भक्तीतल्या “क” चा फरक

Author: Share:

मध्यंतरी एक चर्चा रंगली. निर्गुणभक्तीपंथी एका अनुयायाने एक प्रश्न विचारला “गणपतीबाप्पाची मूर्ती 10 दिवस मनोभावे पूजल्यावर त्याचं वाजतगाजत विसर्जन लोकं कसं करू शकतात?”  प्रश्न एका दृष्टीनं अगदीच चुकीचा नव्हता. या प्रश्नासंदर्भात तत्वज्ञानाचे खूप कंगोरे निघून त्यावर न संपणाऱ्या चर्चा घडू शकतील. पण या निमित्ताने बरेच दिवस माझ्या मनात घोळत असलेल्या एका विषयाचं विचारचक्र  पुन्हा मनात  सुरू झालं.

भारतीय संत परंपरेत सगुणभक्त आणि निर्गुणभक्त असे साधारणपणे दोन भक्तीपंथ अस्तित्वात असलेले दिसतात. वारकरी संप्रदायातील सर्वच संतमंदियाळी मुख्यत्वे सगुणभक्तीची कास धरणारी तर कबिरदास ज्याचे अध्वर्यू अशी निर्गुणभक्तांची मांदियाळी निराकार निर्गुणाची उपासना करणारी. सगुणोपासना असो किंवा निर्गुणोपासना, या दोन्ही उपासना पद्धतीचा आढावा घ्यायचा असेल तर त्या त्या परंपरेतील संतसाहित्याचं परिशीलन उपयोगी ठरतं आणि मग लक्षात यायला लागतं की सगुणभक्त काय किंवा निर्गुण भक्त काय, त्यांच्या  साधनामार्गातले त्यांचे अनुभवांचे  मैलाचे दगड बरंच साधर्म्य सांगणारे असतात.

सुंदर ते ध्यान उभे विटेवरी’म्हणणारे संतश्रेष्ठ तुकोब्बाराय, ‘त्रिभंगी देहूडा ठाण मांडुनिया राहे, कल्पदृमाँतळी  वेणू वाजवतो आहे’ असं म्हणणारी ज्ञानमाऊली किंवा ” मै गोविंद गुन गाना म्हणणाऱ्या संत मीराबाई सगुणाच्या वर्णनात लीन होतात आणि निर्गुणभक्त जरी ठकड्या विठ्ठलासारखं कुठल्या रुपाचं वर्णन करत नसले तरी ‘गुरा तो जिने ग्यान की जडिया जडी’ असं गुरूंच वर्णन करताना तेही रमतातच.

सगुणभक्त  साधकाला साधनमार्गातील सूचना, ‘रुणूझुणू  रुनुझुणू रे भ्रमरा, सांडी तू अवगुणू रे भ्रमरा’ या शब्दात मिळते तर निर्गुणभक्ताला तीच सूचना ‘हिरना समझबूझ बन चरना’ या शब्दात मिळते. सगुणभक्त हृदयस्थ ईश्वराचं सर्वव्यापीत्व ‘तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल, देव विठ्ठल देवपूजा विठ्ठल’  या शब्दात करतो तर निर्गुणभक्त तेच तत्व “घट घट मे पंछि बोलता” या शब्दात मांडतो.

साधनेच्या एका टप्प्यावर सगुण निर्गुणातली दरी कमी व्हायला लागते आणि सगुणभक्त ज्ञानमाऊली त्या मनस्थितीच वर्णन “तुज सगुण म्हणू की निर्गुण रे, सगुण निर्गुण एकू गोविंदू रे” आशा शब्दात करतात आणि निर्गुणभक्त कबीरदास हीच मनस्थिती वर्णन करताना म्हणतात “जो दिखे सो तो है नाही, है सो कहा न जाई “. त्या परमात्म्याच्या ओढीनं मृत्यूची भीड चेपल्यावर निर्गुणभक्त म्हणतो “उड जयेगा हंस अकेला, जग दर्शन का मेला’ आणि तीच भावना “काळ देहासी आला खाउ, आम्ही आनंदे नाचू गाऊ” या शब्दात सगुणभक्त वर्णन करतो. साधनेच्या अंतिम टप्यात सत,  चित, आनंद एक होण्याची वेळ आली की निर्गुणभक्त कबीरदास म्हणतात, “मन, मस्त हुआ. फिर क्या बोले, क्या बोले फिर क्योँ बोले” आणि हीच मनस्थिती वर्णन करताना संत सोयराबाई म्हणतात “अवघा रंग एक झाला रंगी रंगला श्रीरंग” .

तात्पर्य सगुण आणि निर्गुण भक्तीत साधनेचे सगळेच टप्पे इतकं साधर्म्य दाखवत असतील तर मग त्यांच्यात फरक तो काय?

थोडा खोलवर विचार केल्यावर जाणवतं की सगुणभक्त रुपात रंगतो आणि निर्गुणभक्त रुपकात. या दोन्ही भक्तिमार्गात

“रूप” आणि “रूपक” म्हणजेच अगदी “क” इतकाच जर फरक असेल तर कुणी साधक भक्तिमार्ग कुठला का आचरेना, शेवटचं सत्य “पूर्णमद: पूर्णमिदं…” हेच आहे हे उमगलं की मग अनुभवायचं उरतं ते “आनंदाचे डोही आनंद तरंग” एवढंच….

लेखक: राजेंद्र वैशंपायन 

संपर्क: 91 93232 27277

ईमेल: rajendra.vaishampayan@gmail.com

Previous Article

मराठा म्हणजे नक्की कोण?

Next Article

कला शिक्षक विजय चव्हाण यांचा स्तुत्य उपक्रम; पर्यावरणपूरक गणेशोत्सवातून जनजागृती

You may also like