भडाग्नी

Author: Share:

मानवशरीर म्हणजे निसर्गाने बनवलेली एक सुंदर कलाकृती. निसर्गाने सर्वच बनवले. सजीव बनवले, निर्जीव बनवले. सजीवांना मेंदू दिला, चेतना दिली आणि संवेदनाही दिली. मात्र सर्व सजीवांमध्ये मनुष्यप्राण्याला एक निराळे अस्त्र दिले, बुद्धीचे! त्या बुद्धीच्या जोरावर, इतर कुणाही सजीवापेक्षा (किमान ज्ञात) अधिक जास्त, वेगाने आणि क्रांतिकारी विचार करण्याची कुवत मनुष्याकडे आहे.

निसर्गाच्या विविध शक्तिरूपापुढे, जिथे इतर सजीव हार जातात, म्हणण्यापेक्षा, त्यांचे जीवन आणि कालचक्र या निसर्गशक्तीपीठांपुढे नमते घेते, तिथे, मनुष्य कैक वेळेस या शक्तिपीठांपुढे उत्तर घेऊन उभा राहतो. याचा अर्थ तो नमवतो असे नाही. निसर्ग जे प्रश्न उभे करतो, त्याचे उत्तरही त्याच्याकडे आहे. ते उत्तर शोधण्याची क्षमता फक्त मनुष्याकडे आहे इतकेच! किंबहुना ते उत्तर मनुष्याने शोधावे हीच निसर्गाचीही मनीषा असेल. वादळ येते, भूकंप येतो, त्सुनामी येते यात जीवन नष्ट होते, हेलकावते. मनुष्य हि हानी कमी करण्याची साधने शोधू शकतो, निसर्गचक्र नाही! आयुष्यभर माणूस ज्ञान, विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा वापर करीत, इतर सजीवांपेक्षा अधिक अर्थपूर्ण सकस आयुष्य जगतो. याच तंत्रज्ञानाचा आणि विज्ञानाचा वापर करून, शरीरव्याधींवर विजय मिळवतो, किंवा त्या पुढे ढकलतो.

पण , मृत्यू मनुष्याचे सर्व अहं नष्ट करतो. सर्वार्थाने! मृत व्यक्तीच्या भोवती एक निर्विकार पोकळी असते. तिथे भवतालच्या सर्व संवेदना शून्य होतात. सर्व भाव विकार आणि विचार सुन्न होतात. ती पोकळी म्हणजे निसर्गाची श्रेष्ठता आहे. सेहवागच्या भाषेत सांगायचे तर बाप बाप होता है, और बेटा बेटा!

शरीर पंचधातूंचे आहे, हि संकल्पना वैदिकांनी आणि जवळ सर्वच धर्मांनी स्वीकारली आहे. ज्याची निर्मिती होते, ते नष्ट होते हेच शाश्वत आहे, आणि असावेच! उद्या मृत्यूवर विजय मिळवण्याचे विज्ञान मनुष्याने शोधले तर ती त्याचं विनाशाचीच नांदी असेल. प्रत्येक सजीवाला निसर्ग आपल्यात सामावून घेतो. दिवसभर हुंदडल्यावर, बाळ आईच्या कुशीत शिरते, तेंव्हा आईची कूस ब्रह्माण्डापेक्षा अमर्याद वाटते. तसेच मृत्यू मनुष्याला सहस्त्र बाहूंनी आपल्या कुशीत घेतो. भडाग्नी!

माणूस चितेवर चढवल्यावर सर्व विधी होऊन, त्याला चिता देऊन, माणसे मृत व्यक्तीला श्रद्धांजली वाहण्यासाठी एका कोपऱ्यात जमतात. साधारण अग्नी देऊन दहा मिनिटांचा कालावधी लोटलेला असतो.

मृताच्या आठवणींमध्ये जनसमुदाय बुडालेला असताना, तिथे चितेवर पाहावे!

कलेवराभोवती अग्नीचे तांडवनृत्य चालू असते. मगासपेक्षा तो कैक पटीने उधाणलेला असतो. विनाशकारी रुद्रावतार आणि त्याचे तांडवनृत्य या दोन्ही संकल्पना मृत स्वरूपात अग्नी दाखवत असतो. जणू निसर्गाचा एक धुंद सोहळाच चालू असतो. अग्नी या प्रलयाचे धुंद स्वरूप असतो, आणि शरीर, लाकडे, धृत आनंदाने या यज्ञात आहुती म्हणून जळत असतात. विधींचे मंत्राग्नी आणि भडाग्नी असे प्रकार असतात असे शास्त्र सांगते. पण मंत्राग्नीही वेगळ्या अर्थाने भडाग्नी होतो इथे!

अग्नी हे वैदिकांचे सर्वार्थशक्तीचे स्वरूप का आहे हे, इथे समजते! निसर्गाच्या त्या रुपापुढे आपण फक्त नतमस्तक व्हायचे असते. आणि केवळ धन्यवाद मानायचे त्या असीम शक्तीला जिच्यामुळे, निसर्गाच्या या शक्तीचा , अशा क्षणीसुद्धा, भावार्थ समजून, शब्दस्वरूपात मांडण्याची शक्ती या बुद्धीला आणि हातांना दिली, म्हणून!

– हर्षद माने

Previous Article

राज्य शासनाच्या उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार २०१७ साठी प्रवेशिका पाठविण्याचे आवाहन: अंतिम दिनांक ३१ जानेवारी २०१८

Next Article

पंढरपूर आणि हज यात्रा…

You may also like