Smart Maharashtra

दिसामाजी काही उत्तम वाचावे…

dummy_728

श्रीशालिवाहन शके १९४१, शिवराज्याभिषेक शके ३४५, विकारीनाम संवत्सर

ग गणपतीचा…

Author: Share:

आमची पिढी त्यातल्या त्यात भाग्यशाली होती, कारण आम्ही ग गणपतीचा गिरवला. आता ए फॉर ऍपल या शिवाय तुम्हाला पर्याय नाही. साधारण २०-२५ वर्षांपूर्वी इंग्रजी माध्यमात शिकवण्याचं टूम आलं. पण हे टूम उच्च मध्यम वर्गीय आणि श्रीमंत यांच्यापुरतं मर्यादित होतं. आता अगदी गरीबातला गरीब माणूसही आपल्या मुलाला इंग्रजी माध्यमात शिकवण्यासाठी धडपडत असतो. हे इंग्रजी माध्यम इतकं महत्वाचं का झालं? तर एक सार्वजनिक अफवा पसरवण्यात आली की इंग्रजी माध्यमात शिकल्यामुळे मुलांचं भवितव्य घडतं आणि म्हणूनच इंग्रजी ही काळाची गरज आहे, असं मानताना इंग्रजी माध्यम सुद्धा काळाची गरज झाली. त्यात हळू हळू शासनाच्या शाळा बंद पडू लागल्या. शासनावर भार नको म्हणून खाजगी शाळा निर्माण होत गेल्या. पण हा भार कमी न होता, तो नाहिसा झाला. अनेक खाजगी शाळा निर्माण होत गेल्या आणि शिक्षणाचा बाजार होत गेला. शिक्षण ही एका अर्थी महत्वाची गरज आहे, त्यामुळे शिक्षण हे महाग असू नये. जसे अन्न, वस्त्र आणि निवारा माणसाच्या मूलभूत गरजा आहेत. पण त्यातील निवारा इतका महाग झाला आहे की आपण कल्पना सुद्धा करु शकत नाही. तसेच शिक्षणाचे झाले आहे. इंग्रजी माध्यमाचं टूम आल्यामुळे खाजगी शाळांना प्राधान्य मिळाल्यामुळे शैक्षणिक मूल्ये कमी झाली आहेत. म्हणजे शिक्षण हे ज्ञान मिळवण्याचं आणि ज्ञान देण्याचं साधन न राहता तो एक व्यवसाय झाला आहे. पालक हे शाळांसाठी मुलांचे पालक न राहता ग्राहक झाले आहेत. शिक्षणाचा बाजार तर झाला. परंतु याचे सर्वात मोठे नुकसान मातृभाषेला झाले. मातृभाषेतून शिक्षण घेणार्‍यांची संख्या घटत गेली.

मराठी शाळा यामुळे बंद पडत गेल्या. सरकार जणू या गोष्टीकडे लक्षच द्यायला तयार नाही. वीस वर्षांपूर्वी ज्या मराठी शाळांमध्ये अनेक विद्यार्थी शिकत होते, त्या शाळा अक्षरशः बंद पडल्या. अनेक शाळांमधल्या विद्यार्थ्यांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात घट झाली. पण हा मुद्दा का कुणास ठाऊक अनेकांना गौण वाटतो. मातृभाषेतून शिक्षण यासाठी शासनाला काहीही करावेसे वाटत नाही. मुळात त्यांची तशी धारणाच नाही. हाताच्या बोटावर मोजण्या इकते काही सामाजिक कार्यकर्ते या विषयावर काम करत आहेत. परंतु ही जबाबदारी शासनाची आहे. स्वच्छता अभियान हे जितकं महत्वाचं आहे, तितकंच मराठी माध्यमातून (अर्थात मातृभाषेतून) शिक्षण हा मुद्दा सुद्धा महत्वाचा आहे. तो मुद्दा सासनाने अजूनही त्यांच्या विषयपत्रिकेत घेतलेला नाही. कारण याविषयीचं गांभिर्य त्यांना नाही. आता एक मुद्दा चघळला जातो की इंग्रजी माध्यमात शिकून सगळेच मोठे साहेब वगैरे होतील? मुळात हे कसे शक्य आहे? समाज सर्व घटकांच्या माध्यमातून आणि सहकार्यामुळे चालत असतो. जसे व्यवसायिक असतात, तसे कारकुनही असतात. एखाद्या कार्यालयात जसा एखादा प्रबंधक असतो, तसा तिथे शिपाई सुद्धा असतो. उद्या जर सर्वांनीच इंग्रजी माध्यमातून शिक्षण घ्यायचे ठरवले तर कार्यालयातील प्रबंधक आणि शिपाई दोघेही अस्खलित इंग्रजी बोलणारे असतील? त्यापेक्षा मोठा काय फरक पडणार आहे? त्यामुळे इंग्रजी माध्यमात शिकल्यामुळेच आपल्या मुलांचं भलं होईल, ही अंधश्रद्धा पालकांनी काढून टाकायला पाहिजे. अर्थात इंग्रजी ही भाषा प्रत्येकाला आलीच पाहिजे. पण इंग्रजी शिकणे आणि इंग्रजीतून शिकणे या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. या दोन गोष्टीत अनेकांचा घोळ होतो.

पालकांना आपल्या मुलांचे कल्याण झालेलेच हवे आहे. त्यामुळे आपलं मुल कोणत्याही बाबतीत कमी राहू नये, ही काळजी पालक घेत असतात. सध्याचं युग इतकं वेगाचं आहे की क्षणभर विश्रांती घ्यायलाही कुणाला उसंत नाही. मग आपली मुले कशी काय त्यातून सुरक्षित निसटू शकतील? आपण मुलांचं दैनंदिन वेळापत्रक पाहिलं तर आपल्याला जाणवेल की ही मुले आपल्यापेक्षाही जास्त व्यस्त आहेत. शिशूवर्गात शिकणारा मुलगा शाळेतही जातो आणि ट्यूशनलाही जातो. मुळात तो जर शाळेत जात असेल तर त्याला ट्यूशनला पाठवण्याची गरज काय? अहो शिशूवर्गात असा कोणता अवघड अभ्यास असतो? तरीही पालक आपल्या मुलांवर असले अत्याचार करतात. याचे पहिले कारण आई आणि वडील कामाला जातात. दुसरे कारण, त्यांना इंग्रजी येत नसतं. पालकांना इंग्रजी येत नाही म्हणून त्या चिमुकल्याने आपलं बालपण वाया घालवायचं? जे वय मुक्तपणे वावरण्याचं असतं, अल्लडपणात रमायचं असतं, त्या वयात आपण पालक त्यांच्यावर दफ्तरांचं असं काही ओझं टाकतो की ते आयुष्यभर वाकले जातात. मुळात शालेय अभ्यास हा शिक्षणाचा केवळ एक भाग आहे. ते परिपूर्ण शिक्षण नाही. म्हणजे खेळ, कला, इतर क्रियाकलाप सुद्धा महत्वाच्या आहेत. मुलांचा सर्वांगिण विकास झाला पाहिजे. त्या सर्वांगिण विकासात शालेय शिक्षण महत्वाची भूमिका बजावतं. पण सध्या इंग्रजी माध्यमाच्या वर्चस्वामुळे मुल शाळा आणि ट्यूशनमध्ये अडकला आहे.

मराठी भाषा आणि देवनागरी लिपी ही अत्यंत पुढारलेली आहे. देवनागरी लिपीत जगातल्या अनेक अनोळखी भाषा लिहिल्या तरी त्याचे वाचन करणे सुलभ जाते. त्यात मराठी ही संपन्न भाषा. त्यामुळे मराठीत शिक्षण घेतल्याने कुणाचे नुकसान तर मुळीच होणार नाही. झाला तर फायदाच होईल. त्यात इंग्रजी माध्यमाचे शिक्षण अनेक पालकांना परवडत नाही. बर्‍याचदा मासिक कमाईत कसा बसा महिना काढावा लागतो. पण आपल्या मुलाला मात्र तो इंग्रजी माध्यमातच शिकवतो. जणू तो स्वतःला शिक्षाच करुन घेतोय. या गोष्टी थांबल्या पाहिजेत. यासाठी सुजाण नागरिकांनी प्रयत्न केले पाहिजे. अर्थात ही जबाबदारी सरकारची आहे. पण त्यांना जेव्हा जाग येईल तेव्हा येईल. तोपर्यंत आपण मात्र झोपू नये. मराठी माध्यमातून शिक्षण घेण्यासाठी अनेक स्तरांतून प्रबोधन झाले पाहिजे. व्याख्यान, पथनाट्य, चित्रपट, नाटक ही प्रभावी माध्यमे आहेतच. परंतु सुजाण पालकांनी सुद्धा त्यांच्या पद्धतीने यासाठी प्रयत्न केले पाहिजे. यासाठी आपल्याला समिती स्थापन करता येईल. या समितीच्या माध्यमातून मराठी माध्यमाचे महत्व लोकांपर्यंत पोहोचवता येईल. कारण संघटितपणे काम केले तर फळ लवकर मिळतं. आता गणेशोत्सव सुरु आहे, तर गणपती मंडळांना मराठी माध्यम या विषयावर चलचित्र दाखवता येईल. गणेशोत्सव मंडळांना याविषयी छोटे छोटे फलक करता येतील. स्वतःला राजकारणी आणि समाजसेवक म्हणवून घेणार्‍यांचे अनेक फलक आपण गणेशोत्सवात पाहतो. त्यांनाही आपल्या फलकांवर मराठी माध्यमाचा संदेश देता येईल. “गणपती बाप्पा मोरया, मराठी माध्यमात शिकूया” अशा घोषणा सगळीकडे पसरवता येतील. तसेच गणेश विसर्जनातही अशा घोषणा म्हणता येतील. अशा स्वरुपाने हा संदेश अनेक लोकांपर्यंत जाऊ शकतो. हे काम प्रचंड कठीण आहे. पण यास जन आंदोलनाचे स्वरुप दिले तर हे शक्य होऊ शकेल. प्रत्येकाने आपल्याला शक्य असेल अशा पद्धतीने कृती करायची आहे. यासाठी अनेक वर्ष खर्च करावी लागतील. आपल्याला या कार्याचा श्रीगणेशा करायचा आहे आणि फलस्वरुप म्हणून काही वर्षांनी आपली मुले पुनश्च ग गणपतीचा गिरवायला लागतील…

Previous Article

२६ ऑगस्ट

Next Article

जैन मुनींनी संजय राऊतांना झापले; तुझ्या आईने तुला संस्कार दिले नाहीत.

You may also like