भाई पूर्वार्ध: फक्कड जमलेले मघई पान

Author: Share:

महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्व पुलंवर जीवनपट आलेला पाहून सर्व मराठी मंडळींना आनंद झाला आहे. ज्या अवलियाने पिढ्यांना आनंद दिला आणि पुढे कित्येक पिढ्या तो घेतील असे साहित्य निर्माण करून ठेवले आहे त्याचे चरित्र पाहण्याची उत्सुकता सर्वांना आहेच पण साहित्य संगीत कथाकथन नाटक सिनेमा ह्यात मुक्त संचार करणाऱ्या पुलंचे जीवन चित्रपटात कसे रेखाटले आहे हेही पाहण्याची उत्सुकता सोबत आहे. त्यांच्या साहित्यातून आणि इतक्या लोकांनी त्यांच्याविषयी लिहिलेल्या अनुभवकथनांतून पुलं एक अतिशय आनंदी ‘डोळस’ आणि हसतखेळत आयुष्य जगले आणि त्यांना मिळालेला आनंद मुक्तहस्ते वाटत गेले हे आपल्याला ठाऊक आहे. मात्र त्यातील बारकावे पहायला मिळाले तर काय मजा येईल. ही मजा भाई चा पूर्वार्ध तुम्हाला देतोच पण त्याचा शेवट उत्तरार्धाची उत्सुकता शिगेला पोहोचवतो. पुलंच्या पानवाला च्या भाषेत सांगायचे तर चित्रपट एक उत्तम जमलेल्या मघई पानासारखा झाला आहे.

चित्रपटाची सुरुवातच पुलंच्या हॉस्पिटलमध्ये आयसीयूत अंतिम क्षणी असल्याने होते. ह्याचे व्रण मराठमंडळींच्या ह्रुदयावर ताजे असल्याने प्रेक्षक इथेच देहभान विसरतो. कारण आजच्या प्रेक्षकांना पुलंचे असलेले स्मरण म्हणजे सत्तरीच्या पिढीला त्यांच्या रंगमंचावरील कथाकथन आणि नव्वदीच्या पिढीला त्यांचे यूट्यूबवर पाहिलेले ऐकलेले कथाकथन त्यांचे निर्मित साहित्य आणि त्यावर निघालेली नाटके आणि त्यांच्या अंतिम दिवसांच्या बातम्या. तिथूनच चित्रपट सुरू करून दिग्दर्शक आजच्या पुलंशी आपली नाळ घालून मग आपल्याला ठाऊक नसलेल्या त्यांच्या भूतकाळात ते घेऊन जातात. हॉस्पिटलच्या वेटिंग रूम मध्ये बसलेल्या सुनीताबाईंच्या आठवणीतून आपण चित्रपट पाहतो आणि पुलं आपण तसेच समजून घेतले आहेत.

पुलंच्या बालपणाच्या काळापासून चित्रपट सुरू होतो. पुलंचे नाट्यवेड हार्मोनियम वादन आणि उत्तम कलाकारांच्या कलेचे आकर्षण त्याला वडिलांचा असलेला पाठिंबा. (इथे पटकन आठवते ते बिगरी मधील ‘वडिलांनी भीक मागण्याची परवानगी मागण्याचे प्रसंग आणले नाहीत’…चार शब्द पुस्तकात पुलंनी आपल्या वडिलांविषयी लिहिले आहे.). यानंतर दोन महत्वाचे प्रसंग घडतात ज्यांत पुलंचे रुदन दिसते आणि प्रेक्षक गहिवरतो. इथेच चित्रपट मनाचा ठाव वगैरे जे म्हणतात ते घेतो. यापुढची कथा सांगण्यात काही मौज नाही ती पाहण्यात आहे. कारण ही काही रोमांचक गुप्तहेरकथा नव्हे की एका ठराविक जागेपर्यंत आणून आता पुढचे प्रत्यक्ष पहा असे म्हणावे. पुलंचे जीवन एक अनुभव आहे तो प्रत्यक्ष घ्यावा. कारण त्यातला गोडवा त्यातच आहे.

पुलं झालेल्या सागर देशमुख यांनी ट्रेलर पासूनच प्रेक्षकांचे मन जिंकून घेतले आहे. ते पुलं म्हणून चित्रपटभर अत्यंत चपलख वावरले आहेत. वागण्याची आणि जीवनाकडे पाहण्याची (यानंतर मी जीवन हा शब्द…) एक सुंदर लय; नाट्यसिनेमात पूर्ण बुडाल्याने इतर गोष्टींकडे झालेले दुर्लक्ष वेंधळेपणा आणि त्याची जाणीवही हा प्रामाणिकपणा त्यांनी व्यवस्थित जपला आहे. सुनीताबाईंचे तरुणपण इरावती हर्षे यांनी उत्तम उभे केले आहे. पुलंच्या व्यक्तिमत्वाला सांभाळणारा एक अतिशय खंबीर आणि तितकाच प्रेमळ जोडीदार समोर उभा राहतो. त्यांचे जुळलेले प्रेम आणि लग्न या दरम्यानचे प्रसंग अतिशय गोड साधे आणि सच्चे आहेत. एकंदरीत दिग्दर्शकाने नाट्य घडवण्यासाठी कुठेही अवास्तवपणा आणण्याचा प्रयत्न केलेला नाही. वसंतराव देशपांडे भीमसेन जोशी कुमारगंधर्व गदिमा यांचे दर्शन आपल्याला होते. सर्व कलाकारांनी आपल्या पात्रांच्या लकबी सुंदर वठवल्या आहेत. पुलंची पात्रेही मध्ये भेटतात. यात नाथा कामत (नाव तेच ठेवले आहे) आणि अंतू बर्वा म्हणून ज्ञात असलेले अण्णा कर्वे ही काल्पनिक पात्रे तसेच बेळगावात पुलंचे उष्टे सांडले त्या काळी पुलंना भेटलेले रावसाहेब मजा आणून जातात.

सगळ्यात महत्वाचा भाग आहे तो संवाद. इतर नाटक चित्रपटातही ते महत्वाचे असतात पण वाक्यावाक्याला शाब्दिक कोट्या करणाऱ्या पुलंच्या आयुष्याबद्दल लिहिताना प्रत्येक वाक्याला कोट्या करण्याचा मोह संवादलेखकाला झाला असता. त्यांनी तो जाणीवपूर्वक टाळला आहे. त्यामुळे संवाद अतिशय साधे सोप्पे आणि कुरकुरीत आहेत. मात्र प्रत्येक शब्दाला तुम्हाला हसवणूक करण्याचा आव नाही.आणि हे अवघड काम पेलण्यास रत्नाकर मतकरींहून अधिक सक्षम लेखक नसता ज्यांनी पुलंच्या साहित्याचे नाट्यरूपांतर केले आहे. अजित परब यांचे पार्श्वसंगीत फक्कड जमले आहे. पुलंच्या हसतखेळत जगण्याला आणि साधेपणाला सुसंगत आहे. आणि ह्या सर्वांना जोडणारा दिग्दर्शक म्हणजे महेश मांजरेकर त्यांचे हे शिवधनुष्य पेलल्याबद्दल अभिनंदन!

काही प्रेक्षकांचा चित्रपटाला काय आक्षेप असू शकतो तेही सांगतो. पुलंच्या आयुष्यात नाट्यमय असे काही घडलेले नाही. जे घडले ते चारचौघांसारखे आणि त्यातही अधिक खुमासदार आणि विनोदी. त्यात लेखक शोधतात तसे नाट्य कमी. त्यामुळे अशा जीवनावर एक नेहमीच्या मार्गाने जाणारा सिनेमा काढावा म्हणजे कथा रंगत जाते आणि मग अँटी क्लायमेक्स मग क्लायमेक्स ही सरळधोपट मांडणी येथे येत नाही. अर्थात चित्रपटाची मांडणी एका लयीत जाते हे कदाचित कुणाला न आवडेल. यावर काही चित्रपट होऊ शकेल का? असेही वाटेल. पण सामान्य माणसाची कथा असामी मधून खुमासदार मांडणाऱ्या पुलंनीच कथा केवळ वादळांनी भरलेली हवी असे गरजेचे नसते हे दाखवले होते. प्रेक्षक पुलंचे जीवन पहायला येतो तेंव्हा त्यात आनंदच असणार आहे आणि त्यांनी जगलेल्या क्षणांचे आपल्याला साक्षीदार व्हायचे आहे असे मनाशी धरूनच येतो. त्यामुळे चित्रपट असाच जातो. ज्यात केवळ पुलंच्या जीवनपटाचे तुकडे एडिट करून बसवले आहेत आणि त्याला एक लय दिली आहे. त्यामुळे चित्रपट एका मैफिलीवर येउन संपतो हे अजुनपर्यंत आपण पाहिलेल्या चित्रपटांपेक्षा पुष्कळ वेगळे आहे. पण चित्रपट तसाच जायला हवा. उत्तरार्धात अधिक घटना असतील हे शेवटच्या मिनिटात दिसते. इथे पटकथाकार गणेश मतकरी यांचे कौतुक झाले पाहिजे आणि संकलक अभिजीत देशपांडे यांचेही.

खटकत असलेली गोष्ट हीच की कदाचित चित्रित केलेले कोणते तुकडे जोडावेत याची तारांबळ काही ठिकाणी झाली आहे. नाथा कामत आणि रावसाहेब ही पात्रे अजुन वेगळ्या ठिकाणी आणून अधिक तजेलदार करता आली असती अंतू बर्व्यांनां सुद्धा एकाच ठिकाणी संपवला आहे. संपूर्ण चित्रपटभर ती विखुरलेली असती तर अधिक गंमत आली असती. पुलंच्या साहित्य निर्मितीच्या कथाही त्यात आल्या असत्या तर प्रेक्षकांना ते अधिक जवळचं वाटलं असतं. केवळ अंमलदार नाटकाचा उल्लेख येतो. दुसरं म्हणजे काळाचा अंदाज प्रेक्षकांना येत नाही. तो दिला असता तर चित्रपटाचा संदर्भ जोडणे अधिक सोप्पे गेले असते.

चित्रपट दोन भागात विभागला हे फार उत्तम केले आहे. कारण त्यामुळे दोन्ही भाग खूलले असतील आणि त्यांना पूर्ण न्याय मिळाला आहे.

चित्रपट खरेच उत्तम जमला आहे. अतिशय गोड पद्धतीने वळणेवळणे घेत चित्रपट प्रवास करतो. प्रेक्षक मध्यंतराला टाळ्या वाजवतात हे नाट्यसंस्कार चित्रपटात घडतात. प्रेक्षक मनमुराद हसतात कधी थोडे कधी टाळी देऊन. ह्या गमतीशीर आनंदमय अनुभवाचा भाग होण्यासाठी चित्रपट नक्की पहा.

आणि थिएटर मध्येच जाऊन पहा बरं!

Previous Article

५ जानेवारी 

Next Article

४ जानेवारी

You may also like