Smart Maharashtra

दिसामाजी काही उत्तम वाचावे…

dummy_728

श्रीशालिवाहन शके १९४१, शिवराज्याभिषेक शके ३४५, विकारीनाम संवत्सर

उत्सवाचा कुत्सव होऊ नये…

Author: Share:

पालघरमध्ये दहीहंडीच्या थरावरुन पडून २१ वर्षीय गोविंदाचा जागीच मृत्यू झाला. तर तब्बल ११७ गोविंदा जखमी झाले. भारतीय जनता मुळातच उत्सप्रिय. आपल्यालकडे अनेक सण तर आहेतच त्याच जन्म, लग्न आणि यांसारखे अनेक आनंदाचे प्रसंग आपण उत्सव म्हणूनच साजरे करतो. त्यामुळे उत्सव हा भारतीयांच्या नसानसात भिनला आहे. पण बर्‍याचदा हा उत्सव कुत्सव म्हणजे हिंसक, अधार्मिक ठरतो. जसे संभोग आणि बलात्कार यामध्ये जितके अंतर आहे. तितकेच अंतर उत्सव आणि कुत्सवमध्ये आहे. प्रत्येक गोष्टीत एक थ्रील असतं. पण ती गोष्ट सोपी व्हावी म्हणून त्या गोष्टीतलं थ्रील आपण काढून टाकतो आणि उत्साह एका वेगळ्याच शीगेला पोहचून आपण उत्सवाचा कुत्सव करत असतो. उत्सव हा आनंदासाठी असतो.

जर उत्सवात लोक जखमी होऊ लागले किंवा मृत्यूमुखी पडू लागले. तर त्या उत्सवाला उत्सव म्हणता येईल का? तुमचा उत्सव हा इतरांसाठी त्रासदायक ठरु नये हे उत्सवातील महत्व तत्व आहे. पण आपण ते तत्व अनेक वेळा धाब्यावर बसवतो.

 

दही हंडी खेळणारी मुलं ट्रक टॅम्पोमधून जात असताना मुलींची छेड काढतात, कुणातरी वृद्ध गृहस्थाला अश्लील बोलतात. बाईकवरुन जाताना लोकांकडे पाहून षंढासारखे ओरडतात. गणपतीची मिरवणूक नेत असताना अनेक सामाजिक नियम धाब्यावर बसवले जातात. माझ्याच बॅंजोचा आवाज वाजला पाहिजे हा अट्टाहास. मारामार्‍या, कुटाकुटी या सगळ्या गोष्टी मोठ्या प्रमाणात उत्सवांमध्ये घडत असतात. आता काही दिवसांनी गणेशोत्सव सुरु होणार आहे. या गोष्टी आता आपल्याला सर्रास आढळून येतील.

लोकमान्यांनी गणेशोत्सवाला राष्ट्रीय उत्सवाचे स्वरुप दिले. लोकांच्या मनात इंग्रजांविषयी असंतोष निर्माण करणे ही दूरदृष्टी ठेवून हिंदूंचे संघटन असे स्वरुप लोकमान्यांनी प्राप्त करुन दिले. त्यांनी स्वप्नातही कधी असा विचार केला नसेल की त्यांचे देशबांधव त्यांच्या विचारांचा या प्रकारे अवमान करतील.

 

कुणी जर उत्सवातील या नालायकपणावर बोट ठेवलं तर उत्सववीरांकडून उत्तर ठरलेले असते ते म्हणजे “हिंदूंनाच का अक्कल शिकवता? इतरांनाही शिकवा”. म्हणजे इतर जर शेण खात असतील तर आपण त्या पुढची पायरी गाठायची. हे इतक्या परखड शब्दात लिहिण्याचे कारण म्हणजे महाराष्ट्रतील उत्सव ही खरोखरच हिंदू धर्माची विटंबना ठरत आहे.

काही ठिकाणी गणपती मंडपा बाहेर आपण बियरच्या बाटल्या पाहिल्या असतीलच. गणपतीच्या मिरवणूकीत शीला की जवानी, बिडी जलइले, ही पोली साजूक तुपातली असली गाणी आपण ऐकली असतीलच. या गाण्यांवर बाप्पाच्या(?) भक्तीत तल्लीन झालेले भक्त हिडीसपणे नाचताना आपण पाहिले असतीलच. ढोल ताशा सारखे सुंदर वाद्ये सोडून डीजे नावाच्या कर्णपिशाच्च्याचा ह्रदयाचे ठोके वाढवणारा आवाज आपण ऐकला असेलच. पण आपण याबद्दल काही बोलायचे नसते. कारण लोकांना त्रास झाला तरी चालेल. पण उत्सवीरांना राक्षसी आनंद प्राप्त झाला पाहिजे, हा सध्याचा नियम आहे.

 

या उत्सवांमध्ये राजकारणी सुद्धा सामील असतात. मुळात हे असले उत्सव तेच लोक पोसत असतात. कारण या उत्सवांमध्ये त्यांना त्यांची आर्थिक आणि राजकीय शक्ती दाखवण्याची संधी मिळते. अगदी नगरसेवकांपासून ते पक्षातील छोटे मोठे कार्यकर्ते (होतकरु नेते?) यांचा अगदी हैदोस माजलेला असतो. आपण वेंटीलेटर हा सुंदर चित्रपट जर पाहिला असेल तर त्या चित्रपटाची पार्श्वभूमी गणेशोत्सव अशी आहे. त्या चित्रपटात वेंटीलेटरवर असणार्‍या गजाकाकांचा मुलगा प्रसन्न याला वडीलांपेक्षा त्याच्या सायबांनी दिलेली गणेशोत्सवाची जबाबदारी पार पाडणे अतिशय महत्वाची वाटते. आपला गणपती सगळ्या मंडळांपेक्षा उठून दिसला पाहिजे. आपला गणेशोत्सव दणक्यात वाजला पाहिजे, असं त्याला वाटत असतं. गणेशोत्सवावर जणू त्याचं राजकीय करिअर(?) अवलंबून असतं.

 

हे हल्लीच्या उत्सवांचं स्वरुप मापुसकरांनी अगदी उत्कृष्टपणे दाखवले आहे. जितेंद्र जोशींनी सुद्धा या असल्या थिल्लर गोष्टीत भरकटलेला तरुण उत्तम सादर केला आहे. ही आपली सध्याची परिस्थिती आहे. आपण सर्वांचा एकाकेकी महापुरुष करुन टाकलंय. महापुरुष तरी परवडले पण आपण सर्वांना देव करुन टाकलंय. त्यामुळे आपल्या भावना असल्या थिल्लर गोष्टीत रमतात. एखाद्या नेत्याने छत्रपती शिवाजी महाराज की म्हटलं तर लगेच आपल्याला तो नेता आपला तारणहार वाटू लागतो. मग त्याचा सगळा हलकटपणा आपण मस्तकी धरतो. आपल्या भावना मुळात बोथट झाल्या आहेत.

 

आपण स्वतःला उत्सवांमध्ये रमवून घेतो. पण उत्सव साजरा करताना सुद्धा आपण इतके बोथट होऊन जातो की ज्या धर्माच्या नावावर किंवा ज्या धर्मासाठी आपण उत्सव करीत असतो. त्याच धर्माचे धिंडवडे आपण आपल्या कृतीने काढत असतो. यात राजा (नेते) आणि प्रजा (जनता) दोन्ही घटक सामील होतात. हीच एक वेळ असते जिथे राजा आणि प्रजा दोघे एकत्र मिळून हातात हात घालून सामाजित आणि वैचारिक भ्रष्टाचार करीत असतात.

 

पण ही परिस्थिती नक्कीच बदलेल असं आपण म्हणायला हरकत नाही. कारण हळू हळू सज्जनांचा धाक वाढत राहिल. आता लोक उघडपणे या असल्या गोष्टींबद्दल बोलू लागले आहेत. पुढे सर्व समाजातून यावर प्रतिक्रीया व्यक्त होईल. मुळात ती झालीच पाहिजे. म्हणूनच दुर्जनांवर सज्जनांचा धाक निर्माण होईल. आधीच म्हटल्याप्रमाणे उत्सव झालेच पाहिजे. पण उत्स्वव हा आनंद साजरा करण्यासाठी असतो. दुःख ओढून घेण्यासाठी नव्हे. तर मग चला सार्वजनिक गणेशासमोर वैयक्तीक मागणे न मागता समाजाच्या कल्याणाचे मागणे मागूया.

बा देवा गणराया..
उत्सवांमधील कुप्रथा मोडून काढ.
सर्वांना चांगली बुद्धी दे.
धर्माचा नाश करण्यासाठी नव्हे तर धर्माचे रक्षण करण्यासाठी उत्सवाची निर्मिती आहे,
हे लोकांना कळू दे.
देवा, सर्वांचं कल्याण कर, रक्षण कर…
तुझी कृपादृष्टी आमच्यावर नेहमीच असू दे.
उत्सवांचे कुत्सव होऊ नये असे आशीर्वाद दे गणराया…
बा देवा गणराया..

Previous Article

रिझर्व्ह बॅंक आणते आहे पन्नास रुपयाची नवीन नोट

Next Article

खडवलीच्या अनाथाश्रमात झुंज प्रतिष्ठानची संवाद मुशाफिरी

You may also like