गौतम बुद्ध आणि बौद्ध तत्वज्ञान   

Author: Share:

वैदिक धर्मातील कर्मकांडामुळे धर्म क्लिष्ट बनला होता. पारलौकिक जीवनामध्ये तो अधिक अडकू लागला होता. त्याला अधिक व्यावहारिक पद्धतीने लोकांसमोर आणण्याची गरज होती. भारताचे सुदैव असे की या सुमारास एक महान तत्वज्ञ विचारी पुरुष भारताला लाभला. इस पूर्व ४८३ मध्ये वैशाख पौर्णिमेस शाक्य कुळातील एका महाजनपदी गौतम बुद्धांचा जन्म कपिल वास्तू येथील लुम्बिनी येथे झाला. सिद्धार्थ असे या राजपुत्राचे नाव होते. सर्व प्रकारच्या दुःखांपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न त्याच्या वडिलांनी शुद्धोधन राजाने खूप केला. मात्र शेवटी एके दिवशी जरा, व्याधी आणि मृत्यू यांचे दर्शन घडल्यावर सिद्धार्थ आत्मचिंतनात बुडून गेला. जीवनाच्या अर्थाचा शोध घेत हा राजपुत्र भटकला आणि जेंव्हा आत्ताच्या बिहारमधील गया येथील एका अश्वथवृक्षाच्या खाली बसला, तेंव्हा त्याला ज्ञानप्राप्ती झाली. आणि त्यांनतर हे ज्ञान वाटत तथागत देशभर फिरले. सुत्तनिपातात एका श्लोकात तथागतांच्या तोंडी उद्गार आहेत “थोड्या पाण्यात राहिलेल्या माशांप्रमाणे तडफडून एकमेकांवर हल्ला करण्यात आणि झगडण्यात मग्न झालेले लोक पाहून माझ्या मनात भीती उत्पन्न होऊन मला उबग आली..” आज बौद्ध धर्माचा जगभर प्रसार झालेला आहे. भारताचे सुदैव आहे, की गौतम बुद्ध आणि बौद्ध धर्म यांची उगमजननी भारत आहे. 

आपली रुपतारुण्यवती पत्नी यशोधरा आणि लहानगा राहुल यांना सोडून सिद्धार्थने राजवाडा सोडला. आपले वडील, पत्नी मुलगा मागे सोडून तो भटकत राहिला. त्यालाल पाच साधक भेटले. ज्ञानाच्या प्राप्तीसाठी शरीर क्लेश हा एक मार्ग त्याकाळी प्रसिद्ध होता, तो त्यानेही स्वीकारला. मात्र शरीराचे अस्थिपंजर होऊनही त्याचा उपयोग होईना. त्यामुळे, शरीरपीडा हा मार्ग नव्हे हेही त्याला कळले. शरीराचे लाड करणे चूक तसेच शरीराला पीडा देणेही चूक आहे, यांच्यामध्ये काहीतरी मार्ग असला पाहिजे असे त्याला वाटले. मध्यममार्ग हे बौद्ध तत्वज्ञानाचे वैशिष्ट्य आहे. गयेतील नैराँजन वनात त्याला ज्ञानप्राप्ती झाली. तो बुद्ध झाला. पौर्णिमेच्या शांत चंद्रप्रकाशात त्याने ह्या विमुक्तीसुखाचा अनुभव घेतला.
आपल्याला मिळालेल्या ज्ञानप्राप्तीचे अमृत वाटण्यासाठी गौतम बुद्ध निघाले तेंव्हा त्यांचे वय पस्तीस होते. पुढील पंचेचाळीस वर्षे त्यांना हे काम केले. जे पाच तापसी त्यांना भेटले होते, त्यांनाच त्यांनी पहिली दीक्षा दिला. ती वाराणसीजवळ सारनाथ येथे. या पहिल्या प्रवचनास धम्मचक्रप्रवर्तन असे म्हणतात.
इसवीसन ५६३ मध्ये कुशीनगर येथे गौतम बुद्धांचे वयाच्या ८० व्या वर्षी महापरिनिर्वाण झाले.
बौद्ध धर्माने भारताच्या दिशा ओलांडून जगभरात आपला प्रकाश पसरवला. इसवीसन पूर्व पाचवे शतक ते इसवी सन पहिले शतक हा भारतातील बौद्ध धर्माच्या सुवर्णाचा काळ होता. बौद्ध धर्माला भारतात खरा बहर आला तो मौर्य सम्राट अशोकाच्या काळात.
बौद्ध धर्माचे तत्वज्ञान ज्या तीन मुख्य ग्रंथात समाविष्ट आहे त्यांना त्रिपिटक म्हणतात. पिटक म्हणजे टोपली. तथागतांच्या निर्वाणानंतर बौद्ध धर्मात मतमतांतरे झाली. त्यामुळे बुद्धांचे मत काय होते हे  ठरवण्यासाठी धम्मपरिषद झाल्या. ह्यापैकी पहिल्या परिषदेत दोन पिटके रचली गेली आणि तिसऱ्या परिषदेत तिसऱ्या पिटकाची रचना झाली. सुत्तपिटक अर्थात गौतम बुद्धांनी बौद्ध धर्माची सांगितलेली तत्त्वसुत्रे आहेत. विनयपिटकामध्ये भिक्षूंनी आचरावयाचे नियम आहेत. अभिधम्मपिटकात तात्विक चर्चा केली आहे. ह्यात सात प्रकरणे आहेत. सुत्तपिटकातील सूत्रे ही गोष्टींच्या स्वरूपात असून त्याचे पाच भाग पडतात-दीघनिकाय, मज्झिमनिकाय, संयुत्तनिकाय, अंगुरत्तनिकाय आणि खुद्दकनिकाय. त्यांचे अनेक पोटविभाग आहेत. बुद्धम शरणं गच्छामि हे प्रसिद्ध धम्मपद खुद्दकनिकायच्या एका पोटविभागातील आहे. विनयपिटकाचे पाच भाग आहेत.
बौद्ध तत्वज्ञान
चार आर्यसत्ते
१. दुःख: दुःख हे आर्यसत्य आहे. त्याचे अस्तित्व असते.
२. दुःख कारण: अविद्या हे दुःखाचे कारण आहे. अविद्येतून तृष्णा निर्माण होते. अर्थात तृष्णेमुळे दुःख निर्माण होते.
३. दुःखनिरोध: दुःखांच्या कारणांचा विनाश केल्यास दुःख नाहीसे होऊ शकते.
३. दुःखनिरोधगामिनी प्रतिपदा: अर्थात दुःख निवारण्याचा मार्ग म्हणजेच अशांग मार्ग. ह्या आठ मार्गांचा वापर केल्यास दुःखाचे निवारण होऊ शकते.
 
अष्टांगमार्ग:
१. सम्यकदृष्टी: सम्यक दृष्टी म्हणजे चार आर्यसत्यांचे ज्ञान
 २.सम्यक संकल्प: शुभ आशा, आकांक्षा आणि सुखाबद्दल विरक्ती , तसेच सर्व भूतांविषयी अद्वेष दुसर्यास पीडा न देणे
३. सम्यक वाचा: खोटे न बोलणे, परनिंदा न करणे, व्यर्थ बडबड न करणे
४. सम्यक कर्म: दुसऱ्याचे प्राण न घेणे, पीडा न देणे, चोरी न करणे, इंद्रियसंयम
५. सम्यक आजीविका: कुठल्या मार्गाने आपली उपजीविका करावी म्हणजे सम्यक आजीविका. उदा कसाईकाम , शास्त्र व्यापार यांची आजीविका म्हणून वापर करणे निषिद्ध
६. सम्यक व्यायाम: मनातील वाईट विचार काढून शुभ विचारांची स्थापना करण्यासाठी प्रयत्नशील राहणे
७. सम्यक स्मृती: दुःख शाश्वत आहे आणि मी क्षणिक आहे याचे सतत भान ठेवणे  आणि
८. सम्यक समाधी: अष्टांग मार्गाची परिणती: ध्यानचं सर्व अवस्थांतून गेल्यावर सम्यक समाधीची अनुभूती मिळते.
ह्या अष्टांगमार्गाचे तीन मुख्य भागात विभाजन केले जाते:
१. प्रज्ञा आत्मज्ञान: सर्व पदार्थ अनित्य, दुःखमय आणि अनात्म आहेत
२. शील : नैतिक सदाचार आचरणाचे नियम:
यात पंचशीलांचा समावेश होतो: १) प्राणातिपात विरती: दुसऱ्यांचे प्राण न घेणे २) अदत्तदान विरती: दुसऱ्याची वस्तू न घेणे ३) काम मिथ्याचार विरती : अयोग्यमार्गाने कामतृत्प्ती न घेणे ४)मृशावाद विरती: खोट न बोलणे आणि ५) सुरा-मैरेय-प्रामादस्थान विरती : मद्यपानापासून दूर राहणे) आणि  ३.समाधी: चित्ताची समतोल अवस्था . हि अवस्था ध्यानाने येते. ध्यान करताना चार भाव विकसित करावेत: मैत्री( प्राणिमात्रांवर प्रेम करावे), करुणा (त्यांची दुःखे ध्यानात ठेऊन त्यांच्याबद्दल करुणा बाळगावी), मुदिता (त्यांच्या सुखाने आनंदून जावे) आणि उपेक्षा (चित्त स्थिर असावे). ह्या चार भावनांना ब्रह्मविहार असे म्हटले जाते.
बौद्ध तत्वज्ञानाची मुख्य योजना दुःख शोधून त्याच्या निरोधात आहे. त्यामुळे निव्व्ल तात्विक काथ्याकूट बुद्धांनी टाळला आहे. असे दहा प्रश्न आहेत ज्यावर बुद्धांनी उत्तर दिलेले नाही. त्यांना दहा अव्याकृत असे म्हणतात. (when Budhda remain silent). ही अव्याकृत म्हणजे, १. जग शाश्वत आहे ? २. जग अशाश्वत आहे? ३. जग अंत आहे? ४.जग अनंत आहे? ५. जीव आणि शरीर एकच आहेत? ६. जीव आणि शरीर वेगवेगळी आहेत? ७. तथागतर मरणांनंतर असतो? ८. तथागत मरणानंतर नसतो? ९.तथागत मरणानंतर असतोही आणि नसतोही.? १०. तथागत मरणानंतर असतो असेही नाही नसतो असेही नाही?. बुद्धांनी ह्या प्रश्नांची उत्तरे द्यायचे टाळले कारण एक म्हणजे त्याची उत्तरे  नुसत्या विचारशक्तीच्या आटोक्याबाहेरची आहेत आणि दुसरे म्हणजे त्याचा फारसा उपयोग नाही असे त्यांचे म्हणणे होते. दुःखाचा विनाश कसा होईल याकडे लक्ष दिले पाहिजे. एक दृष्टांत याविषयी बुद्ध देतात. एखाद्याला बाण लागून तो आसन्न अवस्थेत असताना, बाण मी काढून देईन पण बाण कशाचा बनलेला आहे ते आधी सांग तरच मी तो काढू देईन असे त्या शरविद्ध माणसाने म्हणणे जितके शहाणपणाचे आहे तितकेच आपण संसार दुःखानी विद्ध झालो असताना ह्या प्रश्नांची उत्तरे मिळवणे शहाणपणाचे आहे. बुद्ध दर्शनाची बैठक व्यावहारिक आणि नीतिप्रधान आहे हे स्पष्ट होते. तरीसुद्धा ह्या तात्विक विचारांचा उहापोह बुद्धांना करावाच लागला. विस्तारभयास्तव या तात्विक प्रश्नांचा उहापोह मात्र आपण येथे करणार नाही आहोत.
बौद्ध धर्माचे दोन पंथ आहेत. हीनयान पंथ गौतम बुद्धांच्या मूळ विचारांचा पंथ आहे.बोधिसत्व याच्या मुख्य गाभा आहे.  तो मूर्तिपूजा मानत नाही स्वयंशिस्त आणि ध्यानाद्वारे तो वैयक्तिक निर्वाणाचा विचार करतो. कर्म हा याचा मुख्य स्रोत आहे. अशोक हा हीनयानाचा अनुयायी होता. पाली ही सामान्यांची लिपी असल्याने हीनयान पंथाने ह्या लिपीतच वाङमय निर्मिती करण्यास जोर दिला.
महायान पंथ ज्याला इसवीसन पहिल्या शतकां कुशाण राजा कनिष्काने बढावा दिला आहे, यात मूर्तिपूजा स्वीकारली गेली. गौतम बुद्धांच्या मूर्ती निर्माण होण्याची सुरुवात ह्याच काळात झाली ज्याला गांधार शैली असे म्हटले जाते. निर्वाण ही सर्वसंगपरित्यागाची नकारत्मक स्थिती नसून आशीर्वादाची सकारात्मक स्थिती आहे, असे हा पंथ मानतो. संस्कृतमध्ये वाङ्ममय निर्मितीस प्रोत्साहन दिले गेले. अश्वघोषचे बुद्धचरित हे संस्कृत वाङ्मय याचा काळात निर्माण झाले.
याव्यतिरिक्त वज्रयान हा तांत्रिकतेवर भर देणारा तिसरा पंथ सुद्धा काही ठिकाणी अस्तित्वात आहे.
 बुद्ध, धम्म आणि संघ ह्यांना त्रिरत्न म्हणतात.
 
बौद्ध धर्माची प्रतीके:
बौद्ध धर्मात प्रतिकांना फार महत्व आहे. बौद्ध धर्मातील ‘महायान’ पंथ जो इसवीसनपूर्व पहिल्या शतकात राजा कनिष्काच्या काळात अधिक वाढला त्याने गौतम बुद्धांच्या पूर्ण प्रतिमा बनवण्यास सुरुवात केली. त्याला गांधार शैली म्हणतात. त्याआधी प्रतीकात्मक पूजा होत होती.
कमळ आणि बैल ही गौतम बुद्धांच्या जन्माची प्रतीके आहेत. घोडा हे सर्वसंगपरित्यागाचे प्रतीक आहे. पूर्ण ज्ञानाची प्राप्ती झाल्याची अवस्था म्हणजे निर्वाण, त्याचे अर्थात बोधी वृक्ष हे प्रतीक आहे. बुद्धांनी सारनाथ येथे दिलेल्या पहिल्या धर्मदिक्षेस धम्मचक्रप्रवर्तन असे म्हणतात ज्याचे प्रतीक आहे चक्र आणि स्तूप हे महापरिनिर्वाणाचे प्रतीक आहे.
बौद्ध धर्माच्या चार परिषदा भारतात पार पडल्या आहेत. त्यापैकी पहिली परिषद भरवली होती इसपु ४८३ मध्ये हारण्यक कुळाचा राजा अजातशत्रू याने. या परिषदेत बुद्धांचे अनुयायी आनंद याने सुत्तपिटकाचे आणि उपालीने विनयपिटकाचे लिखाण केले. दुसरी परिषद इसवीपू ३८३ मध्ये शिशुनाग राजा कालशोक याने वैशाली येथे भरवली होती. तिसरी धम्मपरिषद राजा अशोकाने इसपु २५० मध्ये आपली राजधानी पाटलीपुत्र येथे भरवली होती. तेंव्हा बौद्ध तत्वज्ञानात तफावत येऊ लागण्याने त्याबद्दल सखोल विचार करून त्याचे प्रमाणीकरण करण्याची आवश्यकता अशोकाला वाटली. यातून ह्या परिषदेत तिसऱ्या पिटकाची अर्थात अभिधम्मपिटकाची रचना केली गेली. बौद्ध विचारवंत मोगलीपुत्त तिसा हा ह्या परिषदेचा अध्यक्ष आणि अभिधम्मपिटकाचा निर्माता होता. चौथी धम्म परिषद कुशाण राजा कनिष्क याने इसवीसन ७२ मध्ये काश्मीर मधील कुंडलवनयेथे भरवली होती. वसुमित्र हा अध्यक्ष होता आणि संस्कृत बुद्धचरिताचा निर्माता अश्वघोष उपाध्यक्ष होता. ह्या परिषदेत बौद्ध धर्माची हीनयान आणि महायान अशा दोन पंथात विभागणी झाली.
त्रिपिटकांसोबत गौतम बुद्धांच्या पुनर्जन्माच्या कथा असणारा जातक कथा हा ग्रंथ, गौतम बुद्धांआधीच्या २४ बुद्धांची माहिती देणारा बौद्धवंश ग्रंथ, भारतात मिलिंद नावाने प्रचलित असणाऱ्या इंडो ग्रीक राजा मिनेडर आणि बैद्ध भिक्खू नागसेना मधील संवाद मिलिंदपन्हो, श्रीलंकेतील बौद्ध वांङमय दीपवंश महावंश आणि कुलवंश ही इतर बौद्ध वाङ्ममय निर्मिती झाली.  बौद्ध धर्मात वाङ्ममय निर्मिती झाली तसेच ज्ञानार्जन सुद्धा झाले. कुमारगुप्त पहिला याने बिहार मध्ये नालंदा विद्यापीठाची स्थापना केली. याशिवाय धर्मपालाने निर्माण केलेले विक्रमशिल विद्यापीठ आणि सोमपुरी विद्यापीठ, उत्तर बंगाल मधील सोमपुरी विद्यापीठ, भट्टारकाने बांधलेले गुजरात चे वल्लभी विद्यापीठ ही बौद्ध विद्यापीठे होती.
बौद्ध बांधकामेसुद्धा वैशिष्ट्यपूर्ण आहेत. बौद्ध भिक्खूंना राहण्यासाठी आणि चर्चाविनिमयासाठी विहारांची रचना केली गेली. स्तूप ही गौतम बुद्धाच्या निर्वाणाची प्रतीके आहेत. प्रत्येक स्तूपाच्या पायाशी गौतम बुद्धाची काही ना काही आठवण आहे. नाशिक आणि गया येथील बाराबार डोंगरावरील लेण्यासुद्धा प्रसिद्ध आहेत.
Previous Article

महाराष्ट्र

Next Article

यूपीएससी २०१७: उस्मानाबादचा ‘गिरीश बडोले’ देशातून विसावा

You may also like