दलित बंधू कोठे जाणार आहेत?- अरविंद कुळकर्णी

Author: Share:

ब्रिटिशांचे राज्य भारतात सुरु झाले त्याला नेमकी २०० वर्षे यंदा पूर्ण होतात ० ब्रिटिशांना मराठ्यांना पराभूत करावे लागले तेव्हा ते राज्यकर्ते होऊ शकले ० त्यासाठी ज्या लढाया झाल्या त्यातली एक पुण्याजवळील कोरेगावची ० पेशव्यांच्या सैन्याविरुद्ध झालेल्या युद्धात ब्रिटिशांच्या सैन्यात दलितांचा भरणा होता ० ह्या लढाईचे स्मृती चिन्ह म्हणून ब्रिटिशांनी कोरेगावात पुढे विजयस्तंभ उभारला ० त्याला अभिवादन कारण्यासाठी ह्यावर्षी फार मोठ्या संख्येने जनसमुदाय जमला होता ० त्यावर दगडफेक झाली ० एका तरुणाचा मृत्यू झाला ० मग काही ठिकाणी दंगली उसळल्या आणि निषेधार्थ तीन जानेवारीला प्रकाश आंबेडकर ह्यांच्या नेतृत्वाखाली काही संघटनानी महाराष्ट्र बंद पाळला ० त्याला संमिश्र प्रतिसाद मिळाला ० पुढील वर्षीच्या होणाऱ्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी ह्यांच्या भाजप पक्षाला पुन्हा सत्ता मिळू नये म्हणून विविध समाजघटकांमध्ये ह्या सरकार विरोधात अप्रीती आणि द्वेष पसरविण्याचे संघटित प्रयत्न दुष्ट प्रवृत्ती करणार त्याचे हे सूतोवाच आहे ० त्यांना यश प्राप्त होऊ नये म्हणून सर्व समाजाने भीमा-कोरेगाव प्रकरणाचा शांतपणाने विचार केला पाहिजे ०

ब्रिटिशांच्या बाजूने लढलेल्या दलितांनी पेशव्यांच्या सैन्याशी लढण्याच्ये काम नोकरीचा भाग म्हणून केले ० त्याला सैद्धांतिक बैठक दिली जात आहे ० पेशवाईत दलित गुलामांचे जिणे जगत होते , त्यांना ब्रिटिशांनी पेशवाई नष्ट करून मुक्त आणि स्वतंत्र केले , म्हणून ते विजयस्तंभाला अभिवादन करतात ० अशी भूमिका मांडली जात आहे ० हा तर्क पुढे न्यायचा तर नेताजी सुभाषचंद्रांपासून जे अगणित स्वातंत्र्यसैनिक ब्रिटिशांविरुद्ध लढले त्यांनी एकप्रकारे दलितविरोधी काम केले ० कारण ब्रिटिशांनी जो दलितांच्या मुक्तीचा महायज्ञ आरंभला होता त्यात त्यांनी विघ्ने आणली ० तेव्हा संघ आणि भाजपचा निषेध करण्याआधी ह्या स्वातंत्र्यसैनिकांचा निषेध करायला हवा ० तसे होत नाही ह्याचे कारण दलितमुक्ती हा ब्रिटिशांचा उद्देश नव्हता तर सर्वच भारतीयांना पारतंत्र्यात ढकलून ह्या देशावर राज्य करणे हा त्यांचा उद्देश होता हे मनातून सगळ्यांना कळते ० त्यावेळी भारतावर पेशव्यांचे राज्य होते ० पेशवे जाऊन इंग्रज आले ० मग रेल्वेही आली आणि काही प्रमाणात अस्पृश्यता नाहीशी झाली ० तेव्हा अस्पृश्यता नष्ट होणे हा परिणाम असू शकतो पण तो उद्देश केव्हाही नव्हता ० हे जेव्हढे समजेल तेव्हढ्या प्रमाणात विजयस्तंभाचे महत्व कमी होते आणि त्याला अभिवादन करणे स्पृहणीय ठरत नाही ० तो विजयस्तंभ इंग्रजांचा असू शकतो; दलितांचा नाही ०
पेशवाईत सांगितली जाते तेव्हढी अस्पृश्यता होती असे ठामपणे म्हणता येत नाही ०

गळ्यात मडके आणि कमरेला झाडू ह्याविषयी एकही मूलभूत स्त्रोत स्वरूपातला पुरावा आजपर्यंत वारंवार मागूनही कोणाला देता आलेला नाही ० ह्याविषयी चाळीस वर्षांपूर्वी साप्ताहिक सोबतमध्ये अभ्यासूंची चर्चा मी वाचली आहे ० पेशवाईत कर्तृत्वाला निर्विवाद प्राधान्य आणि महत्व होते आणि शनिवारवाड्याच्या स्वयंपाकगृहापर्यंत सर्व जातीच्या सरदारांना मुक्त संचार स्वातंत्र्य होते ० पेशव्यांनी लोकांशी वागतांना आणि एकंदर राज्यकारभारात जातीपातीचा विचार केला नाही असे थोर पत्रकार आणि नाट्याचार्य कृष्णाजी प्रभाकर तथा काकासाहेब खाडिलकर ह्यांनी लिहून ठेवले आहे ० अजून दोन मुद्द्यांचा विचार करू ० पेशवाईत जातीयता एखादे वेळेस नसेल पण शेवटच्या बाजीरावाच्या वेळेस ती होती असे विधान कोणी करू शकतो ० त्याला उत्तर असे की इंग्रजांनी पेशव्यांना खाली खेचायची वाट पाहत न बसता इतर समाजाने त्यांना पदच्युत करून राज्यशकट हातात घ्यायला हवा होता ० जेव्हा छत्रपती निष्प्रभ ठरले तेव्हा पेशव्यांनी पुढे येऊन राजदंड परक्याहाती जाऊ दिला नाही० तो वरच्यावर झेलला आणि स्वराज्याचे साम्राज्य केले ० तसे करायला इतरांना कोणी रोखले होते ? इंग्रजांनी दलितांची अस्पृश्यता नाहीशी करून त्यांना स्वतंत्र केले असे विधान करण्यापूर्वी एका वेगळ्या सत्याची ओळख करून घेतली पाहिजे ० भारतावरील ब्रिटिश राजवटीचे सर्वात मोठे परिणामकारक वैशिष्ठ्य म्हणजे त्यांनी हिंदूंना denationalised केले ० अराष्ट्रीय म्हणजे राष्ट्रीयत्वहीन केले ० आर्य बाहेरून आले असा सिद्धांत मांडून त्यांनी हिंदूंच्या ह्या भूमीवरील मूलभूत अधिकाराला सुरुंग लावण्याचा अत्यंत कुटील डाव खेळून बघितला ० सुशिक्षित हिंदूंच्या मनात त्यांनी त्यांच्या इतिहासाच्या गौरवशाली भागाविषयी संशय निर्माण केला ० परिणामी राष्ट्राची सृजनशील ऊर्जा गोठण्यात झाला ० राष्ट्र आधी मग जात ० राष्ट्र नसेल तर जातीला घेऊन करायचे काय हा विचार दलितांनी केला पाहिजे ० ब्रिटिशांना मुक्तिदाते मानण्याचा वेडेपणा त्यांनी करू नये ०

खरे सांगायचे तर दलितांनी आता दलित म्हणून विचार करण्याचे थांबविले पाहिजे ० ते आता गावकुसाबाहेर राहिलेले नाहीत ० ते आता विराट भारतीय समाजाचा समरस होत असलेला अवश्यमेव भाग म्हणून विशेष दायित्वाचे निर्वहन करीत आहेत ० अस्पृश्यता संविधानाने आणि निर्बंधाने लौकिक व्यवहारातून नाहीशी झाली असून मनामनातूनही गाशा गुंडाळण्याच्या मार्गावर आहे ० थोडा वेळ लागेल पण आज ना उद्या ते होणार आहे ० राजकीय आणि शैक्षणिक आरक्षणाच्या आधारावर ते सवर्णांच्या मांडीला मांडी लावून सुसंवाद करू शकतात ० प्रामाणिकपणे थोडा नेट लावला तर दलित हा शब्द पुढच्या काही दशकात इतिहासजमा होऊ शकतो ० अशी रक्तहीन क्रांती केवळ ह्या देशात होऊ शकते कारण ह्या देशात हिंदू बहुसंख्य आहेत आणि ह्या देशाचे भावविश्व हिंदू हितसंबंधांनी गुंफलेले आहे ०

भीमा-कोरेगाव वादावरून झालेल्या उद्रेकाच्या निमित्ताने राहून गांधी ह्यांनी रा स्व संघ दलितविरोधी असल्याचे विधान केले ० मोदी आणि फडणवीस ह्यांची राजवट म्हणजे पेशवाई असल्याचे कोणी म्हणाले ० थोडक्यात हिंदुत्वनिष्ठ दलितविरोधी असतात असे भासविण्याचा हा प्रयत्न आहे ० इतका खोटा प्रचार दुसरा असू शकत नाही ० स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर हे हिंदुहृदयसम्राट म्हणून ओळखले जातात ० रत्नागिरीच्या १९२४ ते ३७ ह्या तेरा वर्षाच्या स्थानबद्धतेत समाजसुधारणेचा चमत्कार त्यांनी करून दाखविला ० रात्रंदिवस जिव्हाळ्याचा लोकसंपर्क साधून त्यांनी रत्नागिरी जिल्ह्यापुरती अस्पृश्यता नष्ट केली ० शेकडो सहभोजने घडवून आणली ० पतित पावन मंदिर स्थापन केले ० दलितांची कीर्तने ह्या मंदिरात झाली ० दलितोद्धाराचे असे सर्वोत्तम काम आजपर्यंत कोणालाही करता आले नाही असे भले समाजसुधारक विठ्ठल रामजी शिंदे ह्यांना वाटले आणि आपले उरलेले आयुष्य सावरकरांना द्यावे अशी ईश्वरचरणी त्यांनी प्रार्थना केली ० भारताच्या स्वातंत्र्यप्राप्तीसाठी सर्वोच्च पराक्रम,सर्वोच्च त्याग आणि सर्वश्रेष्ठ सृजनशीलता ह्यांचा साक्षात्कार सावरकरांनी घडविला ० आपल्या साम्राज्याचा सर्वात घातक शत्रू सावरकर आहेत असे ब्रिटिश मानत ० समकालीन राजकीय नेत्यांमध्ये आणि विचारवंतांमध्ये डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे कोणाशी सख्य जुळले असेल तर ते सावरकरांशी ० तेव्हा दलित बंधुभगिनी इंग्रजांविषयी भक्ती आणि सावरकरांविषयी दूरत्व कसे ठेवू शकतात ? तीच गोष्ट संघाची ० मराठवाडा नामांतर प्रकरणात दलित आणि इतर ह्यांच्यात सामंजस्य राहावे म्हणून संघाने केलेले परिश्रम विसरता येणार नाहीत ० असे अभिमानाने म्हणता येईल की संघ ही कदाचित एकमेव सामाजिक संघटना असावी की जेथे कोणी कोणाला जात विचारत नाही आणि सर्व व्यवहार मनमिळाऊपणे चालतात ०

पेशवाई नष्ट केली म्हणून दलितांना जर इंग्रज मुक्तिदाते वाटत असतील तर मुक्तिदाता शब्दाचा अर्थ त्यांनी समजून घेतला पाहिजे ० नरसिंहराव पंतप्रधान जाहले तेव्हा गोविंदराव तळवलकरांनी त्यांची मुलाखत घेतली ० ती पूर्णपणे मराठीत झाली ० सरदार पटेलांविषयी बोलतांना त्यांनी ते आमचे मुक्तिदाते आहेत असे म्हटले ० पटेलांनी हैद्राबाद संस्थान निझामाच्या तावडीतून मुक्त करून स्वतंत्र भारताला इतर राज्याप्रमाणे जोडले नसते तर आम्ही कायमचे पारतंत्र्यात राहिलो असतो असे नरसिंहराव म्हणाले ० इतके निझामाचे हिंदूंवरील अत्याचार क्रूर आणि अनिर्बंध होते असे त्यांनी पुढे सांगितले ० ह्या निझामाच्या अत्याचारी राजवटीविरुद्ध सावरकरांनी निशस्त्र प्रतिकार लढा सुरु केला ० त्यात विविध संघटनांचे हजारो कार्यकर्ते सामील झाले ० तथापि निझामाविरुद्ध लढा करू नका असा आदेश गांधींनी हैद्राबाद काँग्रेससाठी काढला होता ० तो झुगारून काही काँग्रेसजनही लढ्यात उतरले ० निझामाचे स्वातंत्र्य नाहीसे करण्यास नेहरूंचा इतका विरोध होता की शेवटी त्यांना अंधारात ठेवून पटेलांना हैद्राबादमध्ये सैन्य उतरवावे लागले ० राहुल गांधींनी अमका तमक्याच्या विरोधात आहे असली बाष्कळ विधाने करतांना आपल्या पणजोबांचे चरित्र एकदा वाचले पाहिजे ० म्हणजे त्यांची नैतिक बैठक कशी आहे ह्याची अटकळ त्यांना येईल ०


असे साहित्य वाचत राहण्यासाठी लाईक करा आमचे फेस बुक पेज 

www.facebook.com/SmartMaharashtraOnline


सांगलीचे संभाजीराव भिडे गुरुजी आणि पुण्याचे मिलिंद एकबोटे ह्यांनी हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्त्यांना भडकावल्यामुळे असंतोषाचे रूपांतर दंगलसदृश परिस्थितीत झाले असा आरोप आहे ० त्या विषयात भारतीय दंड संहिता काय करायचे ते करील ० पण या निमित्ताने ह्या दोन व्यक्तिमत्वांविषयी अपप्रचार केला जात आहे तो योग्य नाही ० भिडे गुरुजी म्हणजे धगधगीत वैराग्य आहे ० छत्रपती शिवाजी महाराज हे त्यांचे आराध्यदैवत आहे आणि त्यांच्या चरित्राचे मर्म समजून घेऊन महाराष्ट्रातील युवकांनी आपले जीवन पुरुषार्थी आणि विजिगीषू करावे म्हणून आज ८५ व्य वर्षीही ते अहोरात्र कार्यशील असतात ० मिलिंद एकबोटे हा पैसे न खाता लोकांची कामे करणारा नगरसेवक म्हणून ओळखला जातो ० निवडून येण्यासाठी ते लोकानुरंजन करीत नाहीत ० सर्वार्थाने ते देशभक्त आहेत ० काही प्रसारमाध्यमांनी ह्या दोघांचा एकेरी उल्लेख केला ते बरोबर झाले नाही ० याकूब मेमन आणि भिडे गुरुजी तसेच एकबोटे ह्यांना एकाच पातळीवर मोजण्याचा अश्लाध्य प्रयत्न प्रकाश आंबेडकर ह्यांनी केला त्यावरून ते सध्या कोणाच्या संगतीत आहेत ते स्पष्ट होते ० मी त्यांच्या म्हणजे प्रकाशजींच्या पूर्वी मुलाखती घेतलेल्या आहेत ० त्यावेळी आजोबांचा काहीसा का होईना त्यांचेवर प्रभाव होता ० अलीकडे मी त्यांना भेटलेलो नाही ० पण मला त्यांची काळजी वाटते ० त्यांनी भिडे गुरुजी आणि एकबोटे ह्यांच्याशी एकदा पूर्वग्रह बाजूला ठेवून बोलले पाहिजे ०

भीमा-कोरेगांव उद्रेकाचा उद्देश फडणवीस आणि मोदी सरकार हटविणे हा असू शकतो ० त्यामागे कोणीही असू शकतो ० लोकसभेची वर्ष २०१९ मध्ये होणारी सार्वत्रिक निवडणूक होईपर्यंत असे अनेक उद्रेक होऊ शकतात ० नरेंद्र मोदी हा पहिला पंतप्रधान असा आहे की जो भारतीय समाजाला आत्मभान देण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न करीत आहे ० भारत जसा आहे तसा लपविण्याचा प्रयत्न आजपर्यंत झाला ० तो हिंदुबहुल आहे हे नेहरूंनी आमच्यापासून लपवून ठेवले असे मध्यपूर्वेतल्या एका सुलतानाने बाबरी मशीद पडल्यावर टाइम्स ऑफ इंडियाला सांगितले ० हिंदुत्व हीच आमची ओळख आहे ० ऊर्जा आहे ० ती घेऊन भारताला महासत्ता बनविण्याचा खटाटोप मोदी करत आहेत ० हे काम चीनला आणि पाकिस्तानला आवडणारे नाही तसे ते काँग्रेस पक्षाला आणि काँग्रेस संस्कृतीत वाढलेल्या इतर पक्षांना आवडणारे नाही ० अशा परिस्थितीत आपण कोठे असले पाहिजे ह्याचा विचार दलितांनी करायचा आहे ०

ह्या देशाच्या संस्कृतीची हानी होईल असे मी काही करणार नाही असे डॉ आंबेडकर ह्यांनी धर्मांतराच्या वेळी सांगितले होते ० म्हणून त्यांनी बौद्ध धर्म स्वीकारला ० बाबासाहेबांचे काँग्रेसशी आणि कम्युनिस्टांशी कधी जमले नाही ० जगाला दोन गोष्टी सांगण्याचे नैतिक आणि सैनिकी सामर्थ्य भारताजवळ येईल तेव्हा तो गीतेतले कृष्णाचे आणि भगवान गौतम बुद्धाचे तत्वज्ञान ह्यांवाचून जगाला दुसरे काय सांगू शकेल ? कारण तोच आमचा उत्तमतला उत्तम असा साठा आहे असे सावरकर एकदा म्हणाले होते ० दलितांनी ह्या सगळ्याचा एकदा शांतपणे विचार करावा ० पेशवाई नष्ट केली म्हणून इंग्रजांना अभिवादन करण्याने ते पुन्हा पारतंत्र्याच्या दिशेने प्रवासाला निघाले आहेत ० हिंदू जीवनशैली ही आपणा सर्वांची जीवनशैली आहे आणि ती प्रवाही आहे ० ती सर्वसमावेशक आहे ० कालानुरूप बदलणारी आहे तरी शाश्वत सत्याची तिला चिरंतन ओढ आहे ० त्यामुळे तिची न्यायबुद्धी कधी मलूल होत नाही ० सूज्ञास अधिक काय सांगावे ? असो ०

लेखक: अरविंद विठ्ठल कुळकर्णी

संपर्क: ०९६१९४३६२४४


असे साहित्य वाचत राहण्यासाठी लाईक करा आमचे फेस बुक पेज 

www.facebook.com/SmartMaharashtraOnline

Previous Article

४ जानेवारी 

Next Article

एकनाथजी रानडे- जीवन वृत्तांत

You may also like