भय; मनाची अवस्था…

Author: Share:

आज मी अडतीस वर्षाचा झालो पण माझ्या जवळ जमा अडतीसशे रुपयेही नाहीत आणि माझा बाप म्हणतो,” तू लग्न कर ! लोक मला विचारतात तुमचा मोठा मुलगा लग्न का करत नाही ?” हा प्रश्न मला समोरून अजून फक्त दोघांनीच विचारला आहे. पण ते दोघेही माझे मित्र आणि हितचिंतक होते. एकदा एका भटजीने माझ्या बापाला विचारले , “तुमच्या मुलाचे काही प्रेमप्रकरण वैगरे आहे का ?” त्यावर माझा अज्ञानी बाप म्हणाला,” नाही ! ” पण माझी जन्मपत्रिका पाहिलेल्या भटजींच्या मनात ही शंका आली नसती तर माझ्या मनात त्याच्या ज्योतिष शास्त्राच्या ज्ञानाबद्दल शंका निर्माण झाली असती. नशीब हा प्रश्न त्या भटजीने मला विचारला नाही. नाहीतर मी म्हणालो असतो ,” मी ज्या मुलीच्या प्रेमात पडतो तिचे ताबडतोब लग्न होते.”

भटजी होते शेवटी ते त्यांचा ज्योतिष शास्त्राचा अभ्यास तो काय फक्त पंचांगात शुभ मुहूर्त पाहणे , पत्रिकेतील मूला मुलींचे गुण जुळवून पाहणे अथवा मंगल आहे का आणि गुरुची दशा पाहण्याइतपत मर्यादित! मी त्या भटजींना काही बोललो नाही कारण जर मी बोललो असतो तर तेथे उपस्थित असणाऱ्या सगळ्यांनाच माझ्या ज्योतिष्य या विषयातील गूढ ज्ञानाची माहिती जाली असती . माझा जन्म स्वाती नक्षत्रातील त्यामुळे मी इतरांचे आयुष्य घडवू शकतो पण स्वतःचे नाही.

मी अनेकदा स्वतःचे आयुष्य घडविण्याचा प्रयत्न केला पण तेव्हा – तेव्हा ते अधिक बिघडत गेले. जोपर्यत मी स्वयंचलित जीवन जगत होतो तोपर्यत मी गरिबीतही आनंदी सुखी समाधानी होतो पण जेव्हा मी स्वतः माझ्या आयुष्याला दिशा देण्याचा प्रयत्न केला तेव्हा मात्र माझ्या वाट्याला अपयश दुःख आणि मनस्तापच आला.

गरिबी दूर झाली पण आंनद झोप समाधान मात्र नाहिशे झाले. आजही मी जेव्हा कोणतेही काम इतरांसाठी फुकट करतो तेव्हा समोरच्याला त्याचा फायदा होतो पण तेच काम मी स्वतःसाठी केले की मला नुकसान होते. माझ्या नावावर दुसऱ्याने केलेली गुंतवणूक कधीच तोट्यात जात नाही पण मी माझ्या नावावर केलेली गुंतवणूक वाया जातेच ! माझ्या आयुष्यात आतापर्यत एक डझन मुली आल्या आम्ही एकमेकांना आवडायचो आजही आमच्यात चांगली मैत्री आहे मी त्यांच्या प्रेमात पडलो होतो पण का कोणास जाणे त्या माझ्या प्रेमात पडल्या नसाव्यात कारण त्यापैकी एकही कधी माझे तुझ्यावर प्रेम आहे असे म्हणाली नाही आणि मी मनाशी जेव्हा – जेव्हा त्यांच्या समोर माझे त्यांच्यावरील प्रेम व्यक्त करण्याचे ठरविले तेव्हा – तेव्हा माझ्या हातात त्यांच्या लग्नाची पत्रिका पडली. मी ही माझ्या आयुष्यातून त्यांचे प्रेमिका म्हणून वजा होणे सहज स्वीकारले कारण माझ्या आयुष्यात येणाऱ्या स्त्रिया कधीच थांबणार नाहीत याची मला खात्री वाटत होती.


असे दर्जेदार साहित्य वाचण्यासाठी आमचे पेज LIKE आणि Follow करा: https://www.facebook.com/SmartMaharashtraOnline/


पण एक काळ आला जेव्हा माझी शनीची साडेसाती सुरु झाली मी हातातील नोकरी सोडून व्यवसाय करायला गेलो आणि भिकेला लागलो. त्यामुळे साडेसातीच्या साडेसात वर्षात एकही मुलगी म्हणजे स्त्री माझ्या आयुष्यात आली नाही.

साडेसातीच्या शेवटच्या तीन वर्षात शनीच्या साडेसातीत शनीची महादशा आणि अंतर्दशाही आली तेव्हा मात्र मी जवळ – जवळ संन्याशी होण्याच्या निर्णयापर्यत पोहचलो होतो मी माझ्या दिसण्याकडे खाण्यापिण्याकडे दुर्लक्ष करू लागलो होतो त्यामुळे माझ्यावर टीकाही सुरु झाली होती खाजगीत आणि अगदी घरातही ! एकेकाळी मी लोकांना हजारो रुपये असेच दिले होते पण एक वेळ आली जेव्हा माझ्या खिशात एक रुपयाही नव्हता माझा हक्काचा ! मागितले असते तर लाखही मिळाले असते पण मला ते नको होते. आमच्या घरात गरिबी असतानाही जितके वाईट दिवस मी काढले नव्हते त्याहून वाईट दिवस श्रीमंतीत काढले. या तीन वर्षात समाजातील माझी ओळख बेकार माणूस म्हणून अधोरेखित झाली ज्यामुळे मला लग्नासाठी फालतू मुली सांगून येऊ लागल्या. ज्यांच्या मनात माझ्याबद्दल प्रेम होते त्यांच्या मनात माझ्या पुरुषत्वाबद्दल आणि माझ्या भविष्याबद्दल शंका निर्माण झाली होती .

माझ्या बापाला वाटते मी इतका हुशार ज्ञानी तरी मी यशस्वी का झालो नाही भौतिक जगात ? मी माझ्या आयुष्यात यशस्वी म्हणजे (आर्थिक दृष्ट्या ) होण्याचा प्रयत्न कित्येकदा करून पाहिला होता पण प्रत्येक वेळी मी खड्ड्यात गेलो होतो. अगदी करोडपती लोकांनाही माझी मदत लागते पण मी त्याची मदत घेऊ शकत नाही हे माझे दुर्दैव आहे ! श्रीमंत होण्याचा माझ्यासाठी एक सोप्पा मार्ग होता तो म्हणजे शिक्षण ! पण माझ्या नशिबाने तो मार्गही अवघड करून ठेवला होता अथक प्रयत्न करूनही मला माझे शिक्षण पूर्ण करता आले नाही ते येणारच नव्हते ! मला अध्यात्मिक आणि अलौकिक ज्ञान प्राप्त करायचे होते. माझ्या नकळत माझा प्रवास त्यादिशेने सुरु झालाही होता अशात माझी शनीची साडेसाती संपली आणि मी एका तरुणीच्या प्रेमात पडलो. ही सूचना होती माझे नशीब बदलायला सुरुवात झाल्याची ! ती माझ्या प्रेमात नाही पडणार कदाचित ! तिचेही लग्न होईल दुसऱ्यासोबत !

पण आता मला भीती वाटू लागली आहे की माझ्या आयुष्यातून क्रमाक्रमाने निघून गेलेल्या त्या माझ्या आयुष्यात एका तपानंतर पुन्हा तर परतणार नाहीत ना ? मी तिच्या प्रेमात पडावे असे तिच्यात काहीच नव्हते तरी मी तिच्या प्रेमात पडलो कारण माझ्या भविष्यातील पत्नीत असणारे सर्व दुर्गुण तिच्यात होते. लोकांना माझे जे भविष्याचे चित्र दिसत होते ते अभासी होते. माझ्या भविष्याचे चित्र नियतीने अगोदरच रेखाटून ठेवले होते ज्या चित्रात माझ्यासोबत असणारे सारेच नशीबवान होते. ते चित्र हेच माझ्या भयाचे कारण होते कारण त्या चित्रात मी स्वतःला एका राजकीय नेत्याच्या भूमिकेत पाहात होतो, माझी पत्नी अतिशय घमेंडी श्रीमंत आणि सुंदर असल्याचे दिसत होते, मला भेटण्यासाठी लोक ताटकळत असल्याचे दिसत होते माझा फाटका बाप सुटाबुटात वावरताना दिसत होता आणि माझी आई विमानप्रवासाची तयारी करीत होती.

एक गरीब मुलगा ते राजकीय नेता इतपर्यतचा माझा प्रवास भविष्यात ठरलेला आहे हे मला ज्ञात आहे . म्हणूनच मी तो बदलण्याचा प्रयत्न करून पाहिला पण सारे व्यर्थ ! उलट मला आणि इतरांना त्याचा त्रास झाला. आता मी ठरविले भविष्यात ढवळाढवळ करायची नाही. जरी माझे भविष्य माझ्या अपेक्षांच्या विरोधात आहे. मला नेहमीच साधं,सरळ, सोप्प, शांत आणि समाधानी आयुष्य जगायचं होत एखाद्या साधूसारखं . माझ्यावर फक्त मनापासून प्रेम करणारी ती एक प्रेयसी मला हवी होती जिला कसलाच मोह आणि माया नसेल.

जे होणे शक्यच नव्हते म्हणून मी लग्नच न करण्याच्या निर्णयापर्यत येऊन पोहचलो होतो. पण आता भीती वाटतेय तेच होणार जे माझ्या भविष्यातील चित्रात रेखाटले आहे. लोक मला डोक्यावर घेतील, मला पुढारी करतील आणि माझ्या प्रसिध्द्धीत माझ्या पत्नीसह सारे न्हाऊन निघतील. म्हणून मी सार्वजनिक गोष्टीपासून दूर पळत राहिलो पण आता ते ही अशक्य झाले आहे. स्वतःला प्रसिद्धीपासून जाणूनबुजून दूर ठेवले पण आता प्रसिद्धी माझा पाठलाग करू लागलेय ! लोक ज्या भविष्याची आतुरतेने वाट पाहात असतात मला त्याच भविष्याची भीती वाटतेय कारण भविष्यात मी इतका बदललोय यावर माझाही विश्वास बसणार नाही तेव्हा . बरे झाले असते मला भविष्याचे ज्ञान नसते तर माझे भय टळले असते…

लेखक: निलेश बामणे
संपर्क: ८६९२९२३३१०


असे दर्जेदार साहित्य वाचण्यासाठी आमचे पेज LIKE आणि Follow करा: https://www.facebook.com/SmartMaharashtraOnline/


Previous Article

सेन्सेक्स १६० अंश वाढून ३३७८८ वर: ३३५०० ची पातळी स्ट्रॉंग सपोर्ट असल्याचे संकेत

Next Article

महाराष्ट्रातील गावाची ढोबळ स्वरूपात सर्वसाधारण रचना

You may also like