भय्युजी महाराज आणि स्वामी विज्ञानानंद

Author: Share:

मनशक्ती, लोणावळा चे चिंतक स्वामी विज्ञानानंद यांचे उदाहरण व नाव भय्युजी महाराज प्रकरणात काही ठिकाणी वाचले. मी मनशक्तीशी परिचित आहे व स्वामी विज्ञानानंद यांच्या लेखनाशीही परिचित आहे.

स्वामी विज्ञानानंद हे वेगळ्या पध्दतीने समाधी घेणार असे सर्वांना आधीच माहीती होते. वयाच्या सुमारे ७४ व्या वर्षी त्यांनी स्व मृत्यु घडवला. त्या आधी आठ वर्षे ते समाधी घेण्याची चर्चा करत होते. ‘शक्तीचर्चा’ या पुस्तकामध्ये त्यांनी अशा बऱ्याच प्रयोगांची माहिती दिली होती. ‘वितळता क्षण’ या पुस्तकातही त्यांनी समाधीच्या त्यांच्या एका फसलेल्या समाधीच्या प्रयत्नाची सविस्तर माहिती लिहिली आहे.

समाधीचा तो प्रयोग फसला कारण त्यांनी बहुदा योगमार्गाने प्राण सोडायचा प्रयत्न केला, व अर्धवट बेशुध्दावस्थेत शिष्यांनी त्यांना दवाखान्यात हलवले. तो त्यांनी ध्यान लावून केला पण नेमका कसा केला हे कळू शकले नाही पण त्यांच्या त्या प्रयत्नानंतर झोपेची वा तत्सम औषधे, विष इत्यादी त्यांच्या शरीरात सापडली नाहीत असा अहवाल डॉक्टरांनी दिला. अन्य एका वेळी त्यांच्या समाधीच्या प्रयत्नाची कुणकुण लागल्याने त्यांना पोलिसांनी अटकाव केला होता.

आपण गेल्यावर कसे वागावे याचे मार्गदर्शन त्यांनी अतिशय सुस्पष्ट पणे शिष्यांना करुन ठेवले. समाधीच्या प्रयत्नांचे वेगवेगळे मार्ग आणि त्यांची नावे त्यांनी एका लेखात लिहून ठेवली आहेत. त्यात खूप उंचावरुन उडी मारुन शरीरातले प्राण बळाने बाहेर काढणे यास प्रकाशसमाधी हे नाव दिले होते, त्यामुळे त्यांच्या शिष्यांनी त्यांच्या मृत्युला प्रकाश समाधी हेच नाव दिले. मंत्रालयासमोरील एका अन्य सरकारी इमारतीच्या गच्चीवरुन उडी मारुन त्यांनी हे आत्मसमर्पण केले. तत्कालिन काही वृत्तपत्रांनी त्यास आत्महत्या म्हटले तर काहिंनी त्यास आत्मसमर्पण म्हटले.

समाधी म्हणजे काय याचे स्पष्टीकरण स्वत: स्वामी विज्ञानानंद यांनी केले ते सम+धी अशी फोड करुन. धी म्हणजे बुध्दी व सम म्हणजे अर्थातच स्मान, बुध्दी सम ठेऊन, किंवा स्थिर ठेऊन, मला दु:ख ही नको आणि सुख ही नको, मी आता या दोन्हीच्या पलिकडे गेलो आहे असा सुख दु:खाविषयी समभाव ठेऊन आयुष्य संपवणे म्हणजे समाधी.

टिप:- समाधी घेण्याचे स्वामी विज्ञानानंद यांचे जे कारण आहे व त्याचा जो परिणाम त्यांना अपेक्षित होता तो मला अमान्य आहे. मी त्या प्रकाराने कोणी समाधी घ्यावी याच्याशी सहमत नाही, पण तरीही विज्ञानानंद यांच्या मृत्यु प्रकारास आत्महत्या हे नाव मी देणार नाही.

केवळ दु:खातिरेक, अपयश, मनावरचा ताण, मानापमानाचा विलक्षण कल्पना किंवा व्यसन व वेड यांच्या भरात स्वताची बळाने केलेली हत्या यासच मी आत्महत्या मानतो, आत्महत्येचा हेतू व त्यामागची विचारसरणी हा महत्वाचा निकष असून त्यानंतरच एखाद्याच्या अशा मृत्युला आत्महत्या, आत्मसमर्पण, समाधी किंवा हौतात्म्य हे शब्द लागू करता येतात.

लेखक: चंद्रशेखर साने


असे साहित्य वाचत राहण्यासाठी लाईक करा आमचे फेस बुक पेज 

www.facebook.com/SmartMaharashtraOnline


 

Previous Article

श्रावणातला पाऊस

Next Article

सावरकरांचे रत्नागिरीतले समाजकार्य

You may also like