Smart Maharashtra

दिसामाजी काही उत्तम वाचावे…

dummy_728

श्रीशालिवाहन शके १९४१, शिवराज्याभिषेक शके ३४५, विकारीनाम संवत्सर

भूक

Author: Share:

“अय आये, कायतरी खायाला दिन, लई भूक लागलीया. पोटात कायच नाय ग माह्या ”  लेकराच्या या केविलवाण्या विनवणी वर त्या गाठोड्यातून एक लाडू काढला अन त्याला दिला. त्यांची परिस्थिती पाहता साहजिकच तिने तो केला नसावा हे दिसून येत होत. दिवाळीतच कुठेतरी तो तिला भिक माघून मिळाला असावा. कामावरून घरी जाताना चहा पीत होतो तेव्हा डांगे चौकात हा प्रसंग माझ्या समोर घडला.

आता दुसरा प्रसंग. एके दिवशी मित्रांना भेटायला पुणे विद्यापीठात गेलो होतो. जो कालचा मुलगा भूक लागली म्हणून ओरडत होता तोच दुसऱ्या दिवशी विद्यापीठ चौकात भिक मागत होता. लाल दिवा सुरु असल्याने मी थांबलो होतो पण काही क्षणांसाठी माझी नजर त्या माउलीला शोधत होती. भूक तर दोघांनाही लागली असेल ना ? मग आत्ता ती कुठे आहे ? ते लहान बाल माझ्या जवळ येऊन पैसे माघायला लागल पण तितक्यात लाल दिवा हिरवा झाला अन मी गाडी जोरात काढून निघून गेलो.

वरील दोन्ही प्रसंग हे पुण्यात नित्यानियामाचे अन प्रत्येकाच्या आयुष्यात दररोज घडणारे आहेत. पण तिसऱ्या प्रसंगाने मात्र आम्हा दोघा तिघांना विचार करायला भाग पाडलं. त्याच झाल अस. आम्ही काही मित्र चहा घेत असताना असाच एक लहान मुलगा भिक मागायला आला.भिक हा शब्द थोडा वेगळा वाटतो म्हणून मी येथे पैसे असा उल्लेख करतो. तो पैसे मागत असताना सुरवातीला आम्ही त्याची थोडी गंमत केली. मनात विचार आला की याला पैसे न देता आपण एक वडापाव घेऊन देऊ कारण तसही पैसे हा जेवणासाठीच मागत असणार ना ?

पण आम्ही दिलेला वडापाव त्याने नाकारला अन तो फक्त पैशाचीच मागणी करायला लागला. तो फक्त पैसेच का मागतोय असा विचार केला असता त्याने सांगितल की , “जर मी सांच्याला पैस घेऊन नाय गेलो तर माहा बाप मला लई हानितो. रोच्याला दारू पिऊन येतो अन आईला पण लई मारितो. तुमी मला पैसच द्या सायेब.” त्याच उत्तर ऐकून मी एकदम शांत झालो होतो.

पण आमचे दोस्त त्याची गंमत करायचे थांबले नव्हते अजून. पैसे तर दिले नाही पण चेष्टा मात्र सुरु होती. एक मित्र म्हणे , वडापाव नाही अन पैसे पण नाही देणार. तेव्हा ते लहान मुल म्हणे, “सायेब, ते दोनी नाय दिल तरी चालन पण ५ रुपद्याच यक पेन अन १० ची यक दुरेघी वही तरी घेऊन द्या. माया बाप मला शाळेत पण जाया देत नाय. सारखा भिक मागायला लावितो. मला येबिसिडी पण येत अन शंभरापोत यक-दोन बी येत. तुमी तेव्हड घेऊन दिल तर मी दररोज राच्याला वाचीत जाईन अन लीवीन सुदा. मला पण शाळा शिकायची हाय अन तुमच्या सारख मोठ सायेब व्हायाच हाय….”

आता मात्र त्याच्या या उत्तराने आमच्यात निर्वात शांतता पसरली होती. कुणाच्याच तोंडून एक शब्द फुटत नव्हता अन तो मात्र निरागस चेहऱ्याने आमच्याकडे पाहत होता. त्याला पेन-वही घेऊन दिली. तो निघून गेला अन आम्ही ही आलो परत. पण त्या प्रसंगाने मात्र मला खूप वेळ झोपच लागली नाही.

एका चौकात हा भेटला, याच चौकात कितीतरी याच्यासारखे असतील ? अन पुणे शहरात काय चौक कमी नाहीत अन अवघ्या भारतभर पुण्या सारखी शहरेही काही कमी माहित ! फक्त विचार केला तरी हा आकडा काही लाखोंच्या घरात जाईल अन प्रत्येक्षातील आकडेवारी मात्र त्या पेक्षाही अधिक. मुलांकडे पाहूनच राष्ट्रपती अब्दुल कलाम यांनी भारत महासत्ता होण्याच स्वप्न पाहिलं होत पण अशी कित्येक मुले-मुली शिक्षणावाचून-अन्नावाचून वणवण हिंडत आहेत, त्यांच्या भविष्याच काय ? मग कसा होणार भारत महासत्ता ? हा विचारच मनाला सुन्न करून टाकणारा आहे.

दोन वेळच जेवण अन कमावण्यापुरात शिक्षण जर हे सरकार किंवा कुणीही देऊ शकत नसेल तर हा जो विकास-विकास म्हणता तुम्ही, तो काय कामाचा ? आता असे म्हणायची वेळ आली आहे, पंतप्रधान अन सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनो – आम्हाला तुमची बुलेट ट्रेन नको, गुळगुळीत अन रुंद रस्तेही नकोत, तुमचा विकास अन काय ते म्हणे अच्छे दिन पण नकोत, पण गरिबांना दोन वेळच जेवण मिळेन, सगळयांना शिक्षण  मिळेन, तरुणांच्या हाताला काम मिळेन, इतक जरी दिल तरी ते आम्हाला भरून पावेल. पण तुम्ही फक्त ऐकणार अन चर्चा करत बसणार हे सर्व-सामान्य जनता जाणते.

तू भुखा है तो सब्र कर, रोटी नाही तो क्या हुआ ?
तू अनपढ है तो सब्र कर, शिक्षा नाही तो क्या हुआ ?
तू बेरोजगार है तो सब्र कर, नोकारी नही तो क्या हुआ ?
तू दु:खी है तो सब्र कर, सुख नही तो क्या हुआ ?
आजकल दिल्ली में है, यह सब बहस का मुद्दा ||

– प्रा. विशाल पोपट पवार
रुईछत्तिशी, ता. नगर. जि.अ.नगर
vishalpawar153@gmail.com

( लेखक ATSS महाविद्यालय , चिंचवड, पुणे येथे प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत )


असे साहित्य वाचत राहण्यासाठी लाईक करा आमचे फेस बुक पेज 

www.facebook.com/SmartMaharashtraOnline


 

Previous Article

अंध बांधवांची शैक्षणिक स्थिती आणि आव्हान

Next Article

सत्तरी ओलांडलेला नवतरुण…

You may also like