काँग्रेस,संघ आणि सेनादले !

Author: Share:

राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर खोटेपणाने टीका करण्याची आणखी एक संधी काँग्रेसला मिळाली आहे ० संघाने भारताच्या सेनादलांचा,तिरंगी ध्वजाचा , हुतात्म्यांचा आणि संविधानाचा अपमान केला आहे ,संघाने सेनादलाचे मनोधैर्य खच्ची करण्याचा प्रयत्न केला आहे ,निमलक्षरी संघटनेच्या स्वरूपात संघ पुढे येतो आहे अशी विधाने काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी , राज्यसभा सदस्य आनंद शर्मा आणि अन्य काही नेते ह्यांनी केली आहेत ० सरसंघचालक मोहनराव भागवत ह्यांचे अलीकडील वक्तव्य ह्या नव्या वादंगास कारणीभूत ठरले आहे ० एकदा युद्ध पेटल्यानंतर त्यास समर्थपणे सामोरे जाण्यासाठी त्या विशिष्ठ परिस्थितीत नागरिकांच्या काही निवडक तुकड्यांना सिद्ध करण्याकरिता साधारणपणे सहा महिने लागतात पण संघ स्वयंसेवक अवघ्या तीन दिवसात सज्ज होऊ शकतात असे सरसंघचालकांचे विधान आहे ० त्यांनी तुलना संघ स्वयंसेवक आणि अन्य नागरिक ह्यांच्यात केली आहे पण ही तुलना संघ स्वयंसेवक आणि सेनादलातील जवान ह्यांच्यात करण्यात आली आहे असा समज लोकात पसरविण्याचा प्रयत्न काँग्रेस करीत आहे ०

भारताची सेनादले संघाच्या देशभक्तीपर कार्याच्या दीर्घ आणि घट्ट परंपरेशी चांगली परिचित असल्यामुळे काँग्रेस ह्या दोघांमध्ये संशयाचे वातावरण निर्माण करू शकणार नाही ० सर्वसामान्य लोकही काँग्रेसच्या दुष्ट प्रचाराला बळी पडण्याची शक्यता कमी आहे ० तथापि विषय निघालाच आहे तर काँग्रेसचा संघाला विरोध का आहे ते लोकांना , पुनरक्तीचा दोष पत्करूनही , समजावून सांगणे आवश्यक आहे ० मुसलमानांसाठी काँग्रेस संघाला नेहमी विरोध करते आणि हे लांगुलचालन काँग्रेसच्या तत्वज्ञानातून उत्पन्न झाले आहे ० मुसलमानांसमोर काँग्रेस सेनादलांनाही मोजत नाही तेथे तिने संघाची पत्रास का बाळगावी ? कसे ते पाहू ०

काँग्रेसच्या स्थापनेच्या म्हणजे पहिल्याच वर्षात , वर्ष १८८५ मध्ये , हिंदू राष्ट्र मोडून हिंदी राष्ट्र निर्माण करण्याचा संकल्प काँग्रेसने सोडला ० आम्ही मुसलमानच राहणार असल्याने आणि हिंदूंशी सहजीवन अशक्य असल्याने हिंदी राष्ट्रात आम्ही सामील होण्याचा प्रश्नाच उद्भवत नाही असे मुसलमानांनी तेव्हाच स्पष्ट केले होते ० तेव्हा मुसलमानांना राजी करण्यासाठी हिंदूंनी ते नेहमी असतात त्याहून कितीतरी अधिक उदार आणि क्षमाशील होण्याचे ठरविले ० लोकमान्य टिळक असेपर्यंत हिंदी राष्ट्राची संकल्पना हा हिंदू-मुस्लिम ऐक्याच्या दृष्टीने एक प्रयोगशील उपक्रम होता ० गांधीयुग सुरु झाल्यावर प्रयोगाचे रूपांतर अपरिवर्तनीय श्रद्धेत करण्यात आले ० स्वातंत्र्य आंदोलनाचे अग्रक्रम बदलण्यात आले ० हिंदू-मुस्लिम ऐक्याला सर्वोच्च प्राधान्य देण्यात आले ० त्यानंतरचा क्रम अहिंसा पालनाचा ठरविण्यात आला ० स्वातंत्र्य आंदोलनाला तिसरा क्रम मिळाला ० परिणामी भारताला स्वातंत्र्य मिळण्याआधी मुसलमानांना पाकिस्तान मिळाले ० पाकिस्तानातल्या आणि भारतातल्या मुसलमानांच्या दबावातून स्वतंत्र भारतात काँग्रेसचे सेनादलांविषयीचे आणि संघासारख्या देशहितासाठी काम करणाऱ्या संस्थांविषयीचे धोरण ठरत गेले ० हितरक्षणाचा मुद्दा येतो तेव्हा काँग्रेस प्रथम मुसलमानांचा आणि नंतर सेनादलाचा म्हणजे देशाचा विचार करते हे विधान अवास्तव वाटले तरी त्यात तथ्य आहे का ह्याचा शोध घेण्याचा प्रयत्न सोडता कामा नये ०

स्वातंत्र्यानंतर अडीच महिन्यातच पाकिस्तानने काश्मीरवर आक्रमण केले ० हे आक्रमण मोडून काढून संपूर्ण काश्मीर मुक्त करण्याच्या उद्योगाला भारताची सेनादले लागली होती ० परंतु काँग्रेसने सेनादलांना त्यांचे घटनादत्त कार्य करू दिले नाही ० काँग्रेसने अचानक युद्ध थांबविले आणि काश्मीरचा ४० प्रतिशत भूभाग पाकिस्तानच्या अधीन राहू दिला ० पुढे भारताच्या संसदेने १९९२ मध्ये एकमुखी ठराव करून पाकव्याप्त काश्मीर मुक्त करण्याचा सरकारला आदेश दिला ० परंतु काँग्रेसने त्याला भीक घातली नाही ० पंतप्रधान नरेंद्र मोदी ह्यांचे सरकार आज ना उद्या पाकव्याप्त काश्मीर मुक्त करणार हे काँग्रेसला माहीत आहे ० संघविरोधात कलुषित वातावरण निर्माण करीत राहून मोदी ह्यांच्या प्रयत्नात अडथळे आणण्याचा काँग्रेसचा डाव आहे ० पण तो यशस्वी होणार नाही ०

कारण भारताचे सैन्य संपूर्ण काश्मीर पाकिस्तानच्या तावडीतून स्वतंत्र करण्यास सक्षम आणि मग्न असतांना काँग्रेसने ते का होऊ दिले नाही हा प्रश्न लोक काँग्रेसला विचारणार आहेत आणि त्याचे उत्तर काँग्रेसला देता येणार नाही ० काँग्रेसने सैन्याला युद्धबंदीचा आदेश दिला हे एकच कृत्य काँग्रेस आणि भारताची सेनादले ह्यांची उद्दिष्टे समान नाहीत हे स्पष्ट करण्यास पुरेसे आहे ० पाकिस्तानची सेनादले आणि काँग्रेसची उद्दिष्टे काही प्रमाणात समान आहेत असे विधान देशभक्तीचा आवेग अनावर होऊन एखाद्या नागरिकाने केले तर थयथयाट न करता काँग्रेसने अंतर्मुख होऊन देशहित राखण्यात आपण कमी का पडलो ह्याचा विचार केला पाहिजे ० कारण पंतप्रधानपदाची शपथ घेताना जवाहरलाल नेहरू ह्यांनी भारताच्या सीमांचे संरक्षण करण्याचे वचन सर्व जनतेला दिले होते ० ते त्यांना पाळता आले नाही ० देशहिताला सर्वोच्च प्राधान्य देईन आणि अन्य कोणत्याही विचाराच्या आणि शक्तीच्या प्रभावाखाली आपण येणार नाही असेही वचन नेहरूंनी दिले होते ० मुसलमानांच्या हिताविषयी नेहरूंच्या मनात जो प्रचंड गोंधळ काम करीत होता तो इतका प्रभावी ठरला की सेनादलाचा विश्वासघात करताना त्यांना काही वाटले नाही ० काश्मीर म्हणजे आपली खासगी मालमत्ता आहे असे समजून नेहरूंनी त्याचे वाटप केले आणि तसे करतांना सेनादलांच्या मनोधैर्यावर त्याचा किती घातक परिणाम होईल ह्याचा विचार केला नाही ०

पाकिस्तानच्या परराष्ट्र आणि संरक्षण नीतीचा आज काश्मीर हा प्रधान मुद्दा आहे ० त्यासाठी त्याने आतन्कवादाचा आश्रय घेतला असून जागतिक आतन्कवादाचे पाकिस्तान प्रमुख केंद्र बनले आहे ० अन्य बड्या राष्ट्रांना काश्मीर प्रश्न भारताच्या बाजूने न सुटण्यात त्यांचा भौगोलिक आणि सामरिक स्वार्थ दडला आहे असे वाटू लागले आहे ० पाकिस्तानला संपूर्ण काश्मीर हवा आहे ० ह्या राक्षसी महत्त्वाकांक्षेमुळे भारताचे राजकारण अत्यंत गुंतागुंतीचे झाले आहेच पण भारताच्या विकासकार्यात आणि जागतिक महासत्ता बनण्यात फार मोठा अडथळा निर्माण झाला आहे ० हे सगळे पाप नेहरूंच्या कर्तव्यच्युतीचे आहे ० परंतु भारताची समर्थ सेनादले आणि देशहिताला सर्वोच स्थान देणारे मोदी ह्यांचे नेतृत्व ह्यांची समान राष्ट्रीय उद्दिष्टे लवकरच कार्यरत होतील आणि पाकिस्तानला धडा शिकविला जाईल अशी शक्यता काँग्रेसला वाटत आहे ० तसे झाल्यास मुसलमानांना काँग्रेसची आवश्यकता अजिबात वाटणार नाही ह्या भीतीने काँग्रेसला ग्रासले आहे ०

यशवंतराव चव्हाण केंद्रात गृहमंत्री असतांना त्यांनी आसाममधील बांगलादेशी घुसखोरांना हाकलवून लावण्याची मोहीम हाती घेतली होती ० त्यावेळचे राष्ट्रपती फकरुद्दीन अली अहमद ह्यांच्या हस्तक्षेपामुळे चव्हाणांना ती मोहीम यशस्वी करता आली नाही ०. मुसलमानांच्या हिताला प्राधान्य देऊन राष्ट्रहिताच्या प्रशासकीय कार्यात अडथळे आणण्याचे नेहरूंनंतरचे हे दुसरे ठळक उदाहरण ० असेच काश्मीरच्या भावनिक विलीनीकरणाविषयी म्हणता येईल ० भारतातील काश्मीरमधील मुसलमान प्रसन्न राहावेत म्हणून आम्ही अब्जावधी रुपये खर्च केले पण ते प्रसन्न झाले नाहीतच पण त्यांना भारतनिष्ठ बनविण्यातही आम्हाला फारसे यश आले नाही अशी स्वीकारोक्ती भूतपूर्व केंद्रीय मंत्री आणि महाराष्ट्राचे भूतपूर्व राज्यपाल सी सुब्रमण्यम ह्यांनी दिली होती ० काका गाडगीळांनी असे लिहून ठेवले आहे की हिंदू-मुस्लिम ऐक्याचे उद्दिष्ट चांगले होते पण ते प्रत्यक्षात आणण्याची कार्यवाही चुकीच्या पद्धतीने झाली ० सुब्रमण्यम आणि गाडगीळ ह्यांनी पुढे जाऊन तसे म्हटले नसले तरी त्याला अर्थातच कारण काँग्रेसचा दृष्टिकोन अवैज्ञानिक होता आणि गांधींचा त्याविषयातला अहंकार वास्तव नाकारणारा होता असे म्हटल्यास चुकीचे ठरणार नाही ० त्यासाठी मोपल्यांच्या बंडाचे उदाहरण घेऊ ०

पहिल्या महायुद्धात ब्रिटिशांनी तुर्कस्तानात असलेले जगातल्या सगळ्या मुसलमानांचे धर्मपीठ उध्वस्त केले ० ते पुनर्प्रस्थापित करण्यासाठी गांधींनी स्वातंत्र्य आंदोलन बाजूला ठेवून खिलाफत आंदोलन सुरु करण्याचा हिंदूंना आदेश दिला ० हिंदूंनी निरपेक्षपणे ह्या आंदोलनात प्रामाणिकपणे भाग घेतला ० परंतु ब्रिटिशांपुढे मुसलमानांची आणि गांधींची डाळ शिजली नाही ० त्याचा राग केरळमधील मुसलमानांनी तेथील हिंदूंवर सांगता येणार नाहीत इतके घाणेरडे अत्याचार करून काढला ० हेच ते कुप्रसिद्ध मोपल्यांचे बंड ० ब्रिटिशांना गुरखा पलटण पाठवून हिंदूंचे रक्षण करावे लागले ० गांधींनी ह्या अत्याचाराची बातमी दडपण्याचा प्रयत्न केला ० काँग्रेसला निषेधाचा ठराव करू दिला नाही ० मोपल्यांना गांधींनी उधडपणे माफ केले ०

आज त्या मोपल्यांच्या नातेवाईक वारसदारांना स्वातंत्र्यसैनिक म्हणून सर्व सुविधा मिळत आहेत ० काँग्रेस हिंदुविरोधी मोपल्यांना स्वातंत्र्यसैनिक मानते आणि हीच काँग्रेस नेहरू असेपर्यंत सावरकरांना स्वातंत्र्यसैनिक मानायला सिद्ध नव्हती ० संसदेमध्ये सावरकरांचे तैलचित्र अधिकृतपणे लागले ही स्वतंत्र भारताच्या इतिहासातील तीन अत्यंत दुर्दवी घटनांपैकी एक घटना होय असे गांधींचे नातू गोपालकृष्ण गांधी ह्यांनी म्हटले आहे ० ह्या देशाची स्वतंत्रता,सार्वभौमता,अखंडता आणि एकात्मता हा सेनादलांचा आणि रा स्व संघाचा अत्यंत आस्थेचा विषय आहे आणि त्यासाठी वाटेल तो पराक्रम आणि त्याग करावयास ह्या दोन्ही संघटना सिद्ध आहेत ० कारण ह्या दोन्ही संघटना देशभक्तीने परिपूर्ण आहेत ० परंतु देशभक्ती हे निरपेक्ष मूल्य असू शकत नाही असे काँग्रेसला वाटते ०

ह्या विषयात मुसलमानांचे मत काय आहे ते विचारात घेतले पाहिजे हा काँग्रेसचा आग्रह आहे ० म्हणून जम्मू आणि काश्मीर राज्यातील मुसलमानांना ह्या देशाविषयी हिंदूंइतकी आपुलकी वाटावी ह्या हेतूने संघ,जनसंघ आणि भाजपच्या श्यामाप्रसाद मुखर्जींपासून अनेकानेक लहानमोठ्या कार्यकर्त्यांपर्यंत ज्यांनी ज्यांनी संसदीय उपायांनी आणि राजकीय आंदोलातून अभियान चालविले त्या सगळ्याची चेष्टा करण्यात काँग्रेसने आपली ऊर्जा खर्च केली ० समान नागरी संहिता, संविधानातील ३७० वा अनुच्छेद ,घटस्फोटित मुसलमान स्त्रियांना पोटगी देण्याचा प्रश्न ,राम मंदिर निर्माण अशा अनेक प्रश्नात काँग्रेसचा दृष्टिकोन आणि व्यवहार राष्ट्रीय एकात्मतेला पूरक राहिलेला नाही ० मुसलमानांची फुटीरता घट्ट करण्याकडे काँग्रेसचा कल राहिला आहे ०
मुसलमानांना जे नको आहे ते काँग्रेसला नको आहे ० मुसलमानांना जे हवे आहे ते काँग्रेसला हवे आहे ० हे विधान अतिशयोक्तीपूर्ण वाटेल पण ते तसे नाही ० मुसलमानांना हिंदूंचे संघटन नको आहे म्हणून काँग्रेसचा संघाला विरोध आहे ० डॉ हेडगेवारांनी आघाडीवर राहून विदर्भातल्या काँग्रेस संघटनेत काम केले आहे आणि तेथे स्वयंसेवक दल उभे करण्याचा त्यांचा प्रयत्न मूर्त रूप घेऊ शकला नाही ० हिंदूंना अनुशासनबद्ध, प्रतिकारक्षम, स्वावलंबी,सकारात्मक आणि अखंडतावादी करण्याच्या प्रयत्नांना काँग्रेसकडून कधीही पाठिंबा मिळालेला नाही ०

पाकिस्तानसाठी वाटाघाटी करण्यासाठी गांधी महंमद अली जिनांना सतरावेळा त्यांच्या घरी जाऊन भेटले पण फाळणी टाळण्यासाठी आपण सावरकरांना आणि गोळवलकरांना भेटले पाहिजे असे त्यांना एकदाही वाटले नाही ० मुसलमानांशी लढून फाळणी टाळण्याचे सावरकर म्हणत असतील तर मी त्यांचे बरोबर नाही हे त्यांनी पक्के समजावे असे गांधींचे उद्गार आहेत ० गांधींनी फाळणी टाळण्यासाठी हिंदूंना एक होण्याचे एकही आवाहन केलेले नाही ० उलट फाळणी रोखण्यासाठी क्रांती करण्याची हिंमत तुमच्यात नसल्याने पाकिस्तानला मान्यता द्या असे त्यांनी काँग्रेस कार्यकारिणीला सांगितले आहे ० म्हणून गांधी आणि काँग्रेस मुसलमानांच्या राजकीय आकांक्षासाठी लढत होते की हिंदूंच्या हा मूलभूत प्रश्न उत्पन्न होतो ० मुसलमानांना पाकिस्तान हवे होते आणि हिंदूंना अखंड भारत हवे होते ० काँग्रेसच्या धोरणांनी मुसलमानांचा लाभ झाला आणि हिंदूंची हानी झाली ०

आज पाकिस्तानकडून सीमेवर भारताची खोड काढण्याच्या हालचाली वाढत आहेत ० भारताची स्वतंत्रता,सार्वभौमता, अखंडता आणि एकात्मता अभंग राखण्यासाठी योग्य कृती करण्याचा भारतीय सेनादलांचा निर्धार होणार असेल तर त्यामागे खंबीरपणे उभे राहिले असे संघासारख्या सर्व सामाजिक संघटनाना वाटणे साहजिक आहे ० तसा सकारात्मक संदेश त्या सेनादलांना देऊ लागल्या आहेत ० अशावेळी काँग्रेसनेही ह्या महायज्ञात सहभागी व्हायला पाहिजे ० पण काँग्रेसचे वर्तन विसंगत होत आहे ० आपल्या ९२ वर्षाच्या आयुष्यात देशाची हानी होईल असे एकही कृत्य संघाचे हातून झालेले नाही ० तरीही संघाविषयी लोकात अपसमज पसरतील असा प्रयत्न काँग्रेसकडून होत आहे ० काँग्रेसच्या तत्वज्ञानाचे स्फुरण ह्या प्रयत्नांमागे आहे ० पाकिस्तानी प्रवृत्तींविरुद्ध लढायला काँग्रेसचे तत्वज्ञान कधीही संमती देणार नाही ० संघ ही ह्या देशाची सगळ्यात मोठी सामाजिक आणि सकारात्मक संघटना आहे ० सेनादल ही ह्या देशाची सगळ्यात मोठी सामरिक आणि सकारात्मक संघटना आहे ० दोन्ही संघटना अनुशासनबद्ध आहेत ० ह्या संघटना देशभक्तांना चैतन्याचा पुरवठा करतात आणि देशशत्रूंच्या उरात धडकी भरवितात ० काँग्रेसने काळाची पावले ओळखली पाहिजेत आणि सुसंगत वर्तन केले पाहिजे ० लेखनमर्यादा ०

लेखक: अरविंद विठ्ठल कुळकर्णी
संपर्क: ०९६१९४३६२४४

Previous Article

शिवजयंती तिथीनुसार कि तारखेनुसार

Next Article

श्री रामदासस्वामींचे श्री मनाचे श्लोक

You may also like