मुकादम आणि दुय्यम नागरिकत्व !

Author: Share:

मुंबईत विले पार्ल्यामध्ये सोमवारी आठ जानेवारीला ‘ मॅजेस्टिक गप्पा ‘ अंतर्गत ‘ विवेकवादावर धर्मसंकट ‘ ह्या विषयावर जो परिसंवाद झाला तो एकंदरीत बरा झाला ० साधारणपणे अशा कार्यक्रमातून भारतातील सर्व समस्यांना हिंदुत्वाचे तत्वज्ञान आणि हिंदुत्वनिष्ठ संघटना उत्तरदायी आहेत असा निष्कर्ष काढण्याची विचारवंतांची पद्धत आहे ० तसे येथे झाले नाही ० जनतेच्या ऐहिक सुखाचा विचार करताना धर्म थोडा बाजूला ठेवला पाहिजे ह्यावर कसेबसे एकमत झाल्याचे दिसले ० अधिवक्ता किशोर जावळे , पत्रकार हेमंत देसाई . मुसलमानांच्या हितसंबंधांवर लिहिणारे अब्दुल कादर मुकादम आणि बिशप थॉमस डाबरे ह्यांनी चर्चेत भाग घेतला ० सूत्रसंचालन प्रसन्न जोशी ह्यांनी केले ० आपल्याकडील शाळामंध्ये इस्लामधर्मीय विद्यार्थ्यांच्या डब्यातील अन्नपदार्थ हिंदू मुले खात नाहीत , इस्लामने कुटुंब नियोजनाला फार पूर्वीपासून पाठिंबा दिला असल्याने मुसलमान त्यांची लोकसंख्या भरमसाट वाढवून भारतातील लोकसंख्येचा समतोल बिघडवीत आहेत असा प्रचार होऊ नये , ईशान्य भारतातील लोक हिंदू नसून आदिवासी आहेत आणि त्यांना ख्रिस्ती व्हावयाचे असेल तर तो त्यांचा हक्क आहे असे काही मुद्दे मांडले गेले ० पण जावळे ह्यांनी ‘ विवेकवादावर धर्मसंकट ‘ ह्या उद्घोषित विषयाला धरून चर्चा व्हावी आणि आपला धर्म कसा सर्वार्थाने चांगला ह्यावर प्रवचने देण्यापेक्षा प्रत्येक धर्माच्या अनुयायांचे व्यवहार कसे होत आहेत ते विचारात घ्यावे असा आग्रह धरल्याने चर्चा भरकटली नाही आणि जोशी ह्यांनाही सूत्रे सांभाळणे काहीसे सोपे झाले ० टीआरपीसाठी टीव्हीवर चाललेला कार्यक्रम असे स्वरूप त्याला आले नाही ०

कार्यक्रम संपल्यानंतर श्रोते लगेच घरी परतले नाहीत तर त्यांनी वक्त्यांशी आणि आपापसात चर्चा केली ० गोमांस खाण्याचे स्वातंत्र्य काही लोकांना हवे असेल तर ते न खाण्याचे स्वातंत्र्य त्यांच्यापेक्षा कितीतरी पटीने अधिक लोकांना हवे आहे आणि त्या स्वातंत्र्याचा मान ठेवण्यासाठी आम्ही घरी गोमांस शिजवत नसल्याने आमच्या पाल्यांच्या डब्यातील पदार्थांचा आस्वाद घेण्यास कांकू करू नये असे नम्र प्रगटीकरण त्या पालकांनी वर्गात येऊन केले पाहिजे असे काहीजण म्हणाले ० इस्लामचा कुटुंब नियोजनाला पाठिंबा असेल तर चार बायका करण्याची सवलत आम्ही परत करतो त्यादृष्टीने विधिपूर्वक समता निर्माण करा अशी मागणी मुसलमान समाजाकडून पुढे यायला हवी असाही मुद्दा मांडण्यात आला ० ईशान्य भारतातील लोकांची मूळ संस्कृती नष्ट करून त्यांना येशूमय करण्याचा हक्क ख्रिस्ती धर्मगुरूंना हवा असेल तर ती मूळ संस्कृती सर्व चराचरात ब्रह्मत्व अनुभवणाऱ्या सर्वसमावेशक हिंदू संस्कृतीला अधिक जवळची आहे असे मानून तिला हिंदुत्वाच्या परिघाबाहेर जाऊ न देण्याचा हिंदुच्या धार्मिक आणि सामाजिक संघटनांना अधिक न्याय्य हक्क आहे असेहि सांगण्यात आले ०

असे साहित्य वाचत राहण्यासाठी लाईक करा आमचे फेस बुक पेज 

www.facebook.com/SmartMaharashtraOnline

परिसंवादातील वक्त्यांची भूमिका ऐकून घेण्याची होती , उलटून वार करण्याची आक्रमक नव्हती हे लक्षात आले ० हा बदल आशादायी आहे ० हा एकंदर वातावरणाचा परिणाम आहे ० अशा चर्चा व्हायला हव्यात आणि सर्व समाजघटकांनी देशहिताला अग्रक्रम देऊन आपले आचारविचार निश्चित करायला पाहिजेत ० असे परिसंवाद होत राहिले तर विवेकवादावर जे धर्मसंकट चाल करून येत राहिले आहे त्यावर परिणामकारक उपाय सापडेल ०
विवेकवाद म्हणजे मनुष्याला केंद्रीभूत मानून मनुष्याने मनुष्याच्या ऐहिक सुखाचा विचार आपल्या सद्सद्विवेकबुद्धीने आणि न्यायबुद्धीने करणे होय ० मनुष्याच्या सर्वांगीण प्रगतीचा विचार करून आजच्या परिस्थितीत त्याने काय करणे योग्य आहे ह्याचा धर्मादिक अवडंबराला कठोरपणे बाजूला सारून निःपक्षपातीपणे निर्णय घेण्याची क्षमता अंगी येणे म्हणजे विवेकवादाच्या दिशेने पडलेले आश्वासक पाऊल होय ० ह्यालाच बुद्धिप्रामाण्यवाद असेही म्हणता येईल ०

स्वातंत्र्यवीर सावरकरांनी ‘ दोन शब्दात दोन संस्कृती ‘ ह्या निबंधात बुद्धिप्रामाण्यवाद स्वीकारल्याने वा न स्वीकारल्याने काय लाभहानी होते त्याचे सुंदर विवेचन केले आहे ० भारतीय संस्कृती श्रुतिस्मृतिपुराणोक्त आहे तर पाश्चात्य संस्कृती अद्यतन आहे असे सावरकरांनी म्हटले आहे ० वर्तमानकाळात हिंदूला लहानमोठी कोणतीही गोष्ट करायची असेल तर तो तसे करण्याला वेदात आणि पुराणात आधार आहे काय ह्याचा शोध घेतो आणि सापडल्यास निर्धास्त होतो ० पाश्चात्य माणूस परिस्थितीला अनुरूप असे आज मी काय करायला पाहिजे इतकेच पाहतो ,त्यासाठी तो आपल्या सारासारबुद्धीवर विश्वास ठेवतो आणि त्यासाठी त्याला बायबलमध्ये आधार सापडला नाही तरी त्याचे काही बिघडत नाही ० सावरकर असे म्हणाले आहेत की युरोपने धर्मग्रंथांचे पहिले आणि शेवटचे पृष्ठ मिटून ठेवले आणि विज्ञाननिष्ठा अंगिकारण्याचा निर्णय घेतला त्याक्षणी युरोप भौतिक प्रगतीच्या दिशेने कित्येक शतके पुढे गेला ० विज्ञाननिष्ठेचा स्वीकार करा असा समुपदेश सावरकरांनी हिंदू आणि मुसलमान ह्या दोन्ही धर्माच्या अनुयायांना दिला ० मुसलमान श्रोते समोर ठेवून सावरकरांनी सुधारणाविषयक बरेच लिखाण केले आहे ०

आंबेडकरांचा अपवाद सोडल्यास प्रबोधनाच्या माध्यमातून मुसलमानांशी जवळीक साधण्याचा प्रयत्न सावरकर सोडल्यास समकालीनांमध्ये अन्य कोणा राष्ट्रीय नेत्याने केलेला दिसत नाही ० पश्चिमेकडे इस्लामचा मोठ्या प्रदेशावर प्रचार झाला , कारण त्या लोकांमध्ये शौर्यादि गुणात मुसलमानांपेक्षा काही कमीपणा होता असे नाही तर विज्ञाननिष्ठेत ते मुसलमानांइतकेच मागास होते हे आहे ; पाश्चात्यांनी विज्ञाननिष्ठ वृत्ती स्वीकारली आणि मागास मुसलमानांना युरोपमधून हाकलवून दिले ह्याकडे सावरकर त्यांचे लक्ष वेधतात ० सावरकरांना मुसलमान दुबळे न राहता बलवान व्हायला हवे होते हे अनेकांना माहीत नाही ० मुसलमान भारतीय समाजाचा घटक असल्याने ते मागास राहिले तर सामाजिक असमतोल निर्माण होऊन त्याचा दुष्परिणाम राष्ट्राच्या प्रगतीवर होईल अशी भीती सावरकरांना वाटत असे ० ते सावरक सूत्र पकडून अशा परिसंवादातून एक महत्वाची मागणी पुढे यायला हवी आणि यथाकाल ती येईल ह्याची मला आशा आहे ० भारताचे सर्वांगीण हित कशात आहे ते ठरवा आणि त्याला अनुरूप अशी एकाचाही अपवाद न करता सर्व धर्मग्रंथांचे चिकित्सा करा अशी मागणी सर्व धर्मगुरूंनी कार्याला हवी ० मनुस्मृती,कुराण , बायबल असे सर्व धर्मग्रंथ एकदा कसोटीला लावा आणि त्यातले काय हवेनको ते शक्यतो सर्वसंमतीने निश्चित करा असे म्हणणारे लोक वाढले पाहिजेत ० तो विवेकवादाचा विजय असेल ०

विवेकवाद जेव्हढा बलिष्ठ होईल तेव्हढी अल्पसंख्याकामधील धर्मांधता आणि फुटीरता कमी होईल आणि एकात्म समाज निर्मितीच्या दृष्टीने बहुसंख्यांकांचे त्यांच्या अन्य धर्मीय बांधवांशी फारसे मतभेद राहणार नाही ० त्यासाठी असे परिसंवाद व्हायला हवेत आणि त्यात अधिवक्ता किशोर जावळे ह्यांच्यासारख्या बुद्धिप्रामाण्य व्यक्तींनी भाग घ्यायला हवा ० ह्या परिसंवादात मुकादम प्रकरण नावाचे एक उपाख्यान झाले ० ते झाले नसते तर बरे झाले असते ० ते काहीसे विनोदी,लबाडीचे आणि बाप दाखव नाहीतर श्राद्ध कर अशा प्रकारचे होते ० त्याचे असे झाले ० जावळे सावरकरांना बुद्धिप्रामाण्यवादी म्हणाले ० त्याबरोबर त्यांच्या शेजारी बसलेले अब्दुल कादर मुकादम ह्यांनी विचारले की त्यांच्या राज्यात मुसलमानांना दुय्यम नागरिकत्व बहाल करण्यात आले हे कसे काय ० जावळे म्हणाले की असेच काहीतरी तुम्ही बडबडत असता आणि समोर श्रोत्यात बसलेल्या अरविंदराव कुळकर्ण्यांना तुम्ही अस्वस्थ करता ० ते तुमच्याकडे पुरावे मागतात आणि तुम्हाला त्यासाठी नियमित अंतराने फोन करतात ० मग तुम्ही पळ काढता ० त्यावर मुकादम म्हणाले की कुळकर्णी नावाच्या माणसाने मला कधी फोन केल्याचे आठवत नाही ० पण त्यांना पुरावा पाहिजे असेल तर मी आता देतो ० पुरावा हा की आंबेडकर तसे म्हणाल्याचे मी वाचले आहे ०

आता श्रोत्यात बसलेला मी स्वस्थ बसणे शक्य नव्हते ० वक्ते आणि श्रोते ह्यांच्यातील अनेकांनी जागा सोडलेली नव्हती ० मी व्यासपीठावर गेलो आणि मुकादमांना म्हणाले की , ” तोच मी अरविंद कुळकर्णी ० काही वर्षांपूर्वी म्हणजे साधारण आठ वर्षांपूर्वी अंधेरीच्या विजयनगरमध्ये विसावा संस्थेच्यावतीने आपले भाषण झाले होते ० त्यावेळी सावरकरांच्या हिंदुराष्ट्राच्या संकल्पनेत मुसलमानांना दुय्यम नागरिकत्व देण्यात आलेले आहे असे विधान आपण केलेत आणि सावरकर मुस्लिमद्वेष्टे असल्याची जोरदार टीका केलीत ० ती सभा संपल्यावर मी अध्यक्षांच्या अनुमतीने ध्वनिक्षेपक हाती घेतला आणि म्हणालो की मुकादम महाशय ,माझ्याकडे जेव्हढे सावरकर साहित्य आहे त्यात सावरकर असे म्हणाल्याचे मी वाचलेले नाही ० तुम्ही कोठे वाचलेत ते सांगाल काय ? त्यावर तुम्ही म्हणालात की आठवत नाही आणि असे पटकन सांगता येणार नाही ० मी म्हटले काही बिघडत नाही ० मी ह्या सर्व लोकांच्या साक्षीने सांगतो की मी प्रत्येक महिन्याला एक दूरध्वनी तुम्हाला करीन ० तुम्ही मला केवळ पुस्तकाचे नाव आणि पृष्ठ क्रमांक सांगायचा आहे ० सहा महिन्यानंतरही तुम्ही मला पुरावा देऊ शकला नाहीत तर तुमच्याविषयी योग्य ते मत बनवायला मी मोकळा राहीन ०

पार्ल्याच्या सभेत सोमवारी मी मुकादमांना म्हणाले की आज माझे मत सांगतो ० तुम्ही बौद्धिकदृष्ट्या प्रामाणिक नाही ० लबाड आहात ० पण मी सावरकरवादी आहे ० पुरावे न देता सावरकरांच्या चरित्राविषयी आणि चारित्र्याविषयी संशय निर्माण करणारी विधाने बेधडकपणे करण्याचा हा तुमचा उद्योग मी खपवून घेणार नाही ० मुकादम म्हणाले की मी त्यांचा आदर करायला पाहिजे ० मी म्हणाले की मी त्यांचा आदराचा करीत आहे ० तुम्हीं सावरकरांचा आदर नाही केलात तरी चालेल पण त्यांच्याविषयी खोटी विधाने करू नका इतकेच माझे सांगणे आहे ०

मी घरी आलो आणि माझ्या मनातून हा विषय गेला ० मुकादमांनी योग्य तो बोध घ्यावा इतकीच माझी विनंती आहे ० माझ्या मनात त्यांच्याविषयी राग आहे त्यापेक्षा दया अधिक आहे ० गांधी,नेहरू आणि एकंदर काँग्रेस संस्कृती ह्यांनी सावरकरविरोधी परिस्थितीचा जो रेटा उत्पन्न केला त्याला बळी पडून ते बोलत आहेत ० त्यांनी त्यातून बाहेर यावे ० सावरकर एकदा नीट वाचावा ० पार्ल्याच्या सभेत मुकादम मला म्हणाले की हिंदुत्वाच्या व्याख्येत पुण्यभू आणून सावरकरांनी आम्हाला बाहेर काढलेच की ० मी म्हणाले की तुम्ही ‘ हिंदुत्व ‘ नीट वाचलेले नाही ० तुम्हाला पोटात घेणारी हिंदुत्वाची गंगा तुमच्या दारासमोरून वाहत असतांना बारीकसारीक गोष्टीसाठी बादली घेऊन तुम्ही मक्केकडे का जात असता असा प्रश्न सावरकरांनी तुम्हाला विचारला आहे ० हिंदुमहासभेच्या अध्यक्षपदावरून बोलतांना १९३७ मध्ये सावरकरांनी , तत्वत: हिंदुराष्ट्र व्यवहारात हिंदी राज्य होईल आणि त्यात मुसलमानांना जेव्हढे अधिकार असतील त्यापेक्षा एकही ज्यादा अधिकार हिंदू मागणार नाहीत असे अभिवचन दिले आहे ०

मुकादमांना घरी जाण्याची घाई होती त्यामुळे चर्चा थांबली ० काळजी नाही ० ती पुन्हा सुरु करता येईल ० भूतपूर्व नरसिंहराव , डॉ वि रा करंदीकर अशा दिग्गजांशी मी प्रत्यक्ष समोरासमोर आणि प्रगटपणे किंवा प्रदीर्घ पत्रव्यवहाराने चांगल्या अर्थाने वाद केला आहे आणि त्यांना त्यांची सावरकरांविषयीची चुकीची मते बदलायला लावली आहेत ० तसे मुकादम ह्यांचेही होईल असा मला विश्वास आहे ० असो ०

लेखक: अरविंद विठ्ठल कुळकर्णी
संपर्क: ०९६१९४३६२४४

Previous Article

पुस्तक परिचय स्पर्धा २०१७ चे विजेते

Next Article

भारतीय अर्थव्यवस्थेचा गोषवारा!

You may also like