‘चला, वाचू या’ २९ व्या पुष्पामध्ये ‘ऍनेस्थेशिआ’ आणि ‘सृजनरंग’

Author: Share:

मुंबई – वाचन चळवळ वृध्दींगत करुन लोकांमध्ये वाचनाची आवड निर्माण करण्यासाठी सुरु करण्यात आलेल्या व्हिजन संचालित ‘चला, वाचू या’ या मासिक अभिवाचन उपक्रमाचे २९ वे पुष्प रविवार २७ मे रोजी सायं. ४ वाजता साजरे होत असून यावेळी व्हिजनच्या सहसंचालिका, डॉ. उत्कर्षा बिर्जे यांच्या जन्मदिनाच्या स्मृतिनिमित्ताने एका एकांकिकेसह महाराष्ट्र कल्चरल सेंटर, पुणे निर्मित ‘सृजनरंग’ हा कार्यक्रम सादर होणार आहे. पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीच्या तिसर्‍या मजल्यावरील मिनी थिएटरमध्ये होणारा हा कार्यक्रम सर्व रसिकांसाठी विनामूल्य आहे.

गेल्या वर्षी कणकवलीमध्ये झालेल्या डॉ. चंद्रशेखर फणसळकर नाट्यमहोत्सवामध्ये व्हिजन-नाट्यविलासची डॉ. फणसळकर लिखीत व श्रीनिवास नार्वेकर दिग्दर्शित ‘ऍनेस्थेशिआ’ ही एकांकिका खूप गाजली होती. याच एकांकिकेचे सादरीकरण २७ मे रोजी करण्यात येत आहे. समीर दळवी, नयना रहाळकर व श्रीनिवास नार्वेकर यातील कलावंत आहेत.

तर पु. शि. रेगे यांच्या निवडक कथा व कवितांचे सादरीकरण महाराष्ट्र कल्चरल सेंटर, पुणे निर्मित ‘सृजनरंग’ या कार्यक्रमात केले जाते. कार्यक्रमाची संकल्पना, संहितालेखन, संगीत व दिग्दर्शन प्रमोद काळे यांचे असून अंजली मराठे, सचिन जोशी, हर्षद राजपाठक, वेदांत रानडे, ओमश्री बडगुजर हे अभिवाचक कलावंत आहेत. ज्येष्ठ अभिनेते जयंत सावरकर, अभिनेते व कवी किशोर कदम ‘सौमित्र’, संगीतकार कौशल इनामदार, दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी, विजय केंकरे, अविनाश नारकर, अभिनेत्री सोनाली कुलकर्णी, स्मिता तांबे, राजन ताम्हाणे, अनंत भावे आदींसह अनेक नामवंत आजवर या उपक्रमात सहभागी झाले आहेत. जून महिन्यात या उपक्रमाला तीन वर्ष पूर्ण होत आहेत. साहित्यप्रसाराबरोबरच वाचिक अभिनयाकडेदेखील जाणीवपूर्वक लक्ष वेधण्याचा प्रयत्न करणे हा या उपक्रमाचा हेतू आहे. या कार्यक्रमास बहुसंख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन व्हिजनचे संचालक श्रीनिवास नार्वेकर यांनी केले आहे.

Previous Article

पवित्र रमजानचे महत्व – शकील जाफरी

Next Article

कर्नाटकात भाजप विजयी आहे !

You may also like