भगवंतांची LIC पॉलिसी

Author: Share:

नुकताच मला माझा एक लहानपणीचा मित्र भेटला. चौकशी करताना माझा नेहेमीचा प्रश्न, “काय करतोस हल्ली?” त्यावर तो म्हणाला , ” अजूनही ‘Life In Comfort’ मध्येच आहे”. माझा गोंधळलेला चेहरा ओळखून तो म्हणाला “अरे म्हणजे LIC – Life Insurance Corporation चा एजन्ट आहे” छान चाललंय सगळं”.  Life In Comfort  – LIC चा इतका यथायोग्य फुलफॉर्म मला एकदम भावला.  मी म्हटलं अरे इतक्या स्पर्धेमध्ये तू मजेत आहेस हे ऐकून बरं वाटलं. तो म्हणाला “अरे या जगात भविष्याची चिंता करून घाबरणाऱ्या लोकांची संख्या इतकी आहे की इन्शुरन्स या धंद्याला मरणच नाही.” आम्ही दोघेही त्याच्या विनोदावर खळखळून हसलो आणि ‘पुहा लवकरच भेटू’  अशा आणाभाका घेऊन आम्ही आपापल्या मार्गानी निघून गेलो.

त्याचा विनोद आणि ते वाक्य मनात कुठेतरी खोलवर रुतलं. स्वतःच्या भविष्याची तरतूद करणं आणि आयुष्यात अनपेक्षितपणे घडणाऱ्या दुर्दैवी घटनांपासून स्वतःला सुरक्षित ठेवण्याची काळजी प्रत्येकानं घेणं  हे योग्यच आहे. पण वाटलं आपण आपल्या लौकिक आयुष्याची तरतूद इतक्या काळजीपूर्वक करतो तर मग पारलौकिक प्रवासाची काळजी घेण्याबद्दल माझा काय विचार झाला आहे? संभाव्य महागाई (इन्फ्लेशन), आयुर्मान, आर्थिक दायित्व,  म्हातारपण, म्हातारपणातलं आजारपण इतक्या आणि अशा कितीतरी गोष्टी विचारात घेऊन आपण पॉलिसी काढतो. जवळजवळ सर्व उद्योगशील वर्ष त्या पॉलिसीचे हप्ते भरण्यात घालवतो. कधीतरी खिशाला, आपल्या हौशी मौजीला काट मारतो पण पॉलिसीचा एकही हप्ता चुकवत नाही कारण ही भीती की हप्ता चुकला तर पॉलिसी लॅप्स होईल. आपण या एका आयुष्याच्या कव्हरेजसाठी इतका आटापिटा करतो मग जन्मोजन्मीच्या प्रवासासाठी किती कव्हरेज लागेल, याचा विचार करून आपल्याला खरी किती तयारी करायला हवी? ती मी करतो का?

या जन्मात संबंध आलेल्या बायको, मुलं, आई वडील, इत्यादी सर्वांचा विचार करण्यात आणि त्यांच्या पॉलिसीचे प्रीमियमचे हप्ते भरण्यात जवळजवळ सगळं आयुष्य खर्ची घालतो पण आपला आत्मा जो आपल्याबरोबर जन्मोजन्मी राहणार असतो त्याच्या सुरक्षेची तरतूद करण्यासाठी माझ्या दिनचर्येत मी काय करतो तर फार फार तर एक माळ किंवा शॉर्ट कट देवपूजा ? जन्मोजन्मी पारलौकिक कव्हरेज देणाऱ्या या अलौकिक पॉलिसीचा प्रीमियम फक्त दिवसभरात एक माळ? खरंच इतकी स्वस्त आहे का ही इन्शुरन्स पॉलिसी?

जवळजवळ सर्वच संत मंडळी त्यांच्या प्रत्येक वाचनातून, अभंगातून, ओव्यांतून याच साठी कळकळीनं सांगत आहेत. “जन्मोजन्मी आम्ही बहू पुण्य केले, तेव्हा या विठ्ठले कृपा केली” हे आपल्या अनुभवांवरून शिकवण्याचा प्रयत्न करत आहेत. याच साठी श्रीमद दासबोधाचे २० दशक, २०० समास आणि जवळ जवळ १०००० ओव्या खर्ची पडल्या, पण समर्थ रामदास स्वामींच्या शब्दांना LIC एजन्ट च्या शब्दांइतकही महत्व नाही का माझ्या लेखी?

मी विचारात पडलोय. खरं तर घाबरलोय. माझे आत्तापर्यंत किती प्रीमियम लॅप्स झाले त्याचा हिशोब सुद्धा लागत नाहीये. LIC चा हप्ता चुकू नये म्हणून आटापिटा करणारा मी, भगवंताच्या पॉलिसीबद्दल इतका निष्काळजी कसा राहिलो याची हळहळ वाटते आहे. पारलौकिक पॉलिसीच्या प्रीमियमचा हप्ता बुडला म्हणून दंड भरायला लागला असता तर काय झालं असतं ? विचारानंही मन सुन्न झालं आहे.

गम्मत म्ह्णजे असा विचार आल्यावर इतकं घाबरलेलं पण तरी बेमुर्वत मन म्हणालं,  LIC मधून, लिखित पॉलिसी, एजन्ट मार्फत अगदी घरपोच येते तशी लिखित पारलौकिक पॉलिसी कुठे मिळते ?

मीच माझ्या मनाला हसलो आणि समजावलं,

अनन्याश्चिन्तयन्तो मां ये जना: पर्युपासते |

तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम् ।। गीता ९-२२ ।।

इतक्या नेमक्या शब्दात, एकाच श्लोकात, पाच हजार वर्षांपूर्वी, समस्त मानवजातीमधल्या प्रत्येक जीवाची, लॅप्स न होणारी, जन्मोजन्मी सुद्धा एक्सपायर न होणारी, अगदी मुक्तीच्या एक्झिट बोनस सकट असणारी, आणि इतकं कव्हरेज असून, केवळ मनापासून अर्पण केलेल्या फळ, फुल, झाडाचं एक पान किंवा अगदी एक चमचा पाणी सुद्धा,  इतक्या कमी प्रीमियमवर उपलब्ध असलेली  आणि भगवद्गीतेच्या ऋचांमध्ये लिखित पॉलिसी देणाऱ्या आणि त्यातून जन्मोजन्मी ‘Lives In Comfort’  ची हमी देणाऱ्या या  भगवंतावर इतर इन्शुरन्स एजन्ट इतका तरी विश्वास ठेवणार ना ?…..

लेखक: राजेंद्र वैशंपायन

संपर्क: 91 93232 27277

ईमेल: rajendra.vaishampayan@gmail.com

असे लेख/बातम्या व इतर साहित्य नियमितपणे वाचण्यासाठी आमच्या Facebook Page ला Like आणि Follow करा: https://www.facebook.com/SmartMaharashtraOnline/

Previous Article

थिंक महाराष्‍ट्र डॉट कॉम’चे अॅप

Next Article

माझे इंजिनीरिंगचे प्रयोग भाग: १

You may also like