Smart Maharashtra

दिसामाजी काही उत्तम वाचावे…

dummy_728

श्रीशालिवाहन शके १९४१, शिवराज्याभिषेक शके ३४५, विकारीनाम संवत्सर

कला शिक्षक विजय चव्हाण यांचा स्तुत्य उपक्रम -पर्यावरणपूरक गणेशोत्सवातून जनजागृती

Author: Share:

नांदगाव (प्रतिनिधी) – येथील व्ही.जे. हायस्कूलचे कलाशिक्षक विजय चव्हाण हे गेल्या आठ वर्षांपासून पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करत असून, आपल्या कल्पकतेने वेगवेगळे उपक्रम राबवून पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी जनजागृती करत आहे.त्यांनी नांदगाव मधील नरेंद्रस्वामी नगर मध्ये आपल्या राहत्या घरी हा उपक्रम राबविला असून दरवर्षी नांदगाव शहरातील अनेक मान्यवरांनी या उपक्रमास भेट देवून कौतुक केले आहे.त्यांनी त्या परिसरात शाडूमातीचे गणपती बनविण्याची कार्यशाळा घेवून परिसरातील सर्व नागरिकांना शाडूमातीचेच गणपती बसविण्यास प्रोत्साहीत केले आहे. त्यांना यात चांगले यश मिळत आहे. त्यांच्या प्रयत्नाने व मार्गदर्शनाने व्ही. जे. हायस्कूलच्या २०० विद्यार्थ्यांनी या वर्षी शाडूमातीचे गणपती घरी बसविले आहेत.

गणपतीची आरास ही पूर्णपणे पर्यावरणपूरक असून त्यासाठी ते स्वतः बनविलेलेल्या गणेशमूर्तीची प्रतिष्ठापणा करतात.सजावटीसाठी कागद, पुठ्ठा, कापड, माती, रोपटे, धान्य इत्यादी साहित्याचा वापर करून सजावट केली जाते. त्यांच्या घरी सकाळ-संध्याकाळ आरती होते, त्यासाठी गावातील विविध क्षेत्रातील मान्यवरांना सहकुटुंब आमंत्रित केले जाते,या वर्षी पंचायत समिती सभापती सौ. सुमनताई निकम, नांदगावचे तहसीलदार चंद्रकांत देवगुणे, वरीष्ठ पोलीस निरीक्षक बशीर शेख, माजी सैनिक संघटनेचे सर्व सदस्य,जेष्ठ नागरिक संघाचे सर्व सदस्य यांनी व इतर मान्यवरांनी भेट दिली व उपक्रमाचे कौतुक केले.आरती साठी परिसरातील सर्व नागरिक, विद्यार्थी एकत्र जमतात. आरती आगोदर पर्यावरणपूरक गणेशोत्सव का साजरा करावा? या संदर्भात व्हिडीओ क्लिप दाखवली जाते. तसेच दरवर्षी सेल्फी काढण्याच्या नादात किती तरुणांना प्राण गमवावे लागत आहेत? याची जाणीव देखील तरुणांना करून दिली जात आहे. या वर्षीची आरास देखील त्याच संबंधी तयार केली आहे. दरवर्षी अशाच वेवेगळ्या विषयांचे प्रबोधन केले जात आहे.त्याचा चांगला परिणाम देखील जाणवू लागला आहे.

गणेश विसर्जन सुद्धा पर्यावरणपूरक पद्धतीने केले जाते. घरासमोर कृत्रिम विसर्जनकुंड तयार करून परिसरातील व शाळेतील विद्यार्थ्यांचे शाडूमातीच्या मूर्तींचे विसर्जन केले जाते ,तीच माती पुन्हा पुढच्या वर्षी मुर्त्या तयार करण्यासाठी वापरली जाते. सर्व जमा झालेले निर्माल्य एकत्रित करून कंपोष्ट खत तयार केले जाते. अशाप्रकारचे उपक्रम सर्व गणेशभक्तांनी व गणेश मंडळांनी राबवावे असे आवाहन विजय चव्हाण यांनी केले.

बातमी: प्रा. सुरेश नारायणे

Previous Article

स्थगिती उठेपर्यंत मुंबईतील शांतता क्षेत्रे कायम राहणार: उच्च न्यायालयाचा निर्णय

Next Article

व्ही. जे. हायस्कूलच्या राष्ट्रीय छात्रसेनेचे नांदगाव रेल्वेस्टेशनवर स्वच्छता अभियान

You may also like