Smart Maharashtra

दिसामाजी काही उत्तम वाचावे…

dummy_728

श्रीशालिवाहन शके १९४१, शिवराज्याभिषेक शके ३४५, विकारीनाम संवत्सर

चिनी ड्रॅगन विरुद्ध आर्थिक युद्ध

Author: Share:

चीनने कमी किमतीतील उत्पादने डम्प करून जगभरातील बाजारपेठांवर आपला कबजा मिळवला आहे. अगोदर इलेक्ट्रॉनिक्स आणि इतर उत्पादित क्षेत्रातून सुरु झालेला हा खेळ आता भारतीयाच्या उत्सवाच्या खरेदीपर्यंत म्हणजे लाईटच्या माळांपासून ते फटाक्यांपर्यंत येऊन पोहोचला आहे.

चीनच्या वस्तूंविरोधातील लढाई तशी नवी नाही. पण मागील दोन वर्षात तिने सोशल मीडियावर चांगलाच रंग धरला आहे. आता तर डोकलाम प्रकरणात चीनने केलेली आगळीक आणि नंतर चक्क दिलेली युद्धाची धमकी यामुळे हा प्रश्न अधिक तीव्रतेने पुन्हा येत आहे. आणि तो येण्याची वेळही अगदी योग्य आहे, भारतातील उत्सवी मोसमाच्या सुरवातीची आणि चीनच्या यावर्षीच्या भारतीय बाजारपेठेतील शिरकाव्याची!

चीन कमी किमतीमुळे आणि आकर्षक रुपामुळे भारतीय बाजारपेठेवर स्वार होतो. वास्तविक चिनी वस्तूची गॅरंटी नसते. चालली तर पहिल्या दिवशी नाहीतर तुळशीविवाहापर्यंत अशी चीनच्या वस्तूंची अवस्था असते. तरीही, त्याच्या अतिशय कमी किमतीमुळे भारतीय ग्राहकालाही ती सोडवत नाही. चालली तर बोनस नाही तरी एवढी काही किंमत नव्हती असे म्हणून तो ती वस्तू घेतो. दुसरे म्हणजे ती वस्तू दिसावयास इतकी गोजिरी असते, की ती घ्यावयावाचून मन राहवत नाही.

दुसरीकडे चिनी वस्तूंना मागणी असल्याने, आणि त्यावर चांगले मर्जिनही सुटत असल्याने  भारतीय व्यापारी कंटेनर भरून माल चीनहून आयात करतात. असे करणारी एक लिंकच मार्केटमध्ये कार्यरत असते. म्हणजे एखादा पैसे ओतून कंटेनर मागवतो आणि होलसेल मध्ये डिस्ट्रिब्युट करतो. तो त्याचे पैसे घेऊन जातो. पुढे व्यापारी ग्राहकांना ती वस्तू विकून आपले पैसे सोडवतात. इतर पर्यायांपेक्षा कैक कमी किमतीत वस्तू गवसल्याने ग्राहक खुश आणि टिकण्याची अपेक्षाच कमी असल्याने, सणापुरती टिकली की खुशीने दोन करंज्या अधिक फस्त करतो.  यालाच विन-विन सिच्युएशन असे म्हणतात. आणि मागचं दशकात आपण ती अनुभवतो आहोत.

पण, यामधून खूप पैसे चीनमध्ये जातो आहे, भारतीय उद्योग मंदावतो आहे, आणि भारतीय उत्पादक मार खात आहेत, हे सुद्धा ग्राहकाला समजते. त्यातून फक्त मामला स्पर्धेचा असता तरी चालले असते. चीनची वाढती पाकिस्तान (किंवा नापाकिस्तान) आगळीक आणि आता तर ड्रॅगन थेट भारतीय वाघावरच डोळे वटारु लागल्याने आपल्या आवाक्यात असलेले चीनशी आर्थिक युद्ध खेळायचे असा चंग जरी बांधला तरी ते कसे शक्य होईल हे पाहणे गरजेचे आहे.

इथे म्हटलं तर विषय सोप्पा आहे, चीनच्या वस्तू घेऊ नका, भारतीय बनावटीच्या वस्तू घ्या! आत्ता इथे तीन मुख्य मुद्दे आहेत, चीनमध्ये सरकार उद्योगांना खूप अनुदान देत असल्याने ते कायच्याकाय (याशिवाय दुसरे विशेषण नाही) कमी किमतीत माल बाजारात उतरवतात (उतरवतात कसला, कचरा फेकावा तसा फेकतात . त्याला इंग्रजीत डम्प करणे असेच नाव आहे.) इतक्या कमी किमतीच्या आसपास तरी भारतीय वस्तू फिरकू शकतील का प्रश्न आहे. आणि केवळ भारतीय आहे म्हणून उपलब्ध स्वस्त पर्याय सोडून भारतीय ग्राहक या महाग वस्तू स्वीकारेल का हा प्रश्न आहे. दुसरे म्हणजे, चिनी वस्तू दिसायला इतक्या आकर्षक असतात, आणि त्यामध्ये इतक्या प्रकारच्या सोयी असतात (इंग्रजीत ज्याला सॉफ्टीस्टिकेटेड) असे म्हणतात, हे अर्थात विकसित तंत्रज्ञान आणि तंत्रज्ञानावरील त्यांच्या शासनाने केलेल्या खर्चामुळे शक्य आहे.

आपल्या वस्तू जरी किमतीने कमी केल्या तरी त्यात तो आकर्षक पणा किंवा अनेकगुणत्व नष्ट होईल. अशी वस्तू तरी ग्राहक स्वीकारेल का हा प्रश्न उरतोच. तिसरे म्हणजे, आणि अतिशय महत्वाचे, भारतीय कोणते आणि चिनी कोणते हे ग्राहकाला समजणार कसे? म्हणजे समजा एखाद्या धटिंगणाने केली हिम्मत न बांधला चँग सॉरी चंग आणि उतरवला आपला माल त्याच किमतीत, तर ग्राहकाला कळणार कसे कि तो भारतीय आहे कि नाही. याचे सोप्पे उत्तर तुमच्या डोक्यात आले आहे ते माझ्या डोक्यात आले नाही असे नका समजू..पॅकवर मेड इन इंडिया लिहिले कि झाले काम असे नाही होणार. कारण एकतर त्याची कॉपी होऊ शकेल, किंवा खोटे लिहिले जाऊ शकेल. आणि आदर्शपणे आयएसआय मार्क घेऊन एखादा मार्केट मध्ये उतरला तर, तो एवढ्या कमी किमतीत उतरवू शकेल का, हा प्रश्न! कारण कुठल्याच डम्प वस्तूंवर गुणवत्तेचे काही प्रमाणक नसते, कारण त्या वस्तू त्या गुणवत्तेच्या नसतातच! म्हणजे, गुणवत्ता आणि किंमत या व्यस्त प्रमाणात कार्यरत आहेत.

विक्रेते सुद्धा हेच सांगत आहेत, की आम्हाला कमी किमतीत भारतीय माल मिळाला तर आम्ही का दुसऱ्याच्या घरच्या वस्तू विकू? आमच्याच नाही का विकणार! आता जो व्हॉट्स एप मेसेज तुम्हाला मिळालाय तो त्यांना मिळाला नसेल? त्यांना नसेल वाटत कि आपण का चीनला पैसा देतोय. पण गोम इथे आहे.

आत्ता याला दोन पर्याय आहेत.

एक असे जे उद्योग आहेत कि जे चीनच्या मालाला टक्कर देऊ इच्छित आहेत, त्यांनी एक क्लस्टर म्हणजे गृप बनवावा. यात दोन फायदे होतील. त्यांची स्वतःची ऊर्जा एकत्रित होईल आणि कामे विभागली जातील. पैसे, उत्पादनाच्या सुविधा, आणि मार्केटिंग सोप्पे होईल. दुसरीकडे शासनाने जाणीवपूर्वक, गुणवत्तेची मानके या उत्पादनांना अधिक सोप्या पद्धतीने मिळवून द्यावीत, जेणे करून, चिनी गुणविरहित वस्तूंशी स्पर्धा करताना, आपल्या उत्पादकांना त्यांच्याएवढ्या “खालच्या पातळीवर उतरावे लागणार नाही”.

लगेच गणेशोत्सवासाठी हे लागू होणार नाही, कारण ऑलरेडी चिनी माल भारतीय बाजारपेठेमध्ये दाखल झालेला आहे. दिवाळीसाठी मात्र याचे नीट नियोजन करून काम करता येईल!

चिनी ड्रॅगनशी युद्ध आवश्यक आहे, आणि शक्य आहे . आजच आलेल्या आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या अहवालानुसार चीनचे कर्ज त्यांच्या सकाळ राष्ट्रीय उत्पन्नाच्या तब्ब्ल २३५% वाढले आहे. चीनला एक दणका दिला तर ड्रॅगनचं डोळ्यासमोर किमान तारे तरी चमचमतील.

महाराष्ट्राने आजपर्यंत अनेक वेळेला पुढाकार घेऊन देशाचे नेतृत्व केले आहे. चला, या बाबतीतही आपणच पुढाकार घेऊ!!

 – हर्षद माने | mahaudyog@harshadmane.com

Previous Article

१७ ऑगस्ट

Next Article

दसऱ्याच्या मुहूर्तावर सदाभाऊ खोतांचे सीमोल्लंघन?

You may also like