Smart Maharashtra

दिसामाजी काही उत्तम वाचावे…

dummy_728

श्रीशालिवाहन शके १९४१, शिवराज्याभिषेक शके ३४५, विकारीनाम संवत्सर

स्वा. सावरकरांच्या बदनामीबद्दल राहुल गांधींविरोधात रणजित सावरकर यांच्याकडून तक्रार दाखल

Author: Share:

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविरोधात निखालस खोटे आणि बदनामीकारक वक्तव्य छत्तीसगढ़ येथील जगदलपुर येथे जाहीर सभेत केल्याचा आरोप करत काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या विरोधात स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे नातू आणि स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे कार्याध्यक्ष रणजित सावरकर यांनी शिवाजी पार्क पोलिस ठाण्यात लेखी तक्रार दिली असून त्वरित कारवाई करण्याची मागणी केली आहे. त्यांच्या या विधानाने सर्व देशभक्त जनतेची मनं दुखावली आहेत. राहुल गांधी यांनी सावरकरांची बदनामी केल्यामुळे सर्व सावरकर कुटुंबियांना तसेच सावरकरांच्या लक्षावधी अनुयायांना तीव्र मनस्ताप झाला आहे, असेही तक्रारीत नमूद केले आहे.

“स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी ब्रिटीशांची हात जोडून माफी मागितली” असे धादांत खोटे विधान करुन त्यांची बदनामी केली आहे असे तक्रारीत म्हटले आहे. एका थोर क्रांतिकारकाचा आणि राष्ट्रपुरुषाचा अवमान केल्यामुळे त्यांच्याविरोधात ही तक्रार केली असून भारतीय दंड संहिता कलम ५०० अन्वये गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. यानुसार संबंधितांना दोन वर्षे कारावास किंवा दंड अथवा दोन्हींची शिक्षा होण्याची तरतूद आहे.

स्वातंत्र्यवीरांनी अंदमानात काळ्या पाण्याची शिक्षा भोगली, कोलू ओढला. त्याचबरोबर असंख्य क्रांतिकारकांनीही अंदमानात यमयातना भोगल्या. सावरकरांनी केवळ आपलीच नव्हे तर अन्य क्रांतीकारकांची ही सुटका व्हावी यासाठी अर्ज केले होते. कारागृहातून कुठल्याही प्रकारे सुटका करून घेऊन आपले कार्य चालू ठेवणे, ही केवळ सावरकरच नव्हे तर सर्वच क्रांतिकारकांची रणनीती होती. सावरकरांप्रमाणेच सगळ्यांनीच सरकारी अटी मान्य करून सुटका करून घेतली व पुढे कामही सुरू ठेवले. सावरकर अंदमानात असतानाच त्यांचा युरोपमधील क्रांतिकारकांशी संपर्क असल्याचा ब्रिटिश गुप्तचर खात्याचा अहवाल आहे. तत्कालीन गृहमंत्री सर रेजिनॉल्ड क्रेडॉक यांनी सावरकरांच्या अर्जात कुठलाही खेद अथवा खंत नसल्याचे नोंदवत सावरकर अत्यंत धोकादायक कैदी असल्यामुळे त्यांना अंदमानात डांबून ठेवणे भाग असल्याचे म्हटले आहे. त्याप्रमाणे ब्रिटिशांनी सावरकरांना एकूण १४ वर्षे कारागृहात आणि नंतर १३ वर्षे रत्नागिरीत स्थानबद्ध करून ठेवले होते. असे असतानाही राहुल गांधी यांनी जाणीवपूर्वक “स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी ब्रिटीशांची हात जोडून माफी मागितली” असे खोटे विधान करून या महान देशभक्ताचा अपमान केला आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.

 

Previous Article

१६ नोव्हेंबर

Next Article

‘स्पायडर मॅन’ चे पिता स्टेन ली वयाच्या ९५व्या वर्षी कालवश 

You may also like