पहिली आणीबाणी आठवावी !

Author: Share:

पंतप्रधान नरेंद्र मोदी ह्यांनी २६ जूनला मुंबईत येऊन, इंदिरा गांधींनी पंतप्रधान असतांना स्वतःची खुर्ची टिकवण्यासाठी आणीबाणी लादून सगळ्या देशाला कारागृहाचे भीषण स्वरूप दिल्याच्या निषेधार्थ, मार्मिक भाषण केले ० २६ जून १९७५ ला मध्यरात्री इंदिरा गांधींनी आणीबाणी लादून सुष्टदुष्ट भेदाभेद न करता सगळ्यांच्या स्वातंत्र्याचा संकोच अनिवारपणे केला ० त्याची कहाणी मोदींनी सांगितली ० आणीबाणी हे काँग्रेसचे पाप आहे असे मोदी म्हणाले त्यावर काँग्रेसने प्रतिक्रिया व्यक्त करतांना ते जुन्या गोष्टी उगाळून पक्षीय राजकारण करीत असल्याच्या आरोप केला ० ह्या लेखात काँग्रेसची पापे आणि दुसऱ्या लेखात आणीबाणीचे राजकारण ह्या दोन मुद्द्यांचा उहापोह करायचा आहे ०

आणीबाणी आहेच पण फाळणी हे त्याहून अधिक गंभीर पाप काँग्रेसच्या खात्यावर जमा आहे ० फाळ णीमध्ये लोकांचा विश्वासघात आहे ० उघडउघड देशद्रोह आहे ० काँग्रेसने अखंड भारताचे आश्वासन देऊन १९४५-४६ च्या निवडणूक लढविल्या आहेत ० जिंकल्या आहेत आणि सहा महिन्यात आपल्या बाराशे वर्षाच्या शत्रूला पाकिस्तानची भेट दिली आहे ० पाकिस्तान हे स्वतंत्र आणि सार्वभौम राष्ट्र आहे ० हे राष्ट्र निर्माण करण्यासाठी परकीय मुसलमान आक्रमक बाराशे वर्षे हिंदूंशी अत्यंत क्रौर्याने आणि विधिनिषेध बाजूला ठेवून लढत होते ० ह्या प्रदीर्घ कालखंडात एकाही हिंदू राज्यकर्त्याने शांततेसाठी आणि दमछाक झाली म्हणून मुसलमानांना पाकिस्तान भेट म्हणून देण्याचा विचारही मनात आणला नाही ० ही स्वाभिमानाची आणि स्वातंत्र्यासाठी सर्वोच्च पराक्रम आणि सर्वोच्च त्याग करून दाखविण्याची परंपरा लोकमान्य टिळक जिवंत असेपर्यंत अभंग राहिली ० ही परंपरा कधी खंडित झाली ह्याचा शोध आपण घेणार नसू तर इंदिराजींच्या आणीबाणीचा निषेध हे वांझ कर्मकांड होईल ०

पाकिस्तान ज्यातून निर्माण झाले त्या मुसलमान अनुनयाची परंपरा गांधीयुगात सुरु झाली ० आंबेडकरांनी गांधीयुगाला तमोयुग म्हटले आहे ० सत्तावीस वर्षे म्हणजे १९२० पासून १९४७ पर्यंत स्वातंत्र्य आंदोलनाची सूत्रे निरपवादपणे आणि सर्वार्थाने गांधींच्या हातात एकवटली होती ० अहमदाबाद काँग्रेसमध्ये गांधींनी स्वतःला गर्वाने डिक्टेटर म्हणवून घेतले आहे ० ह्या २७ वर्षात बाराशे वर्षात जमले नव्हते ते गांधींनी करून दाखविले ० त्यांनी स्वातंत्र्य आंदोलनाचे क्रम बदलले ० स्वातंत्र्य मग आधी हिंदू-मुसलमान ऐक्य असा क्रम त्यांनी लावला ० टिळक असेपर्यंत स्वातंत्र्यप्राप्ती हे लक्ष्य पहिल्या क्रमांकावर होते ०असे साहित्य वाचत राहण्यासाठी लाईक करा आमचे फेस बुक पेज 

www.facebook.com/SmartMaharashtraOnlineपानिपतच्या युद्धात पराभूत झाले तरी मराठ्यांनी अब्दालीला असा खरपूस चोप दिला होता की त्यानंतर हिंदूंशी लढण्याचा प्रसंग आला की मुसलमान पळवाटा शोधत होते ० लढायचे ब्रिटिशांशीच होते पण मुसलमानांचा मूळ स्वभाव जागा झाला आणि त्यांनी विघ्ने उत्पन्न केली तर ती सहजपणे दूर करण्याचे प्रशिक्षण अंगवळणी पडलेले असावे म्हणून टिळकांनी गणेशोत्सव आणि शिवजयंत्युत्सव सुस्थिरपणे प्रवाहित करून ठेवले होते ० गांधींनी हिंदू-मुसलमान ऐक्यावाचून स्वराज्य नाही असा नवा सिद्धांत मांडलाच पण अहिंसा व्रत म्हणून पाळण्याची शपथ हिंदूंना घातली ० अहिंसा मुसलमानांना बंधनकारक नव्हती ० म्हणून त्यांनी हिंसा करवून म्हणजे कत्तल,लुटालूट , जाळपोळ आणि हिंदू स्त्रियांवर बलात्कार अशी चतु:सूत्री राबवीत ऐक्याची किंमत भोळ्या हिंदूंकडून वसूल करण्याचा सपाटा लावला आणि मागणी केल्यापासून सात वर्षात पाकिस्तान मिळविले ०

इंदिरा गांधींच्या आणीबाणीपेक्षा मोहनदास गांधींची आणीबाणी अतिशय भयंकर आहे ० लोकशाही हवी असा दावा करणारे अनेक गट आणि पक्ष एकजुटीने लढले आणि त्यांनी इंदिराजींना पराभूत करून आणीबाणी समाप्त केली ० मोहनदास गांधींची आणीबाणी स्वातंत्र्य मिळून सत्तर वर्षे झाली तरी अजून जशीच्या तशी चालू आहे ० मोहनदासांची आणीबाणी मूलगामी स्वरूपाची आणि दूरगामी परिणाम करणारी आहे ० इंदिराजींच्या आणीबाणीचा उद्देश सत्ता अप्रतिहत आपल्याकडे म्हणजे नेहरू घराण्याकडे राहावी इतकाच होता ० मोहनदासांच्या आणीबाणीचा उद्देश ह्या प्राचीन देशाच्या मूळ प्रकृतीवर प्राणघातक हल्ला करण्याचा आहे ० ह्या देशाचे भावविश्व हिंदूमय आहे आणि ते ऋषीमुनींनी आणि उदात्त राष्ट्रनिर्मात्यांनी निर्माण केले आहे ० रामायण आणि महाभारत ह्या देशाचा आत्मा आहे ० सीता आणि शिवाजी ह्या देशाचे परमोच्च आदर्श आहेत ० गांधींना हे अमान्य आहे ०

मुसलमान बाराशे वर्षे हिंदूंशी लढले एव्हढी एकच गोष्ट त्यांचे ह्या देशावरील स्वामित्व सिद्ध करण्यास पुरेशी आहे हा मोहनदासांचा सिद्धांत आहे ० ह्या देशाची संस्कृती हिंदू नसून ती संमिश्र आहे असे गांधींचे म्हणणे आहे ० भारताच्या संविधानाने संमिश्र संस्कृतीचा उल्लेख केला असल्याचे निदर्शनास आणून दिले जाईल ० परंतु मोहनदास जेव्हा संमिश्र संस्कृतीचा आग्रह धरतात तेव्हा त्याचा अर्थ हिंदू संस्कृती पुसून भारताला इस्लाममय करण्याचा मुसलमानांना हक्क आहे असे त्यांना सुचवायचे असते ० त्यांची उक्ती आणि कृती तशी झालेली आहे ० येथे पुन्हा आंबेडकरांचा उल्लेख अपरिहार्य आहे ० धर्मांतराचा निर्णय सांगतांना हिंदू संस्कृतीला हानिकारक होईल असे आपण काही करणार नाही हे त्यांनी स्पष्ट केले ० म्हणून त्यांनी इस्लाम आणि ख्रिस्ती धर्मात न जाता बौद्ध धर्माचा स्वीकार केला ०

स्वातंत्र्य आंदोलनाची सूत्रे हाती येताच गांधींनी संपूर्ण देशाचा नव्या वातावरणातला पहिला उद्घोषित कार्यक्रम म्हणून खिलाफत चळवळ सुरु केली ० खिलाफत म्हणजे मुसलमान धर्मगुरूंची राज्यसत्ता ० कुराणात जसे म्हटले आहे त्यानुसार राज्यकारभार आणि समाजव्यवहार करवून घेणे म्हणजे खिलाफत ० ब्रिटिशांनी पहिल्या महायुद्धात ही खिलाफत नष्ट केलीच पण पुढे तुर्कस्थानात केमालपाशाचे राज्य आल्यावर त्याने क्रांती करून खिलाफतीच्या स्थानी धर्मनिरपेक्ष प्रजासत्ताक राज्याची स्थापना केली आणि मुसलमानांमध्ये विज्ञाननिष्ठ जीवनपद्धती रुजविण्याची पराकाष्ठा केली ० गांधींना हे मान्य नव्हते ० त्यांना खिलाफत जशी होती तशी टिकवायची होती ० त्यासाठी हिंदूंना वेठीस धरून त्यांनी मुसलमानांसाठी आंदोलन केले ० त्याचा ब्रिटिशांवर काही परिणाम न झाल्याने ते फसले ० त्याचा राग केरळात मुसलमानांनी हिंदूंवर काढला ० जवळजवळ वर्षभर हिंदूंवर सर्व प्रकारचे घोर अत्याचार मुसलमानांनी केले ०

ब्रिटिशांनी सैन्यबळाने ते मोडून काढले म्हणून हिंदू शिल्लक राहिले ० गांधींनी काँग्रेसला ह्या अत्याचाराचा निषेध करू दिला नाही ० बातमीही येऊ दिली नाही ० खिलाफत चळवळीतील मुसलमानांच्या अमानुषतेचा अनुभव ही गांधींना आत्मचिंतनाची मोठी संधी होती ० पण त्यांनी मार्ग बदलला नाही ० पुढी सत्तावीस वर्षात मुसलमानांची धर्मांधता आणि राष्ट्रीय प्रवाहापासून फटकून राहण्याची मनोवृत्ती बदलावी म्हणून गांधींनी काही केले नाही ० ह्या राष्ट्रघातकी प्रवृत्तींविरुद्ध लढण्याचे बळ हिंदूंना मिळावे म्हणूनही त्यांनी काही केले नाही ० उलट संधी मिळेल तेव्हा त्यांनी हिंदूंचा मनोभंग केला ० त्यांना गलितधैर्य केले ० फाळणीविरुद्ध गांधींनी एकही लढा दिलेला नाही ० जे अखंडभारतवादी होते त्यांच्याशी गांधींनी सतत शत्रुत्व केले ० जे फुटीरतावादी होते त्यांना गांधींची सहानुभूती होती ०

गांधी जिनांना सलग सतरा वेळा मुंबईत त्यांच्या घरी जाऊन भेटले ० पण सावरकर आणि गोळवलकर ह्यांना भेटून फाळणीविरुद्ध आघाडी उघडावी असे त्यांना एकदाही वाटले नाही ० उलट सावरकर आणि मुंजे जशास तसे न्यायाने मुसलमानांशी लढणार असतील तर मी त्यांचे बरोबर जाणार नाही अशी घोषणा गांधींनी केली ० निझामाविरुद्ध सावरकरांनी निशस्त्र प्रतिकाराचा लढा सुरु केला त्यात सामील होण्यास गांधींनी काँग्रेसला बंदी केली ० ब्रिटिश ,मुस्लिम लीग आणि गांधी ह्या तिघांनी मिळून पहिले पोलिटिकल मॅच फिक्सिंग केले आणि पाकिस्तान जन्माला आले असे विधान केल्यास वस्तुस्थितीपासून ते फार दूरचे असेल असे वाटत नाही ०

काँग्रेसने मुसलमानांचा स्वयंनिर्णयाचा म्हणजे फुटून निघण्याचा हक्क लेखी स्वरूपात मान्य केला आहे ० काँग्रेसने ठराव करून पाकिस्तान निर्मितीला मान्यता दिली आहे ० शांततेसाठी हे करतो आहोत असे काँग्रेसने समर्थन केले आहे ० काँग्रेसने न लढता शरणागती पत्करून भारताचे तुकडे करण्यास मान्यता दिली ० सत्ता परिवर्तन शांततेने करण्याची अट काँग्रेसने मुस्लिम लीगला घालायला पाहिजे होती ० उलट काँग्रेसने नवनिर्मित पाकिस्तानात असलेल्या आणि भारतात येऊ इच्छिणाऱ्या हिंदूंना संरक्षण दिले नाही ० त्यांच्यावरील अत्याचार उघड्या डोळ्यांनी काँग्रेसने बघितले ० मुसलमानांच्या अत्याचारांना प्रतिकार न करता धैर्याने तोंड द्या आणि हसतमुखाने आपल्या प्राणांचे बलिदान करा असे कळकळीचे आवाहन गांधींनी पाकिस्तानातील हिंदूंना केले ० त्यातून नवे आदर्शवत हिन्दी राष्ट्र निर्माण होईल असे स्वप्न गांधींनी रंगविले ०
गांधींच्या हिंदी राष्ट्रात हिंदूंना कर्तव्ये आहेत आणि मुसलमानांना अधिकार आहेत ०

हिंदूंनी त्याग करायचा आहे आणि त्यातून ज्या सुखसोयी उत्पन्न होतील त्या मुसलमानांनी भोगायच्या आहेत ०काश्मीर हे त्याचे उत्तम उदाहरण आहे ० पोलिटिकल मॅच फिक्सिंगचा पुढचा भाग म्हणून पाकिस्तानने अडीच महिन्यांनी म्हणजे ऑक्टोबर १९४७ मध्ये काश्मीरवर आक्रमण केले ० ते पूर्णपणे परतवून लावून संपूर्ण काश्मीर संपूर्णपणे मुक्त करण्यास भारताची सेनादले सक्षम असतांना पंतप्रधान नेहरूंनी तसे होऊ दिले नाही आणि जवळजवळ निम्मा काश्मीर पाकिस्तानकडे राहू दिला ० पाकव्याप्त काश्मीर परत मिळविण्याचा एकही प्रयत्न स्वतंत्र भारताने केलेला नाही ० ह्यावरून गांधींच्या पहिल्या आणीबाणीने हिंदूंना किती षंढ बनविले आहे ह्याची कल्पना येते ० गांधी आणि नेहरू ह्यांना काश्मीरला मुसलमानांचा स्वर्ग करायचा होते ० म्हणून त्यांनी काश्मीरला स्वतंत्र निशाण, विधान आणि प्रधान ह्या सुविधा अर्पण केल्या ० हिंदूंना तेथे भूमी खरेदीण्यास प्रतिबंध करण्यात आला ० काश्मीर खोऱ्यात हिंदूंचा निर्वंश करण्यात आला आणि तेथून लाखो काश्मिरी पंडितांना विटंबना करून हाकलवून लावण्यात आले ०उर्वरित भारताच्या पैशावर काश्मीर मजा मारत आहे ० ह्या सुखात अधिक वाढ व्हावी असे जेव्हा जेव्हा तेथील मुसलमानांना वाटते तेव्हा ते भय निर्माण करण्यासाठी रस्त्यावर येऊन भारतीय सेनादलाच्या जवानांवर उघडपणे दगडफेक करतात ० ह्या दगडफेकीचा जे निषेध करतात ते अशांतता निर्माण करीत आहेत असा आरोप गांधीवादी करतात ०

इंदिरा गांधींच्या आणीबाणीचे भय सत्तेपुरते मर्यादित होते म्हणून त्यावर मात करता आली ० मोहनदास गांधींच्या आणीबाणीचे भय हिंदूंनी मुसलमानांपुढे म्हणजे खिलाफतीपुढे झुकावे म्हणून निर्माण करण्यात आले आहे ० ते हिंदूंच्या धमन्यात विषासारखे भिनले आहे ० ते विष उतरवून हिंदूंना पुन्हा पुरुषार्थी आणि विजिगीषू करायचे असेल तर आपल्या आजाराची कठोर चिकित्सा करण्यास हिंदूंना सिद्ध व्हावे लागेल ० मोहनदासांच्या आणीबाणीचे मूळ त्यांच्या राष्ट्रवादाच्या कल्पनेत आहे ० नेहरूंच्या ,’ डिस्कव्हरी ऑफ इंडिया ‘ह्या ग्रंथात पृष्ठ २७२ वर ह्या कल्पनेवर प्रकाश टाकण्यात आला आहे ०

हिंदुराष्ट्रवाद ह्या देशाच्या मातीतून निर्माण झाला आहे हे नेहरू मान्य करतात ० पण तेव्हढे त्यांना पुरेसे वाटत नाही ० त्याहून मोठा राष्ट्रवाद आकारास आणण्यास हिंदुराष्ट्रवाद अडथळा निर्माण करतो अशी टीका नेहरूंनी केली आहे ० नेहरू वास्तवापासून दूर जातात आणि गांधींच्या स्वप्नांत असलेला राष्ट्रवाद साकारण्यासाठी हिंदूंवर अन्याय करतात ०तसे करतांना ह्या देशाच्या भवितव्याशी आपण खेळत आहोत ह्याची चिंता ते करत नाहीत ० हिंदू राष्ट्रवाद ह्या मातीतला म्हणजे स्वदेशी असल्याने आणि आपल्या प्राचीन इतिहासात तो सातत्याने आणि सुसंगतपणे धर्मनिरपेक्ष आणि उदात्त राहिल्याने त्याच्याशी मुसलमानांनी आणि ख्रिस्त्यांनी समरस व्हावे अशी भूमिका नेहरूंनी घ्यायला हवी होती ० पण हिंदुभुमीवर सार्वभौम धर्मांध राष्ट्र उभे करण्याची महत्वाकांक्षा बाळगणाऱ्या फुटीरतावादी शक्तींशी हिंदूंनी जुळवून घ्यावे म्हणून नेहरू आटापिटा करतात ० त्यासाठी ते हिंदूंना भयभीत आणि अपमानित करण्याची संधी सोडत नाहीत ०

१९७५ ची आणीबाणी हा सत्तालोभापायी घडलेला एक प्रमाद आहे ० पण मोहनदास गांधींनी खिलाफत चळवळीपासून पाकिस्तान मान्य करायला लावण्यापर्यंत जे कारस्थान रचले ते पाप मोठे आहे ० हिंदूंना विकलांग आणि पौरुषहीन बनविण्याचे ते कारस्थान आहे ० तो देशद्रोह आहे ० त्यातून हिंदूंना सुखरूप बाहेर काढले नाही आणि ह्या देशाचे सुखसमृध्दीमय आणि सुरक्षित भवितव्य आपण एकटे घडवू शकतो असा विश्वास निर्माण केला नाही तर अखंड भारताचे अखंड पाकिस्तान बनण्यास फार वेळ लागणार नाही ० म्हणून प्रत्येक २६ जूनला फाळणी का झाली ह्यावर चर्चासत्रे झाडायला हवीत आणि पहिल्या पोलिटिकल मॅ च फिक्सिंगचा रहस्यभेद व्हायला हवा ० काँग्रेसेतर पक्षांचे इंदिरा गांधींच्या आणिबाणीशी निगडित जे राजकारण घडले त्याचा उहापोह दुसऱ्या लेखात घेऊ ० इत्यलम ०

लेखक: अरविंद विठ्ठल कुळकर्णी
संपर्क: 09619436244
असे साहित्य वाचत राहण्यासाठी लाईक करा आमचे फेस बुक पेज 

www.facebook.com/SmartMaharashtraOnline
Previous Article

निमगाव (वा) येथे कृषीदुतांचे आगमन

Next Article

चीन नावाचा ससा आणि जग नावाचं कासव.

You may also like