Smart Maharashtra

दिसामाजी काही उत्तम वाचावे…

dummy_728

श्रीशालिवाहन शके १९४१, शिवराज्याभिषेक शके ३४५, विकारीनाम संवत्सर

देवाच्या निमित्ते मराठी चित्रपटाची व्यथा!

Author: Share:

‘देवा’ला स्क्रीन मिळण्यात झालेला उशीर आणि त्यासाठी करावी लागणारी भांडणे हा मराठी सिनेमांच्या मस्तकी लागलेला एक मनस्ताप आहे. हिंदी चित्रपटासोबत विशेषतः खान त्रिकुटाच्या रिलीज बरोबर एखादे रिलीज आले, की मराठी सिनेमांना स्क्रीन मिळण्यास दिरंगाई होते. असे का होत असेल? बॉलिवूड च्या चित्रपटाला मिळणारा क्राउड लक्षात घेता व्यावसायिक थिएटर मालकांनी हिंदी चित्रपटाला स्क्रीन देणे लस्वाभाविक आहे. किंबहुना दुकानदाराच्या शेल्फवर आपले प्रॉडक्ट समोर असावे यासाठी जी स्पर्धा इतर वस्तूंमध्ये असते, तीच स्पर्धा, इथेही असणार हेही स्वाभाविक आहे. मात्र तरीही… या निमित्ताने मराठी सिनेमावाले, थिएटरवाले, सरकार आणि मराठी प्रेक्षक सर्वांना शिकण्यासाठी काही ना काही आहे. या वर्षाच्या अखेरीस हे झाले. त्यामुळे पुढील वर्षी ह्या चुका पण टाळायच्या आहेत असाच नियतीचा संकेत असावा असा सकारात्मक अर्थ त्यातून आपण घेऊ आणि लेखास सुरुवात करू!

मराठी चित्रपटांबाबतीत तीन गोष्टी प्रकर्षाने सांगितल्या जातात. त्यापैकी हिंदीनेही खुल्या दिलाने मान्य केलेली गोष्ट म्हणजे, मराठी चित्रपटाचा विषय तगडा असतो,आणि रंगभूमीचा सक्षम वारसा पाठीशी असल्याने मराठी कलाकारांमध्ये दम असतो. एखादा चित्रपट चालण्यासाठी तो फक्त मसालेदारच असावा अशी आवश्यकता नाही. जो मसालेदार नाही तो चित्रपट प्रायोगिक म्हणवण्याकडे एक कल असतो. मात्र तसे असेलच असे नाही. मराठी चित्रपट विषयांच्या बाबतीत इतका प्रभावशाली आहे याचे कारणच त्यांच्या कथेमध्ये किंवा ज्यावरून कथा बेतू शकते अशा मराठी साहित्यामध्ये वैविध्यता, नवीन विषयांना सकसपणे पेलण्याची शक्ती आणि मूळ लेखनामध्ये असलेली सृजनशीलता ह्याच गोष्टी हिंदीपेक्षा म्हणजे बॉलिवूड पेक्षा त्याला वेगळे करतात. आपल्या प्रॉडक्टच्या ‘यूएसपी’ चा मार्केटिंग मध्ये उपयोग करावा, हे साधे व्यवस्थापनाचे सूत्र जरी आपण लक्षात घेतले तरी सशक्त लेखन आणि विषयातील वैविध्यता ह्या यूएसपी मराठी चित्रपटांनी सोडून द्याव्यात असे म्हणणे चुकीचे ठरेल. याचा अर्थ, हिंदी सारखी सवंगता मराठी चित्रपटांनी अंगीकारणे व्यर्थ अट्टाहास ठरेल. दुसरे महत्वाचे आपण लक्षात घेतले पाहिजे की हिंदीला फक्त हिंदी भाषिकांनाच लक्ष करायचे नसते. सर्व भाषिक बॉलिवूडचे प्रेक्षक आहेत. त्यामुळॆ कधी एखादा चित्रपट एखाद्या विशिष्ट प्रदेशाचा असतो उदा गोलमाल, अन्यथा संपूर्ण भारताला लागू पडू शकेल अशी सामान्यता त्यात असावी लागते. असे करताना तो चित्रपट लार्जर दॅन लाईफ आणि काहीसा अविश्वसनीय करण्याकडेच निर्माते-दिग्दर्शकाचा कल असतो. प्रादेशिक चित्रपटांना हे परवडणारे नसते कारण त्यांचे मूलभूत प्रेक्षकच त्या भाषेचे पाईक असतात. त्यामुळे चित्रपटाचे पाणी मातीशी नाळ साधणारे असावे हा स्वाभाविक प्रघात आहे. याला काही चित्रपट अपवाद होऊ शकतात. मात्र बहुतांशी मराठी चित्रपटात हाच प्रघात पाळला गेलेला आहे. म्हणूनच मराठी धागा पकडून कथा जावी लागते. आपले दुसरे यूएसपी म्हणजे, उत्तम अभिनय कौशल्य असणारे कलाकार. हिंदीमध्ये त्यांची वानवा आहे. त्यामुळे त्या चित्रपटांचे स्क्रिनप्लेच अधिक अभिनय टाळता येण्याकडे असतो. गिमिक्सचा वापर, उंची सेट्स, दिपवणारी बॅकग्राऊंड, लहान शॉट्स यांचा वापर आढळतो. मराठीमध्ये असे करण्याची गरज नाही. ही नाळ ओळखून बनवलेले मराठी चित्रपट नक्कीच यशस्वी ठरतात.सामना आणि सिंहासन हे चित्रपट आपण उत्तम लिखाण आणि अभिनय यासाठीच ओळखतो. चौकट राजा हा असाच चित्रपट. नवीन चित्रपटांमध्ये ‘नटसम्राट’. अगदी प्रियांका चोप्राने बनवलेला मल्टीस्टारर ‘व्हेंटिलेटर’मध्ये सुद्धा अभिनयाचा बाज उजवाच आहे. ग्रामीण प्रेक्षकांकडून मराठी चित्रपट शहरी आणि निमशहरी प्रेक्षकांकडे आलेला आहे. मात्र ग्रामीणतेचा स्पर्श अजून सुटलेला नाही. असेही चित्रपट मराठी प्रेक्षकांनी उचलून धरलॆ आहेत. “अशी ही बनवाबनवी” हे त्याचे उत्तम उदाहरण! त्यामुळे हिंदीच्या वळणावर जाऊन मराठीने आपले नुस्कान करून घ्यायची गरज नाही.

मराठी प्रेक्षक चित्रपटांना वळत नाहीत,यावर चित्रपट आणि थिएटर मालक दोघांचे एकमत आहे. सकाळी १० चा मॅटिनी शो स्वस्तात असतो, पण एकंदर मराठी चित्रपटांची तिकिटे स्वस्तच असतात. तसेही चांगल्याला पैशाची तोशीस नसते. चांगल्या मराठी नाटकांना नाही का प्रेक्षक येत साडे-तीनशे भरून? पण मग मराठी चित्रपटाला अशी सवत वागणूक का? कॉलेजवयीन प्रेक्षकाला डोक्याला शॉट द्यायचा नसतो असे एक कारण दिले जाते. पण हिँदी चित्रपटात, चांगला अभिनय, गंभीर विषय नसतात असे नाही. मॉम, उडता पंजाब त्याआधी रंग दे बसंती, तारे जमीन पर कितीतरी, चांगल्या अभिनयाने आणि गांभीर्याने बहरलेले चित्रपट बॉक्स ऑफिसवर गल्ला घेऊन गेले आहेत. आमिरच्या चित्रपटांना तरी फक्त टाईमपास म्हणता येत नाही. शाहरुखच्या चित्रपटात तरी सगळे हसतखेळत असते असे थोडेच आहे? तरीही, ते चित्रपट उत्तम गल्ला करतात. त्यामुळे गांभीर्य हे चित्रपटाला व्यावसायिक दृष्ट्या खाली खेचण्याचे कारण अजिबात नाही.

एक कारण हे असू शकेल, की कॉलेजची पोरे जेंव्हा बंक करून चित्रपट पाहायचे ठरवतात, तेंव्हा मराठी चित्रपट त्यांच्या पर्यायात नसतो. याचे कारण काय? आवर्जून पाहावी अशी नाटके जशी एकाच वेळ चार पाच असतात तशी चित्रपटाच्या जाहिरातीच्या पानाची चंगळ नसते. दोन-चार नावे अशी आढळतील की निर्माते दिग्दर्शकाचे नातेवाईकतरी तो चित्रपट पाहतील का कुणास ठाऊक? त्यातच, खाली स्क्रीनच्या संख्येचा मानसिक परिणाम होत असतोच! हिंदी चित्रपटाखाली डोळे ताणून थिएटरची नावे वाचावी लागतात. मराठी चित्रपटाखालील थिएटरची नावे चष्मा लागलेला चष्म्याशिवाय वाचू शकेल. घोळक्यात अमराठी मुले-मुली असणे हे एक कारण असेल.पण सैराट पाहायला अमराठी क्राउड आवर्जून गेलाच की! तसेही, मराठी गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड सुद्धा आवर्जून मराठी चित्रपटाला जातीलच असे नाही ना! त्यामुळे भाषा हे कारण नाही. आत्तापर्यंतची मराठी चित्रपटाची इमेज तशी आहे, हे कारण खचितच नाही. कारण, चांगली कलाकृती लाखात उठून दिसते. हीच मराठी मुले, एखाद्या दर्जेदार नाटकाला आवर्जून जातील. त्यामुळे मराठी तरुणांनाच मराठी चित्रपट नको असेही नाही. प्रश्न फक्त येतो दर्जेदार चित्रपटांचे एकाच वेळी पर्याय उपलब्ध होण्याचा! मध्यववयीन आणि ज्येष्ठ माणसांनाही चित्रपटाकडे खेचण्याचा हाच एक उत्तम मार्ग आहे. मार्केटिंग ही नंतरची गोष्ट झाली. एक फिल्म पीआर मला सांगत होता, की आताशा ठरवून सिनेमा बघण्याचे प्रमाण कमी होते आहे. उलट आपण मॉल मध्ये जाऊ तो सिनेमा पाहण्याचे प्रमाण आहे. अशा वेळेस, मराठी चित्रपटाचा उत्तम पर्याय समोर असेल तर का नाही तो पाहिला जाणार?

यासाठी दोन गोष्टी प्रकर्षाने सांगण्यासारख्या आहेत. एक, निर्माता ह्या मनुष्याने अधिक चोखंदळ होण्याची गरज आहे. फक्त आहे पैसा म्हणून लावला, तो निर्माता नव्हे. काहीतरी आपण निर्माण करतो आहोत, ते चांगलेच असले पाहिजे हा ध्यास आधी निर्मात्याला हवा, तरच तो दिग्दर्शकातून कलाकारांमध्ये, क्र्यु मध्ये आणि इंडस्ट्री मध्ये उतरेल. डिस्ट्रिब्युशन आणि अधिकाधिक स्क्रीन्स मिळवणे ही नंतरची गोष्ट आहे.आधी जे करतो आहोत ते उत्तम असावे. त्यामुळे काय चांगले निर्माण करता येईल, यासाठी निर्माते पुस्तकांच्या दुकानांमधून चांगले साहित्य चाळतील, लेखक आणि दिग्दर्शकांना शोधात फिरतील तेंव्हा मराठी चित्रपटात चांगली निर्मिती होणे वाढेल. मराठी नाटकांचे निर्माते स्वतः नाटकाची चांगली जाण आणि अभिरुची असलेले असतात, चांगले वाचक आणि चोखंदळ रसिक असतात. दुसरे म्हणजे, आपल्या नावावर चित्रपट यावा यासाठी स्ट्रगल करणाऱ्या दिग्दर्शकानेही फक्त निर्माता गळाला फसलाय म्हणून काहीही काढण्याचा प्रयत्न करू नये. वर सांगितलेले निर्माते आणि दिग्दर्शकाचे नातेवाईकही पाहणार नाहीत असे चित्रपट ह्या कंटेगरीत मोडतात. दुर्दैवाने, अशा चित्रपटातही काही चांगली नावे काम करतात. त्यांना करावेच लागते, कारण शेवटी घर चालवायचे असते. त्यामुळे अशा चित्रपटांना ‘किचन सिनेमाही’ म्हणतात. पण अशा किचनची संख्या हॉल आणि बेडरूम पेक्षा अधिक झाली आहे. अशा दिग्दर्शकांमुळेच इंडस्ट्रीचे अधिक नुकसान होत . निर्मात्याला अव्वाच्या सव्वा स्वप्ने दाखवणारे दिग्दर्शक मी पहिले आहेत. तो बिचारा पैसे टाकून बसलेला असतो, त्याला अशी स्वप्नेच तगून ठेवतात. त्यामुळे एकंदरीत सर्व दूध दिग्दर्शक नासवतो. त्या निर्मात्याची जीभ कडवट होते आणि तो पुन्हा या मार्गाला येत नाही, एक निर्माता इंडस्ट्री गमावते.

मुळात मराठी चित्रपटांना स्क्रीन्स मिळाव्यात म्हणून आंदोलने करून, लढून मागणे योग्य राहील काय? मराठी चित्रपटाने आपले आर्थिक महत्व सिद्ध केले तर हा प्रश्न उद्भवणारच नाही. सैराटला नाकारण्याची हिम्मत कुठला थिएटर मालक दाखवू शकला असेल. मात्र त्यापलीकडे जाऊन मराठी चित्रपटांना प्रोत्साहन देणायचे शासकीय धोरण अधिक सक्षमपणे राबवण्याची गरज आहेच. मराठी चित्रपटांना मराठी राज्यात प्राधान्य असावे हा विचार व्यावहारिक दृष्टया अतिशय चुकीचा वाटेल, पण भाषिक आणि प्रांतीय अस्मिता जोपासण्याचा हट्ट (चांगल्या अर्थाने) करणारी राज्ये अशा अटी व्यावसायिकांवर घालू शकतात. महाराष्ट्राने आणि त्यासाठी इतर सर्व राज्यांनी ही अस्मिता जोपासण्यात काही गैर नाही. कारण शेवटी भाषावार प्रांत रचना उभ्या देशाने १९५६ मध्ये मान्य केलॆली आहे. ह्यात अअसंवैधानिक काही नाही. मात्र त्याचा अतिरेक नसावा. यासाठीच देवाच्या बाबतीत झालेला प्रकार सरकारने धोरण म्हणून विचारात घेण्यासारखी गोष्ट निश्चित आहे.

मराठी भाषा, मराठी शाळा , संस्कृती, साहित्य, कला ह्या गोष्टी हातात हात घालून चालणाऱ्या आहेत. ह्या सर्वांबाबतीत महाराष्ट्र राज्य सरकारचे एक ठोस, समावेशक आणि कल्याणकारी धोरण असलेच पाहिजे. प्रादेशिक अस्मिता आणि विचार ह्या गोष्टींचा आदर झालाच पाहिजे आणि त्या वृद्धिंगत झाल्याच पाहिजेत. एखाद्या प्रादेशिक भाषा किंवा संस्कृतीला आपण मोठे करतो तेंव्हा कधीच ती दुसऱ्याच्या जीवावर उठत नाही. उलट आपण प्रत्येक अस्मिता जेवढी मोठी होते, तेवढ्याच सर्व अस्मिता एकमेकांना पूरक ठरतात. राज्य सरकारांची आत्तापर्यंतची धोरणे सुनियोजित नव्हती किंवा त्यांची अंमलबजावणी नीट झालेली नाही. ती सर्वसमावेशक नाहीत, त्यात त्रुटी आहेत. पण महत्वाचे म्हणजे, मराठी अस्मितेचे धोरण व्यापकपणे, स्पष्टपणे आणि धीरोदात्तपणे राबवण्याची राजकीय महत्वाकांक्षा कुठल्याच सरकारची दिसली नाही. शासनाने गंभीरपणे विचार करण्याची आवश्यकता आहे. थिएटर मालकांनीही ह्या बाबतीत अधिक डोळस विचार करण्याची गरज आहे. आपण ज्या मातीत राहतो त्या मातीचा रंग आपण लावतो. ही मातीच तुम्हाला पैसा देते, राहायला घर देते. त्यामुळे त्या मातीतील गुण, कला, माणूस आणि विचार वाढावा हा प्रयत्न करायला हरकत नाही. इतर वेळेस प्रत्येक जण स्वतःचे आर्थिक फायदे संभाळत असतोच. पण शासनाने लादलेल्या अटींबाहेर स्वतःहून मराठी चित्रपटांच्या विकासासाठी काम करण्याची  इच्छा थिएटर व्यावसायिकांनी ठेवायला हरकत नाही.

आता प्रश्न प्रेक्षकांचा! शेवटी सगळा प्रश्न सुरूच होतो इथपासून, की प्रेक्षक मराठी चित्रपटाकडे फिरकत नसल्याने ते लावणे थिएटर मालकांना प्रोफीटेबल नसते. नाटक जाऊन पाहण्याची जी सवय मराठी जनांना आहे, ती चित्रपट पाहण्याची नाही. त्यामुळे चांगले चित्रपट जोपर्यंत मराठी प्रेक्षक आवर्जून जाऊन पाहत नाही तोपर्यंत ही दुरावस्था संपणार नाही, थिएटर मालकांची सुद्धा रड थांबणार नाही आणि मराठी चित्रपटांमागील शुक्लकाष्ट संपणार नाही. वर आपण सकस चित्रपट खोऱ्याने आले पाहिजेत ही चर्चा केली पण दर्जेदार चित्रपट येताच नाहीत असे तर नाही ना!

ही एक थोडीशी सवय आपण मराठी प्रेक्षकांनी स्वतःला लावून घेतली पाहिजे. दर महिन्याला किमान एक मराठी नाटक आणि एक मराठी चित्रपट कुटुंबासमवेत पहावा. नंतर शक्यतो एखाद्या मराठी हॉटेलात जेवून घरी यावे. एकाच फटक्यात किती काम करतो पहा आपण! मराठी चित्रपट, मराठी नाटके आणि मराठी उद्योजक यांना हातभार लावतो.आपल्या कुटुंबासमवेत क्वालिटी वेळ घालवतो.नाटके आणि चित्रपटांचे निर्मातेही उद्योजकच आहेत. त्यांना आपण हात देतो. ते अजून एक चांगली निर्मिती करण्यासाठी उद्युक्त होतील. त्यासाठी चांगले साहित्य लिहिले जाईल. आपल्या या एका कृतीने मराठी लेखक, साहित्य, प्रकाशक, निर्माते, दिग्दर्शक, कलाकार, चित्रपट, नाटके आणि मराठी उद्योजक आपण जगवून ठेवतो, मोठे करतो. शेवटी हे सर्व मोठे होऊन मराठी समाजच मोठा करणार आहेत. हे चक्र निरंतर चालत राहील! मारवाडी-गुजराती लॉबिंग म्हणतात ते काही वेगळे नाही! एकमेका सहाय्य करू… त्यातही एक मजा असते!

मराठी भाषा, संस्कृती, परंपरा, कलाकृती यांचा वारसा गर्भश्रीमंत आहे. पण तो टिकवण्याची, वाढवण्याची, वाढवणाऱ्यांना प्रोत्साहन देण्याचीही सामूहिक जबाबदारी मराठी समाजाची आहे. या जाणिवेतून सामूहिक कर्तव्यात आपला वाटा उचलण्याची जबाबदारी पार पडण्यास आता प्रत्येकाने सुरुवात केली पाहिजे. प्रेक्षकांनी सिनेमे उचलून धरावेत, सिनेमावाल्यांनी उचलून धरण्याजोगे सिनेमे प्रेक्षकांना द्यावेत. सरकारने मराठीसाठी ठोस असे एक धोरण राबवावे. थिएटर वाल्यांनी आपण कुठे पैसे कमावतो आहोत त्या मातीसाठी थोडासा विचारही करावा!

‘देवा’च्या निमित्ताने ह्या वर्षाच्या अखेरीस हा एक धडा घेऊ. पुढील वर्षी अंमलात आणण्यासाठी!

Previous Article

“खेळाचे स्वातंत्र्य” -सचिन तेंडुलकर भाषणाचा मराठी स्वैर अनुवाद

Next Article

गुजरात निवडणुकीचा अन्वय आणि अर्थ

You may also like