“खेळाचे स्वातंत्र्य” -सचिन तेंडुलकर भाषणाचा मराठी स्वैर अनुवाद

Author: Share:

गोंधळ घालणारे गोंधळी म्हणून आपली राजकीय गृहे प्रसिद्ध आहेत. आपल्या संसदेत आणि विधानमंडळांमध्ये कामापेक्षा अधिक गोंधळ, ओरडणे आणि सभात्याग यांचे सत्र चालू असते. याचा परिणाम होतो कामकाजावर. काल भारतरत्न सचिन तेंडुलकर जेंव्हा राज्यसभेत बोलावयास उभा राहिला, तेव्हा २जी प्रकरणावरून विरोधकांनी घातलेल्या गोंधळाने, त्याला बोलताही आले नाही. “खेळाडू अन खेळांचे स्वातंत्र्य” या विषयावर सचिन बोलणार होता. काळ त्याला बोलावयास मिळाले नाही हे खरे. मात्र आपले विचार देशासमोर आणण्यासाठी त्याने एक वेगळा मार्ग स्वीकारला. सोशल मीडियावर त्याने आपला व्हिडीओ शेअर केला. देशासाठी आपली सर्वोत्तम गुणवत्ता पणाला लावणाऱ्या भारताच्या लाडक्या मास्टरब्लास्टरने देशातील तरुणांसाठी एक नवीन मांडून राज्यसभा खासदार म्हणून सुद्धा देशाचा विचार करीत असल्याचे दाखवून दिले. भाषण वाचल्यावर त्याने किती सखोलपणे अभ्यासपूर्ण विचार केला आहे हे तुमच्याही लक्षात येईल आणि आत्तापर्यंत खेळाडू म्हणून त्याच्याविषयी असणारे प्रेम आणि आदर निश्चित वाढेल!

काय म्हणाला सचिन? आम्ही मराठीत शब्दबद्ध केलंय तुमच्यासाठी!

          नमस्कार माझ्या प्रिय देशवासियांनो,

काल काही गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचवायच्या होत्या,आता मी तोच प्रयत्न करणार आहे. मला नेहमी आश्चर्य वाटते मी इथे कसा आलो, आणि मला थोडे थोडे असे वाटते की मी क्रिकेट सुरु करताना चाललेली “बालपाउले” आठवणी म्हणून आयुष्यभर माझ्या सोबत राहिल्या. मला नेहमीच खेळायला आवडत असे आणि क्रिकेट माझे आयुष्य होते. माझे वडील प्राध्यापक रमेश तेंडुलकर, कवी आणि लेखक होते. मला जे आयुष्यात बनायचे आहे ते बनण्यासाठी त्यांनी नेहमीच मला प्रोत्साहन आणि पाठींबा दिला. त्यांच्याकडून मला मिळालेली सर्वात महान भेट होती, खेळण्याचे स्वातंत्र्य, खेळण्याचा अधिकार, आणि मी नेहमीच त्यांचा यासाठी ऋणी राहीन.

आपल्या देशासमोर सध्या खूप मोठ्या समस्या आहेत ज्याकडे आपण लक्ष देण्याची आवश्यकता आहे. आर्थिक विकास, गरिबी, अन्नसुरक्षा, आरोग्य या अनेकांमधून काही…! खेळाडू असल्याने मी खेळाविषयी बोलणार आहे, आरोग्य आणि सुदृढतेविषयी बोलणार आहे, कारण त्याचा अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम होतो. निरोगी आणि तंदुरुस्त भारत हे माझे स्वप्न आहे. ‘जब स्वस्थ है युवा तब  देश मी कुछ हुआ’. भारत २०२० पर्यंत सर्वाधिक सरासरी तरुण वय असणाऱ्यांचा देश म्हणून पुढे येणार आहे असे म्हटले जाते. तर,असे गृहीतक असते, की तरुण आहे तर तंदुरुस्त आहे.पण आपण चुकतोय! आपण जगाची मधुमेहाची राजधानी आहोत आणि साडे सात कोटी भारतीय या रोगाने त्रस्त आहेत. आणि जेंव्हा प्रश्न लठ्ठपणाचा येतो, आपण जगात तृतीय स्थानावर आहोत.या रोगांची आर्थिक ओझी आपल्या देशाला प्रगती करण्यापासून अडवतील. संयुक्त राष्ट्रसंघाच्या अहवालानुसार असंसर्गजन्य रोगांचा २०१२ पासून २०३० पर्यंत भारतीय अर्थव्यवस्थेवर ६.३ ट्रिलियन डॉलर्स अर्थात भारतीय ४ कोटी कोटी रुपये, बरोबर ऐकले तुम्ही ४ कोटी कोटी एवढा परिणाम होणार आहे. पण ही संख्या आपण कमी करू शकतो, जर आपण सर्वांनी हा प्रयत्न केला की आपणा सर्वांचे आरोग्य चांगले राहील, आपण व्यायाम करू आणि कुठलातरी खेळ खेळू, तर खूप काही बदलू शकते. पण मला असे वाटते की त्यसाठी आपल्या देशाला खेळणारा देश बनवण्यासाठी आपल्याकडे एक योजना हवी. आपल्याला उपभोगपूर्ण आयुष्यपद्धतीपासून दूर नेण्यासाठी, आपली रोगी मानसिकता बदलण्यासाठी.आपले तंदुरुस्तीचे धडे हलके होताहेत आणि आणि खाण्याचे धडे जड होत चालले आहेत. आपल्याला ही सवय बदलली पाहिजे. मला वाटतंय, या ‘मोबाईल’च्या युगात आपण सर्व ‘इममोबाईल” होत चाललो आहोत. आपल्यापैकी खूप जण ठरवतात, पण खेळत नाही. आपल्याला आपल्या देशाला ‘खेळप्रिय’ देशापासून ‘खेळ खेळणाऱ्या देशाकडे’ रूपांतरित केले पाहिजे, प्रत्येकाला क्रियाशील आणि सहभागी करून घेतले पाहिजे, खेळाची संस्कृती आपण रुजवली पाहिजे आणि वाढवली पाहिजे. आपला ईशान्य भारत, ज्याची लोकसंख्या देशाच्या अवघे ४% आहे, त्याला फार तेजस्वी खेळसंस्कृती आहे. त्याने खूप खेलरत्नांना जन्म दिला आहे, ज्यात आपली बॉक्सिंग आयकॉन मेरी कॉम आहे, नुकतीच वेटलिफ्टिंगचे (सुवर्ण)पदक जिंकलेली मीराबाई चानु, दीपा कर्माकर, बायचुंग भुटिया, सरितादेवी, संजीता छानु आणि अनेक.

खेळ सामाजिक सुसंवाद वाढवतो. राष्ट्राध्यक्ष नेल्सन मंडेला यांनी दक्षिण आफ्रिकेला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी रग्बी खेळाच्या मार्फत घेतलेले प्रयत्न आख्यायिका आहेतच. खेळाकडे देश घडवण्याचा स्वतःचा एक अनोखा मार्ग आहे. तो (खेळ) व्यक्तींची चरित्रे घडवतो,आणि व्यक्तींची चरित्रे म्हणजे भारताची चरित्रे (ओळखी) आहेत. खोडकर मुलापासून, देशासाठी विश्वचषक जिंकण्याच्या स्वप्नाचा पाठलाग करताना मी अधिक शिस्तबद्ध झालो आणि लक्ष्यकेंद्रित झालो. माझ्यासमोर लक्ष्य होते आणि मी त्यासाठी नियोजन करायला सुरवात केली. पण सगळ्यात महत्वाचा भाग होता ती योजना अंमलात आणणे. प्रत्येक वेळेस मी यशस्वी झालो असे नाही. असे प्रसंग आले जेंव्हा मी अपयशी ठरलो. पण खेळाने मला परत आपल्या पायावर उभे राहायला आणि पुन्हा निकोप पद्धतीने लढायला शिकवले.

मला माझ्या वडिलांच्या खूप वर्षांपूर्वी सांगितलेल्या काही ओळी आठवतात.

  “पराभव म्हणजे शेवट नाही…

   हरून घरात बसणं योग्य नाही..

   कधीतरी एखादा उत्कृष्ट खेळाडूही शुन्यावर बाद होतो..

   पण त्यांनंतरचा संघर्षच उद्याचं सामर्थ्य निर्माण करतो..

    आयुष्याला एक वेगळी कलाटणी देतो… “

आपण देशात खेळाची संस्कृती निर्माण केली पाहिजॆ, नाहीतर तरुण, तंदुरुस्त नसलेली आणि रोगी भारत म्हणजे आपत्तीची पाककृतीच आहे.

मी विनम्रपणे तीन ‘आय (I)’ ची रचना प्रस्तावित करतो. गुंतवणूक (इन्व्हेस्ट), संरक्षण (इंश्युअर), आणि पुढे जाण्याची क्षमता (इमोटीलाईज)

आपण आपल्या स्वतःच्या वेळेची आणि प्रयत्नांची गुंतवणूक केली पाहिजे आणि आपले आरोग्य सुरक्षित केले पाहिजे. आपल्यातील प्रत्येकाला कुठलातरी एक खेळ स्वीकारला पाहिजे आणि नियमितपणे खेळात राहिले पाहिजे. आपल्या सन्माननीय सभापतींना (राज्यसभेचे सभापती आणि उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू) बॅडमिंटन हा खेळ खूप आवडतो, असा गुलझार साहेबांना टेनिस खेळ आवडतो.वय हा कधीच अडसर नाही कारण आपल्या देशातील सर्वात वयोवृद्ध मॅरेथॉनपटू ह्या कोचीच्या १०१ वर्षाच्या ई पी परमेस्वरन आहेत, ज्यांना मी नुकताच भेटलो. आपले नागरिक आणि विद्यार्थ्यांना खेळाच्या अधिक पायाभूत सुविधांचा लाभ मिळाला पाहिजे.

खुली मैदाने आणि क्रीडांगणे वाचवली पाहिजेत. स्मार्ट शहरांसोबतच आपण स्मार्ट खेळांची शहरे बनवली पाहिजेत. या अनुषंगाने मी कंपनी व्यवहार मंत्री माननीय श्री अरुण जेटलींना विनंती करतो की सीएसआर फंडातील ठराविक टक्के रक्कम खेळांवर खर्च करणे कंपन्यांना बंधनकारक केले पाहिजे. धोरणात्मक दृष्टया ‘खेळ’ हा विषय शाळेतील इतर कुठल्याही ‘विषयाच्या’ ‘बरोबरी’चाच असला पाहिजे.

खेळात शाळा, जिल्हा, राज्य किंवा देशाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या विद्यार्थ्यांना अतिरिक्त गुण किंवा ग्रेड्स दिले जावेत. मी माझ्या कार्यकाळाच्या सुरुवातीपासून ह्या विषयाच्या मागे आहे आणि मला आनंद आहे की मनुष्यबळ मंत्रालय आणि क्रीडा मंत्रालय ह्या मुद्द्याचा गंभीरतेने विचार करीत आहेत.

जेव्हा घरात मुलगी जन्माला येते तेव्हा आपण म्हणतो, घरी लक्ष्मी आली आहे. त्या लक्ष्मीला लक्ष्मीसारखेच ठेवणे आपल्या हातात आहे. भारताच्या कन्यांनी त्या किती सक्षम आहेत हे दाखवून दिले आहे आणि विजेत्यांमध्ये सिंधू ,साक्षी, सायना,सानिया, मिताली आणि ही यादी वाढत जाणारी आहे. जेव्हा स्वप्न भेदभाव करीत नाहीत, तर आपण का? मला त्यांच्या पालकांचे, कुटुंबियांचे, प्रशिक्षकांचे कौतुक करावेसे वाटते, ज्यांनी त्यांना प्रोत्साहन दिले, मदत केली आणि हे एकमेव कारण आहे की त्या इथपर्यंत पोहोचू शकल्या आहेत. माझा पालकांसाठी हाच संदेश आहे की तुमच्या मुलाला आणि मुलीला समान पाठींबा आणि प्रोत्साहन द्या आणि ते तुम्हाला अभिमानास्पद ठरतील.

ऑलिंपिक किंवा महत्वाच्या खेळाच्या स्पर्धेआधी आमच्या अपेक्षा आकाशाला भिडतात. मला हे जाणवते आहे की गोष्टी सकारात्मकरित्या बदलत आहेत आणि आपण दीर्घकालीन तयारीचा दृष्टिकोन अवलंबित आहोत. लहान वयात गुणवत्ता हेरण्याबरोबरच, आपल्याकडे क्रीडापटूंच्या तयारीसाठी वाहून घेतलेला प्रशिक्षकांचा एक संघ असावा. मला वाटते हे अतिशय महत्वाचे आहे की आमचं क्रीडापटूंच्या भोवती पूर्णवेळ सपोर्ट स्टाफ असावा, आणि पदके जिंकणे हे त्यांचेही लक्ष्य असावे. मागील ऑलिंपिकअगोदर आपला एक मल्ल आधुनिक प्रशिक्षणासाठी अमेरिकेत गेला होता. काय हे शक्य होते, की आपण आपल्या क्रीडापटूंना हे भारतातच उपलब्ध करून दिले असते आणि हे प्रशिक्षण डिजिटल इंडिया च्या माध्यमातून सर्व प्रशिक्षकांपर्यंतही पोहोचवले असते, आणि माझा आपला बॅडमिंटन आयकॉन पुल्लेला गोपीचंद सोबत झालेला संवाद ह्याला पाठींबा देतो, जो म्हणाला होता, की भारतात बॅडमिंटनच्या गुणवत्तेची कमी नाही, पण प्रशिक्षणाच्या मानकांबद्दल तो चिंतीत आहे.

सातत्य, तयारी आणि सराव आपल्याला आपले लक्ष्य गाठण्यासाठी मदत करेल. मला माहिती आहे, सराव करण्यात काहीही गौरव नाही, पण सरावाशिवाय सुद्धा गौरव नाही.

जेव्हा कुणीही खेळ हेच आपले करिअर म्हणून निवडतो, तेव्हा आर्थिक सुरक्षितता हा त्याच्या समोर सर्वात मोठा प्रश्न असतो. मला खात्री आहे, आपला सहकारी आणि माजी इंडिया हॉकी कप्तान दिलीप तिर्की माझ्या ह्या विधानाला सहमती दर्शवेल की बहुतांश वेळेस क्रीडा-करिअर ३५-४० व्या लहान  वयात संपते. उपरोधिकपणे, हे तेच वय असते जेव्हा व्यावसायिकांचे करिअर साधारणतः वेग घेते किंवा स्थिर होते.

मला हेही माहिती आहे की सरकार त्याच्या विविध संस्थांद्वारे क्रीडापटूंना नोकरी देते आणि पाठबळ पुरवते,जे प्रशंसनीय आहे पण, आपल्याकडे कितीतरी राष्ट्रीय ,राज्य आणि जिल्हास्तरीय क्रीडापटू आहेत जे खेळातून निवृत्त झाले आहेत आणि त्यांच्याकडे योग्य नोकरीधंदा नाही, किंवा काहींच्या फाईल्स एका टेबलावरून दुसऱ्या टेबलवर फिरत आहेत. त्यांच्या आर्थिक स्थैर्याची सुरक्षा पाहतानाच, आपण त्यांचे मन गुंतवून ठेवण्याचीही काळजी घेतली पाहिजे. त्यांचे कौशल्य आणि खेळप्रती त्यांचे पॅशन, आपल्या भावी पिढ्यांना प्रशिक्षित करण्यासाठी सर्वोत्तमरीतीने उपयोगात आणले जाऊ शकते. नमुन्यादाखल झारखंडच्या राष्ट्रीय पदक विजेत्या हॉकीपटू नौरी मुंडू. हॉकीतून निवृत्त झाल्यावर पोट भरण्यासाठी त्या शिक्षकाची नोकरी करतात आणि शेतात कामही करतात. २०११ च्या अथेन्स  विशेष ऑलिंपिक्स मधील पदकविजेती सीता साहू,आज पोट भरण्यासाठी गोलगप्पे विकत आहेत. आपण एक संस्था बनवून त्यामार्फत ह्या क्रीडापटूंना आपले शालेय विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देऊन लहान वयात गुणवत्ता हेरण्यासाठी गुंतवून ठेवले पाहिजे. आपल्या समाजाला देण्यासाठी ह्या क्रीडापटुंकडे खूप काही आहे. आपल्या सर्व राष्ट्रीय खेळाडूंचा आरोग्य विमा काढणेही महत्वाचे आहे.

आपले माजी महान हॉकी क्रीडापटू महम्मद शाहिद यांना त्यांच्या अंतिम दिवसांमध्ये काढाव्या लागणाऱ्या खस्तांनी अशा दुर्दैवी घटनांची पुनरावृत्ती टाळण्याची गरज पुन्हा अधोरेखित केली आहे. समशेर खान यांचे आयुष्य आम्ही आमच्या राष्ट्रीय हिरोंना कसे विसरलोय याचे अजून एक उदाहरण आहे. ह्या चॅंपियन जलतरणपटूने भारताचे १९५६ च्या मेलबर्न उन्हाळी ऑलिम्पिक मध्ये प्रतिनिधित्व केले होते. ते ५व्या स्थानी आले होते आणि मागील ६ दशकातील हे भारताचे सर्वश्रेष्ठ अंतिम स्थान आहे. त्यांना कानाचे आणि हृदयाचे विकार होते, आणि पैशाच्या कमतरतेमुळे त्यांचं अंतिम क्षणापर्यंत हे आजार कायम राहिले. आमचे राष्ट्रीय हिरो सन्माननीय आयुष्य जगू शकले पाहिजेत. सेंट्रल गव्हर्नमेंट हेल्थ स्कीमचे लाभ त्यांच्यापर्यंत पोहोचवणे हे त्यादृष्टीने उचललेले पाऊल आहे. मी भारताचे आरोग्य आणि कुटुंबकल्याण मंत्री जे पी नड्डाजींना विनंती करतो की त्यांनी ह्या विषयातील माझ्या विनंतीचा विचार करावा, ज्या  ऑल इंडिया कौन्सिल ऑफ स्पोर्ट्स (एआयसीएस) ने केलेल्या शिफारशीशी मिळत्याजुळत्या आहेत.

सोने चांदी आणि कांस्य धातूच्या किमती वेळपरत्वे वाढल्या आहेत. पण ज्यांनी भारतासाठी सोने चांदी आणि कांस्य पदके जिंकली त्यांची किंमत आम्हाला समजली आहे काय? नवाब पतौडी, प्रकाश पदुकोण, कर्नल मल्लेश्वरी, अजित वाडेकर, पिटी उषा ह्या क्रीडा विजेत्यांनी मिळवलेले यश आज साजरे केले जात नाही. आपल्या ह्या चँपियन्स आणि हिरोंना त्या काळी उत्तम ते मिळाले नसेल पण जे मिळाले त्याचे त्यांनी सोने केले. आजच्या पिढीला ह्याची कल्पनाही येणार नाही की ह्या विजेत्यांनी त्यांच्या काळात काय यश मिळवले. सध्या क्रीडा जगतात काय चालले आहे, ह्याबरोबरच हे अतिशय महतवाचे आहे की आपल्या पिढीने आपला क्रीडा इतिहास शिकला पाहिजे.

आपल्या सर्वांच्या आयुष्यात हिरो होते ज्यांनी विविध प्रसंगी आपल्याला प्रेरणा दिली. नमुन्यादाखल विस्मरणात गेलेल्या काही हिरोंचे एक पुस्तक बनवले आहे. मला प्रामाणिकपणे वाटते, की ह्या विजेत्यांचे आयुष्य आपल्या अभ्यासक्रमाचा भाग असावे.

खेळाकडे जग बदलण्याची क्षमता आहे. खेळाकडे प्रेरणा देण्याची शक्ती आहे. खेळाकडे लोकांना एकत्र आणायची शक्ती आहे. खेळ तरुणांशी त्यांना समजेल अशा भाषेत संवाद साधतो. नेल्सन मंडेलांनी सांगितल्याप्रमाणे खेळ एकेकाळी निराशेचे वातावरण होते आशा निर्माण करू शकतो.

२००९ च्या ऑगस्ट मध्ये ह्या सभागृहाने मुलांच्या मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाच्या अधिकाराचे विधेयक संमत केले. ही माझी विनम्र शिफारस आहे, की त्या कायद्यात बदल करून खेळाचा अधिकार समाविष्ट करण्यात यावा. खेळ हा अभ्यासक्रमाचा महत्वाचा आणि अनिवार्य भाग बनवता येऊ शकेल, ज्यायोगे प्रत्येक मुलाला शालेय स्तरावर खेळण्याचा अधिकार मिळेल.

आई वडील जसे आपल्या मुलांना विचारत आलेत, की तू जेवलास का? तू अभ्यास केलास का? माझ्यासाठी तो दिवस सर्वात मोठा दिवस असेल जेव्हा ह्या दोन गोष्टींसोबत आई वडील आपल्या मुलांना हे सुद्धा विचारतील, की आज तू खेळलास की नाही?

तुम्हा सर्वांचे मला ऐकल्याबद्दल आभार. एकत्र आपण भारतात खेळाची संस्कृती घडवू शकतो आणि आपण आत्तापर्यंत जसे जगत आलोय आणि  खेळत आलोय ती पद्धती बदलू शकतो.

जय हिंद!

Previous Article

चार घोटाळा सुनावणी!लालू प्रसाद दोषी

Next Article

देवाच्या निमित्ते मराठी चित्रपटाची व्यथा!

You may also like