कॉर्पोरेट क्षेत्राच्या सहभागातून विविध सामाजिक क्षेत्रात आमूलाग्र बदल घडविण्याच्या उद्देशाने विविध कॉर्पोरेट कंपन्यांबरोबर 34 सामंजस्य करार

Author: Share:

विविध कॉर्पोरेट कंपन्यांबरोबर ३४ सामंजस्य करार

मुंबई : कॉर्पोरेट क्षेत्राच्या सहभागातून विविध सामाजिक क्षेत्रात आमूलाग्र बदल घडविण्याच्या उद्देशाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत आज विविध कॉर्पोरेट कंपन्यांबरोबर ३४ सामंजस्य करार करण्यात आले. राज्य शासन आणि कॉर्पोरेट क्षेत्राच्या एकत्रित सहभागातून राज्याचा सर्वांगिण विकास करण्याच्या दिशेने हे सामंजस्य करार अत्यंत महत्त्वाचे आहेत, असे प्रतिपादन मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी यावेळी केले.

टाटा ट्रस्टस्, टाटा पॉवर, टाटा केमिकल, टाटा सेंटर ऑफ डेव्हलपमेंट– शिकागो विद्यापीठ, इग्ना फाउंडेशन, आदित्य बिर्ला फाउंडेशन, एटीई फाउंडेशन, आर झुनझुनवाला फाउंडेशन, आर. के. दमानी, इनाम होल्डिंग्ज, वाईल्ड लाईफ कॉन्सर्वेशन ट्रस्ट, बिलियन लाईव्हज, सेंटर फॉर डिजिटल फायनान्शिअल इन्क्लुजन या कॉर्पोरेट संस्था आणि राज्य शासनाचे विविध विभाग यांच्यामध्ये विविध ३४ सामंजस्य करार करण्यात आले. आरोग्य, पोषण, वन्यजीव संवर्धन, पशुसंवर्धन, कौशल्य विकास, आदिवासी मुलांचे शिक्षण, जलसंधारण, माजी मालगुजारी तलावांचे संवर्धन, ग्रामविकास आदी विविध क्षेत्रात काम करण्याबाबत हे सामंजस्य करार आहेत.

कॉर्पोरेट क्षेत्राचे ज्ञान, कौशल्य हे विकास प्रक्रियेत महत्त्वपूर्ण

मुख्यमंत्री श्री. फडणवीस यावेळी म्हणाले की, राज्यात विकास प्रक्रियेत कॉर्पोरेट क्षेत्र महत्त्वपूर्ण योगदान देत आहे. त्यांच्या सहभागाने राज्याच्या विकासाचा वेग निश्चितच मोठ्या प्रमाणात वाढेल. कॉर्पोरेट क्षेत्राकडे असलेले ज्ञान, संशोधन, कौशल्य, क्षमता, तंत्र आदींचा उपयोग करुन राज्याची विकास प्रक्रिया अधिक गतिमान केली जाईल. राज्य शासन आणि कॉर्पोरेट क्षेत्राच्या एकत्रित सहभागातून आज घेण्यात आलेल्या पुढाकारातून विकासाची फळे समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचतील. या एकत्रित सहभागातून राज्याच्या विकास प्रक्रियेत तसेच लोकांच्या जीवनमानात आमूलाग्र बदल घडून येतील, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

विविध सामाजिक क्षेत्रांचा समावेश असलेले सामंजस्य करार

नागपूर येथे रिजनल मेंटल हॉस्पीटलचा विकास करणे आणि मॉडेल मेंटल हेल्थ कार्यक्रमाची अंमलबजावणी करणे, चंद्रपूर जिल्ह्यात एल्डरली केअर कार्यक्रम राबविणे, नागपूर महापालिका क्षेत्रात आरोग्यविषयक कार्यक्रम राबविणे, गडचिरोली, गोंदिया, भंडारा, चंद्रपूर आणि नागपूर जिल्ह्यांमधील माजी मालगुजारी तलावांचे पुनरुज्जीवन करणे, अकोला, यवतमाळ आणि अमरावती जिल्ह्यात जलयुक्त शिवार अभियान राबविणे, नाशिक जिल्ह्यातील धरणे आणि तलावांतील गाळ काढणे, सोलापूर जिल्ह्यातील कासळगंगा नदीचे पुनरुज्जीवन करणे, गडचिरोली, नाशिक, नंदूरबार आणि पालघर जिल्ह्यातील ३० आदीवासी आश्रमशाळांचा विकास करणे, गडचिरोली आणि नागपूर जिल्ह्यात कर्करोग केअर सिस्टीम सुरु करणे, गोरेगाव आणि परेल येथे पशुवैद्यकीय केंद्र सुरु करणे आदींबाबत टाटा ट्रस्टस् बरोबर शासनाच्या विविध विभागांचे सामंजस्य करार करण्यात आले.

अमरावती जिल्ह्यात पोषण कार्यक्रम राबविण्याबाबत टाटा केमिकल बरोबर सामंजस्य करार करण्यात आला. मागासवर्गीय आणि आदिवासी युवकांना कौशल्य विकास प्रशिक्षण उपलब्ध करुन देणे, जव्हार, जि. पालघर येथील आयटीआयमधील तांत्रिक प्रशिक्षणात सुधारणा करणे, साकूर, ता. जव्हार येथील आदिवासी मुलींच्या निवासी शाळेचा विकास, जव्हार तालुक्यात आदीवासी गावांचा विकास आदीबाबत टाटा पॉवर बरोबर संबंधीत विविध विभागांचे सामंजस्य करार करण्यात आले.

गाळमुक्त धरण – गाळयुक्त शिवार अभियानाबाबत टाटा सेंटर ऑफ डेव्हलपमेंट – शिकागो विद्यापीठ बरोबर सामंजस्य करार करण्यात आला. नागपूर, अमरावती आणि औरंगाबाद विभागातील सुमारे ५०० पाण्याचे स्त्रोत गाळमुक्त करणेबाबत यावेळी विविध कंपन्यांबरोबर लेटर ऑफ इंटेंटची देवाण-घेवाण करण्यात आली.

गावांच्या विकासासाठी विविध सामंजस्य करार

राज्य शासन आणि कॉर्पोरेट क्षेत्राच्या एकत्रित सहभागातून गावांचा कायापालट करण्याच्या उद्देशाने व्हीलेज सोशन ट्रान्सफॉर्मेशन फाउंडेशन स्थापन करण्यात आले आहे. याअंतर्गत आदित्य बिर्ला फाउंडेशनबरोबर गडचिरोली जिल्ह्यातील गावांच्या विकास कार्यक्रमाबाबत सामंजस्य करार करण्यात आला. अमरावती, गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यातील गावांच्या विकास कार्यक्रमाबाबत टाटा ट्रस्टस्बरोबर सामंजस्य करार करण्यात आला. बीड जिल्ह्यातील गावांच्या विकास कार्यक्रमाबाबत एटीई फाउंडेशन, आर झुनझुनवाला फाउंडेशन, डी – मार्ट, इनाम होल्डींग्ज यांच्याबरोबर सामंजस्य करार करण्यात आले. चंद्रपूर जिल्ह्यातील गावांच्या विकास कार्यक्रमाबाबत वाईल्ड लाईफ कॉन्सर्व्हेशन ट्रस्ट यांच्याबरोबर सामंजस्य करार झाला. व्हीलेज सोशन ट्रान्सफॉर्मेशन मिशनअंतर्गत बिलीयन लाईव्हज आणि सेंटर फॉर डिजिटल फायनान्शिअल इन्क्लुजन यांच्याबरोबरही यावेळी सांजस्य करार करण्यात आले.

सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे झालेल्या या कार्यक्रमास वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवर, ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे, आदिवासी विकास मंत्री विष्णू सवरा, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, पदूम मंत्री महादेव जानकर, गृह राज्यमंत्री डॉ. रणजीत पाटील, मुख्य सचिव सुमीत मल्लिक, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव प्रवीण परदेशी, आदीत्य बिर्ला सेंटर फॉर कम्युनिटी इनिशिएटिव्हच्या अध्यक्षा श्रीमती राजश्री बिर्ला, टाटा ट्रस्टचे विश्वस्त अमीत चंद्रा, टाटा पॉवरचे व्यवस्थापकीय संचालक अनिल सरडाणा, झुनझुनवाला फाउंडेशनचे राकेश झुनझुनवाला, डी – मार्टचे संस्थापक राधाकृष्ण दमाणी, वाईल्डलाईफ कॉन्झर्वेशन ट्रस्टचे अध्यक्ष हेमेंद्र कोठारी, इनाम होल्डींगचे अध्यक्ष वल्लभ भन्साळी, डॉ. आनंद बंग मान्यवर उपस्थित होते.

बातमी साभार: महान्यूज 

Previous Article

८ डिसेंबर 

Next Article

मंत्रिमंडळ निर्णय : महिला उद्योजकांसाठी राज्याचे विशेष धोरण

You may also like