Smart Maharashtra

दिसामाजी काही उत्तम वाचावे…

dummy_728

श्रीशालिवाहन शके १९४१, शिवराज्याभिषेक शके ३४५, विकारीनाम संवत्सर

चिदंबरम, रिबेरो आणि ख्रिस्ती लॉबी – अरविंद विठ्ठल कुळकर्णी

Author: Share:

वनवासी आणि अन्य मागासवर्गीयांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी ह्यांच्या मानवतावादी सरकारने गेल्या चार वर्षात ज्या विविध विकास योजना सुरु केल्या, राबवून दाखविल्या आणि त्यांची सुमधुर फळे चाखावयास मिळाली त्यामुळे त्यांचे जीवनमान बरेच उंचावले आहे ० परिणामी ऐहिक लाभाची प्रलोभने दाखवून ह्या भोळ्याभाबड्या लोकांचे धर्मांतर करणे कपटी ख्रिस्ती मिशनऱ्यांना शक्य होत असे ते आता काही प्रमाणात कमी झाले आहे ० त्यांच्या धंद्याला मंदी येऊ लागली आहे ० चर्च ही जगातील सगळ्यात मोठी प्रभावशाली लॉबी आहे ० लॉबी म्हणजे लोकमत हवे तसे वळविण्याची साधने आणि सामर्थ्य जवळ असलेला गट ०

भारतातील ख्रिस्ती मिशनऱ्यांच्या गट त्यादृष्टीने कार्यरत झालेला दिसतो आहे ० सर्व मोक्याच्या आणि उपयुक्त क्षेत्रात अशा लॉबींची माणसे पेरलेली असतात ० ही माणसे सामान्य माणसाचा बुद्धिभ्रम करण्यात दंग असतात ० दैनिक लोकसत्ताच्या मंगळवार ५ जूनच्या अंकात संपादकीय पृष्ठावर प्रसिद्ध करण्यात आलेला वादग्रत आणि अपकीर्त झालेले भूतपूर्व केंद्रीय गृहमंत्री पी चिदंबरम ह्यांचा ” त्यांना दुय्यम नागरिक म्हणणार ? ” ह्या शीर्षकाचा उद्दाम लेख त्या प्रकारचा आहे ० ह्या लेखाचे सार ( एन्ट्रो ) म्हणून जो मजकूर देण्यात आला आहे तो असा : ‘ एक वेळ दुय्य्यम नागरिकत्व माथी मारा पण माझ्या देशभक्तीवर शंका घेऊ नका ‘ असे ज्युलिओ रिबेरोंना म्हणावे लागते , अशी आजची स्थिती … कारण आताच्या सरकारच्या काळात असहिष्णुताच जणू स्वाभाविक मार्ग आहे ० शिवराळपणा ही नवी परिभाषा आहे , तर द्वेष हे नवे शस्त्र आहे ! ” असहिष्णुता,शिवराळपणा आणि द्वेष ह्या तीन अवगुणांनी मोदी सरकार मंडित आहे असा आरोप चिदंबरम ह्यांनी केला आहे ० हा आरोप खोटा आहे हे सांगायला नको ०

पण वादासाठी हे आरोप खरे आहेत असे मानले तरी एकदा भारताची फाळणी केलेल्या आणि फाळणी करू पाहणाऱ्या अशा दोन राक्षसी शक्तींच्या विषयात मोदी सरकारने हे वर्तन केले असे म्हणता येईल ० पण हे असे घृणास्पद आणि अक्षम्य वर्तन जवाहरलाल नेहरूंपासून राहुल गांधींपर्यंत अनेक काँग्रेस नेत्यांनी आणि राजवटींनी हिंदूंच्या विषयात केले आहे असे म्हटले तर चिदंबरम ह्यांच्याकडे उत्तर काय आहे ? हिंदू ह्या देशात बहुसंख्य आहेत हाच त्यांचा सगळ्यात मोठा अक्षम्य अपराध आहे असे विघटनकारी शक्ती मानीत आल्या आहेत ० हिंदूंचे बहुसंख्यांकत्व कमी करण्यासाठी ज्यांना आपली लोकसंख्या भूमितीश्रेणीने वाढवावयाची आहे त्यांना तसे करण्याची मुभा आधीच्या ब्रिटिश आणि नंतरच्या काँग्रेस सरकारने दिली हे खोटे आहे काय ? वर्ष १८०० मध्ये अखंड भारतात मुसलमान आणि हिंदू ह्यांचे परस्परप्रमाणं एकास सहा होते ० वर्ष १९९१ मध्ये ते एकास दोन झाले ० हिंदू असहिष्णू नव्हते तर मूर्ख होते म्हणून हे परिवर्तन झाले ०

 


 

असे साहित्य वाचत राहण्यासाठी लाईक करा आमचे फेस बुक पेज 

www.facebook.com/SmartMaharashtraOnline


स्वतंत्र भारतात सर्वाधिक काळ सत्ता काँग्रेस पक्षाने आणि त्याच्या तत्वज्ञानाने भोगली आहे ० ह्याच काळात ह्या देशाचे प्राचीन काळापासून आजपर्यंत चालत आलेले निसर्गसिद्ध हिंदू भावविश्व नाहीसे करून त्याची जागा त्यांना सत्ता स्थापन करण्यास साह्यभूत होईल अशा प्रकारे इस्लामी आणि ख्रिस्ती भावविश्वाने भरून काढावी म्हणून काँग्रेस शासनाने हिंदूंना सतत अपमानित केले त्याला सहिष्णुता म्हणायचे की असहिष्णुता ? हा द्रोह काँग्रेसने मतांसाठी म्हणजे आपल्याकडे सत्ता टिकून राहावी म्हणून केला ०

मुसलमानांना प्रसन्न करण्यासाठी काँग्रेसने प्रभू रामचंद्राचे अस्तित्व नाकारले आणि ते साहित्याने निर्माण केलेले काल्पनिक पात्र आहे असे प्रतिज्ञापत्र सादर केले ० हा शिवराळपणा आणि हिंदुद्वेष नव्हता का ? बाबरी मशिदीचा उपयोगात नसलेला ढाचा पाडणे ही चारशे वर्षाच्या अन्यायाला वाचा फोडणारी हिंदूंची राजकीय कृती होती ० त्यात धर्मांधता नव्हती ० बाबरी मशीद पडल्यामुळे मुसलमानांची अमुक इतकी ऐहिक आणि पारलौकिक हानी झाली असे आजपर्यंत कोणालाही सिद्ध करता आलेले नाही ० अयोध्येतील एकाही मुसलमानाला स्थलांतर करावे लागलेले नाही वा अयोध्येतील आणि अन्यत्रही एकही मशीद पाडण्यात आलेली नाही ० मुसलमानी राजवटीत हिंदूंची अनेकानेक मंदिरे पाडून तेथे मशिदी उभारण्यात आल्या ० त्या पाडण्याचे अभियान हिंदुत्ववादी संघटनांनी अजून सुरु केलेले नाही व करण्याचा त्यांचा विचार आहे असे दिसत नाही ० तरी हिंदूंवर असहिष्णुतेचा आरोप केला जातो ०

आपले स्वतंत्र अस्तित्व टिकून राहण्यासाठी हिंदूंना जे अमृत वाटेल ते आपल्याला विष वाटले पाहिजे असे मानसिकतेवर विशिष्ट बंधन घालणारा ठराव मुस्लिम लीगने १९१० मध्ये केला ० काँग्रेसवर फाजील विश्वास ठेवलेल्या भोळ्या हिंदूंना त्या मानसिकतेने जेरीस आणून पाकिस्तान उभे केले ० स्वतंत्र भारतातील मुस्लिम लीगने तो ठराव परत घेतलेला नाही व त्याचा निषेधही केलेला नाही ० चिदंबरम ह्यांनी त्या दृष्टीने मुस्लिम लीगशी कधी संपर्क साधला आहे काय ? गृहमंत्री म्हणून मुस्लिम लीगच्या सहिष्णुतेविषयी त्यांच्याकडे सांगण्यासारखे काय आहे ?

मुसलमानांच्या विशिष्ट फुटीर मानसिकतेचा उग्रपणा सौम्य स्वरूपात लोकांसमोर यावा म्हणून चिदंबरम ह्यांनी हिंदूपण आतन्कवादी असतात असे सांगायला सुरवात केली ० त्याला अनुसरून काही बॉम्बस्फोटात जे आरोपी नव्हते त्यांना त्यांनी आरोपी केले आणि जे आरोपी होऊ शकले असते त्यांचेविषयीचे पुरावे त्यांनी नष्ट केले असे म्हटले जाते ० ह्यातील खरेखोटेपणा चौकशीतूनच उघडकीस येईल ० ज्यांना आरोपी केले ते आठ वर्षे कारागृहात सडून शेवटी निर्दोष सुटले ० म्हणजे चिदंबरम ह्यांचे वर्तन संशयास्पद होते असे म्हणणे चूक ठरणार नाही ० हा माणूस मोदी ह्यांच्यावर असहिष्णुतेचा आरोप करतो आहे ० चोराच्या उलट्या बोंबा दुसरे काय ?

रोमने २१ व्या शतकात आशिया खंडात धर्मांतराचा झंजावात निर्माण करून सगळे काही ख्रिस्तमय करण्याचा विडा उचलला आहे ० त्यामुळे असहिष्णुता वाढेल की कमी होईल ? ज्यांना ख्रिस्ती व्हायचे नाही त्यांना आत्मसरंक्षणाचा अधिकार आहे की नाही ? हे आत्मसरंक्षण पुरविण्यात नरेंद्र मोदी पंतप्रधान म्हणून काही प्रमाणात कारणीभूत ठरत असतील तर ते असहिष्णुता वाढवीत आहेत असे म्हणणे कितपत न्यायोचित ठरेल ? नेहरूंच्या काळात मध्य प्रदेशातील ख्रिस्ती मिशनऱ्यांच्या अवांछनीय कारवायांविषयी न्यामू भवानीशंकर नियोगी ह्यांचा चौकशी आयोग नेमला होता ० सेवाप्रकल्पाच्या नावाखाली हे ख्रिस्ती मिशनरी अशिक्षित वनवासी जनतेला फसवून त्यांना ख्रिस्ती धर्माची दीक्षा देत असल्याचा निष्कर्ष आयोगाने काढला होता आणि ह्या मिशनऱ्यांना भारतातून हाकलवून लावण्याचा अनुरोध केला होता ० काँग्रेस सरकारच्या कृपेमुळे ते हाकलले गेले नाहीत पण धर्मनिरपेक्षतेचे तत्व लबाडीने वापरून भारताच्या एकात्मतेला ते धोका निर्माण करीत आहेत हे सत्य जगासमोर आले ० त्याची कदाचित चिदंबरमना माहिती नसावी ०

वर्ष २०१५ मध्ये नागालँडमधील दिमापूर ह्या अत्यंत मोक्याच्या नगरात एका मुसलमान तरुणाला तो एका ख्रिस्ती तरुणीचा शारीरिक उपभोग घेत असल्याच्या संशयावरून फटफटीला बांधून आठ किलोमीटर फरफटत नेण्यात आले आणि दगडांनी ठेचून ठार मारण्यात आले ० त्याचे रक्तबंबाळ प्रेत नगराच्या मध्यवर्ती भागात रस्त्यावर टांगून ठेवण्यात आले ० ह्या प्रकरणाचा गवगवा झाला तेव्हा दिमापूरमधील सर्व ख्रिस्ती संघटना आणि प्रतिष्ठित ख्रिस्ती व्यक्ती रस्त्यावर आल्या आणि दिमापूरची ख्रिश्चन संस्कृती असून आम्हाला जे मान्य नाही ते आम्ही खपवून घेणार नाही अशी घोषणा करण्यात आली ० त्यात काही सेवानिवृत्त आयएएस अधिकारी होते ० सहिष्णुतेशी संबंधित असलेल्या ह्या घटनेवर चिदंबरम किंवा रिबेरो ह्यांनी काही भाष्य केल्याचे आठवत नाही ०

नरेंद्र मोदी ह्या देशातील धर्मनिरपेक्षतेचा धागा उसवत असल्याने त्या चुकीचे प्रायश्चित्त म्हणून ख्रिस्ती समाज उपवास आणि प्रार्थना करणार आहेत अशी माहिती देऊन दुसऱ्याच्या चुकीविषयी आत्मक्लेश करवून घेण्याच्या त्यांच्या उदारतेकरिता हिंदूंनी कृतज्ञ राहिले पाहिजे असा सूर चिदंबरम ह्यांनी काढला आहे ० मोदींसाठी आत्मक्लेश करण्याची आवश्यकता नाही० त्यापेक्षा ख्रिस्ती समाजाने अंतर्मुख होण्याची आवश्यकता आहे ० मुसलमान आणि ख्रिस्ती जेथे राज्यकर्ते म्हणून गेले तेथील मूळ संस्कृती नष्ट झाली ० भारतात ते जमले नाही ० हिंदूंजवळ असे काय आहे की ज्यामुळे सर्व संकटांना तोंड देत ते पुरून उरले आहेत ह्याचा शोध ख्रिस्ती बांधवांनी घेतला पाहिजे ० शांततापूर्ण सहजीवनासाठी ते आवश्यक आहे ० अटलबिहारी वाजपेयी पंतप्रधान असतांना अल्पसंख्यांकांच्या देशभक्तीविषयी शंका घेतली जात नव्हती पण मोदी पंतप्रधान झाल्यापासून ती घेतली जात आहे असे रिबेरो म्हणत असल्याचे चिदंबरम ह्यांनी म्हटले आहे ०

मोदींना वाईट म्हणता यावे म्हणून ते वाजपेयींना चांगले म्हणत आहेत ० ही लबाडी आहे ० वाजपेयी पंतप्रधान झाले तेव्हा कम्युनिस्टांनी त्यांचे औपचारिक अभिनंदन करण्यास नकार दिला होता ० वाजपेयी पंतप्रधान असतांना ईशान्य भारतातील संघाच्या चार प्रचारकांचे अपहरण करण्यात आले होते ० नंतर त्यांची हत्या करण्यात आली होती ० रिबेरो ह्यांच्या देशभक्तीविषयी कुणाच्याही मनात शंका नाही ० तरी ते दुय्यम नागरिकत्वाच्या गोष्टी बोलतात ० हा कांगावा आहे ० काश्मीरमध्ये हिंदूंना दुय्यम नागरिकांची वागणूक मिळते ० काश्मीर खोऱ्यात हिंदूंचा निर्वंश झाला आहे ० काश्मिरी पंडितांना हाकलवून दिले गेले आहे ० त्याविषयी चिदंबरमही बोलत नाहीत ० मोदींना झोडपण्यासाठी ते आपला काठी म्हणून वापर करीत आहेत हे रिबेरोंनी ओळखले पाहिजे ० जर धार्मिक अल्पसंख्यांक भीतीग्रस्त असतील तर भारताला भगवा पाकिस्तान का म्हणू नये असा प्रश्न रिबेरो करतात ० इतकी वर्षे पोलीस दलात उच्च स्थानावर काढूनही रिबेरो ह्यांना भारत आणि पाकिस्तान ह्यामधील अंतर ओळखता येत नसेल तर त्यांचे मानसिक संतुलन बिघडले असावे किंवा प्रभावशाली ख्रिश्चन लॉबीला ते हवे तसे स्वतःला वापरू देत असावेत असे निरुपायाने आणि दु:खाने म्हणावे लागते ०

नरेंद्र मोदी ह्यांच्या ” सबका साथ सबका विकास ” ह्या प्रामाणिक नीतीने आणि तळागाळातील माणसांच्या विशेषतः: महिलांच्या सुखासमाधानाला अग्रक्रम देण्याच्या प्रवृत्तीने गरिबांना अननुभूत आत्मभान येत असून त्यादृष्टीने धर्मांतराचे लक्ष्य ठेवून सेवाकार्याचे ढोंग करणाऱ्या ख्रिस्ती संघटनांमध्ये अस्वस्थता आली आहे ० त्यांना मोदी पुन्हा निवडून यायला नको आहेत ० राहुल गांधी ही त्यांची पसंती आहे ० त्यादृष्टीने ही लॉबी कामाला लागली आहे ० तिने चिदंबरम ह्यांना वापरले तर आश्चर्य वाटायला नको पण रिबेरो आपला वापर करू देत असतील तर ती अत्यंत शोचनीय गोष्ट आहे ० सुज्ञास अधिक काय सांगावे ?

लेखक: अरविंद विठ्ठल कुळकर्णी
संपर्क: संपर्क: ०९६१९४३६२४४


असे साहित्य वाचत राहण्यासाठी लाईक करा आमचे फेस बुक पेज 

www.facebook.com/SmartMaharashtraOnline


 

Previous Article

नियतीसमोर सगळे समान

Next Article

शाळा डिजीटल व्हायला हवी…

You may also like