Smart Maharashtra

दिसामाजी काही उत्तम वाचावे…

dummy_728

श्रीशालिवाहन शके १९४१, शिवराज्याभिषेक शके ३४५, विकारीनाम संवत्सर

ग्रामपंचायतींना मिळणार स्वत:ची इमारत: बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजनेस मान्यता

Author: Share:

मुंबई : स्वतंत्र कार्यालयीन इमारत नसलेल्या राज्यातील ग्रामपंचायतींसाठी मा. बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजना सुरू करण्याचा निर्णय आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. या निर्णयाचा लाभ लोकसंख्येने लहान, आर्थिकदृष्ट्या कमकुवत अथवा दुर्गम भागातील सुमारे 4 हजार 252 ग्रामपंचायतींना मिळणार आहे.

त्याचप्रमाणे सार्वजनिक प्रयोजनासाठी संपादित होणाऱ्या ग्रामीण भागातील जमिनींसाठी चार पट मोबदला, कोल्हापूर विमानतळास छत्रपती राजाराम महाराजांचे नाव, सिडको प्रकल्पबाधितांना 22.5 टक्के विकसित भूखंड, अनाथ मुलांना एक टक्के आरक्षण मंजूर, नागपूर विमानतळाशी संबंधित कामांच्या प्रस्तावांसाठी दस्तावेजांना मंजुरी, जलसंधारण महामंडळाच्या सदस्य संख्येत वाढ, उद्योजकता विकसित करण्यासाठी राज्याच्या स्टार्ट-अप धोरणास मान्यता, महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमात सुधारणेसह अध्यादेश पुनर्प्रख्यापित करण्यास मान्यता, मराठवाड्यातील दुष्काळावरील उपाययोजनांसाठी इस्त्रायलच्या मेकोरोट कंपनीसोबत सामंजस्य करार, औद्योगिक प्रयोजनासाठीच्या जमिनींच्या हस्तांतरणासाठी आता 25 टक्के शुल्क आदी निर्णय आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आले.

या योजनेनुसार स्वतंत्र इमारत नसलेल्या 1000 पेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायतींना 12 लाख आणि 1000 ते 2000 पर्यंत लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायतींना 18 लाख निधी मंजूर करण्यात येणार आहे. या निधीपैकी 90 टक्के रक्कम राज्य शासनामार्फत मिळणार असून 10 टक्के रक्कम स्वनिधीतून उभारणे आवश्यक आहे. या ग्रामपंचायतींना सार्वजनिक-खाजगी भागीदारी (PPP) तत्त्वावर देखील इमारत उभारता येणार आहे. तसेच 2000 पेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायतींना स्वनिधीतून अथवा सार्वजनिक-खाजगी भागीदारी (PPP) तत्त्वावर इमारत उभारता येईल.

सार्वजनिक-खाजगी भागीदारी किंवा आज जाहीर केलेली मा. बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजना यापैकी कोणत्या योजनेतून ग्रामपंचायत कार्यालय बांधावयाचे आहे याबाबत संबंधित ग्रामसभेने ठराव करणे आवश्यक आहे. 1000 ते 2000 पर्यंत लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायतींनी इमारत बांधण्यासाठी सार्वजनिक-खाजगी भागिदारी संदर्भात किमान दोन वेळा प्रयत्न करणे आवश्यक आहे. पीपीपी तत्त्वावर बांधकाम करण्यास प्रतिसाद मिळाला नसल्यास आज जाहीर केलेल्या योजनेतून इमारत उभारण्यास मान्यता मिळणार आहे.

शासकीय-खाजगी भागीदारीतून बांधकाम करण्याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मान्यतेने स्वतंत्र धोरण ठरविण्यास मान्यता देण्यात आली आहे. मा. बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजना राबविण्यासाठी 2017-18 या वर्षासाठी 25 कोटी इतका निधी राखून ठेवण्यात आला असून हा निधी खर्च करण्यास मान्यता देण्यात आली. या योजनेसाठी प्रतीवर्षी साधारणपणे 110 कोटीप्रमाणे पुढील चार वर्षांमध्ये 440 कोटींची तरतूद करण्यासही मान्यता देण्यात आली. सार्वजनिक-खाजगी भागीदारीतून ग्रामपंचायतींचे बांधकाम करण्यात आल्यास तेवढा निधी कमी लागू शकतो.

साभार: महान्यूज

Previous Article

१ टक्का अब्जाधीश  भारतीयांकडे देशाचे ७३% उत्पन्न:  ऑक्सफॅमचा आर्थिक विषमता दाखवणारा डोळ्यात अंजन घालणारा रिपोर्ट 

Next Article

राज्य शासनाच्या उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार २०१७ साठी प्रवेशिका पाठविण्याचे आवाहन: अंतिम दिनांक ३१ जानेवारी २०१८

You may also like