विंदा जन्मशताब्दी विशेषसहीत १७ सप्टें.ला ‘चला, वाचू या’

Author: Share:

मुंबई – उत्तम साहित्याची आवड निर्माण होऊन लोकांनी अभिरुचीपूर्ण वा चनाकडे वळावे, या उद्देशाने सुरु करण्यात आलेल्या व्हिजन आयोजित ‘चला, वाचू या’ या मासिक अभिवाचन उपक्रमाचे २१ वे पुष्प ज्येष्ठ साहित्यिक कविवर्य विंदा करंदीकर जन्मशताब्दी विशेषसहीत अन्य अभिवाचनांद्वारे गुंफण्यात येत आहे. प्रसिध्द लेखक ‘बगळा’कार प्रसाद कुमठेकर, अभिनेते सुनील जाधव, रंगकर्मी व विक्रीकर उपायुक्त आशुतोष घोरपडे यांच्यासोबत विंदा विशेषमध्ये श्रीनिवास नार्वेकर, समीर दळवी व विनीत मराठे सहभागी होत आहेत. रविवार १७ सप्टेंबर सायंकाळी ५ वाजता प्रभादेवी येथील पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीच्या कॉन्फरन्स हॉलमध्ये होणारा हा कार्यक्रम रसिकांसाठी विनामूल्य आहे. विंदा विशेषमध्ये त्यांच्या ‘राजा लिअर’ या नाटकातील उतार्‍याचे अभिवाचन होणार आहे तर राजश्री पोतदार विंदाच्या साहित्याचा आढावा घेत त्यांच्या काही कविता सादर करणार आहेत.

जून २०१५ मध्ये ‘चला, वाचू या’ हा अभिवाचन उपक्रम सुरु झाल्यानंतर अल्पावधीतच त्याला उत्तम प्रतिसाद मिळाला. दर महिन्याला सलग उपक्रम स्वरुपात सुरु झालेला अभिवाचनाचा अशा प्रकारचा हा मुंबईतील पहिला उपक्रम आहे. आजवर या उपक्रमामध्ये ज्येष्ठ अभिनेते जयंत सावरकर, अभिनेते व कवी किशोर कदम ‘सौमित्र’, संगीतकार कौशल इनामदार, दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी, ज्येष्ठ साहित्यिक दत्ता टोळ, अभिनेत्री स्मिता तांबे, वर्षा दांदळे, ज्येष्ठ साहित्यिका उषा मेहता, साहित्यिक अनंत भावे, अभिनेते विजय कदम, राजन ताम्हाणे, शैलेश दातार, अविनाश नारकर, श्रीरंग देशमुख, मिलींद फाटक, कौस्तुभ दिवाण, लेखक-दिग्दर्शक देवेंद्र पेम, अभिनेते विजय मिश्रा, सुशील इनामदार, संदेश जाधव, शर्वाणी पिल्ले, केतकी थत्ते, मानसी कुलकर्णी, राज्याच्या भाषा संचालिका मंजुषा कुलकर्णी, निवेदिका सुलभा सौमित्र, प्रसिध्द कवी व कोकण मराठी साहित्य परिषदेचे अध्यक्ष डॉ. महेश केळुसकर, किरण येले, भक्ती रत्नपारखी, ज्येष्ठ चित्रकार व लेखक आशुतोष आपटे, वृत्तनिवेदिका प्राजक्ता धर्माधिकारी, शुभांगी सावरकर, हेमंत बर्वे, ज्येष्ठ लेखक रवी लाखे, पुणे एसएनडीटी कॉलेजच्या मराठी विभागप्रमुख डॉ. प्रिया जामकर, अभिनेते सचिन सुरेश, अभिजीत झुंजारराव, वृत्तनिवेदक विजय कदम, दीपक कदम आदींसह अनेक मान्यवरांनी यापूर्वीची अभिवाचन सत्रे गुंफली आहेत. ‘मॉंटुकले दिवस’ या राज्य साहित्य पुरस्कारप्राप्त लेखनाचे अभिवाचनही स्वत: लेखक संदेश कुलकर्णी व अभिनेत्री अमृता सुभाष यांनी केले आहे. जूनमध्ये झालेल्या दुसर्‍या वर्धापनदिनाच्या कार्यक्रमात ज्येष्ठ दिग्दर्शक विजय केंकरे व विवेक देशपांडे, अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांनी अभिवाचन केले होते.

साहित्यप्रसाराबरोबरच वाचिक अभिनयाकडेदेखील जाणीवपूर्वक लक्ष वेधण्याचा प्रयत्न करणे हा या उपक्रमाचा हेतू आहे. गेल्या वर्षभराच्या कालावधीत अनेकांना वाचनाकडे वळवण्यात आणि आवडीने पुस्तक खरेदी करुन ते वाचण्याची आवड निर्माण करण्यात आल्याचे आयोजक सांगतात. नव्या कलावंतांनादेखील या उपक्रमात अभिवाचन करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करुन देण्यात आले आहे. या निमित्ताने वाचन चळवळ वृध्दींगत करण्याच्या उद्देशाने अभिवाचनाचे एक कायमस्वरुपी व्यासपीठ निर्माण करण्याचा प्रयत्न असून. या कार्यक्रमास रसिकांनी बहुसंख्येने उपस्थित राहून उपक्रमाचा प्रसार व वृध्दी करण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन व्हिजनचे संचालक श्रीनिवास नार्वेकर यांनी केले आहे.

Previous Article

पाखरास

Next Article

भाषेचे महत्व

You may also like