Smart Maharashtra

दिसामाजी काही उत्तम वाचावे…

dummy_728

श्रीशालिवाहन शके १९४१, शिवराज्याभिषेक शके ३४५, विकारीनाम संवत्सर

भारतातील जाती: डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी वाचलेल्या निबंधाचे विश्लेषण

Author: Share:

भारतातील जाती: 

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी कोलंबिया विद्यापीठाच्या मानववंशशास्त्र विभागाच्या अभ्यास मंडळासमोर वाचलेल्या निबंधाचे विश्लेषण:  हा निबंध डॉ अ अ गोडेनवायजर ह्यांच्या मानववंशशास्त्र परिषदे मध्ये , कोलंबिया विद्यापीठ, न्यूयॉर्क, अमेरिका येथे ९ मे १९१६ मध्ये वाचण्यात आला.  त्या प्रबंधाचे विश्लेषण आम्ही येथे देत आहोत.

मानवी संस्थांचे प्रदर्शन ही संकल्पना तुम्हाला रुचणार नाही, काहींना ती भयावह वाटेल मात्र मानववंशशास्त्राचा विद्यार्थी या नात्याने माझ्या या नाविन्यपूर्ण कल्पनेने तुम्हाला धक्का बसणार नाही अशा शब्दात डॉक्टर आपल्या निबंधाला सुरुवात करतात. मानववंशशास्त्राचा विदयार्थी एखाद्या पुरातन स्थळाचे वर्णन करणाऱ्या गाईडसारखा असतो आणि त्याच वास्तववादी दृष्टिकोनातून तो सामाजिक संस्थांचे निरीक्षण करून त्यांची निर्मिती आणि कार्ये यांचा वेध घेतो.

जातीसंस्थेसारख्या जख्खड संस्थेच्या अनेकांगी फसवेपणाची मला कल्पना आहे परंतु अज्ञानाच्या प्रदेशात तिला ढकलण्याएवढा मी निराशावादी नाही असे सांगून हा विषय गुंतागुंतीचा असला आणि अस्पष्ट असला तरी संस्थेच्या गूढतेचे पटल दूर करण्याचा मी प्रयत्न करेन असे ते सांगतात.मात्र जातिसंस्थेचा यथासांग उहापोह मला शक्य नाही म्हणून उगम घडण आणि प्रसार ह्या मुद्द्यांभोवती मी मर्यादा घालून दिली आहे असे आंबेडकर स्पष्ट करतात.

व्यवहारश: आणि तत्वश: जातीची समस्या व्यापक आहे, कारण तिच्यात व्यावहारिक दृष्टीने विस्तृत परिणाम घडवून आणण्याचे आणि गोंधळ माजवण्याचा सामर्थ्य आहे. हिंदू जातीच्या बंधनात राहून आंतरजातीय विवाह करणार नाहीत, अहिंदूशी सामाजिक संबंध ठेवणार नाहीत  आणि हिंदू स्थलांतर करून विदेशात गेले तर जातीची हि समस्या जागतिक होईल असे डॉक्टर नमूद करतात. (अर्थात, आधुनिक जगात, हिंदू परदेशी गेले आहेत मात्र अजून अशी समस्या उदभवलेली नाही).

भारतातील लोकसंख्या आर्य द्रविड मंगोलियन आणि सिथियन वंशाच्या मिश्रणाने बनलेली आहे असे मानववंशशास्त्रज्ञांचे मत आहे. हे लोकसमूह वेगवेगळल्या मार्गांनी भिन्न संस्कृतीसह भारतात आले. प्रत्येक टोळी भारतात क्रमशःघुसली आणि लढाई करून त्यांनी जम बसवला मात्र नंतर ते शेजाऱ्याप्रमाणे शांततेने राहूलागले . नित्य संबंध आणि परस्परिक व्यवहार यामुळे त्यांच्यात संस्कृतीचा उदय झाला आणि भिन्न संस्कृतीचा लोप झाला. अर्थात विभिन्न वंशांचे अजूनही एकत्रीकरण झालेले नाही, मात्र सांस्कृतिक एकतेच्या बाबतीत दुसरा कोणताही देश भारताची बरोबरी करू शकत नाही असे अभिमानास्पद विधान डॉक्टर करतात. भारतात मूलभूत असलेली सांस्कृतिक एकटा एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत आढळून येते.

या एकतेमुळेच जातीव्यवस्थेचे स्पष्टीकरण अधिक बिकट होते, हिंदू सामक केवळ परस्परापासून भिन्न जातींचा समूह असता तर हा विषय सोप्प झाला असता, परंतु एकसंध समाजाचा जात हा तुकडा आहे म्हणून जातींच्या उत्पत्तीचे स्पष्टीकरण बिकट ठरते. तीन तज्ज्ञांची जातीची व्याख्या सांगून डॉकटर म्हणतात की जातीचा एकाकी विचार करणे चुकीचे आहे कारण जात हि जातीच्या साखळीत एक दुवा असून तिचा दुसरा जातीशी निश्चित प्रकारचा संबंध असतो, आणि अशा सर्व जाती मिळून जातीव्यवस्था निर्माण होते.

विटाळ किंवा शुद्धाशुद्धता ह्या कल्पना जातसंस्थेचे मूलभूत वैशिष्ट नाही हे सांगताना डॉक्टर स्पष्टीकरण देतात की कोणत्याही जातीच्या कार्यपद्धतीत फारसा बदल न करताही विटाळाची कल्पना पूर्णतः काढून टाकता येण्याजोगी आहे.

हे विवेचन करून डॉक्टर जातिसंस्थेच्या मूळ लक्षणाकडे वळतात. डॉक्टर म्हणतात, जातिबाह्य लग्नसंबंध वर्जित केल्याने जातीचे सभासदत्व जातीत जन्मणार्यापुरतेच मर्यादित होते. त्यामुळे जातीच्या वेगवेगळ्या वैशिष्टयांचे परीक्षण केल्यावर जातिबाह्य विवाहाची उणीव अर्थात जात्यंतर्गत विवाह हाच खरा जातीचा आत्मा आहे. विशेषतः भारताच्या बाबतीत डॉक्टरांचा ह्याबाबतीतील आक्षेप विशेष नोंद घेण्यासारखा आहे. कारण डॉक्टर म्हणतात तसे भिन्न संस्कृतीतून आला असला तरी भारतातील समाज मूलतः एक असूनही भारतातील जाती म्हणजे कृत्रिमपणे ह्या एकसंध समाजाचे लचके तोडून निर्माण केलेले निश्चित आणि स्थिर घटक आहेत, ज्यात प्रत्येकावर जात्यंगर्त विवाहाच्या रुढीद्वारे परस्परात मिसळून जाण्याची बंदी घालण्यात आली, आणि म्हणून जात्यंगर्त विवाह हे जातीचे व्यवच्छेदक लक्षण आहे. भारतात हा प्रश्न कसा गुंतागुंतीचा बनतो हे सांगताना डॉक्टर सांगतात, की जात्यंगर्त विवाह भारतात रूढ असा तरी सपिंड (एकाच रक्ताच्या) आणि सगोत्र (एकाच गोत्राच्या) विवाहांना निषिद्ध मानले आहे. याचाच अर्थ भारतात गोत्रबाह्य विवाह होतात. जेथे गोत्रबाह्य विवाह होतात तेथे जात असता नये. मात्र इथे तर जाती आहेत. याचे कारण जात्यंतर्गत विवाहाचा गटबाह्य विवाहावर वरचश्मा आहे.अशा तर्हेने गटांतर्गत विवाहाने स्वगटाबाहेर लग्न करण्याच्या रुढींवर मिळवलेला विजय म्हणजे जातीची निर्मिती.

आता ज्या लोकसमूहाला जातीत रूपांतर करायचे असते, तो गटबाह्य विवाह करणारा असेल तर टायला आधी गटांतर्गत विवाह करणे आवश्यक ठरते. मात्र गटांतर्गत विवाह केवळ फर्माने काढून होणार नाहीत. त्यासाठी लग्नाळू स्त्री पुरुषांची संख्या जातीत समान राखणे आवश्यक आह, अन्यथा एखादा पुरुष किंवा स्त्री जातीबाहेर लग्न करून हा कायदा मोडू शकेल. कुठल्याही लोकसमूहात साधारणत: स्त्री पुरुषांची संख्या सामान असते असे मानले तर प्रत्येक लग्न होणाऱ्या आणि लग्नाळू स्त्री पुरुषांची योग्य ती व्यवस्था लावणे समूहास आवश्यक ठरते. आता यातूनच हिंदू समाजातील अनिष्ट प्रथा कशा निर्माण झाल्या त्याचे वर्णन डॉक्टर करतात. समजा एखाद्या स्त्रीचा पती निधन पावला तर एकत्र तिला पतीबरोबर जाळून टाकणे किंवा तिच्यावर वैधव्य लादणे हे उपाय जातीसमोर राहतात. दोन्ही उपायांनी ती जातीबाहेर लग्न करण्याचा प्रश्न निकाली निघतो. पहिल्या दुसरा उपाय अधिक मानवी आणि व्यवहार्य आहे. त्यात स्त्री अनैतिक संबंध ठेवण्याची शक्यता असल्याने तिच्याकडे कुणी आकर्षित होऊ नये असे निर्बंध लादली  जातात दुसरीकडे  पुरुषावर मात्र अशी बंधने लादली जात नाहीत. याचे कारण नेहमीच पुरुषांचे स्त्रियांवर वर्चस्व राहिले आहे. आणि पुरुषाला बंधनात अडकवले तर जातीतून एक धडधाकट व्यक्ती नष्ट होते. ब्रह्मचर्य जातीला संपन्नावस्था प्राप्त करून देण्यात असमर्थ ठरतो. त्यामुळे पुरुषाला गृहस्थाश्रमात ठेवणे भाग पडते.मात्र अशा पुरुषाला विवाहयोग्य मुलगी उपलब्ध नसल्याने आणि एकविवाह पद्धती असल्याने विवाहयोग्य नसलेल्या मुली अशा वराना दिल्या जातात. एकंदरीत जात्यांतर्गत विवाह आणि जातीव्यवस्था टिकवण्यासाठी सती केशवपन आणि बालविवाह प्रथा आल्या अशी थेअरी डॉक्टर मांडतात. या प्रथांचे समर्थन केलेले आढळते मात्र प्रथा कां व्यवहारात आणल्या गेल्या याचे कारण मिळत नाही. त्यामुळे यां रुढींचे कारण जातीव्यवस्था आहें असे डॉक्टर म्हणतात. स्तुतीशिवाय रुढी उभ्या राहू शकत नाहीत. जातीच्या घडणीसाठी ह्या रुढी आवश्यक होत्या म्हणून त्याला साखरेचा मुलामा देण्यासाठी गौरवशाली तत्वज्ञान निर्माण केले गेले.

जातीचा उगम कसा झाला ह्याविषयी डॉक्टर अतिशय स्पष्ट आहेत. जातींचे वैशिष्ट्य जातीअंतर्गत विवाह असेल तर जातीअंतर्गत विवाहासाठी लागणाऱ्या यंत्रणेचे मूळ हे जातीचे मूळ आहे.

समाज हा वर्गांचा बनलेला असतो आणि समाजात वेगवेगळे वर्ग अस्तित्वात असतात. त्यांचे आर्थिक बौद्धिक किंवा सामजिक आधार वेगवेगळे असतील. आणि समजातील व्यक्ती कुठल्या नां कुठल्या वर्गाची सदस्य असते. हा नियम ध्यानात घेतला तर जातीमागे असणारा वर्ग कुठला हाच प्रश्न शिल्लक राहतो. हिंदू धर्मात असे वर्ग आणि जात समोरासमोर दरवाजा असलेले  शेजारी आहेत.

मग ज्याने स्वतःभोवती अशी मर्यादा घालून घेतली असं वर्ग कोणता. ह्याचे प्रत्यक्ष उत्तर देणे आपल्या शक्तीबाहेरचे आहें असे म्हणून ह्याचे अप्रत्यक्ष उत्तर ब्राह्मण असे ते देतात. ह्या सिद्धांताची कारणमीमांसा देताना ते म्हणतात हिंदू धर्मातील रुढी प्रचलित आहेत त्या ब्राह्मण वर्गात अधिक कडक रुपात पाळल्या जातात. अब्राह्मण वर्गातही त्या आहेत मात्र त्या तितक्या कडक नाहीत. याचा अर्थ त्या अनुकरण करून आल्या आहेत. ब्राह्मण वर्गाला असलेली सामजिक प्रतिष्ठा सुद्धा ह्याचा अजुन एक पुरावा आहें असे डॉक्टर मानतात. त्यामुळे जातीव्यवस्थेचा जनक ब्राह्मणवर्ग आहे असे विधान डॉक्टर करतात.

प्रबंधाचा तिसरा भाग म्हणजे जातीव्यवस्थेचा प्रसार आणि वाढ भारतात कशी झाली. प्रत्येक देशांत नियम करणारे काही महापुरुष असतात जे जनतेला न्यायाचे आणि नीतीचे धडे देतात. मनु हा खरोखर होऊन गेला असेल तर तो निश्चित एक धाडसी पुरुष होता. मात्र जातीची निर्मिती मनु ह्या एका व्यक्तीने केली असे मानण्यास मात्र डॉक्टर तयार नाहीत कारण एका माणसाने केलेली व्यवस्था तो गेल्यावर संपली असती आणि एका माणसामुळे कुणी एक आपली स्थिती जनावरांच्या बरोबरीची नीच करून घेण्यास आणि स्वतः दुःख सोसून दुसऱ्या वर्गाला उच्चतेच्या शिखरावर चढवण्यास कोणता वर्ग तयार होऊ शकेल? जातीव्यवस्था मनुच्या आधीच अस्तित्वात होती. मनुने त्याचे नियमन आणि प्रसार करण्याचे कार्य केले.

ब्राह्मणांनी जाती केल्या हेही ते मानत नाहीत. ही विचारसरणी  द्वेषमुलक आहें असे डॉक्टरांचे स्पष्ट म्हणणे आहे. अनेक बाबतीत ब्राह्मण दोषी असतील पण अब्राह्मण जातींवर जातीप्रथा लादण्याचे कार्य त्यांच्या सामर्थ्यापलीकडचे होते. उपदेशाने जातीव्यवस्था निर्माण झाली नाही आणि नष्टही होणार नाही.

भारतामध्ये प्राचीन काळी मूलतः चार वर्ग होते: १. ब्राह्मण २. क्षत्रिय ३. वैश्य किंवा व्यापारी आणि ४. शूद्र अर्थात शेतकरी आणि मजूर. या वर्गातील व्यक्तींना पात्रता मिळाल्यानंतर वर्ग बदलता येत होता, श्रम विभागणीच्या तत्वानुसार बाकीच्या वर्गांचीही विभागणी झाली. वैश्य आणि शूद्र त्यामुळे संख्येने अधिक होते. सैनिकी पेशा पोटविभागणीला अनुकूल नसल्याने क्षत्रिय वर्गाचे विभाजन राजे आणि सैनिक अशा दोन गटातच होऊ शकले. ह्या पोटविभागणीतील वर्गांनी जेंव्हा वर्गपद्धतीतील मुक्त प्रवेश पद्धती गमावली आणि ते स्वयंमर्यादित वर्ग बनले तेंव्हा त्यांना जाती असे म्हणतात.

मग पुढचा प्रश्न येतो कि अशाप्रकारे प्रवेशबंदी करून अंतर्गत विवाह करणारा वर्ग होण्यास कशी सुरुवात झाली? हे स्वेच्छेने झाले की त्यांना भाग पाडण्यांत आले? ह्याची डॉक्टर दोन उत्तरे देतात, एकाला ते मानसशास्त्रीय उत्तर म्हणतात ज्यात काही वर्गांनी स्वेच्छेने येऊ स्वीकारले तर जेथे हे लादले गेले त्याला यांत्रिक कारण म्हणतात. मात्र दोन्ही परस्परपूरक आहेत.

ब्राह्मणांनी जेंव्हा आपल्या वर्गाचे जातीत रूपांतर सुरु केले आणि अंतर्गत विवाह, वैधव्य आणि बालविवाह पद्धती सुरु केल्या तेंव्हा ब्राह्मणांना सामाजिक प्रतिष्ठा असल्याने त्यांचे स्वाभाविक अनुकरण अनेक जातींनी केले ही थेअरी मानसशास्त्रीय स्पष्टीकरणात येते. यासाठी पाश्चिमात्य विचारवंतांचे अनुकरणाबाबतीतील विचार नोंदवताना डॉक्टर सांगतात की ज्याचे अनुकरण व्हावयाचे त्याचे सामाजिक स्थान मनाचे असले पाहिजे आणि समाजातील लोकांचे परस्पर संबंध विभिन्न आणि नित्य असले पाहिजेत, हे दोन्ही नियम ब्राह्मणांच्या बाबतीत लागू पडतात. त्यामुळेच त्यांनी केलेल्या कृतीचे अनुकरण झाले, ज्यातून अब्राह्मण वर्गातही जातींची निर्मिती झाली. त्याचाच पुढचा भाग म्हणजे ज्या रूढींनी जातींच्या शैशवावस्थेत जातीच्या रचनेला आधार दिला, आणि हिंदू मनावर पूर्ण कोरल्या जाईपर्यंत काळाच्या ओघात सतत साथ दिली आणि जातींचे संगोपन केले.

यांत्रिक कारण स्पष्ट करताना डॉक्टर पुन्हा स्पष्ट करतात की जाती कधीच एकांगी नसतात. त्या एकवचनी नसतात. जात अशी वस्तू कधीच नसते, त्या जाती असतात. अर्थात त्या परस्परावलंबी असतात. त्यामुळेच जेंव्हा ब्राहमण जात निर्माण झाली त्यावेळी अब्राह्मण ही जात प्रकर्षाने निर्माण झालीच, कारण जेंव्हा ब्राह्मणांनीं आपली मर्यादा ठरवली तेंव्हा इतरांना आपसूक मर्यादेच्या बाहेर उभे केले. काही जातींनी स्वतःहुन आपले दरवाजे बंद करून घेतले, तर काही जातींना हे समजले की त्यांचे दरवाजे आपसूक बंद झाले आहेत.

जातीच्या सामाजिक धार्मिक आणि आर्थिक नियमांना धोका संभवणारी कोणतीही नवी प्रथा जात चालू देत नाही. अर्थात जातीतील बंडखोरांना जात बहिष्कृत करते आणि इतर जात आपल्यात सामावून घेत नाही. त्यामुळे त्यांना स्वतःची वेगळी जात बनवणे भाग पडते. त्यामुळे नवीन वर्ग जातीच्या चौकटीला आव्हान देणारे वर्ग नवीन जातींमध्ये रूपांतरित होत असतात आणि जातींची संख्या चळ लागल्याप्रमाणे फुगत जाते.

आपल्या प्रबंधाचा शेवट करताना डॉक्टर म्हणतात, की हिंदुराचना संयुक्त स्वरूपाची आहे आणि त्यात संस्कृती ऐक्य आहे. जात म्हणजे सांस्कृतिक ऐक्य असलेल्या समाजाचा एक अंशात्मक तुकडा आहे. जातींची सुरुवात करणारी एक जात होती (ब्राह्मण) आणि अनुकरण आणि बहिष्काराच्या माध्यमातून वर्गांचे रूपांतर जातीत झाले. आपण प्रबंधात मांडलेले मुद्दे अंतिम मानण्याइतका मी दुराग्रही नाही असे सांगताना, माझे निष्कर्ष खंबीर पायांवर उभे आहेत असा विश्वास व्यक्त करतात आणि पूर्वग्रहदूषित होऊन या विषयाकडे जाण्यापासून रोखावे आणि भावनांना शास्त्राच्या कक्षेबाहेर बंदी घालून वस्तूंचे वस्तुनिष्ठ निरीक्षण करावे यासाठी प्रबंध बनवल्याचे डॉक्टर सांगतात.

अंतिमतः ते ही सुद्धा अपेक्षा व्यक्त करतात, जात मानवी समाजाच्या उत्क्रांती प्रक्रियेत आपोआप निर्माण झाली असे ज्यांना वाटते त्यांच्यासाठी माझा प्रबंध विचारांचे खाद्य ठरावे.

– विश्लेषक

हर्षद माने

Previous Article

डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे संविधानदिनाच्या पूर्वसंध्येला केलेले भाषण:विश्लेषण

Next Article

क्रांतिसिंह नाना पाटील

You may also like