Smart Maharashtra

दिसामाजी काही उत्तम वाचावे…

dummy_728

श्रीशालिवाहन शके १९४१, शिवराज्याभिषेक शके ३४५, विकारीनाम संवत्सर

एका सज्ञान सुजाण मराठी समाजाच्या दिशेने..

Author: Share:
आज जे तरुण वीस ते चाळीस ह्या वयोगटात आहेत, त्यांनी पुढील वीस-तीस वर्षांसाठी स्वतःच्या पुढील एक ध्येय मिशनऱ्यांसारखे घेऊन चालले पाहिजे, ते म्हणजे आपल्याला एक सुजाण, सज्ञान, संवेदनशील आणि प्रगतोत्सुक मराठी समाज घडवायचा आहे.
समाज हा एक प्रवाह आहे. असंख्य जलबिंदूंचा प्रवाह. यातील अनेक जलबिंदू मिळून, त्या नदीला जोडणाऱ्या उपनद्या मिळून ठरवत असतात, त्या नदीच्या पत्राचा विस्तार, व्याप्ती आणि दिशा कशी असावी. एखादी नदी आपल्या आजूबाजूच्या प्रदेशाला सुजलाम सुफलाम करीत तेंव्हाच जाऊ शकते जेंव्हा ती एका विशिष्ट दिशेने एका नियंत्रित मार्गाने पुढे सरकते. आज चार बाजूंना तोंड असलेल्या आपल्या समाजातील घटकांना एकाच दिशेला वळवून त्यांच्या प्रवाहास एक निश्चित दिशा आणि नियंत्रित वेग देणे आवश्यक आहे.
मराठी ह्या एका भाषिक संज्ञेत प्रचंड ताकद आहे. मराठी ही केवळ भाषा नाही ती एक संस्कृती आहे. सर्व मराठी भाषिकांच्या सामाजिक सांस्कृतिक धार्मिक अभिमानाचा स्त्रोत आहे. मराठी हा अभिमानास्पद इतिहास आहे. म्हणूनच वेगवान वर्तमान आणि उज्ज्वल भविष्याचा विचार आपण एक समाज म्हणून करू शकतो. धर्म आणि जातींच्या घटकांनी बाध्य होण्यास सद्यस्थितीत अनेक मर्यादा आहेत काही दुष्परिणाम सुद्धा समोर येत आहेत. अशा वेळी स्वतःचे अस्तित्व शोधण्यासाठी मराठी जनानी मराठी हा एकमेव निकष घेतल्यास समाज म्हणून आपल्या विकासासाठी तो महत्वाचा ठरेल.
म्हणूनच आपण हिंदू आहोत..बौद्ध आहोत..ब्राह्मण आहोत मराठा आहोत या पलीकडे आपण मराठी आहोत ही संकल्पना आपल्याला अधिक घट्ट प्रवाहात एकाच दिशेने वाहण्यासाठी प्रतिबद्ध करू शकते.
मराठी म्हणौन एकसंध राहण्यासाठी जसे अनेक घटक मदत करतात तशीच अनेक कारणे त्याला प्रेरणा देतात. मराठी माणसांना एकत्र बांधणारी अनेक सूत्रे तयार झाली जी सार्वत्रिक निर्विवाद प्रेरणादायी आहेत. संस्कृतमध्ये अडकून राहिलेले ज्ञान आणि धर्म  बोली भाषेत सोप्प्या शब्दांत लोकांसमोर मांडण्याचे जे कार्य देशभरात भक्ती संप्रदायाने केले त्याचे अग्रणी म्हणजे ज्ञानेश्वर माउली. माउलींनी मराठी भाषेचा अभिमान आणि विश्वास अमृतातेही पैजा जिंके या शब्दांत मांडला आहे. तुकाराम महाराजांनी तत्कालीन समाजातील दांभिकतेवर आसुड ओढत लोकांना विठ्ठलाच्या निर्मळ भक्तीचा आनंद घेण्यासाठी प्रेरित केले. छत्रपती शिवाजी महाराज अवघ्या महाराष्ट्राचे आदरस्थान. येथे अवघ्या महाराष्ट्राची मान लवते. अत्युच्च राष्ट्रधर्माची ज्योत पेटवताना महाराष्ट्रात वैचारिक आणि सामाजिक घुसळण करणारे स्वा सावरकर. राष्ट्रधर्मात आणि आधुनिक विचारात मराठी कधीच मागे नसतो हे त्यांनी अधोरेखित केले. आपल्या विद्वत्तेचे जगाला दर्शन घडवणारे आणि विद्वत्तेचा उपयोग राष्ट्रासाठी आणि आपल्या समाजाच्या उन्नती साठी करणारे डॉ बाबासाहेब आंबेडकर अवघ्या मराठी जनांना पूजनीय आहेत. मराठी बुद्धिमत्तेचे ते प्रतीक आहेत. कुठच्याही विचार आचाराच्या बंधनातून बाहेर येऊन मराठी म्हणून एकत्र बांधू शकतील अशी ही सूत्रे आहेत. या व्यतिरिक्त मराठी रत्ने अनेक आहेत ज्यांनी आपल्या कार्याने एक विचार आणि अभिमान मराठी माणसाला दिला. ह्यात नवनिर्माण करण्याची उमेद जागवणारे शाहू फुले असतील..प्रबोधनकार ठाकरे आणि महर्षि विठ्ठल शिंदे असतील या सर्वांना महाराष्ट्राने आदरस्थानी मानले आहे. त्यामुळे महाराष्ट्राला कुठच्याही जातीधर्माच्या बंधनाबाहेर एकसंध बांधू शकतील अशी ही सूत्रे आहेत. याचबरोबर ज्या वारशाचा अभिमान बाळगावा आणि आपले मन उचंबळून यावे अशा अनेक जागा आहेत. ह्यात साहित्यिक आहेत अभिजात साहित्य आहे कला आहे कलाकार आहे विचार आहेत विचारवंत आहेत…मराठी म्हणून एकत्र बांधण्यात ह्या सांस्कृतिक वारशाचा फार मोठा वाटा आहे. मराठी माणसाने थोडक्यात मराठी भाषा ह्या घटकावर एकत्र येण्याची आवश्यकता आहे.
Previous Article

Review: आरण्यक: एक मंत्रानुभव

Next Article

9 नोव्हेंबर

You may also like