Smart Maharashtra

दिसामाजी काही उत्तम वाचावे…

dummy_728

श्रीशालिवाहन शके १९४१, शिवराज्याभिषेक शके ३४५, विकारीनाम संवत्सर

दृष्टीकोन

Author: Share:

एका गृहस्थाला कामासाठी आसनगावात जायचे होते. त्याची त्या गावात बदली झाली होती. कित्येक वर्ष स्वतःच्या गावातच नोकरी केल्यामुळे अचानक गाव सोडावं लागणार या काळजीने तो चिंतीत होता. त्या गावचे लोक कसे असतील? त्यांचा स्वभाव कसा असेल? ते आपल्याशी जुळवून घेतील ना? असे अनेक प्रश्न त्याच्या मनात घुटमळत होते. बदली झाल्यामुळे चांगलीच तारांबळ उडाली होती. म्हणजे मुलाची शाळा बदलणार, शेजारी बदलणार. इथल्या शेजारी तसे बरे होते. हिच्याशी जुळवून घ्यायचे. तसा हिचा स्वभाव थोडा चिडखोर. कसं होणार देव जाणे… या विचारात असतानाच बसचा ब्रेक लागला. तो धुंदीतून बाहेर आला. त्याच्या शेजारी एक माणूस बसला होता. त्या माणसाने विचारले “कुठे जात आहात आपण?” गृहस्थ म्हणाला “आसनगाव”. माणसाने त्याला निरखून पाहिले व म्हणाला “तुम्ही आसनगावचे वाटत नाही” गृहस्थाच्या चेहर्‍यावर हसू फुलले “म्हणजे तुम्ही आसनगावचे का?” माणूस म्हणाला “अगदी तसं नाही. पण मी व्यापारी आहे. सोमवारी आसनगावात बाजार लागतो. माझा कपड्यांचा व्यवसाय आहे ना.” गृहस्थ आपल्याला बरेच काही समजले असा भाव चेहर्‍यावर आणून म्हणतो “अच्छा… म्हणजे गावातल्या लोकांशी तुमचा व्यवहार होत असणार…” माणूस होकारार्थी मान हलवतो. “कशी आहेत हो गावातली माणसं?” गृहस्थाने शंकेनेच विचारले. हे ऐकताच माणूस सुरु झाला “अहो काय सांगू? अतिशय वाईट लोक. माझी कितीतरी उधारी बाकी आहे त्यांच्याकडे. कधी चांगलं बोलण नाही. सदाचे आपले वैतागलेले. यांच्यापेक्षा पुण्याचे लोक परवडले. मला तर नेहमीच वाईट अनुभव येतो. पण काय करणार? धंदा आहे आपला. चला भाऊ. आमचं गाव आलं” दोघंही एकमेकांना नमस्कार करतात. माणूस उतरतो. गृहस्थाच्या मनात मात्र विचारांचा काहूर माजतो. आसनगाव येतं. आत गावात जायला रीक्षा करावी लागणार. म्हणून तो रीक्षात बसतो. रीक्षाचा ड्रायव्हर फारच बोलका. रीक्षा ड्रायव्हर विचारतो “पाव्हणं… तुम्ही गावचं वाटत नाही” गृहस्थ निराशेनेच म्हणतो “नाही… माझी बदली झाली आहे इथे.” रीक्षावाला म्हणतो “अरे वाह… बरंच झाल की राव. आसनगाव म्हणजे एकदम बेश्ट. गेल्या आठवड्यातच शासनानं या गावाच्या सरपंचाचा सन्मान केला. अहो गावातली माणसं अगदी सुसंस्कृत. रस्त्यावर कचरा फेकायचा नाही, घाण करायची नाही अशी शपथ यांनी घेतलीय. आसनगाव हे स्वच्छ गाव, म्हणून सरपंचाचा सन्मान झाला. मंत्री वगैरे आले होते. मी होतो ना सोहळ्याला.” गृहस्थाने उत्सुकतेने विचारलं “तुम्हाला तुमच्या गावाचा फारच अभिमान दिसतोय” रीक्षावाला म्हणाला “माझं गाव? छे हो… मी या गावचा जावई. मी शेजारच्या गावात राहतो. पण इथलं भाडं मिळालं ना तर आनंदाने स्वीकारतो. तेवढंच सासरच्यांना भेटता येतं आणि मला इथले सगळे लोक ओळखतात ना… चला सरपंचांचा वाडा आला.” गृहस्थ उतरतो. रीक्षावाला पैसे घेऊन हसतमुखाने जातो. गृहस्थ मात्र विचार करत राहतो. मगाशी बसमध्ये जो व्यापारी भेटला तो गावातल्या लोकांबद्दल किती तक्रारी करत होता आनि हा रीक्षावाला मात्र गावची स्तुती करत होता. नेमके कसे असतील या गावचे लोक. मी उगाच विचार करतोय. मी त्यांच्याशी जसा वागेन तसेच ते माझ्याशी वागतील ना? जग असतं तसंच असतं. आपाला दृष्टीकोन मात्र चांगला किंवा वाईट असू शकतो… असं मनातल्या मनात म्हणत तो चालू लागतो.

तात्पर्य : आपण जगाकडे नेहकी सकारात्मक दृष्टीकोनातून पहावे. जग खुप सुंदर आहे. आपण आपली नजर, आपला दृष्टीकोन सुंदर ठेवला पाहिजे.

 

लेखक: कौमुदी

Previous Article

गोवा – माझ्या नजरेतून

Next Article

दहीहंडी

You may also like