अंध व्यक्तींचे व्यवसाय आणि अडचणी

Author: Share:

रेल्वेने प्रवास करताना अनेक फेरीवाले रेल्वेमध्ये व्यवसाय करताना दिसतात. यात अंध व्यवसायिकांचाही मोठ्या प्रमाणात समावेश असतो. दैनंदिन जीवनात गरजेपयोगी सामान विकून अंध व्यवसायिक आपली गुजराण करतात. परंतू बर्‍याचदा या अंधांना प्रवास करताना रेल्वेप्रशासनाकडून त्रास सहन करावा लागतो. त्याचाचं हा आढावा…


असे साहित्य वाचत राहण्यासाठी लाईक करा आमचे फेस बुक पेज 

www.facebook.com/SmartMaharashtraOnline


अंध व्यक्तींचे व्यवसाय आणि अडचणी

रेल्वेला मुंबईची जीवनवाहिनी म्हणतात. ही वाहिनी दररोज लाखो लोकांना आपल्या अंगाखांद्यावर घेत त्यांच्या नोकरीधंद्याच्या ठिकाणी पोहचवते. लाखो लोक या वाहिनीला रोजगाराकडे पोहचण्याचे माध्यम म्हणून बघतात परंतु आम्ही ज्यांच्या मुलाखती घेतल्या ते अंधजन याच रेल्वेत आपले काम शोधतात. रेल्वे त्यांचे कामाचे ठिकाण आणि कामासाठीचे साधन ही आहे.

वांगणी मध्ये राहणाऱ्या अंध बांधवांचा उपजीविकेचा महत्वाचा घटक रेल्वे हाच आहे.आलेल्या माहितीच्या आधारे हे निश्चितपणे म्हणता येईल की,उपजीविका करणे हा महत्वाचा घटक रेल्वे प्रवास करणाऱ्या दृष्टिहीन व्यावसायिकांचा आहे. मुलाखतीदरम्यान प्रश्नांची उत्तरे देत असताना अनेक अंध बांधवांनी रेल्वेला आपल्या उदरनिर्वाहाचे साधन म्हणून सांगितले. शिक्षण, दैनंदिन प्रवास व्यक्तिगत कारण, नोकरी अशा विविध बाबी प्रवासासाठी समोर आल्या. वांगणी परिसरात वास्तव्यास असलेले बहुतांश अंध व्यवसाय व नोकरी यासाठी प्रवास करत असल्याचे स्पष्टपणे निदर्शनास आले. बहुतेक अंध सामानाची खरेदी विक्री करणे अशा कारणांसाठी प्रवास करत असल्याचे समोर आले. चर्चे दरम्यान एका अंध व्यक्तीने जीवन जगण्यासाठी प्रवास करणे अविभाज्य असल्याचे सांगितले. काही अंध विद्यार्थी आपल्या शैक्षणिक कारणास्तव नियमित रेल्वे प्रवास करत असल्याचे समोर आले.

अंध व्यावसायिक कुर्ला, विठ्ठलवाडी आणि कल्याण अशा प्रमुख ठिकाणांवरून कच्चामाल विकत घेऊन त्यावर प्रक्रिया करून त्याची विक्री करतात. रेल्वे प्रवासादरम्यान कटलरी, स्टेशनरी व इतर जीवनावश्यक वस्तूंची विक्री करून दृष्टिहीन बांधव आपला उदरनिर्वाह करतात. यातील काही अंध सुशिक्षित आहेत. तर, काही निरक्षर आहेत. तर, काही भिक मागून आपला उदरनिर्वाह करतात. मुलाखती दरम्यान अनेक अंध व्यक्तींनी रेल्वेमध्ये वस्तू विक्री व व्यवसायासाठी प्रवासादरम्यान रेल्वे प्रशासनाच्या आणि शासनाच्या कार्यबाबत नाखुशी व्यक्त केली. बहुतांश अंध सकाळी आठ ते संध्याकाळी सात या गर्दीच्या वेळेत व्यवसाय करतात.त्यांच्यामध्ये रेल्वेच्या अतिक्रमण विरोधी कर्मचारी व RPF कर्मचाऱ्यांबद्दल कमालीचा द्वेष आहे.

अंधांच्या मते ही लोक त्यांना व्यवसाय करण्यापासून परावृत्त करतात. वेळ प्रसंगी त्यांचे सामान जप्त देखील करतात अथवा फेकून सुद्धा देतात परिणामी आर्थिक विपन्नावस्थेत असलेल्या अंधांना मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागते. त्यांची ही सर्वात मोठी समस्या आहे. ही समस्या अधोरेखित झाली. रेल्वे प्रशासनाकडून वेगळाच युक्तिवाद केला जातो. त्यांच्यामते या विक्रेत्यांमुळे प्रवाशांची गैरसोय होते. परिणामी त्यांच्यावर कार्यवाही करणे आम्हाला आवश्यक आहे. प्रशासनाच्या मते,“अंध बांधव पूर्णपणे अनधिकृतरित्या व्यवसाय करत असतात” त्यामुळे, त्यांच्यावर कार्यवाही होऊन त्यांना शिक्षा होण. ही कायदेशीर बाब आहे. वेळेप्रसंगी प्रवासांच्या तक्रारीचा हवाला देत प्रशासन अंध बांधवांवर कार्यवाही सुद्धा करतात.

रेल्वे प्रवास हा वांगणी मधील अंध बांधवांसाठी उपजीविकेचा प्रमुख साधन असल्याचे मुलाखती व गट चर्चेच्या माध्यमातून स्पष्ट होते. यातून एक मूलभूत प्रश्न समोर येतो तो म्हणजे रेल्वे या माध्यमात येथील तर कोणता पर्याय या अंध बांधवांसाठी आहे. या प्रश्नाच्या शोधात घेण्यात आलेल्या मुलाखत व संवादांमध्ये असे समोर आले की, रेल्वे ही बाब वांगणी मधील अंध बांधवांची संलग्न आहे. त्यांच्या मते“ रेल्वे व्यतिरिक्त इतर ठिकाणी त्यांना पुरेशा प्रमाणात वाव मिळणार नाही”. रेल्वे इतकी गर्दी अन्य कोणत्याही ठिकाणी उपलब्ध होणे आव्हानात्मक आहे. रेल्वेचे प्रवासी भरपूर आहेत. व रेल्वेत व्यवसायासाठी प्रवास करणे सुलभ आहे. सोबतच“ रेल्वे प्रवास हा आमचा दैनंदिनी विषय असल्याने प्रवासात सोयीचे ठरते” असे मुलाखत देणाऱ्या एका दृष्टिहीन व्यक्तींचे मत आहे.

मुलाखती दरम्यान एका महिलेने “रेल्वे प्रवासाला आपली मूलभूत गरज म्हणून संबोधले तिच्यामते त्यापासूनच आम्हाला रेल्वेने प्रवास करायची सवय जडली आहे” अन्य प्रवासाची साधने पुरेशा प्रमाणात अंगवळणी न पडल्यामुळे रेल्वेशी वांगणी मधील अंधांची नाळ जुळली असल्याचं अधोरेखित होते. मुलाखत देणाऱ्या एका अंध व्यक्तीच्या मते. “आम्ही स्वबळावर रेल्वेमध्ये व्यवसाय करतो तसेच अन्य वाहतुकीच्या साधनांच्या तुलनेत रेल्वे प्रवासात चुकामूक होण्याची शक्यता नगण्य असते सोबतच करताना अन्य अंध बांधवांची मदत होते रेल्वे प्रवासात इतर प्रवासी त्या तुलनेत सुरक्षिततेची भावना असल्याचे जाणवते”.

रेल्वेत व्यवसाय करताना असामाजिक घटकांचा सुद्धा दृष्टीहीनांना सामना करावा लागतो यामध्ये अंधांचे पैसे घेऊन पळून जाणे, त्यांची काठी हिसकावून घेणे, खोट्या नोटा देणे, चेष्टा करणे चिडवणे, असे दुर्दैवी प्रसंग देखील ऐकिवात आले जे दुर्दैवी आहे. जर उपजीविकेचे साधन नसेल तर जीवनाला निराशेचे ग्रहण लागते. एका दृष्टिहीन व्यक्तीच्या मते“शिक्षणानंतर रोजगाराचे साधन म्हणून बरेचसे दृष्टिहीन बांधव लॉटरी विकणे खेळणी विकणे,कटलरी, विकणे आणि भिक्षा मागणे असे विविध पर्याय निवडतात. पण,त्याला देखील सुद्धा पराकोटीच्या मर्यादा असल्याचे विदारक वास्तव अस्तित्वात आहे” सोबतच कौटुंबिक समस्या व वैवाहिक जीवनातील अडचणी यामुळे दृष्टिहीन बांधव आहेत.

अंधत्व ही आयुष्याला असलेली मर्यादा आहे या मुद्द्यावर प्रश्न विचारला असता अंधांनी हे मान्य केलं की “दृष्टिहीन असल्यामुळे त्यांच्या दैनंदिन जीवनात त्यांना दुसऱ्यावर थोड्या फरकाने का होईना अवलंबून राहावे लागते परिणामी त्यांच्या आयुष्यात त्यांना जगताना मर्यादांचा सामना करावा लागतो” असे मुलाखत देणाऱ्याने सांगितले. अशाच प्रकारचे वास्तव व्यवसाय करताना अंधांना भेडसावते .कारण दृष्टिहीन असल्यामुळे रेल्वेचे डबे चढताना अथवा उतरताना विशेष खबरदारी घ्यावी लागते सोबतच, सामानाची विक्री करत असताना सजग रहावे लागते कारण थोड्याशा चुकीने का होईना त्यांचे मोठे नुकसान होऊ शकते. योग्यप्रकारे खबरदारी जर नाही घेतली तर परिश्रम वाया जाऊ शकतात.योग्यप्रकारे व्यवहार जर नाही केले तर आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागते.सोबतच जर व्यवसायात तोटा झाला तर कर्जबाजारी देखील व्हावे लागते.

पर्यायी रोजगार नसल्यामुळे रेल्वे हा वांगणी येथील दृष्टिहीनांसाठी महत्त्वाचा स्त्रोत आहे हे निश्चित. मुलाखतीदरम्यान एका अंध व्यक्ती ने असे सांगितले की “शिक्षण घेऊनही नोकरी न मिळाल्यामुळे व्यवसाय करणे अथवा भिक्षा मागणे हा एकमेव पर्याय त्यांच्याकडे उपलब्ध आहे”. अनेक ठिकाणी अंधाबद्दल असलेले पूर्वग्रह पण अंधांच्या बेरोजगारीला कारणीभूत ठरले. कारण बरेचसे “लघुउद्योग मालक अंध व्यक्तीनं ऐवजी डोळस लोकांना कामासाठी पसंती देतात”असे एका दृष्टिहीन बांधवाने सांगितले. दरम्यान मुलाखतीदरम्यान एका अंध बांधवाने असे सांगितले की, अंधांच्या संस्थांमध्ये देखील सुद्धा अंध बांधवांना पसंती मिळत नसल्याचे त्याच्या अनुभवास आलेले आहे. परिणामी जीवनातला संघर्ष अधिकच गुंतागुंतीचा झाला आहे. संगणकाच्या भन्नाट प्रगतीमुळे आणि प्लॅस्टिकच्या तंत्रज्ञान शोधामुळे अंध बांधव रोजगाराला मुकत आहेत. विभक्त कुटुंब पद्धतीमुळे वृद्ध दृष्टिहीन यांच्या समस्या ऐरणीवर आल्या आहेत.

रेल्वेच्या डब्यातून अंध महिलाही व्यवसाय करण्यासाठी प्रवास करत असतात, हे करत असताना त्यांच्या सुरक्षिततेचा मुद्दा ही महत्वाचा होता. मुलाखती दरम्यान एका अंध महिलेने महिला म्हणून प्रवास करताना तिच्या शारीरिक सुरक्षिततेचा मुद्दा उपस्थित केला तिच्यामते अंधांच्या डब्यांमध्ये प्रवास करताना अनोळखी व्यक्ती पासून जास्त असुरक्षित वाटते कारण समाजातील वाढत्या विनयभंगाच्या घटना आणि सोबतच सामाजिक अपप्रवृत्तीने मनामध्ये भीतीचे वातावरण निर्माण केले आहे उपनगरीय रेल्वेचा प्रवासादरम्यान अंध स्त्रियांना भेडसावणाऱ्या शारीरिक व लैंगिक समस्यांवर प्रश्न विचारला असता संमिश्र स्वरूपाच्या प्रतिक्रिया समोर आल्या आहेत.

आयुष्यात काहींनी लैंगिक या प्रश्नावर कधीही अनुभव नसल्याचे सांगितले पण मुलाखतीदरम्यान दृष्टिहीन स्त्रियांनी लैंगिक प्रश्नावर आपले म्हणणे मांडले काही दृष्टिहीन स्त्रियांना लैंगिक छेडछाड व विनयभंग झाल्याची घटना अनुभवास असल्याचे मान्य केले. खासकरून रात्रीच्या वेळेस प्रवाशांची गर्दी कमी असते अशा वेळेला अपंगांच्या डब्यामध्ये असुरक्षिततेची भावना प्रकर्षाने जाणवते असे त्यांचे म्हणणे आहे. त्यांनी प्रशासनाकडून अशी अपेक्षा व्यक्त केली आहे की रात्रीच्या वेळेस किमान अपंगांच्या डब्यात सुरक्षाकर्मी असणे आवश्यक आहे. मुलाखतीदरम्यान दोन स्त्रिया व एका पुरुषाने सदर प्रश्नावर आपली मते मांडली.

बऱ्याच अंशी लैंगिक प्रश्नावर महिला व्यक्त न झाल्यामुळे लैंगिकतेचा मुद्द्याबद्दल आम्हांला खूपच कमी माहिती मिळाली. परंतु थोड्या फार फरकाने अंध महिला त्यांची छेडछाड व विनयभंग हा प्रश्न चर्चेला राहिला, कदाचित जास्त महिलांशी चर्चा केली गेली असती तर अजुनहि मुद्दे समोर आले असते. उपजीविकेचे साधन म्हणून रेल्वे प्रवासाला अनन्यसाधारण महत्त्व आहे आणि म्हणून अंध व्यक्तींच्या रोजगारा बद्दल सरकारकडून अपेक्षा खूप आहेत. त्यांच्या अपेक्षा रेल्वे प्रवासादरम्यान वस्तू विक्री व व्यवसायासाठी किमान मुभा मिळणे अपेक्षित आहे.एकूण 25 मुलाखतींचा आढावा घेता, असे लक्षात येते की, जर प्रशासनाने अंधांसाठी व्यवसायाची पर्यायी व्यवस्था केली तर बऱ्याच अंशी ही समस्या मार्गी लागेल. त्यांच्या, अपेक्षांमध्ये सोयी व सुविधा अपेक्षित नसून व्यवसायासाठीचे स्वातंत्र्य अपेक्षित आहे.

अंधव्यक्ती व्यवसाय करताना अनेक अडचणींना तोंड देतात, शासकीय व प्रशासकीय उदासीनता यात भर टाकते दृष्टिहीनांसाठी कार्यरत असलेल्या विविध संस्था त्यांना औद्योगिक प्रशिक्षण देतात खरे पण त्याचा प्रत्यक्ष जीवनाशी संबंध असल्याचे जाणवत नाही .कारण,तंत्रज्ञानाच्या भन्नाट प्रगतीमुळे आणि संगणकाच्या वापरामुळे अनेक लघुउद्योग बंद पडले. परिणामी औद्योगिक प्रशिक्षणाचे प्रमाणपत्र हाती असताना सुद्धा रोजगाराची संधी उपलब्ध होत नसल्याचे विदारक वास्तव पाहण्यात आले. अंधत्वासोबतच सततचे आजारही त्रासदायक ठरतात. परिणामी पुरेसे शारीरिक सामर्थ्य नसल्यामुळे व्यवसाय करणे देखील कठीण झाले आहे.व्यवसाय करणे ही बाब तशी आव्हानात्मक असते उपनगरीय रेल्वे गाड्यांमधील गर्दी आणि गैरसोयीमुळे व्यवसाय हादेखील सुद्धा शाश्वत आधार राहिलेला नाही.

अंधत्व एक समस्या नसून जीवन जगत असताना आलेली सर्वात मोठी मर्यादा आहे. दृष्टिहीन विद्यार्थी दृष्टिहीन व्यावसायिक, महिला, वृद्ध, बालके अशा विविध टप्प्यांवरील अंधांच्या समस्या भिन्न भिन्न स्वरूपाच्या आहेत. अंधत्व जरी हा एक सामाईक घटक असला तरी आव्हाने ही वेगवेगळी आहेत. तथापि आयुष्याच्या विविध टप्प्यावर असलेले अंध वेगवेगळ्या प्रकारे आपल्या अंधत्वावर मात करण्याचा प्रयत्न करत असतात.

संशोधक म्हणून आम्हाला असे जाणवले कि, रेलेव मध्ये भिक मागणे अथवा धंदा करणे जरी अंधांचे उपजीविकेचे साधन असले तरी यामध्ये प्रशासनाला सबंधित विषयावरील कायदा पाळणे बंधनकारक आहे.परंतु प्रशासनाने या विषयावर योग्य विचार करून व्यावसाईक फेरीवाले या विषयावर नियमावली आखणे गरजेचे आहे.त्या संदर्भात ठोस भूमिका घेणे योग्य ठरेल सोबतच या विषयावर कायदा तयार करून त्याची अंमलबजावणी करणे हि योग्य ठरेल. या विषयावर अंधांसाठी कार्यरत असणारी अंधजन मंडल हि संघटना विशेष मागणी लाऊन धरत आहे. कारण त्यांच्या मते रेल्वे शिवाय धंदा करायला दुसरा कोणताही पर्याय अंधांसमोर नाही असे वक्तव्य संघटनेचे सदस्य श्री हर्षद जाधव यांनी मुलाखतीदरम्यान केले.

वांगणी ते दादर प्रवास करताना अंध व्यक्तींच्या सुरक्षेसंदर्भात रेल्वे प्रशासनाची भूमिका महत्त्वाची ठरते. माझ्या या विषयाच्या अनुषंगाने वांगणी ते दादर अंध प्रवास करताना येणाऱ्या सुरक्षितेचे अडचणी या विषयामध्ये त्यांचा मागोवा घेण्यात आला आहे या मुलाखतीमध्ये सुरक्षा आणि आम्हाला व्यवसाय करताना अडचणी अधिक आहेत कारण पोट भरण्याचे धक्काबुक्की त्यांना सुरक्षितता कमी-अधिक प्रमाणात महत्वाची वाटत नाही. त्यांना सुरक्षा पेक्षाही दररोज प्रवास करताना भीक मागताना रेल्वे प्रशासनाकडून त्रास होताना दिसतो.
अंध लोकांचे सामान उचलून नेणे त्यामुळे असल्याने त्यांना त्यांच्या त्यामुळे नाहक त्रासाला त्यांना सामोरे जावे लागते. त्यामुळे रेल्वे प्रशासनाच्या भूमिकेमध्ये अंधांना अधिकृत विक्रेते म्हणून त्यांना मान्यता देण्यात यावी तसेच या मुलाखतीदरम्यान अंधांना शासनाच्या धर्तीवर दुकान दिले जातात. त्या धर्तीवर रेल्वे प्रशासनाने प्रत्येक रेल्वे स्टेशन मध्ये आरक्षण देण्यात यावे.जेणेकरून काही प्रमाणात अंधांच्या बेरोजगारीचा प्रश्न सुटण्यास मदत होई. तसेच,अंधांना अधिकृत विक्रेते म्हणून नोंद करण्यात यावी. मुलाखती दरम्यान रेल्वेमध्ये अंधांना योग्य ते प्रशिक्षण देऊन त्यांना रेल्वे प्रशासनामध्ये समाविष्ट करून घेता येईल.असे मुलाखतीदरम्यान परंतु याचा सर्वस्वी अधिकार प्रत्येक झोनमधील वरिष्ठ अधिकाऱ्यांना असतो.

रेल्वे परिसरात भिक्षा मागणे हा गुन्हा आहे.त्यामुळे मुंबई तरतूद अधिनियम 1886 काहींचे कायद्याचे उल्लंघन होते त्या कारणामुळे रेल्वेमध्ये गाणी पियानो ढोलकी वाजवून पैसे मागणे भिक मागणे बेकायदेशीर आहे. असे रेल्वे अधिकाऱ्यांचं मत आहे. पण यावर अंध बांधवानी असे म्हटले कि, आपली कला सादर करून आपलं रोजीरोटी करतात. पण यावर अंध बांधवानी असे म्हटले कि,रेल्वेत व्यवसाय करणं त्यांना भाग आहे कारण त्यांना दुसरा पर्याय उपलब्ध नाही. त्यामुळ रेल्वे प्रशासनाने अशा अंधांना योग्य ते व्यासपीठ निर्माण करून द्यावं. असे मुलाखती दरम्यान समोर आले. एलफिस्टन दुर्घटनेमध्ये प्रभाव रोजगारीवर झाला.असून कल्याण, कुर्ला, दादर, सायन या भागामध्ये कारवाई करण्यात आली त्यामुळे,अंध लोकच दुर्घटनेला कारणीभूत आहेत असा गैरसमज निर्माण झाला. रेल्वे पोलिसांकडून अंधांची वाढत्या संख्या अंधांना पळवून लावणे हा त्यावरचा उपाय आहे का यावर रेल्वे प्रशासनाकडून कोणते ठोस पाऊल उचलत आहे का यावर प्रशासनाकडून आजपर्यंत कोणतेही प्रयत्न केले गेले नाहीत मुलाखतीदरम्यान एकंदरीत अंधांच्या सुरक्षेचा आहे. बेरोजगार अंधांना रेल्वे पोलीस प्रशासनाकडून दिला जाणाऱ्या त्रासाला अधिक सामोरे जावे लागते त्यामुळे अंधांना इतर पर्यायी व्यवस्था नसल्याने उपासमारीची वेळ झाले आहे. त्यामुळे रेल्वे प्रशासनाकडून भविष्यात अंधांच्या पुनर्वसनासाठी योग्य कौशल्य देऊन त्यांना प्रशिक्षित करण्याची गरज आहे.

रेल्वे प्रशासनाकडून प्रत्येक रेल्वे स्थानकामध्ये आरक्षित जागा आरक्षित स्टॉल देण्यात यावे रेल्वेमध्ये खेळणीकटलरी विकणाऱ्या अंधांना परवाने द्यावेत. तसेच, प्रशासनाकडून वेगवेगळ्या कार्यामध्ये अंधांना सामावून घ्यावं जेणेकरून अंधांच्या बेरोजगारीचा प्रश्न निकाली लागेल. एकंदरीतच परिस्थिती लक्षात घेता अंधांसाठी व्यवसाय हे त्यांच्या जगण्याचे महत्वाचे साधन आहे, त्यांना व्यवसायापासून वंचित करून चालणार नाही.

(पुढील भागात व्यवसायिक अंध अन् रेल्वे प्रशासनाची भुमिका)

@टिम परिवर्तन, पुकार संस्था, मुंबई


असे साहित्य वाचत राहण्यासाठी लाईक करा आमचे फेस बुक पेज 

www.facebook.com/SmartMaharashtraOnline


Previous Article

आध्यात्मिक क्षेत्रातील भोंदूगिरी…

Next Article

लासलगाव येथे प्राथमिक शाळेत वह्या पेन वाटप

You may also like