बाहुलीचा खेळ

Author: Share:

पहाटेचे चार वाजले होते. हवेत अजुनही गारठा जाणवत होता. सान्वीला आजी सारखी हाक मारत होती, “सान्वी चल लवकर आटप, अजून झोपुन राहिली आहेस, तुला आई बरोबर जायचे आहे ना मुंबईला ? लवकर आवर नाहीतर वाटेत रहदारी वाढेल. सन्वी जागी झीली. नवीन ड्रेस घालुन, केसांना गुलाबी पिन लावली आणि आरशातले आपले बाहुली सारखे रूप पाहुन गोड हसली.

सान्वी अवघी पाच वर्षांची होती. कुरळ्या केसांची, गोरीपान सान्वी अगदी बाहुलीच दिसायची. पुण्यातल्या बालवाडीत जायची. तिचे मामा मुंबईला होते. ती मामा मामीची पण खूपच लाडकी होती. आज गुढीपाडव्याला मामांनी तिला व आईला मुंबईला आग्रहाने निमंत्रण दिले होते. सान्वीलाही मुंबईला फिरायला खूप आवडायचे. मामी बरोबर खेळणी खरेदी करण्यात मजा वाटायची. संध्याकाळी सगळे जुहू बीचवर फिरायचे. चार दिवस मुंबईत कसे गेले कधी समजून येत नसे.

सान्वीने आपले कपडे भरले. सोबत आपली प्रीती बाहुली घेतली. बाहीली शिवाय सान्वीला जराही करमत नसे. प्रीती नाव ठेवले होते तिने बाहुलीचे. भातुकलीचा खेळही तिने आईकडे दिला, मुंबईला घेऊन जाण्यासाठी. बाहुली आणि भातुकली तिला बाबांनी गेल्या महिन्यात वाढदिवसाला दिली होती. हातभर लांबीची आणि लाल साडी घातलेली बाहुली अत्यंत सुंदर होती.

चहा आणि पोहे खाऊन सान्वी गाडीत बसली. नवीन होंडा सीटी कारही तिच्या बाबांनी वाढदिवसाला घेतली होती. कार चालू करण्याआधी तिच्या आई बाबांनी आजीला नमस्कार केला. सान्वीनेही मग आजीला नमस्कार केला.


असे दर्जेदार साहित्य वाचण्यासाठी आमचे पेज LIKE आणि Follow करा: https://www.facebook.com/SmartMaharashtraOnline/


गाडी खंडाळ्याच्या घाटातून जाऊ लागली. आकाशात सोनेरी केशरी किरण दिसायला लागली.दरीत सोनेरी प्रकाश दिसत होता आणि छोटे पांढरे शुभ्र झरे. सान्वी केक खात हे घाटाचे रूप पाहत होती. आता घाट संपला होता आणि समोर दिसु लागल्या उंचच उंच अपार्टमेंट.मुंबई आले असावे असा सान्वीला अंदाज आला.

आता गाडी एका डोंगरावरून जाऊ लागली. ती वस्ती अत्यंत स्वच्छ दिसत होती. मलबार हिल आले होते. एका मोठ्या अपार्टमेंट मध्ये दहाव्या मजल्यावर मामाचे घर होते. प्रत्येक मोठ्या काचेच्या खिडकीतुन निळ्याभोर सागराचे दर्शन घडायचे. रात्री मुंबईचे झगमगणारे दिवेही अप्रतिम दिसत असत. तरीही सान्वीला आपला पुण्याचा बंगला आवडत असे. बंगल्या भोवती सुरेख बाग होती. आंबा, फणस, पेरूची झाडं होती. बागेच्या मधोमध एक लहानसे तळेही होते. तळ्याकाठी भातुकलीचा खेळ खेळायला तिला खुप आवडायचे. मामाचे मलबार अपार्टमेंटचे भव्य दार दिसुन आले. गाडी पार्क करून ते लिफ्टने दहाव्या मजल्यावर आले. दाराला झेंडूचे तोरण लावले होते. सान्वीला पाहुन मामाने लगेच तिला उचलूनच घेतले. मामीने तिचा गौड पापा घेतला. कोमट पाण्याने हात पाय धुतले.

देवघरात मोठी चांदीची समई ठेवली होती आणि चांदीच्चा परडीत फुलं ठेवली होती. धुपाचा मंद सुवासही दरवळत होता. रंगीत रांगोळीही काढली होती. मामाने गुढी उभी केली. मामीने आरती केली. भरजरी शालु नेसलेली मामी आज फारच सुंदर दिसत होती. पुजा झाल्यावर मामीने लगेच सान्वीला एका ताटात पुरणपोळी आणि साजूक तूप वाढले. सोबत वाटीभर केशरी श्रीखंडही वाढले. सान्वीने आवडीने पुरणपोळी खाऊन टाकली. मामी पुर्‍या करत होती. “वरण भात झाल्यावर लगेच तुला जेवण वाढते” , मामी तिला प्रेमाने म्हणाली. ” भातुकली खेळण्यासाठी मला खाऊ दे ना”, सान्वी मामीला म्हणाली. मामीने लगेच पुरणपोळी स्टीलच्या डब्यात घातली आणि डबा सान्वीला दिला.

सान्वीच्या बाबांच्या आणि मामाच्या मस्त गप्पा रंगल्या. दोघेही एकाच वयाचे असल्यामुळे त्यांची छान मैत्री होती. गझलची सी.डी. लावली होती. खिडकी जवळ सान्वी बाहुली बरोबर खेळत होती.

इतक्यात ढोलकीचा आवाज आला. सान्वीने खिडकीतुन बाहेर पाहिले. तिच्यापेक्षा थोडी मोठी मुलगी दोरीवरून चालत होती. मुलीने जुना परकर पोलका घातला होता. हा खेळ पहायला गर्दी जमली होती. दहाव्या मजल्यावरून ती मुलगी बाहुली सारखी दिसत होती.

” बाबा मला हा खेळ पहायचा आहे, चला खाली जाऊ या”, सान्वी बाबांना म्हणाली. सान्वीचे बाबा तिला खेळ चालू होता तिथे घेऊन आले. आता मुलगी दोरीवरून उतरली आणि लोकांनकडे पैसे मागत होती. सान्वीच्या बाबांनी तिला शंभराची नोट दिली. सान्वीचा हात धरून ते मागे वळले. अचानक सान्वीने त्यांचा हात झटकला. धावत त्या मुली जवळ गेली आणि आपल्या हातातला पुरणपोळीचा डबा आणि आवडती बाहुली दिली. मुलगी आनंदाने डबा घेऊन गेली.

घरी आल्यावर सर्व मंडळी सान्वीचे कौतुक करत होती. मामीने कपाटातुन नवीन बाहुली सान्वीला भेट दिली. सान्वीने बाहेर खिडकीतून पाहिले. ती दोरीवर चालणारी मुलगी झाडाखाली बसवली होती. तिच्या मांडीवर बाहुली होती आणि ती पुरणपोळी सावकाश खात होती. पण प्रीती बाहुलीला आजच घातलेला नीळे झबले दिसत नव्हतं. सान्वीने थोडे डावीकडे नजर फिरवली. एक पाच सहा महिन्याचे छोटे बाळ रांगत होते. बाळाने ते नवीन नीळे बाहुलीचे झबले घातले होते.

सान्वीचे डोळे भरून आले. आजीला पुण्यात गेल्यावर हि घटना सांगायची असे ठरवले. सान्वीची आई समाजसेविका होती. अनाथआश्रमातल्या सर्व मुलींना नवीन कपडे घेण्याचे तिने ठरवले. दोरीवर चालणारी मुलगी आणि छोटे बाळ पाहुन सान्वीचे डोळे भरून आले

लेखिका: सोनाली टोपले
सौजन्य: साहित्य उपेक्षितांचे, श्री. निलेश बामणे


असे दर्जेदार साहित्य वाचण्यासाठी आमचे पेज LIKE आणि Follow करा: https://www.facebook.com/SmartMaharashtraOnline/


Previous Article

ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. सदाशिव शिवदे यांचे निधन

Next Article

मीरा कुलकर्णी यांना अविनाशी सेवा पुरस्कार

You may also like