास (माझा अनुभव) फोन लागत नाही. त्यामुळे पूर्ण शहानिशा करुनच तुम्ही पोस्टिंग करणे आणि फॉरवर्ड करणे योग्य आहे. आपण लेबर नाही जे दुसऱ्याचे शब्द तिसरीकडे सोडण्याचे काम करू. आपला वेळही तेवढा स्वस्त नाही.

 लिंकडीन आणि ट्विटर हे अधिक प्रोफेशनल असल्याने, त्यावर गैरवापराचे प्रमाण कमी आहे. त्याचा उत्तम वापर तुमची व्यावसायिक इमेज अधिक बळकट करू शकतो, त्याचा अधिक अभ्यास करावा.

सोशल मीडियाचा उत्तम वापर केला जाऊ शकतो का?

 सोशल मीडियावर काय काळजी घ्यावी ह्यातील नकारात्मक बाजू पाहतानाच मला सोशल मीडियाचा कसा सर्वोत्तम वापर होऊ शकतो ह्याकडे लक्ष वेधून घ्यायला आवडेल. काय करावे हे कळले म्हणजे काय करू नये हे अर्धे समजून येते.

युट्युब हे सर्वाधिक वापराचे माध्यम आहे हे मी वर सांगितलेच. आजच्या वर्तमानपत्रात आलेली बातमी आहे, की युट्युब वर मराठी कन्टेन्ट कमी आहे. दोन महिन्यांपूर्वी इकॉनॉमिक टाइम्स मध्ये वृत्त होते की डिजिटल मीडियाच्या आजच्या काळात इंग्रजीपेक्षाही स्थानिक भाषांना अधिक मागणी आहे. मग आता मला सांगा, आपले पहिले काम काय असले पाहिजे? युट्युब वर अधिकाधिक उत्तम मराठी कन्टेन्ट निर्माण करून घालणे, आणि पसरवणे. तुम्ही कलाकार असाल, विचारवंत असाल, पत्रकार, संपादक असाल, खेळाडू,शिक्षक असाल, अन्नपूर्णा गृहिणी असाल, तुम्ही तुमचे विचार उत्तम पद्धतीने मराठीत मांडू शकत असल्यास, युट्युब चॅनल तयार करा.

फेसबुकवर किंवा ब्लॉगवर अधिक उत्तम माहिती तुम्ही लिहू शकता. माहितीचा विस्फोट होत असताना तो जितक्या माहितीची देवाणघेवाण करतो आहे, आणि त्यात जितकी माहिती रोज येऊन आदळते आहे, त्यात चांगल्या माहितीची आवश्यकता अधिक आहे. वाईट माहिती पसरवू नये असे सांगितले तर काय पसरवावे हा अप्रश्न येतोच! त्यामुळे तुम्ही अधिक चांगले काही लिहू शकत असल्यास, ते लिहा आणि पुढे पाठवा. पसरवण्यासाठी लेबर क्लास खोऱ्याने पडला आहेच! फक्त आता ते चांगली माहिती पुढे डकवीत असतील.

सोशल मीडिया आपल्या जगाला मिळालेली एक मोठी देणगी आहे. तिचा योग्य वापर झालाच पाहिजे. क्रांती करण्याची ताकद ह्या मीडियात आहे. आजपर्यंत सहजी एकत्र येऊ न शकणाऱ्या लोकांना, संस्थांना हा मीडिया बांधतो आहे. ही संधी आहे. तिचा सर्वोत्तम वापर करा!

 फक्त तिच्यात वाहवत जाऊ नका. तुमच्या अस्तित्वाचेही रक्षण करा, आणि काहीतरी उत्तम या जगाला द्या!

Previous Article

पडणाऱ्या मार्केटचे करू तरी काय?

Next Article

एमएमआरडीएच्या अर्थसंकल्पात मेट्रोला प्राधान्य

You may also like