Smart Maharashtra

दिसामाजी काही उत्तम वाचावे…

dummy_728

श्रीशालिवाहन शके १९४१, शिवराज्याभिषेक शके ३४५, विकारीनाम संवत्सर

सौदागर नागनाथ गोरे ऊर्फ छोटा गंधर्व

Author: Share:

सौदागर नागनाथ गोरे ऊर्फ छोटा गंधर्व मराठी नाट्यसंगीतातील गायक-अभिनेते-संगीत रचनाकार. मराठी नाट्यसंगीतामधील त्यांची कारकीर्द ५० वर्षांहून प्रदीर्घ होती. सौदागर नागनाथ गोरे ह्यांचा जन्म सातारा जिल्ह्यातल्या कोरेगाव भाडळीत १० मार्च १९१८ रोजी झाला.

जन्मतःच त्यांना एक दात होता. खेडेगावात ही गोष्ट खूप अशुभ मानली गेली. त्यावेळी सौदागरांच्या मामाने त्यावेळच्या कुर्तकोटी शंकराचार्यांना याबाबत विचारले. शंकराचार्यांनी सांगितले की हा मुलगा मोठेपणी खूप नाव कमावणार आहे. सौदागरांना गोड आवाजाची निसर्गदत्त देणगी मिळाली होती.

कोरेगावमध्ये मराठी तिसरीपर्यंतच सौदागरांचे शिक्षण झाले. शाळेत कॊणी पाहुणा येणार असेल तर ईशस्तवन व स्वागतपद्य म्हणण्यासाठी सौदागरांना सांगितले जाई. शाळेला भेट देणार्‍या दामूअण्णा जोशी यांनी या रत्नास अचूक हेरले आणि सौदागरांचे वडील दामूअण्णा यांच्याकडे या मुलाची मागणी केली. सौदागर आणि धाकटा भाऊ पितांबर यांना घेऊन दामूअण्णा पुण्याला आले. आणि सौदागरांचे संगीत शिक्षण सुरू झाले. त्यांना नाट्यगीते शिकवण्यासाठी बळवंत गोवित्रीकर यांना बोलावण्यात आले. दत्तूबुवा बागलकोटकर यांनी त्यांना शास्त्रीय संगीताचे धडे दिले. यानंतर नरहरबुवा पाटणकर, गणेशबुवा पाध्ये यांनीही सौदागरांना गायनाचे शिक्षण दिले. टप्पा आणि ठुमरीचेही शिक्षण दिले.

प्र.क्र. अत्रे यांच्या साष्टांग नमस्कार या नाटकात सौदागरामची स्त्री-भूमिका होती. त्यानंतर घराबाहेर या नाटकात सुरुवातीला स्त्रीभूमिका आणि मग पुरुष भूमिका होती. उण्यापुऱ्या १० वर्षे वयाच्या सौदागराने ’’प्राणप्रतिष्ठा’’ ह्या नाटकाद्वारे मराठी नाट्यसंगीत क्षेत्रात प्रवेश केला. अनंत हरी गद्रे यांनी मधुर गळ्याच्या सौदागरला ‘छोटा गंधर्व’ हा किताब बहाल केला. निर्भीड या वृत्तपत्रात त्यांचा सर्वप्रथम छोटा गंधर्व असा उल्लेख केल्याचे आढळते.

छोट्या गंधर्वांना १९५० साली अभिजात संगीत नाटकांमधून कृष्णाची भूमिका करण्याची संधी मिळाली. या भूमिकेने इतिहास घडविला. त्यानंतर मानापमानमधे धैर्यधर या पहिल्या अंकातील शूर वीर आणि नंतरचा प्रेमात पडलेला धैर्यधर या भूमिका छोटा गंधर्व सुंदर करायचे. हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतातदेखील छोटा गंधर्वांनी मोलाची कामगिरी केली. गुणरंग ह्या नावाने त्यांनी रचलेल्या बंदिशी आणि नंदकिशोर, बसंतीकोश, नंदबसंत, बसंतीशंकरा, गुणिकंस ह्या नवीन रागांची निर्मिती ही त्यांच्या योगदानाची उदाहरणे आहेत.

१९६३ मधे त्यांनी काही कलाकारांसह छोट्या गंधर्वांनी ‘कलाविकास’ ही स्वतःची नाट्यसंस्था काढली. त्या संस्थेचे ‘देवमाणूस’ हे खूप गाजले. या नाटकातून छोटा गंधर्व हे गीतकार म्हणूनही पुढे आले. या नाटकातील पदांच्या चाली छोटा गंधर्व यांच्या होत्या.कलाविकास आर्थिकदृष्ट्या यशस्वी होऊ शकली नाहीत. तिच्यावरील कर्जाचा बोजा वाढला आणि ती बंद पडली.

आवाज खराब असेल तर थेट नाट्यप्रयोग रद्द करणार्‍या या अवलियाला आपला उतारवयातला आवाज प्रेक्षकांना ऐकू नये असे वाटत होते. म्हणूनच १९७८ मध्ये स्वरवैभवाच्या शिखरावर असताना, छोटा गंधर्व यांनी नाट्यसंन्यास स्वीकारला. १९७९ मधे अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाच्या अध्यक्षपदाचे भाषण केल्यावर झालेल्या एका प्रयोगासाठी त्यांनी पुन्हा चेहऱ्याला रंग लावला. त्यानंतर १९८०-१९८१ मधे काही प्रयोगांत आग्रहाखातर भूमिका करून रसिकांना आनंद दिला.

वयाची पासष्ठी उलटलेल्या या स्वरमहर्षीला १९८४ मध्ये त्यांच्या पावलावर पाऊल टाकत असलेल्या शिवप्रसाद या त्यांच्या एकुलत्या मुलाच्या अपघाती निधनाचा धक्का बसला. तरीही संगीताच्या साथीने पुढची पिढी घडवण्याचा सौदागरांचा दिनक्रम सुरू राहिला. संगीतावरील जुन्या ग्रंथांचे वाचन, ज्योतिष तसेच आध्यात्म्याचा अभ्यास व क्रिकेटसारख्या छंदांसोबत ते ‘दुसरे बालपण’ जगत होते. पुण्यातील केईएम हॉस्पिटलमध्ये ३१ डिसेंबर १९९७ रोजी छोट्या गंधर्व यांचे निधन झाले.

संदर्भ: विकिपीडिया

Previous Article

ते म्हणतात “काँग्रेसमुक्त भारत”… हे म्हणतात “मोदीमुक्त भारत” मग नक्की येणार कोण?

Next Article

मंगेश पाडगांवकर

You may also like