भारत वि इंडिया: “आम्हाला ते दिसले नाही पाहिजेत”

Author: Share:

नेहमीप्रमाणे एका इमारतीचे बांधकाम चालू आहे तेथे काम करत होतो. आम्ही प्रत्यक्ष बांधकाम करत नसलो, तरी आजूबाजूला असलेले इतर लोखंडी काम आम्ही करत होतो. नवीन बांधकाम चालू असलेली इमारत आणि नुकतेच बांधकाम संपून सध्या वापरात असलेली व्यावसायिक इमारत यांच्या दरम्यान ९ मीटर उंचीचे बॅरिकेशन दुभाजकाचे काम करीत होती. दोन्ही इमारती या एकाच कंपनीच्या मालकीच्या आहेत. पावसाळ्यात ते बॅरिकेशन पडले. ते बॅरिकेशन कापून पुन्हा नवीन बसवण्याचे काम चालू केले. त्यासाठी अगोदर पडलेले काम पूर्णपणे काढून मगच नवीन बॅरिकेशन उभे करावे लागणार होते. म्हणून आम्ही पडलेले बॅरिकेशन काढले आणि त्याजागी लहान तात्पुरत्या बॅरिकेशनची सोय केली आणि उंच बॅरिकेशनचे काम चालू केले.

काही वेळाने एक वॉचमन माझ्याकडे आला. मला विचारलं,” तुमचं काम कधीपर्यंत संपेल?” मी म्हणालो,” ३-४ दिवस जातील.” तो थोडासा ओशाळून बोलत होता. मला ते समजले. म्हणून मीच पुढे विचारले की,” अचानक कसे तुम्ही आलात इकडे हे विचारायला?”. तो म्हणाला,” साहेब, ते बाजूच्या इमारतीमधून तक्रार आली होती. की काम चालू असलेल्या आणि या इमारतीच्या दरम्यान बॅरिकेशन हवेच. लवकरच बनवायला सांगा त्यांना. आणि ते कामगार लोक आम्हाला दिसले नाही पाहिजेत.” कुठल्याही व्यक्तीला या गोष्टीचा राग येणे साहजिकच आहे. मलाही राग आला. मी चिडून त्याच्याकडे बघितले. तर तो स्वतः म्हणाला,” साहेब वाईट वाटून घेऊ नका. पण त्या लोकांना नाही आवडत हे वातावरण आणि अशी माणसे बघायला.” मी त्याला प्रत्त्युत्तर देणार होतो. पण त्या वॉचमनचा तरी काय दोष !! तोही त्याच लोकांपैकी एक आहे ज्या लोकांना अशी दुय्यम वागणूक मिळते. हाच विचार करून मी गप्प राहिलो. पण मनात विचारचक्र सुरू झाले.

मग मला काही वर्षांपूर्वी वर्तमानपत्रात छापून आलेली बातमी आठवली. काही गरीब मुले ही मॅकडोनाल्डमध्ये गेली होती आणि त्यांचा अवतार बघून तिथल्या वॉचमनने त्यांना हाकलून लावले. बातमी वर्तमानपत्रात छापून आल्यावर खूप गदारोळ झाला. प्रशासनाने त्या वॉचमनला नोकरीतून काढून टाकले. पण खरेतर त्या वॉचमनचा यात काय दोष होता? तोही त्याच लोकांपैकी एक होता ज्यांना त्याने हाकलून लावले. इथला भेदभाव त्याला माहित असेलच म्हणून तर त्याने त्या गरीब मुलांना आत प्रवेश करून दिला नाही. ज्या मुलांना हाकलून लावले आणि ज्याने हाकलले  त्या दोघांचाही यात बळी गेला. पण ज्या मानसिकतेमुळे हे घडले त्या मानसिकतेला काहीही झाले नाही. त्या मानसिकतेला खापर फोडण्यासाठी एक व्यक्ती हवा होता. वॉचमनच्या रूपाने तो मिळाला. तो गरीब वॉचमन नोकरी गमावून बसला.

भारत माझा देश आणि सारे भारतीय माझे बांधव हे फक्त बोलण्यापुरते मर्यादित आहे. प्रत्यक्ष जीवनात मात्र एखाद्या व्यक्तीचा  दर्जा त्याच्या राहणीमानावर अवलंबून असतो. माणूस म्हणून माणसाचा गौरव असणे हेच महत्त्वाचे आहे हे आपण विसरून जात आहोत. घरात, फेसबुकवर आणि मोठमोठ्या मंचावर माणुसकीच्या आणि गरिबांच्या न्याय्य हक्कांची मागणी करणाऱ्या लोकांपैकी कितीजण त्या गरिबांच्या मांडीला मांडी लावून बसतील? कितीजण त्यांच्या हाताचे पाणी पितील? नवाजुद्दीन सिद्दीकी जेव्हा वॉचमनचे काम करत होता, तेव्हा असलेल्या नातेवाईकांनी त्याच्याजवळ दुर्लक्ष केले आणि जेव्हा तो प्रसिद्ध नट म्हणून पुढे आला तेव्हा लोक नसलेले नातेही सांगू लागले. हे तर एक प्रातिनिधीक उदाहरण आहे. अशी कितीतरी उदाहरणे आपल्या आजूबाजूला घडत असतात. डोळे उघडे ठेवून बघितले तरी आपल्याला समजेल.

दोष हा पैशाचा नाही. दोष हा पैशासोबत येणाऱ्या गर्वाचा आहे. त्या अहंकारी मानसिकतेचा आहे. तो अहंकार काढणे गरजेचे आहे. माणूस म्हणून आपण जर दुसऱ्या माणसाला किमंत देऊ तरच आपलेही मनुष्यत्व समजेल. नाहीतर मनुष्य हा केवळ दोन पायांचा प्राणी आहे, इथवरच त्यांचे अस्तित्व राहील.

– विवेक बाळकृष्ण वैद्य

Previous Article

मुंबईकरांच्या सेवेत दाखल झाली एसी राणी

Next Article

शाळा की प्रयोगशाळा?

You may also like