गांधी आणि सावरकर ह्यांच्यातील अंतर !

Author: Share:

भूतपूर्व केंद्रीय मंत्री आणि काँग्रेसचे एक कुख्यात विचारवंत मणिशंकर अय्यर ह्यांनी अलीकडे पाकिस्तानात जाऊन जे वादग्रस्त विधान केले त्यामुळे भारतात थोडीफार खळबळ माजणे साहजिक आहे ० टीव्ही9 मराठी ह्या दूरचित्रवाहिनीने त्या विधानावर मंगळवारी ८ दिनांकाला चर्चा आयोजित केली होती ० मी त्यात सहभागी होतो ०लोकांचे प्रबोधन करण्याऐवजी आणि पुरावे न देता पक्षीय विद्वेषाच्या पातळीवर एकमेकांवर बाष्कळ आणि बेछूट आरोप करण्यात बराच वेळ फुकट गेल्याने चर्चा अधिकाधिक परिपूर्ण होण्याच्या दृष्टीने आवश्यक तेव्हढे मुद्दे मला मांडता आले नाहीत ० म्हणून हा विस्तारित स्वरूपात लिहिलेला लेख ०

भारताच्या राजकारणात हिंदुत्व हा शब्द सावरकरांनी प्रथम वापरला ; त्यामुळे द्विराष्ट्रवादाच्या सिद्धांताकडे मुसलमान आकृष्ट झाले आणि त्यातून पाकिस्तान जन्माला आले असा आशयाचे विधान अय्यर ह्यांनी केले ० हिंदू आणि मुसलमान ही दोन स्वतंत्र आणि युद्धमान राष्ट्रे आहेत आणि ब्रिटिश भारत सोडून गेल्यानंतर राज्यावर कोण बसणार हे निश्चित होत नाही तोपर्यंत सहजीवनाचा आणि स्वातंत्र्य चळवळीत मुसलमानांनी भाग घेण्याचा प्रश्न उपस्थित होत नाही असे विधान सर सय्यद अहमद ह्यांनी १८८८ मध्ये मीरत येथील एका प्रगट सभेत केले ० त्यावेळी सावरकर पाच वर्षाचे होते ०

सय्यद अहमद ह्यांची जन्मशताब्दी भारत स्वतंत्र झाल्यावर काँग्रेस सरकारने आणि पक्षाने धूमधडाक्यात साजरी केली आणि त्यांच्या नावाने टपालतिकीटही काढले ० जिनांनी पाकिस्तानचा ठराव १९४०मध्ये मांडला ० त्यानंतर १९४७ पर्यंत मोहनदास गांधींनी पाकिस्तानच्या मागणीवर प्रत्येक तीनचार महिन्यांनी उलटसुलट विधाने केली ० त्यांचे एक विधान भारताच्या अखंडत्वाचे आश्वासन देणारे असे ० त्यानंतरचे विधान पाकिस्तानची मागणी पुढे रेटण्यास मुसलमानांना प्रत्यक्षाप्रत्यक्ष बळ मिळेल अशी काळजी घेऊन केलेले असे ० ती विधाने सर्वांसाठी कागदोपत्री उपलब्ध आहेत ० मुसलमानांना पाकिस्तान हिसकावून घेण्यात यश येऊ नये म्हणून हिंदूंनी संघर्षास प्रवृत्त व्हावे असे आवाहन करणारे गांधींचे एकही विधान प्रसिद्ध नाही किंवा काँग्रेस आणि गांधीवादी विचारवंत ह्यांच्याकडून सांगितले जात नाही ० फाळणी आणि पाकिस्तानची निर्मिती ही परिस्थितीची अपरिहार्यता होती आणि ऐक्य की शांतता असे पर्याय समोर आले तेव्हा शांततेसाठी काँग्रेसने आणि गांधींनी ऐक्याचा बळी दिला असे समर्थन केले जाते ० त्याला उत्तर असे की स्वातंत्र्यप्राप्तीनंतर आजपर्यंत भारतावर जवळजवळ सगळा काळ काँग्रेसने आणि काँग्रेस संस्कृतीच्या पक्षांनी राज्य केले ०

स्वतः: सावरकर सत्तेच्या जवळपासही कधी नव्हते० उलट ते मरेपर्यंत काँग्रेस सरकारने त्यांच्या घरावरील गुप्तहेरांचा पहारा उठवलेला नव्हता ० सावरकर आणि लोकसंपर्क ह्यात करता येतील तेव्हढे अडथळे निर्माण करण्यात काँग्रेस सरकारांनी आणि विचारवंतांनी इतिकर्तव्यता मानली ० थोडा काळ ज्या हिंदुत्वनिष्ठांनी राज्य केले त्यांनीही सावरकर आपले दैवत आहे असे काँग्रेस संस्कृती जसे गांधी आणि नेहरू आपले दैवत आहे असे मानते तसे नि:संदिग्धपणे मान्य केलेले नाही ० उलट ह्या हिंदुत्वनिष्ठ राज्यकर्त्यांनी आपली गांधीनिष्ठा लपवलेली नाही ० असे असूनही पाकिस्तान निर्मितीला करणीभूत ठरलेल्या हिंदुद्वेष आणि अखंड भारताचे अखंड पाकिस्तान करण्याची महत्वाकांक्षा ह्या दोन प्रवृत्ती नष्ट करण्याचा एकही प्रयत्न काँग्रेस शासनाने केलेला दिसत नाही ० उलट हिंदूंना अपमानित करून दुय्यम नागरिकाप्रमाणे वागणूक देण्याची संधी काँग्रेसने सोडली नाही ०


असे साहित्य वाचत राहण्यासाठी लाईक करा आमचे फेस बुक पेज 

www.facebook.com/SmartMaharashtraOnline 


हिंदूपणाशी जवळीक दाखविणे हा काँग्रेसच्या राज्यात नैतिक अपराध मानला गेला ० एखाद्याने मुसलमानपणाचा फाजील अभिमान दाखविला तर त्याविषयी आक्षेप घेणे म्हणजे जातीय कलह माजविल्याचा अपराध करणे असे मानले जाऊ लागले ० गांधी आणि नेहरू ह्यांनी निर्माण केलेल्या मुसलमानधार्जिणेपणाच्या तत्वज्ञानाचे असे भयंकर मानसिक दडपण हिंदूंवर थयथयाट करीत होते की फाळणीवर चित्रपट काढण्याचे धाडस येथे बरीच वर्षे कोणाला झाले नाही ० चित्रपटाच्या पडद्यावरही हिंदू मुलाला मुसलमान मुलीशी आम्ही लग्न करू देणार नाही अशी धमकी सय्यद शहाबुद्दीन ह्या मुसलमान विचारवंताने आणि खासदाराने दिली आणि आम्ही ती ऐकून घेतली ० मकबूल फिदा हुसेन ह्या चित्रकाराने हिंदू देवदेवतांची नग्न चित्रे काढली ० त्याला आक्षेप घेणाऱ्यांना सौंदर्यदृष्टी नाही असे शेरे हिंदूंना ऐकावे लागले ० गेल्या आठवड्यात हुसेन ह्यांचे एकप्रकारचे समर्थन करण्यासाठी ‘ न्यूड ‘ चित्रपट काढण्यात आला ०

मोहनदास गांधी ह्यांचा मुलाकडून आणि चक्रवर्ती राजगोपालाचारी ह्यांचा मुलीकडून नातू असलेले उच्च प्रशासकीय अधिकारी गोपाळकृष्ण गांधी ह्यांनी सहा जून २०१७ ला ‘ हिंदू ‘ ह्या इंग्रजी दैनिकात लेख लिहून संसदेच्या मध्यवर्ती सभागृहात सावरकरांचे चित्र लावले जाणे ही स्वतंत्र भारताच्या इतिहासातील तीन अत्यंत दुर्दैवी घटनांपैकी एक घटना होय असे मत नोंदविले ० इतका सावरकरद्वेष काँग्रेस संस्कृतीत मुरला आहे ० मणिशंकर अय्यर एकटे नसून त्यांच्यामागे फार मोठी परंपरा आहे ० आज पाकिस्तान जागतिक आतन्कवादाचे मुख्य शक्तिकेंद्र बनले आहे ० भारताची स्वतंत्रता , सार्वभौमता,अखंडता आणि एकात्मता ह्यांना १९४७ मध्ये होता त्याहून अधिक धोका आज पाकिस्तानकडून आहे ० तरीही काँग्रेस संस्कृती अंतर्मुख होण्यास सिद्ध नाही ० तिचा सावरकरद्वेष कमी होत नाही ० पंतप्रधान नरेंद्र मोदी नेमाने राजघाटावर जाऊन हात जोडत असले आणि फुले वाहत असले तरी प्रत्यक्षात ते सावरकरमार्गाने जाऊन सगळ्या भारतीयांची मानसिकता पुरुषार्थी, विकासोन्मुख आणि एकजीव करू पाहत आहेत हे विघ्नसंतोषी काँग्रेस संस्कृतीला सहन होणे कठीण आहे ० त्या वैफल्यातून सावरकरांमुळे फाळणी झाली अशा आरोपांचा वाद नव्याने उकळविला जात आहे ०

वस्तुस्थिती अशी आहे की वासनांवर आणि इंद्रियांवर विजय मिळविला आहे हे सिद्ध करण्यासाठी खासगी जीवनात गांधी ताळतंत्र सोडून जसे ब्रम्हचर्याचे प्रयोग करीत होते तसे वैश्विक संतपणाचा मान मिळविण्यासाठी राजकीय जीवनात ते हिंदुमुसलमान ऐक्याचा प्रयोग करीत होते ० गांधींना हिंदुराष्ट्र मोडून हिंदी राष्ट्र करायचे होते ० त्यात सामील व्हायला मुसलमान सिद्ध नव्हते ० आम्ही आमचे मुसलमानपण म्हणजे अखंड भारताचे अखंड पाकिस्तान करण्याचा इस्लामचा आदेश कदापि सोडणार नाही हे त्यांनी घोषित केले होते ० हिंदुमुसलमान ऐक्याचा विषय गांधींनी समस्त हिंदुजातीसाठी कालांतराने श्रद्धेचा विषय बनविला ० ते व्रत आहे असे भोळ्या स्वभावाच्या हिंदूंना गांधींनी बजावले ० ह्या व्रताच्या पालनासाठी हिंदूंना केवळ कर्तव्ये आणि मुसलमानांना मात्र सगळे अधिकार अशी विभागणी गांधींनी केली ०

भारतातून फुटून निघण्याचा अधिकार गांधींनी मुसलमानांना दिला आणि भारतात काही कारणाने राहिलेले मुसलमान अप्रसन्न होऊ नयेत म्हणून हिंदुत्वाचा आणि आपल्या सर्वस्वाचा त्याग करणे हिंदूंचे कर्तव्य आहे असे सिद्धांत लादण्यात आले ० स्वतंत्रता देवीला नकळत हलविण्यात आले आणि तिच्या जागी नकळत इस्लाम ह्या देवतेला प्रतिष्ठित करण्यात आले ० तरीही गांधींना हवा तसा हिंदुमुसलमान ऐक्याचा प्रयोग हिंदूंच्या चिवटपणामुळे यशस्वी झाला नाही ० तेव्हा त्या अपयशाचे खापर सावरकरांवर फोडण्यात आले ० हा जुना खेळ आहे ०

हिंदुत्व, हिंदुराष्ट्रदर्शन आणि विज्ञाननिष्ठ निबंध असे सावरकरांचे तीन ग्रंथ आहेत ० त्यातून त्यांची हिंदुमुसलमान ऐक्याविषयीची मते शोधता येतात ० हिंदुमहासभेचे अध्यक्ष म्हणून कर्णावतीला १९३७ मध्ये केलेल्या भाषणात सावरकरांनी हिंदुराष्ट्राची संकल्पना व्यवहारात येतांना तिचे रूपांतर हिंदी राज्यात होईल आणि ह्या राज्यात मुसलमानांना जेव्हढे अधिकार असतील त्यापेक्षा एकही जादा अधिकार हिंदूंना असणार नाही अशी समानतेची भूमिका घेतली आहे ० सावरकर मुसलमानांना सहोदर मानीत आणि जगातल्या सगळ्या मुसलमानांपेक्षा भारतातील हिंदू त्यांना सर्वार्थाने जवळचे आहेत असा विश्वास ते त्यांना देत ० हा देश ही त्यांची पितृभूमी आहेच पण बाहेरची पुण्यभू स्वीकारल्यामुळे त्यासमवेत जी आंतरराष्ट्रीय निष्ठा त्यांना चिकटली ती दूर करण्यातच त्यांचे चिरकालीन हित आहे असे सावरकर त्यांना समजावीत ०

मुसलमानांचा फुटून निघण्याचा काँग्रेसने दिलेला हक्क सावरकरांनी कधीच मान्य केला नाही ० लोकशाही,धर्मनिरपेक्षता इत्यादी उदात्त विचारांचे योगदान हिंदूंनी जगाला केले ह्याची जाणीव ते मुसलमानां करून देत आणि ह्या देशाच्या अशा ऊर्जस्वल परंपरांचे मुसलमानांनी अभिमानी असले पाहिजे अशी अपेक्षा ते करीत ० मुसलमानांना त्यांनी विज्ञाननिष्ठ बनण्याचा उपदेश केला ० हिंदूंवर उपकार करण्यासाठी नव्हे तर त्यांच्या स्वतःच्या भौतिक उत्कर्षासाठी त्यांनी धर्मांधता सोडून विज्ञानाची कास धरली पाहिजे असे ते त्यांना समजावीत ० भारतातील मुसलमान सावरकरांना मागासलेले राहायला नको होते ० ते त्यांना पुढारलेलेआणि बलवान असायला हवे होते ०

हिंदुत्व हे सावरकरांनी ह्या देशाचे राष्ट्रीयत्व मानले ० राष्ट्रीयत्व म्हणजे एकत्वाची जाणीव ० ती ह्या देशाच्या अनेकविध ओजस्वी परंपरेच्या अभिमानातून निर्माण होते ० राजकारण , अनेक भौतिक शास्त्रे, साहित्य, कला, तत्वज्ञान ,युद्ध , पराक्रम आणि हौतात्म्य , महिलांचे सबलीकरण आणि सामाजिक समरसता इत्यादी विषयातील थोर परंपरांचे वर्णन हिंदुत्व ह्या ग्रंथात सावरकरांनी केले आहे ० पण ही धार्मिक पोथी नाही ० हिंदुधर्म पाळतो तो हिंदू अशी त्यांची व्याख्या नाही ० हिंदूंचा धर्म तो हिंदू धर्म अशी व्याख्या त्यांनी केली ० हिंदूंमध्ये उदंड उपासना स्वातंत्र्य असल्याने प्रत्येक हिंदूची अनुभूती स्वतंत्र आहे ० त्यामुळे त्यांच्यामध्ये इस्लाम आणि ख्रिस्ती धर्माप्रमाणे एकचएक पोथीनिष्ठ ग्रंथ लिहिला गेला नाही ० सावरकरांची हिंदुत्वाची व्याख्या धार्मिक नाही ० नास्तिकही हिंदू असू शकतो ०

गांधीयुगात स्वातंत्र्य चळवळीला विकृत वळण लागले आणि अखंड भारताचे अखंड पाकिस्तान होण्याच्या दिशेने मार्गक्रमणा सुरु झाली तेव्हा हिंदूंना आत्मभान देऊन त्यांच्या राजकीय हक्काविषयी त्यांना जागरूक करण्यासाठी हिंदूंची काटेकोर व्याख्या सावरकरांना करावी लागली ० पण पुण्यभूच्या संकल्पनेला भारतीयत्वाची बैठक देऊन अहिंदूंना त्यात भविष्यात समाविष्ट होता येईल असा आशावाद ज्ञानकोशकार केतकरांनी व्यक्त केला आहे ० जो शेवटी हिंदू राहत नाही तो हिंदू अशा शब्दात सावरकरांनी स्वतः: ह्या ग्रंथाचा समारोप केला आहे ० हिंदू हा वैश्विक रूप धारण करण्याची इच्छा धरणारा जीव आहे , त्याचे तत्वज्ञान मनुजमंगलाचे आहे अशी सावरकरांची धारणा आहे ०

सावरकरांची हिंदूंची व्याख्या डॉ भीमराव रामजी आंबेडकरांनी संविधानात स्वीकारली आहे ० भारताच्या स्वातंत्र्यासाठी सर्वोच्च पराक्रम, सर्वोच्च त्याग आणि सर्वोच्च सृजनशीलता केवळ सावरकरांनी अभिव्यक्त केली आहे ० जगून दाखविली आहे ० सावरकर बुद्धिवादी होते आणि ईश्वरालाही त्यांनी प्रश्न विचारल्यावाचून स्वीकारले नाही ० पण देशाला त्यांनी जननीस्वरूपात पाहून तेथे सर्वस्व समर्पणाची वृत्ती ठेवली ० सावरकरांमुळे संपूर्ण पंजाब आणि संपूर्ण बंगाल पाकिस्तानात गेला नाही ० राजकारणाचे हिंदूकरण आणि हिंदूंचे सैनिकीकरण ह्या त्यांच्या नीतीचा भारताला लाभच झाला ० अनर्थ टळला ० देशभक्ती ही अंत:करणातून उत्पन्न होते ० ती भीक मागून मिळवता येत नाही ० काँग्रेसने देशभक्तीची भीक मुसलमानांकडे मागितली आणि त्यांनी त्याची किंमत पुरेपूर वसूल करून पाकिस्तान मिळविले असे ते सांगत ०

सावरकरांना काँग्रेस प्रवेशाचे आवाहन करण्यात आले होते ० परंतु हिंदी राष्ट्रवादाची संकल्पना काँग्रेस प्रामाणिकपणे कार्यवाहीत आणत नाही असे कारण देऊन सावरकर काँग्रेसमध्ये गेले नाहीत ० एड्वर्डला घालवून मला औरंगजेबाचे राज्य आणायचे नाही असे ते म्हणत ० शिवाजी हे सावरकरांचे दैवत होते ० शिवाजीच्या राष्ट्रात आणि राज्यात मुसलमान सुखी होते तसे ते सावरकरांच्या राष्ट्रात आणि राज्यातही सुखी राहिले असते आणि राहतील ० पण त्यांना पाकिस्तान निर्माण करता येणार नाही ० हा सावरकर आणि गांधी, नेहरू नि काँग्रेस विचार ह्यातील फरक आहे ० वाद जिना विरुद्ध सावरकर असा नाही तर तो गांधी विरुद्ध सावरकर असा आहे ० राष्ट्रवादी जिनांना गांधींनी पाकिस्तानवादी बनविले ० फाळणी रोखण्यासाठी गांधी सावरकरांना कधी भेटले नाहीत ० फाळणी रोखण्यासाठी क्रांती करावी लागते आणि ती हिंमत तुमच्यात नसल्याने पाकिस्तान मान्य करा असे गांधींनी काँग्रेस कार्यकारिणीला सांगितले ० सावरकर क्रांतिकारक होते आणि सशस्त्र क्रांतीचे तत्वज्ञान आणि परंपरा निर्माण करून ती सुभाषापर्यंत त्यांनी चालवली ० ते ह्या दोघातील अंतर समजून घेतले की संसद भवनासमोर सावरकरांचा भव्य पुतळा उभा करण्याची प्रेरणा प्रत्येक भारतीयाच्या अंत;करण्यात उदित होईल ०

दूरचित्रवाहिन्यांवर असे मूलभूत विषयांवर परिसंवाद होतात तेव्हा त्यात भाग घेणाऱ्या वक्त्यांमध्ये पक्षीय आणि राष्ट्रीय स्वार्थाने बोलणारे कोण आहेत आणि त्यांची योग्यायोग्यता काय आहे ह्याचे तारतम्य आयोजकांनी ठेवायला हवे आणि त्यादृष्टीने समयाचे वितरण करायला हवे ० म्हणजे लोकांपर्यंत विषय गीता अर्जुनापर्यंत गेली तसा जाऊन लोकशाही व्यवस्था बळकट होऊ शकेल ०

लेखक: अरविंद विठ्ठल कुळकर्णी


असे साहित्य वाचत राहण्यासाठी लाईक करा आमचे फेस बुक पेज 

www.facebook.com/SmartMaharashtraOnline 


 

Previous Article

अनाथांची कैवारु कांचन वीर

Next Article

माझं पहिलं प्रेम

You may also like