ईव्हीएम: लोकशाहीचा तकलादू पाया?

Author: Share:


असे साहित्य वाचत राहण्यासाठी लाईक करा आमचे फेस बुक पेज 

www.facebook.com/SmartMaharashtraOnline


 

लोकशाही म्हणजे, प्रौढ मताधिकाराच्या आधारे, खुल्या व निःपक्षपाती निवडणुकांद्वारा लोकांनी निवडून दिलेल्या प्रतिनिधींद्वारे चालणारे राज्य.. या शासनपद्धतीचा ‘निवडणूक, हाच खरा आधारस्तंभ असतो. कारण, यामुळेच विधानसभा आणि लोकसभेच्या सद्श्याबरोबरच स्थानिक स्वराज्य संस्थांचे आपले प्रतिनिधी निवडून द्यायची संधी जनतेला मतदानाद्वारे मिळते. त्यामुळे ही प्रक्रिया निर्भय, निष्पक्ष आणि पारदर्शी वातावरणात पार पडावी असे अपेक्षित आहे. यासाठी निवडणूक आयोग तसेच प्रशासनाकडून विविध उपाययोजना केल्या जातात. परंतु, मतदान प्रक्रियेत इलेक्ट्रॉनिक उपकरण आल्यापासून मतदानप्रक्रियेच्या विश्वासाहर्तेबद्दल काही जण शंका उपस्थित करत आहेत. निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर प्रत्येकवेळी इलेक्‍ट्रॉनिक यंत्रांवरून वादंग निर्माण होतात.

मतदार यंत्रातच मोठा घोळ झाल्याचा आरोप पराभूत उमेदवार आणि त्यांच्या पक्षांकडून केला जातो आणि त्यावर जोरदार चर्चा चालते. उत्तरप्रदेश, गुजरात, कर्नाटक याठिकाणच्या विधानसभा निवडणुकीनंतर ईव्हीएमच्या विश्वासर्हतेवर अनेकांनी प्रश्नचिन्ह निर्माण केले होते. सोशल मीडियावर तर अशा प्रकारच्या संदेशाचा पाऊसच पडत आहे. काल पार पडलेली पालघर व भंडारा-गोंदिया लोकसभा पोटनिवडणूकही ईव्हीएम व व्हीव्हीपॅट यंत्रणेतील बिघाडामुळे वादग्रस्त ठरली. पालघर जिल्ह्यात २७६ ठिकाणी तर भंडारा-गोंदियात सुमारे दोनशेहून अधिक ठिकाणी मतदान यंत्र बिघडण्याच्या तक्रारी अाल्या, त्यामुळे बराच वेळ मतदान प्रक्रिया ठप्प झाली होती. या निवडणुकीत वापरण्यात आलेल्या ईव्हीएम सदोष असल्याचा आरोप करत पुन्हा मतदान घेण्याच्या मागणीसह ईव्हीएम मॅनेज असल्याचे आरोपही सुरु झाले आहेत. अर्थात, इतर आरोपांप्रमाणे याही आरोपात राजकारण असण्याची श्यक्यता नाकारता येत नाही.

मात्र यामुळे जनता संभ्रमित होऊ लागली आहे. एकादा राजकीय पक्ष जिंकला तर तो ईव्हीएममुळे जिंकला अशा चर्चा चौकाचौकात ऐकायला मिळतात. त्यातच तांत्रिक बिघाडामुळे मतदानाची टक्केवारी कमी होण्याचे प्रकारही समोर येऊ लागले आहे. जगातील सर्वात मोठ्या लोकशाही देशात निवडणूक प्रक्रयेबाबतच मतदारांच्या मनात संभ्रम असेल तर, ही बाब निश्चितच सुदृड लोकशाही चिंताजनक आहे. त्यामुळे लोकांच्या मनात संभ्रम राहू नये यासाठी या आक्षेपांचे तंत्रशुद्ध निराकरण करून मनातील संशय दूर करण्याची गरज निर्माण झाली आहे.

पूर्वी निवडणुका ‘व्होटिंग बाय बॅलट’ म्हणजेच मतपत्रिकेद्वारे घेण्याची पद्धत रूढ होती. परंतु विविध प्रकारच्या निवडणुका घेताना अफाट लोकसंख्या, खूप उमेदवार, दुर्गम प्रदेश, अशिक्षित जनता वगैरे खूप समस्यांचा सामना निवडणूक आयोगाला करावा लागायचा. या किचकट प्रक्रियेमध्ये मनुष्यबळ व इतर साधनांवर खर्चही खूप होत होता. मतपत्रिका छापण्यासाठी लागणारा वेळ, त्यांची वाहतूक, त्या सुरक्षित ठेवण्याकरिता यंत्रणा व त्यांची मोजणी यावर उपाय म्हणून इलेक्ट्रॉनिक मतदार यंत्रे वापरण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने घेतला. मतदान प्रक्रिया सुलभ करण्याच्या गरजेपोटीच इलेक्ट्रॉनिक मतदानयंत्राचा जन्म झाला. १९९९ साली सर्वप्रथम अशाप्रकारचे इलेक्ट्रॉनिक यंत्र काही मतदारसंघात वापरात आणण्यात आले व २००४ च्या निवडणुकीनंतर त्यांचा वापर देशभरच्या निवडणुकांत करण्यात येऊ लागला. सुरवातीचा थोडा फार विरोध सोडला तर इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांचा वापर हा भारतीय निवडणुकांच्या इतिहासात अत्यंत क्रांतिकारक बदल ठरला. मात्र दरम्यानच्या काळात या इलेक्ट्रॉनिक मतदानयंत्रात छेडछाड होत असल्याचे आरोप होऊ लागले आहेत.

मतदानयंत्रांत विशिष्ट तंत्रज्ञानाचा वापर करून आपणाला हवे तसे मतदान करवून घेता येते असा दावा काही जणांनी केला आहे. टीव्ही वर याबाबत काही प्रात्यक्षिकही दाखविण्यात आले आहेत. त्यामुळे मतदान यंत्रात घपला करता येतो का? ‘अ’ उमेदवाराच्या समोरचे दाबलेले बटण ते मत ‘ब’ ला परस्पर फिरवू शकते का? असे प्रश्न जनतेच्या मनात उठत आहेत. प्रत्येक निवडणुकीत मतदान यंत्रात हेराफेरी झाल्याचा आक्षेप सार्वत्रिक असतो. मध्यंतरी झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत जिल्ह्यातील सुलतानपूर मतदान केंद्रावरील ईव्हीएम मशीनमध्ये नारळ या निशाणीसमोर बटन दाबले तरी ते मतदान कमळ निशाणीला होत असल्याचा प्रकार उघडकीस आला होता. त्यामुळे या बूथवर फेरनिवडणूकही घेण्यात आली आहे. अशा सकृतदर्शनी रास्त वाटणाऱ्या या उदाहरणावरून हे सारे आक्षेप आणि पुढे आलेले तपशील अगदीच अनाठायी आहेत असे म्हणता येणार नाही.

अर्थात प्रत्यक्षात खरेच तसे झाले आहे किंवा नाही याची खातरजमा अधिकृत यंत्रणेकडूनच होऊ शकेल. त्यासाठी निवडणूक यंत्रणेने किंवा न्यायालयाने हस्तक्षेप करून चौकशीचा आदेश दिल्याशिवाय त्यातील तथ्य कधीच बाहेर येऊ शकणार नाही. म्हणून निवडणूक आयोगाने याप्रकरणी गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे वाटते. नाहीतर मशीन हे शेवटी मशीन आहे. त्यात कोणी ना कोणी छेडछाड करणारच. प्रोग्रॅमिंगमध्ये किंचित जरी बदल केला तरी मशीन चुकीचे रिडिंग दाखवू शकते. अशा अफवा लोकांच्या मनात घर करतील आणि नागरिकांचा निवडणूक प्रक्रियेवरील विश्वास कमी होईल.

मागील काळात विधानसभा निवडणुका झाल्यानंतर मतदानयंत्रात घोळ करण्यात आल्याचे आरोप करण्यात आले होते. यासंदर्भात काही तक्रारीही न्यायालयाकडे करण्यात आल्या होत्या मात्र निवडणूक आयोगाने याची कसलीही दाखल घेतल्याचे दिसले नाही. यावेळी पोटनिवडणुकींच्या निमित्ताने हा विषय पुन्हा ऐरणीवर आला आहे. त्यामुळे जनतेचा निवडणूक प्रक्रियेवर विश्वास अबाधीत राहावा यासाठी निवडणूक आयोग असेल किंव्हा संबधीत यंत्रणा त्यांनी त्यांच्याकडे येणाऱ्या तक्रारी सरसकट धुडकावून न लावता या तक्रारींचे तंत्रशुद्ध निराकरण करणे गरजेचे आहे. जेणेकरून लोकांच्या मनातील संशय दूर होईल. लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी जनतेचा निवडणूक प्रक्रियेवर विश्वास असणे अत्यंत जरुरीचे असून मतदार यंत्रांविषयीची विश्‍वासार्हता कायम ठेवणे ही निवडणूक यंत्रणेचीच जबाबदारी आहे.

लेखक: हरीदास उंबरकरअसे साहित्य वाचत राहण्यासाठी लाईक करा आमचे फेस बुक पेज 

www.facebook.com/SmartMaharashtraOnline


 

Previous Article

सावरकर जयंती आणि मोदी – अरविंद विठ्ठल कुळकर्णी

Next Article

आपल्याकडे सांस्कृतिक अभिज्ञता नाही : डॉ. अरुणा ढेरे

You may also like