सर्कस

Author: Share:

सर्कस…. हा एक नाविण्यपुर्ण उपक्रम. या उपक्रमातुन शिक्षक विद्यार्थ्यांना नाविण्यपुर्ण ज्ञान देवू शकतो. तसं पाहिल्यास सर्कशीतुन मिळणारा आनंद हा चिरकाल टिकत असतो.

सर्कस म्हटलं की वेगवेगळ्या क्लुप्त्या करुन विदुषक प्रेक्षकांना जागेवर अगदी खिळवुन ठेवतो. त्यांचं मनोरंजन करतो.तसंच मनोरंजन आमच्या डीएड मध्ये होत होतं. अगदी तोच प्रकार. पण हा आमच्या जीवनातील सर्कशीचा प्रकार हा मनोरंजनात्मक नव्हता.

फाशीकुंड…….फाशीचा पर्याय. भारतात इंग्रजांचं राज्य होतं. या राज्यात जे इंग्रजांची नीती चांगली वाटत नसल्याने विरोध करीत होते. त्या विरोधकांना या फाशीकुंड मध्ये फाशी देत असत. या फाशीकुंडाची रचना वेगळीच होती. नैसर्गिक रचनेला इंग्रजांनी फाशीकुंडाचं रुप दिलं होतं.

वरुन पाहिल्यास एक खाई दिसत होती. या खाईत खाली एक डोह दिसत होता.या डोहात पाणी होतं.पण मार्ग फार खडतर होता. समजा वरुन एखादा माणुस खाली पडलाच तर तो त्यातुन निघत नसे. शिवाय या डोहात मगरही राहात असल्याने डोहात कोणाला फेकल्यास तो जीवंत जरी असला तरी तो त्या मगरांचा शिकार व्हायचा. अशी फाशीकुंडाची व्यवस्था इंग्रजांनी केली होती.

इंग्रजांच्या काळात कडेलोटही होता.पण कडेलोटामध्ये डोंगरावरुन खाली पडल्यास तो मरेलच याची शाश्वती नसल्याने हा फाशीकुंड.. शिक्षा झाल्यानंतर इंग्रज शिपाही भारतीयांचे हात पाठीमागुन दोराने घट्ट बांधत असत. तसेच त्या गुन्हेगारांच्या तोडांवर काळी टोपी घालुन त्याला या डोहात ढकलत असे. ही इंग्रजांची कुटील नीती. जेणेकरुन भारतीय घाबरुन देश स्वातंत्र्यासाठी लढाच देवु नये.


असे दर्जेदार साहित्य वाचण्यासाठी आमचे पेज LIKE आणि Follow करा: https://www.facebook.com/SmartMaharashtraOnline/


आम्ही फाशीकुंड पाहण्याचा निर्धार केला.या निर्धारानुसार आम्ही फाशीकुंडच्या स्थळाकडे गेलो. तर पाहातो काय. ते पाहण्यासाठीही सर्कस करावी लागली. अर्थात खालचं तळं जर पाहायचं असेल तर झोपुन पाहावं लागत होतं. त्यातही दोन तीन मंडळींना पाहणा-यांचे पाय धरुन ठेवावे लागत होते. ते पाय धरुन न ठेवल्यास सरळ खाईत जाईल पाहणारा अशी अवस्था. त्यामुळे ती आम्हाला सर्कसच वाटली. आम्हीही ते फाशीकुंड पाहण्यासाठी पाहणा-याचे पाय पकडुन ठेवत पाहणा-या माणसांला त्या फाशीकुंड न्याहाळण्याचा आश्वाद देवु लागलो.

जीवनात असे क्षण येतात. जे मनाला रमणीय वाटतात. हा ऐतिहासिक वारसा असतो. आपण तो वारसी जतनही करीत असतो.नव्हे तर त्या वारशात आपल्या पुर्वजांच्या स्मृती लपलेल्या असतात. या स्मृतीनुसार आपण वागत असतो त्या जपण्यासाठी…….पण खरं तर असे ऐतिहासिक वारसे जपुच नये. ज्या वारसामुळे आपल्या भावनांचा उद्रेक होईल. आपल्या भावनेला ठेच पोहोचेल.फाशीकुंड हे स्थळ त्यापैकीच एक.
आम्ही भारतीय जरी सहनशिल वाटत असलो तरी त्यावेळची स्थिती आमची पाहण्यासारखी होती. आमच्या मनातही तेच विचार होते की ह्यात भारतीयांना मुठमाती देतांना ते का बरं कचरले नाहीत. शिवाय आमच्याच भारतात राहुन आमचाच माल खावुन आम्हालाच गद्दार म्हणणारे ते कोण?

आजही भारतात प्रजासत्ताक राज्य असलं तरी कायदे इंग्रजांचेच आहेत. हे कायदे चापलुस लोकांना शिक्षा देत नाही तर चापलुसांच्या पैशासमोर झुकून त्यांना हवं तेव्हा निर्दोष सुटण्याची किंवा शिक्षा कमी करण्याची तरतुद निर्माण करुन देतात. एक टक्का इमानदारांचा सोडला तर बाकी सगळे बेईमान आहेत. इंग्रजही या भारतातील शेकडो स्रीयांवर बलत्कार करीत होते. तरीही इंग्रज अधिकारी हे आपल्या लोकांना शिक्षा न करता ते भारतीयांनाच वेठीस धरत होते. सर्व नाटक आहे.एक सर्कसच.

आम्ही फाशीकुंडात अनुभवलेली सर्कस आजही अनुभवतो आहोत. आजही फाशीकुंडात होणा-या भारतीयांच्या फाशा स्वप्नवत का होईना अनुभवतो आहोत. आजही अंगावर रोमांच ऊभे राहतात.इतरांना त्या फाशीकुंडाचे नवल वाटलेही नसतील कदाचित. पण मला मात्र तो अनुभवताना फार वाईट वाटत होतं. आजही वाटते. आजही वाटते की ते इंग्रज फाशी देत होते आपल्या विरोधक भारतीयांना. पण आपण भारतीय भारत माझा देश व सारे भारतीय माझे बांधव म्हणणारे आपल्याच बंधुभगिणींवर अत्याचार करतो आहोत. नव्हे तर आपल्या बंधुभगिणींवर अत्याचार करुन बळी ठरुन आपल्याच गळ्यात फाशीचे फंदे लटकावीत आहोत.

खरं तर त्या फाशीकुंडात आम्ही सर्कस अनुभवली केवळ तो डोह पाहण्यासाठी…….पण वास्तविक जीवनातही आम्ही सर्कसच अनुभवतो आहोत. सुखाचे मार्ग शोधतांना आम्ही स्वतः दोषी राहुनही स्वतःला दोषी न समजता त्याचा दोष दुस-यावर लादतो आहोत. तसंच एकमेकांचा बळी घेत आम्ही फाशीकुंडाच्या मार्गाला लागतो आहोत. अर्थात आमच्या भाषेत जीवन एक संघर्ष नसुन ती सर्कसच आहे.

आजही फाशीकुंडातील ती सर्कस आठवली की अगदी अंगावर रोमांच उभे राहतात. कधीकधी मला विचार येतो की आम्ही एकमेकांना भाऊ बहिण समजणा-या त्या वर्गमित्रांनी क्षणाचा वैरभाव निर्माण न होवु देता पाय सोडले नाही म्हणुन बरे झाले. नाहीतर आज माझ्यातला लेखक,ऊभा राहु शकला नसता. हे शंभर टक्के खरे आहे. ती सर्कस जरी असली तरी आमच्या वर्गबंधुनी सर्कस एकमेकांचा जीव घेण्यासाठी उभारली नव्हती. त्यांनी नात्याची जपणुक करीत त्या सर्कशीला सांभाळले होते.ती सर्कस त्या फाशीकुंड च्या स्थळाचा आश्वाद घेण्यासाठीच होती. असे म्हटल्यास आतिशयोक्ती ठरत नाही.

लेखक: अंकुश शिंगाडे
नागपुर
संपर्क: ९३७३३५९४५०


असे दर्जेदार साहित्य वाचण्यासाठी आमचे पेज LIKE आणि Follow करा: https://www.facebook.com/SmartMaharashtraOnline/


Previous Article

मोदींच्या चीन दौऱ्याचे फलित

Next Article

पश्चिमी क्षत्रपांची नाणी

You may also like