Smart Maharashtra

दिसामाजी काही उत्तम वाचावे…

dummy_728

श्रीशालिवाहन शके १९४१, शिवराज्याभिषेक शके ३४५, विकारीनाम संवत्सर

८ ऑक्टो.ला ‘चला, वाचू या’मध्ये ह. मो. मराठेंच्या साहित्याचे वाचन

Author: Share:

मुंबई – उत्तम साहित्याची आवड निर्माण होऊन लोकांनी अभिरुचीपूर्ण वाचनाकडे वळावे, या उद्देशाने सुरु करण्यात आलेल्या व्हिजन आयोजित ‘चला, वाचू या’ या मासिक अभिवाचन उपक्रमाचे २२ वे पुष्प नुकतेच दिवंगत झालेले ज्येष्ठ साहित्यिक ह. मो. मराठे यांच्या साहित्याच्या अभिवाचनाने गुंफले जात आहे. रविवार ८ ऑक्टोबर सायंकाळी ५ वाजता प्रभादेवी येथील पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीच्या तिसर्‍या मजल्यावरील फोटोग्राफी हॉलमध्ये होणारा हा कार्यक्रम रसिकांसाठी विनामूल्य आहे.

                व्हिजनच्या ‘चला, वाचू या’मध्ये गेल्या वर्षीच्या एका सत्रामध्ये ह. मो. मराठे सहभागी होऊन नव्यानेच त्यांनी लिहीलेल्या व्यंगकथा ते स्वत: सादर करणार होते. परंतु प्रकृतीअस्वास्थ्यामुळे त्यावेळी व मग त्यानंतरही उपस्थित राहणे त्यांना शक्य झाले नाही. हमो स्मृतीविशेष अभिवाचनामध्ये अनेक मान्यवर सहभागी होत आहेत. व्हिजनतर्फे गेली दोन वर्षे घेण्यात येत असलेल्या राज्यस्तरीय अभिवाचन स्पर्धेतील विजेत्यांचा एकेक दर्जेदार वाचनाविष्कार यापुढील प्रत्येक सत्रामध्ये करण्याचे ठरवण्यात आले आहे, त्यानुसार ८ ऑक्टोबरलाही अशा एका विजेत्या संघाचे अभिवाचन होणार आहे. जून २०१५ मध्ये ‘चला, वाचू या’ हा अभिवाचन उपक्रम सुरु झाल्यानंतर अल्पावधीतच त्याला उत्तम प्रतिसाद मिळाला. दर महिन्याला सलग उपक्रम स्वरुपात सुरु झालेला अभिवाचनाचा अशा प्रकारचा हा मुंबईतील पहिला उपक्रम आहे. आजवर या उपक्रमामध्ये ज्येष्ठ अभिनेते जयंत सावरकर, अभिनेते व कवी किशोर कदम ‘सौमित्र’, संगीतकार कौशल इनामदार, दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी, विजय केंकरे, ज्येष्ठ साहित्यिक दत्ता टोळ, अभिनेत्री स्मिता तांबे, सोनाली कुलकर्णी, वर्षा दांदळे, ज्येष्ठ साहित्यिका उषा मेहता, साहित्यिक अनंत भावे, अभिनेते विजय कदम, राजन ताम्हाणे, शैलेश दातार, अविनाश नारकर, श्रीरंग देशमुख, मिलींद फाटक, कौस्तुभ दिवाण, लेखक-दिग्दर्शक देवेंद्र पेम, विवेक देशपांडे, अभिनेते विजय मिश्रा, सुशील इनामदार, संदेश जाधव, सुनील जाधव, शर्वाणी पिल्ले, केतकी थत्ते, मानसी कुलकर्णी, राज्याच्या भाषा संचालिका मंजुषा कुलकर्णी, निवेदिका सुलभा सौमित्र, प्रसिध्द कवी व कोकण मराठी साहित्य परिषदेचे अध्यक्ष डॉ. महेश केळुसकर, किरण येले, भक्ती रत्नपारखी, ज्येष्ठ चित्रकार व लेखक आशुतोष आपटे, वृत्तनिवेदिका प्राजक्ता धर्माधिकारी, शुभांगी सावरकर, हेमंत बर्वे, ज्येष्ठ लेखक रवी लाखे, पुणे एसएनडीटी कॉलेजच्या मराठी विभागप्रमुख डॉ. प्रिया जामकर, अभिनेते सचिन सुरेश, अभिजीत झुंजारराव, वृत्तनिवेदक विजय कदम, लेखक प्रसाद कुमठेकर, अभिनेते दीपक कदम आदींसह अनेक मान्यवरांनी यापूर्वीची अभिवाचन सत्रे गुंफली आहेत. ‘मॉंटुकले दिवस’ या राज्य साहित्य पुरस्कारप्राप्त लेखनाचे अभिवाचनही स्वत: लेखक संदेश कुलकर्णी व अभिनेत्री अमृता सुभाष यांनी केले आहे.

                साहित्यप्रसाराबरोबरच वाचिक अभिनयाकडेदेखील जाणीवपूर्वक लक्ष वेधण्याचा प्रयत्न करणे हा या उपक्रमाचा हेतू आहे. गेल्या वर्षभराच्या कालावधीत अनेकांना वाचनाकडे वळवण्यात आणि आवडीने पुस्तक खरेदी करुन ते वाचण्याची आवड निर्माण करण्यात आल्याचे आयोजक सांगतात. नव्या कलावंतांनादेखील या उपक्रमात अभिवाचन करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करुन देण्यात आले आहे. या निमित्ताने वाचन चळवळ वृध्दींगत करण्याच्या उद्देशाने अभिवाचनाचे एक कायमस्वरुपी व्यासपीठ निर्माण करण्याचा प्रयत्न असून. या कार्यक्रमास रसिकांनी बहुसंख्येने उपस्थित राहून उपक्रमाचा प्रसार व वृध्दी करण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन व्हिजनचे संचालक श्रीनिवास नार्वेकर यांनी केले आहे.

असे लेख/बातम्या व इतर साहित्य नियमितपणे वाचण्यासाठी आमच्या Facebook Page ला Like आणि Follow करा: https://www.facebook.com/SmartMaharashtraOnline/

Previous Article

७ ऑक्टोबर

Next Article

महामहोपाध्याय दत्तो वामन पोतदार

You may also like