‘चला, वाचू या’च्या दुसर्‍या पुष्पामध्ये अभिनेते अजय पूरकर व दिग्पाल लांजेकर

Author: Share:

पुणे – वाचन चळवळ वृध्दींगत करुन लोकांमध्ये वाचनाची आवड निर्माण करण्यासाठी व्हिजन-मुंबई, प्रभु ज्ञान मंदिर आणि आशियाना करंडक, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने सुरु करण्यात आलेल्या ‘चला, वाचू या’ अभिवाचन उपक्रमाचं दुसरं पुष्प रविवार ५ ऑगस्ट रोजी सायंकाळी ५ वाजता होणार असून यावेळी प्रसिध्द अभिनेते अजय पूरकर आणि ‘फर्जंद’ चित्रपटाचे लेखक-दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर अभिवाचक म्हणून सहभागी होत आहेत. नवी पेठ येथील निवारा वृध्दाश्रमासमोरील प्रभु ज्ञान मंदिर येथे होणारा हा कार्यक्रम साहित्यरसिकांसाठी विनामूल्य आहे.

श्रीनिवास नार्वेकर यांच्या ‘व्हिजन’च्या वतीने गेली तीन वर्षे ‘चला, वाचू या’ ही मासिक अभिवाचन चळवळ मुंबईमध्ये सुरु आहे. या उपक्रमासाठी येणारी सर्व नामवंत अभिवाचक मंडळी या उपक्रमासाठी कोणतीही अपेक्षा न ठेवता विनामूल्य येतात. नुकताच मुंबईतील उपक्रमाचा तृतीय वर्धापनदिन प्रसिध्द संगीतकार सलील कुलकर्णी आणि अभिनेत्री प्रतीक्षा लोणकर यांच्या अभिवाचनाने साजरा झाला. या चळवळीचा पुढला टप्पा म्हणून प्रभु ज्ञान मंदिर आणि आशियाना करंडक यांच्या सहकार्याने पुण्यामध्ये या उपक्रमाची मुहूर्तमेढ रोवण्यात आली. प्रसिध्द साहित्यिका डॉ. मीना प्रभु आणि अभिनेते जितेंद्र जोशी यांच्या सहभागाने रंगलेल्या पहिल्या पुष्पाला साहित्यरसिकांचा प्रचंड प्रतिसाद लाभला. साहजिकच पुण्यातही दर महिन्याला हा उपक्रम करण्याचे आयोजक रश्मिता शहापूरकर यांनी जाहीर केले. या उपक्रमाचे पुण्यातील साहित्यरसिकांनी स्वागत केले आहे.

जून २०१५ मध्ये मुंबईत हा उपक्रम सुरु झाल्यानंतर अल्पावधीतच त्याला साहित्यरसिकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला. दर महिन्याला सलग उपक्रम स्वरुपात सुरु झालेला अभिवाचनाचा अशा प्रकारचा हा मुंबईतील पहिलाच उपक्रम आहे. ज्येष्ठ अभिनेते जयंत सावरकर, अभिनेते व कवी किशोर कदम ‘सौमित्र’, संगीतकार कौशल इनामदार, दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी, विजय केंकरे, अविनाश नारकर, अभिनेत्री सोनाली कुलकर्णी, स्मिता तांबे, राजन ताम्हाणे, संदेश कुलकर्णी, अमृता सुभाष, शर्वाणी पिल्ले, शुभांगी लाटकर, ज्येष्ठ साहित्यिका उषा मेहता, साहित्य अकादमी पुरस्कार विजेते साहित्यिक अनंत भावे, राज्याच्या तत्कालीन भाषा संचालिका डॉ. मंजुषा कुलकर्णी, प्रसिध्द कवी डॉ. महेश केळुसकर, पुणे येथील ज्येष्ठ साहित्यिक दत्ता टोळ आदींसह अनेक नामवंत आजवर या उपक्रमात अभिवाचक म्हणून सहभागी झाले आहेत. पुण्याच्या महाराष्ट्र कल्चरल सेंटरच्या वतीने पु. शि. रेगेंच्या साहित्यावरील‘सृजनरंग’ हा कार्यक्रमही नुकताच या उपक्रमाअंतर्गत साजरा झाला.

साहित्यप्रसाराबरोबरच वाचिक अभिनयाकडेदेखील जाणीवपूर्वक लक्ष वेधण्याचा प्रयत्न करणे हा या उपक्रमाचा हेतू आहे. या कार्यक्रमास बहुसंख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन प्रभु ज्ञान मंदिरचे डॉ. शेखर कुलकर्णी, आशियाना करंडकच्या रश्मिता शहापूरकर आणि व्हिजनचे श्रीनिवास नार्वेकर यांनी केले आहे.

Previous Article

लासलगाव येथील जिजामाता प्राथमिक शाळेत लोकमान्य टिळक पुण्यतिथी व लोकशाहिर आण्णाभाऊ साठे जयंती उत्साहात संपन्न

Next Article

फ्रान्सिस दिब्रिटो, भानु काळेंच्या उपस्थितीत ४ ऑगस्टला लक्ष्मण लोंढे स्मृतीदिन

You may also like